Monday, May 13, 2019

पुरस्कार



महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याची  दखल घेवून राजधानी दिल्लीत दरवर्षी केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांवर एक दृष्टीक्षेप.         





                       फर्स्ट लेडी’  पुरस्कार 
            केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना वर्ष 2018 मध्ये "फर्स्ट लेडी"  सन्मान देऊन गौरविण्यात आले. देशात प्रथमच केंद्रशासनाच्यावतीने महिलांचा अशा नाविन्यपूर्ण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये  महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश होता. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 20 जानेवारी 2018  रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना "फर्स्ट लेडी"  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी  कर्तृत्ववान महिलांना आणि भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला यांना मरणोत्तर "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(हा पुरस्कार वर्ष 2018 मध्ये फक्त एकच वेळा देण्यात आला आहे.)
                                                                                       




 ‘नारी शक्ती’ पुरस्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या देशातील महिला व संस्थांना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी ‘नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. देशाच्या विकासात महिलांच्या योगदान व उपलब्धींचा सन्मान म्हणून केंद्रशासनाच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो . पुरस्कार प्राप्त महिलांचा आदर्श देशवासीयांनी घ्यावा व रचनात्मक कार्य करावे हा या पुरस्कारा मागील उद्देश आहे. प्रत्येक वर्षी 20 फेब्रुवारी रोजी पुरस्कार विजेत्या महिलांच्या नावांची घोषणा करण्यात येते. दरवर्षी जास्तीत-जास्त 30 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रमाणपत्र आणि 1 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही महिला आवेदन करू शकते तसेच व्यक्ती किंवा संस्था ज्या क्षेत्रात कार्य करित असेल त्या क्षेत्राचा किमान 5 वर्षांचा अनुभव असने आवश्यक आहे.

                                      फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार

12 मे हा  फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्मदिन  आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी देशभरातील परिचारिक, परिचारिका आणि परिचारिका सहायक, महिला आरोग्य अभ्यागत यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येतो.
            फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी जगात आधुनिक नर्सिंग सेवेचा पाया रचला म्हणून12 मे हा त्यांचा जन्मदिन जगभर ‘नर्सिंग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून भारत सरकारच्या कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देशातील नर्सिंग सेवेतील महिलांचा उचित सन्मान करण्याच्या उद्देशाने 1973 
पासून फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. 50 हजार रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार
देशातील उदयोग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणा-या महिलांसाठी निती आयोगाच्यावतीने 2016 पासून वुमेम ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार सुरु करण्यात आला. दर वर्षीच्या पुरस्कारासाठी  संकल्पना निश्चित करण्यात येते व त्यानुसार  निती आयोगाकडे देशभरातून आवेदन प्राप्त होतात. विविध चाचण्यांमधून निवडक महिलांची  पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सलग तीन वर्ष या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.
2016 मध्ये जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर निती आयोग, मायगोव्ह(केंद्र शासनाचे अधिकृत वेबपोर्टल) आणि संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील कार्यालय यांनी संयुक्तपणे वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार सुरु केला. विविध उद्योग क्षेत्रात मोलाचे व अव्याहत योगदान देत भारतदेशाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणा-या महिलांच्या कतृत्वाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला. पुरस्कारासाठी देशभरातून ऑनलाईन आवेदन मागविण्यात येतात. ऑनलाईन सर्वेसह अन्य महत्वाच्या चाचणीअंती या पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड करण्यात येते. वर्ष 2017 मध्ये उस्मानाबाद येथील कमल कुंभार, नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर आणि सातारा जिल्हयातील संगीता कांबळे या महाराष्ट्रातील तीन महिला उदयोजिकांना तर वर्ष 2018 मध्ये मुंबई येथील विशबेरी कंपनीच्या सह संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका अग्रवाल यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.                                                               
                                              अंगणवाडी सेविकांना ‘पोषण माह’ सन्मान 

‘पेाषण माह’ या विशेष कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणा-या अगंगणवाडी सेविकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरात  ‘सप्टेंबर  महिना’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. यात अगदी गाव पातळीपासून गरोदरमाता, स्तनदामाता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता , मुलींचे सुपोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी  विषयांवर  पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रिय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.                                                                                   
सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू पुरस्कार
            केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनानिमित्त दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार ’ वितरीत करण्यात येतात. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुंनाही सन्मानित करण्यात येते. विविध 14 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामधील सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुच्या श्रेणीत दिव्यांग महिला खेळाडुंना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 50 हजार रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी महिला खेळाडुंचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सहभाग व कामगिरी लक्षात घेतली जाते. दरवर्षी 15 जून रोजी मंत्रालयाच्यावतीने जाहीरात देवून पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येतात. विविध चाचण्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यात येते. दरवर्षी 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरीत करण्यात येतात.   
                                                                                                         ०००००
संकलन
रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक.
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.






Friday, February 1, 2019

आयुष्यातील पहिल पत्र लिखान



आयुष्याच्या एका वळणावर काही गोष्टींचे सिंहावलोकन करताना आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा हेवा वाटतो. असाच हा प्रसंग. माझे थोरले बंधू मनिष भुयार यांनी कालच वॉटसअप वर मला माझा लहानपणचा फोटो व माझ्या आयुष्यात लिहीलेल पहिल पत्र मला पाठवल.

            माझ गाव माझ कुटुंब सोडून मी मामाकडे आलो. महात्मा फुले माध्यमिकशाळा विहीगाव येथे सहावीत प्रवेश घेतला. एवढया लहान वयात घरापासून लांब राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग (तेव्हा पासून शिक्षण आणि आता नौकरी निमित्त अजूनही घरा पासून लांबच राहतोय). पहिले वहिले पत्र आणि तेही आईला लिहीलेले. 12 वर्षांचा असेल तेव्हा जेमतेम. आयुष्याचा हा पट एकदम मागे घेऊन जाताना थेट मला सहावीत घेवून जातो.

घरचं मोकळपण सोडून मामांकडे शिस्तीत राहणं माझ्यातील बालसुलभ मनाला थोड अवघडच गेल. आजोडी  मला जरी आजी व मामा- मामींकडून  खूप  प्रेम मिळाल चांगली वागणूक मिळाली तरी त्या वयात आईपासून लांब राहण मला फार अवघड गेल. तोच भाव या पत्रातून प्रखरतेने जाणवतो. ‘आई तुझी खूप आठवण येते. पण काय करू देवाने मला पंख सुध्दा दिले नाही.’ हे वाक्य माझ्या मनातील त्यावेळची स्थिती दर्शविते.  माझे मामा शामसुंदर पोटदुखे यांनी सुंदर अक्षरात या पत्रात माझ्या घरचा पत्ता लिहून दिला. यावयात व पुढेही मामांचं  सतत प्रोत्साहणच माझ्या व्यक्तीमत्वाला आकार देत गेल. आजही हा प्रवास सुरु आहे. आपल्यामुळाकडे वळून पाहताना खूप गहीवरून येत असाच हा अनुभव.

                                                           पत्र क्रमांक- २


       
       

लोकराजयच्या जानेवारी २०१९ च्या अंकातील माझा लेख





महाराष्ट्राला यावर्षी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे याजमानपद मिळाले. याचे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या 
लोकराजयच्या जानेवारी २०१९ च्या अंकातील माझा लेख .


Tuesday, December 4, 2018

सन्यस्त अटलजी ; एक संस्मरणीय लेख



या वर्षा अखेरच्या महिन्याच्या पहिल्याच आठवडयात (दिनांक २ डिसेंबर २०१८) मी शब्दांकन केलेला लेख दैनिक लोकसत्ताच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीत प्रकाशित झाला. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या पैलुंचे दर्शन घडविणारा हा लेख अटलजींसोबत ५० वर्षे उन-सावली सारखे राहीलेले त्यांचे स्वीय सहायक शिवकुमार पारीख यांच्या सोबतच्या बातचितीचा आविष्कार आहे. हा लेख संस्मरणीय ठरला व सरत्या वर्षातील उपलब्धी  व येत्या वर्षाचा शुभसंकेतच मी मानतो. संपूर्ण लेख कृपया येथे वाचावा. 





Wednesday, July 4, 2018

जबाबदारी की बेजबाबदारी


          (काही वेळेस आपली चूक आपल्या लक्षात येण आणि जवळच्यांनीही आपल्याला त्याची जाणीव करून देण फार गरजेचे असते) 


युष्याच्या टप्प्यावर आपण वेग-वेगळया जबाबदा-यांचे वहन करीत असतो. त्यात, पती व बापाची भूमिका बजावताना आपण जीवावर उदार होऊ शकतो हा अनुभव आज आयुष्यात पहिल्यांदा घेतला. बायको-मुलासाठी थेट धावत्या रेल्वे गाडीतून उडी मारण्याचा हा अनुभव होता जो, आत्म परिक्षणाची निकड निर्माण करून गेला आणि आपण जबाबदार आहोत की बेजबाबदार हा प्रश्न उपस्थित करून गेला. 


मुळ प्रसंग :-

         आज बुधवार, दिनांक ४ जुलै २०१८ ला  पत्नी सोनाली, मुलगा  स्वरित आणि आकडसासूबाई अनुराधाताई  हे पातालकोट एक्सप्रेस ने  दिल्लीत येणार होते. तब्बल २ महिन्या नंतर पत्नी व मुलाला भेटत असल्याचा प्रंचड आनंद होता तेवढी काळजी ही. सकाळी लवकर उठून या मंडळींना  घ्यायला  दिल्लीतील सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशनवर जायचे नियोजन आदल्या दिवशी ठरले होते, त्यानुसार रात्री झोपी गेलो मात्र काळजी पायी साडेतीन वाजताच जाग आली मग काही झोप येईना. तेवढयात मध्यरात्री सोनालीचा फोन आला, ‘आम्ही बल्लभगडला पोचलो. कदाचित ट्रेन लवकर आहे तर तसे नियोजन कराल !’ त्यानुसार मी सर्व नव्याने नियोजन करायला घेतल. एवढयातच नवीन रूम शिप्ट केली असल्याने सराय रोहिल्ला स्टेशला कस जायच किंवा त्या अगोदर कुठलं स्टेशन लागते ते इंटरनेटवर सर्च केल मग पटेल नगर रेल्वे स्टेशन राहत्या टागौर गार्डन परिसरातून जवळ पडेल तेव्हा तिथेच या मंडळीला उतरावयास सांगावे हे नवे माझेच नियोजन तयार झाले होते. मात्र याला थोडी अडचण अशी होती की पटेलनगरला या रेल्वेचा थांबा नाही मात्र ती अगदी अल्पवेळ थांबते. सोनाली सोबत याविषयी चर्चा झाली व पटेल नगरलाच उतरायचे निश्चीत झाले. ट्रेन रेल्वे स्थानकावर आली. इथे मात्र थोडी चुकामुक झाली. ही  मंडळी  प्लॅट फॉर्मच्या एका बाजुस उतरले व मी दुस-या बाजुला त्यांना शोधत होतो रेल्वे  आता रेल्वे स्थानकाहून निघायला लागली ही मंडळी ट्रेन मध्येच तर नाही ना राहीले असावेत असा विचार करून मी ट्रेन मध्ये चढलो. आता एका एका डब्यात यांना शोधत होतो तेवढयात बायकोचा फोन आला आम्ही तर ट्रेन मधून उतरलो आहोत ! तूम्ही कुठे आहात? अजून इथे दिसत नाहीत. तेव्हां मी ट्रेन मध्ये होतो बायकोला सांगितले तर ती म्हटली पुढील स्टेशनवर ट्रेन थांबल्या नंतर सावकाश उतरा व परत या.  मात्र, पटेल नगर स्टेशन चा परिसर बघता या मंडळीस रेल्वे स्टेशनवर एकटे सोडणे मला खूप असुरक्षीत वाटले . पण आता ट्रेन रूळाहून धावत होती अशात ट्रेनचा वेग कमी होण्याची वाट मी पाहत होतो व ट्रेन मधून उडी मारता येईल का हा विचार करीत होतो. मात्र, मला हिम्मत होत नव्हती . शेवटी खाली छोटे छोटे दगड, छोटीसी वस्ती असे पाहून मी धाडसाने ट्रेनमधून उडी मारली. आता, मात्र मला काहीच कळायला मार्ग नव्हता उडी घेतल्यावर एकाएकी माझ अंग बधीर झाल, पायातील चप्पल बाजुला पडली, आणि रूळाहून रेल्वे पुढे जात होती तेव्हढयात लांबूनच लोक म्हणू लागले, ‘लगा तो नही  भैय्या’ आणि मी ही निरागस पणे त्यांना सांगत होतो अभी कुछ समझ नही आ रहा . मी उठलो मात्र मला चालता येईना पूर्ण अंग अंग दुखू लागल होत आणि माझ्या डाव्या हाताच्या तळव्याला ब-यापैकी खरचटल होतेा व त्यातून रक्त वाहू लागल होत. अशात बायकोला फोन केला तिला सांगीतल तुम्ही तिथेच थांबा मी पोहचतो आहे. आणि अशातही मी रूळाहून धावत होतो  व शेवटी मी माझ्या बायको मुलांजवळ पोहचलो त्यांना घेऊन घरी सुखरूप पोहोचलो.

बेजबाबदारपणा : ज्यांना आधिच नवीन रूम किंवा या  नव्या रेल्वे स्टेशन बद्दल माहित नाही अशा घरच्या मंडळींना पुरेशी कल्पना न देता वेळीच नियोजनात केलेला बदल पूर्णपणे चुकीचा. त्यात चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारण्याचा प्रकार पूर्णपणे निंदणीय व बेजबाबदार कारण, जर का वाईट घडले असते तर? हा पूर्णपणे आपल्या वर निर्भर तसेच  स्वकीयांपुढे चिंता निर्माण करण्याचा आत्मघातकी निर्णय वाटतो.
खुडी जबाबदारी : बायका पोरांसाठी एवढी टोकाची भूमिका घेतली हे थोडया वेळासाठी पटण्यासारख मात्र पूर्णपणे बेजबाबदार वर्तन. 

गेल्या काही वर्षांपासून आमच्या नात्यांमध्ये कर्ते पुरुष जाण्याच्या घटना घडतआहेत. आकडसासुचे पती, ४ वर्षात दोन काकांचा अकाली मृत्यू आणि काल परवा काकुच्या बहीणीच्या पती निधन. या सर्व घटणांमुळे घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबाची किती वाताहत होते आणि नभरून निघणारे नुकसान होते याचा अनुभव ताजा असताना माझ्या बेजबाबदार कृत्याचा पश्चाताप होतो हे मात्र, खरे. या प्रसंगातून खूप मोठा धडा शिकलो व एक जबाबदार मुलगा,पती,बाप,भाऊ म्हणून मी असा प्रकार कधीच करणार नाही हे मनोमन ठरविले आहे.

                                                   ******

Monday, June 11, 2018

दिल्ली,अनुवाद आणि मी



देशाच्या राजधानीत करीअर करण्याचा घेतलेला निर्णय आणि तो प्रत्यक्षात नेण्यासाठी मला माझ्यातील ज्या गुणाची सर्वात ज्यास्त मदत झाली असेल तर तो म्हणजे अनुवाद. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला.’ या संत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या ओळी माझ्यातील अनुवाद कलेसाठी चफकल लागू पडतात. मी काही अनुवादाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल नाही. मात्र, दिल्लीत जगण्यासाठी संघर्षाच्या काळात पोटाचीखळगी भरण्यासाठी अनुवाद क्षेत्रात उडी घेतली. मराठी भाषेतून हिंदी व हिंदीतून मराठी व पुढे पुढे चक्क मराठीतून इंग्रजी अनुवाद करण्याची कला मी आत्मसात केली. चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला. आता हिंदी, मराठी व इंग्रजी या तिनही भाषा संवादाचं माध्यम असून, त्यात आपल्याला लिलया व्यक्त होता येते हा आत्मविश्वास आलाय.



पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येणा-या प्राथिमीकीपासून(एफआयआर)सुरुवात झालेल्या माझ्या अनुवाद कार्यात अनेक यशाची पाने लिहीली गेली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नाशिक येथील व्याख्यानावर आधारित समन्वय का आधार या ३० पानी पुस्तकाचे समन्वयाचा आधार हे पुस्तक अनुवादित केले. दिल्लीतील नामांकीत प्रभात प्रकाशनासाठी दिवंगत राज्यसभा खासदार बाळ आपटे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारे २५० पानांचे मराठी  पुस्तक हिंदी भाषेत अनुवादीत केले त्यासाठी प्रकाशकाने २५ हजार रूपये मानधन दिले. मात्र, त्यांना अनुवादाची क्रेडीट लाईन मागितली होती ती दिली किंवा नाही ते बघायला मिळाले नाही. (हे पुस्तक अनुवादाचे खूप मोठे काम असल्याने व वेळेत दयावयाचे असल्याने माझे मित्र अजित पाटील व मैत्रिण प्रियंका गौतम यांनीही काही पाने हिंदीत अनुवादीत करून दिली होती.). गोईंग टू स्कुलया शिक्षण क्षेत्रात कार्य करणा-या व युनेस्को सोबत जुळलेल्या संस्थेच्या विदर्भातील प्रशिक्षण कार्यावर आधारीत डिव्हीडी कॅसेटचे ट्रान्सक्रिप्शन कार्य, तसेच दिल्ली आयआयटी भागात कार्यरत एक एनजीओ जी युनेस्कोसोबत जुळलेली असून पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पाठयपुस्तके तयार करते या संस्थेने तयार केलेल्या १४ पुस्तकांचे अंतिम संपादन कार्य करण्याचा अनुभव ठसठसीतपणे आजही आठवणीत आहे.
                 श्रीमान सुशीलकुमार शिंदे साहेबांसाठी अनुवाद कार्य
माझ्या उमेदिच्या काळात दिल्लीतील २ कृष्णमेनन मार्ग या तत्कालीन केंद्रीय उर्जा मंत्री व पुढे केंद्रीय गृह मंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांचे निवासस्थान म्हणजे माझ्यातील अनुवादकासाठी एक आधारवडच जणू. साहेबांच्या बंगल्यावर मी कित्तेकदा हक्काने जायचो. येथील खास महाराष्ट्रीय खानसामा व त्याच्या हातची चविष्ट कॉफी कायम स्मरणात राहील या माध्यमातून. श्री. शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या भाषणांचे (इंग्रजी, हिंदी व मराठी) संपादन व कंपायलेशन करण्याचा अनुभवही आनंददायी आहे. याशिवाय शिंदे साहेबांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना शुभेच्छा पत्र लिहीने हा अनुभवही स्मरणीय आहे. शिंदे साहेबांवर एक डॉक्युमेंटरी तयार झालेली त्यासाठी इती पासून ते अथ पर्यंत संपूर्ण संशोधन व लिखानाचे कार्य व सोबतच मराठी व हिंदीतील स्क्रीप्ट लिखानाचे कार्यही केले हा खूप छान अनुभव होता. या ठिकाणी श्री. शिंदे साहेबांच्या विश्वासातील त्यांचे निकटवर्तीय व असीस्टंट पर्सनल सेक्रेटरी श्री. सोमनाथ घोलप यांच्यासोबत हे सर्व अनुवाद व संपादनाचे कार्य मी पार पाडले हे ही नम्रपणे वर्णन करावेसे वाटते.





याशिवाय दिल्लीत एलआयशी व  ग्राहक हक्क न्यायालयात फाइल होणा-या विविध केसेस साठी मराठीतून हिंदी व इंग्रजीत मोठया प्रमाणात अनुवाद केला. माझ्या अनुवादाचा दर सन २००८ ते आज तागायत स्थिर आहे तो म्हणजे मराठीतून हिंदी अनुवादासाठी प्रती पानाचा दर १५० रूपये व इंग्रजी अनुवादाचा दर २०० रूपये. हा दर कायम ठेवण्याचा हेतु हा ही की दिल्ली सारख्या शहरात लोकांना अनुवादाच्या रूपाने मदत करता यावी म्हणजे माझ्यातील अनुवादकाला मी कमी व्यावसायीक व ज्यास्त सामाजिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
पार्श्वनाथ बिल्डर्स या दिल्लीतील नामांकित संस्थेने अहमदनगर जिल्हयात शिर्डी भागात जमीन खरेदी केली होती. हे खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र मराठीत होते व या संस्थेला सर्व कागदपत्र इंग्रजीत करून घ्यायचे होते जवळपास ८० कागदपत्र मी इंग्रजीत अनुवादीत करून दिले, अनुवादाचा दर होता २०० प्रत्येक पान.  अशाच दिल्लीतील एका कॉर्पोरेट कंपनीसाठी फार मोठे काम मी हाती घेतले या कामावर मला स्वत:चा लॉपटॉप घ्यायचा होता, हे ध्येय समोर ठेवून अक्षरष: रात्र रात्र भर काम केल व या कंपनीसाठी केलेल्या कामातून मी फास्ट ट्रॅकची एक मनगटी घडयाळ( किंमत १८०० रूपये) जी अजूनही मी वापरतो, ४ हजारांचा एक नोकिया  फोन व ३५ हजारांचा लॅपटॉप खरेदी केला होता.
           एनसीटीईच्या वतीने स्थापित आयोगावर भाषा सल्लागार म्हणून कार्य
दिल्लीतील आयटीओ भागात राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद’ (एनसीटीई) चे कार्यालय आहे. या कार्यालयातून मला फोन आला, मग काय मी प्रत्यक्ष भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील डीएड व  बिएड विद्यालयांच्या इमारती उभारणीत झालेल्या घोळाचा आढावा घेण्यासाठी देशव्यापी आयोग स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष हे सार्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश श्री. कृष्णा आहेत. देशभरातील जवळपास ६ सीईआरटीचे अध्यक्ष या समितीचे सदस्य होते महाराष्ट्रातील डीएडबीएड महाविद्यालयांच्या जमीन व्यवहारातील घोळाबाबत अचूक माहिती शोधण्यासाठी आम्हाला मराठी भाषा सल्लागार म्हणून तुमची मदत हवी आहे. असे या संस्थेतील वरिष्ठ अधिका-यांनी विनंती केल्यानंतर या कामासाठी मी ही होकार दिला. मग या समितीचे सदस्य मला महाराष्ट्रातील विविध डिएड’, बिएड विद्यायलयांचे खरेदी खत दाखवत त्याबाबत मी त्यांना मराठीतून हिंदी व इंग्रजीत विषय समजावून सांगत असे त्यानुसार ही मंडळी आपसात खलबत करून आप-आपला अहवाल तयार करीत असत. या कामासाठी दररोज ६ तासाच्या कामासाठी २५०० रूपये येण्या-जाण्याचा खर्च दुपारचे जेवन व दोन वेळ हाय टी देण्यात येत असे. केवळ भाषा ज्ञानाच्या जोरावर मला एवढं मोठ कार्य करता आलं. हे कार्य जवळपास ५ दिवस चालले. याकाळात देशातील एससीईआरटीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबात व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांसोबत चर्चा व खलबतांचा अनुभव मला समृध्द करून गेला.
                                दोन दिवसांचा निवासी अनुवाद
        दिल्लीतील एका व्यक्तीचा मुलगा जळगावला शिकायला होता, तिथे त्याला अफिम पिण्याच्या कारणावरून वसतीगृहातून काढण्यात आले असे एक प्रकरण होते. वडीलांचं म्हणन होत की त्याला चुकीच्या पध्दतीने या केस मध्ये फसविण्यात आले. त्या मुलाचे वडील मला भेटायला आले, आपका मोबाईल नंबर मिला है, क्या आप मेरे बेटे पे लगाई गयी मराठी केसेस के बारे में अंग्रेजी मे ट्रान्सलेट करके दोगे?’. असे त्यांनी निरागसपणे विचारले. त्यांची अडचण बघता एका बापाचं दु:खही मला पहावत नव्हत, मी होकार दिला कामाला. मग पुढचे दोन दिवस त्यांनी मला त्यांच्या घरीच निवासी ठेवून घेतलं. मग दोन दिवसात जवळपास ८० मराठी पानांचे मी इंग्रजीत भाषांतर करून दिले. या काळात त्यांनी माझी खूप बडदास्त ठेवली. वेळेवर कॉफी, नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवन, रात्री झोपायचे कपडे पुरविले अशी सर्व व्यवस्था केली त्यांनी. हा ही एक अनुभव मला अनुवादाच्या कलेमुळे मिळाला.
        या शिवाय खूप हाय प्रोफाईल लोकांच्या घटस्फोटाच्या पोलीस केसेसच्या अनुवादाचे कामही केले मी, त्यातून सामाजिक प्रश्नाची भिषणताही कळली. बहुतेक केसेस मध्ये महिलांवरील अत्याचारच दृष्टीपथास येत असे.



                            महाराष्ट्र परिचय केंद्रात हिंदी प्रतिवेदकपदाची कारकीर्द
        सध्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ज्या कार्यालयात मी उपसंपादक म्हणून कार्यरत आहे तिथेच उमेदिच्या काळात मी हिंदी भाषा प्रतिवेदक अर्थात अनुवादक म्हणून कार्य करायचो.(जवळपास वर्षभर) यावेळी या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात येणा-या मराठी बातम्या व लेख राष्ट्रीय प्रसार माध्यमांपर्यंत पोचविण्यासाठी मी याच बातम्या व लेख हिंदीतून अनुवादित करीत असे. इतर काम सांभाळून मी हे कार्य करीत असे. दर तीन महिन्यांनी या कार्यालयासोबत माझ्या कराराचे नुतनीकरण होत असे महिन्याला मला ५ हजार रूपये मानधन मिळत असे.  त्यामुळे मागे वळून पाहताना मज्जा येते.

        एकंदरीतच अनुवाद या कलेतून मला विविध विषय कळले व मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध शब्दांच्या छटा कळल्या. या सर्वांमुळे मला मोठा आर्थिक आधारही झाला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. या कार्यात जमीन व महसुलाबाबतच्या विविध टर्मीनोलॉजी समजून घेताना मला माझे मामा मंडळ अधिकारी श्रीयुत अविनाश पोटदुखे यांची तर माझे मित्र पोलिस निरीक्षक प्रमोद पाचकवडे यांची सुरुवातीच्या काळात खूप मदत झाली. या शिवाय त्या-त्या वेळी त्या-त्या क्षेत्रातील प्रत्येकांशी चर्चा करून मी माझ्याकडून उत्तम अनुवाद होइल व या जबाबदारीला न्याय देवू शकेल याचा पूर्ण प्रयत्न केला. या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणा-या सर्वांचा मी खूप आभारी आहे.
                                                       ०००००००