Monday, August 24, 2015

राजधानीत महाराष्ट्रासाठी महत्वाचे निर्णय


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करारावर झालेल्या स्वाक्ष-या. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री व न्यायाधिशांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील न्यायव्यवस्था गतीमान करण्याचे दिलेले आश्वासन आणि घुमान( पंजाब) येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी नांदेड येथील स्वामीरामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरुगोविंद सिंह अध्यासन सुरु करण्याचे आश्वासन देऊन पंजाब व महाराष्ट्राची मैत्री घट्ट करण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल या राजधानीत राज्याच्यादृष्टीने ठरलेल्या महत्वाच्या घटना. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधी त्रिपक्षीय करारावर दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजी  स्वाक्ष-या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामी पुढाकार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीचा करार दिल्ली येथे करण्यात आला. या करारावर एनटीसीच्या वतीने अध्यक्ष-प्रबंध संचालक श्री. पी. सी. वैश, महाराष्ट्राच्या वतीने निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याची विनंती त्यांना केली. जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर योग्य तारीख निश्चित करून या भूमिपूजन कार्यक्रमाला आपण नक्की येऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी  दिले.
 या करारानुसार केंद्र सरकारच्या मान्यतेने  इंदू मीलची जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या बदल्यात राज्य सरकार या जागेचा मोबदला राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) ला देणार आहे.
केंद्र सरकारच्या मान्यतेने एनटीसी ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार आहे. एनटीसीला दयावयाचा  मोबदला ठरविण्यासाठी आणि हे हस्तांतरण सुरळीत होण्यासाठी अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेत एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत तातडीने पुढील कारवाई होणार आहे.
या करारामुळे या जागेवर मालकी देखील राज्य सरकारचीच राहणार आहे ही उल्लेखणीय बाब आहे.
                       राज्यातील न्यायवस्था गतीमान करणार
केंद्रीय विधी मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित मुख्यमंत्री आणि न्यायाधिशांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची बाजू मांडताना राज्यातील प्रलंबीत खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी न्याय व्यवस्था गतीमान करण्यात येईल असे आश्वासन दिले. या परिषेदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. 
       आश्वासन पूर्ण करण्याकरिता उचलण्यात येणा-या महत्वाच्या पावलांबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी दंडधिका-यापासून जिल्हाधिशांपर्यंत 179 पदे तसेच कर्मचा-यांची 754 पदेनिर्माण करण्यात येतील, उच्चन्यायालयातील न्यायाधिशांची संख्या 75 वरून 94 पर्यंतवाढविण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदी आणि पायाभूतसुविधांना मंजुरी देण्यात येईल, जिल्हा न्यायालयाच्या अधिकारात 25 लाखापर्यंतचे कज्जे येतात ती मर्यादा 1 कोटी रूपयां पर्यंत वाढविण्याचा निर्णय नुकताच राज्याच्या मंत्रीमंडळा ने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या 5 वर्षांसाठी राज्याच्या कायदा व्यवस्थेची योजना मांडताना मुख्यमंत्र्यांनी      सांगितले, राज्यात सध्या विविध न्यायालयात 29 लाख खटले प्रलंबीत आहेत. हे खटले निकाली काढण्यासाठी माहिती व्यवास्थापन पध्दत अवलंबण्यात येईल. गेल्या पाचवर्षांपासून राज्यात महिलाविरोंधात, बालकांविरोधात आणि दुर्लक्षीत समाजातील लोंकाविरोधात न्यायालयात प्रंलंबीत खटले सोडविण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 15 वर्षांपासून प्रलंबीत खटल्यांचा कालावधी 3 वर्षांवर आणण्याचा आमचाप्रयत्न्असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
      राज्यातील न्यायालयीन प्रकरणांच्या जलगती निकालांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगकरत इलेक्ट्रॉनीक फायलींग, नोंदी आणि संदर्भाचा इलेक्ट्रॉनीक साठा, कायद्याच्या कागदपत्रांचे ई-हस्तांतरण करण्यात ेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले .
      राज्यात नागरीक केंद्रीत सेवाप्रदान करणे, न्यायालयीन सूनवणीसाठी आधुनीक तंत्रज्ञानाचा उपयोगकरणे आणि मोबाईल कोर्ट सुरुकरण्यास आपल्या शासनाचे प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.    

       स्वामी  रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरुगोविंदसिंग अध्यासन सुरु करणार

      नांदेड येथील स्वामीरामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरुगोविंदसिंग अध्यसन सुरु करण्यात  येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी संत नामदेवांची कर्मभूमी पंजाब मधील गुरुदासपूर जिल्हयातील घुमान येथील ८८ व्या अखिलभारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या समारोप सोहळयात 
केली. 750 वर्षां पूर्वी महाराष्ट्र आणि पंजाब राज्याच्या सुरु झालेल्या नात्याला घुमान येथील साहित्य संमेलनाने लकाकी मिळाल्याच्या भावनाही मुख्यमंत्र्यानी व्यक्त केल्या. म्हणूनच साहित्य संमलेनाच्या व्यासपिठाहून मुख्यमंत्र्यानी केलेल्या या घोषणेमुळे पंजाब आणि महाराष्ट्राचे नातेवृध्दींगत होण्याच्या दिशेने हा हृद्य सोहळा ठरला.
मुख्यमंत्र्यांनी वाहि गुरुजी का खालसा वाहि गुरुजी की फतह, श्री गुरूग्रंथ साहिब विच जिथे छे गुरु साहिबांना…….’ अशा पंजाबी भाषेत भाषणाला सुरुवात करताच उपस्थित पंजाबी व मराठी साहित्य प्रेमीनी टाळया वाजवून मुख्यमंत्र्यांना उभे राहून अभिवादन केले.  या पुढे नगर पालीका क्षेत्रात नगरपालीके तर्फे बांधण्यात येणा-या गाळयापैकी 1 गाळा मराठी पुस्तकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले . या साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी पंजाबचे मुख्यमंत्री   प्रकाश सिंग बादल यांनी अमृतसर गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यसन सुरु करण्याची घोषणा केली होती.
डिजीटायजेशन युगाशी जुळताना मानवी संवेदना, हुंकार जिवीत ठेवण्याचे आव्हान पेलण्याच्या ताकदिचा आविष्कार व्हावा, त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठीला ज्ञानभाषा बनविण्या साठी प्रयत्नकरावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. नव्या युगाचआव्हान स्वीकारून नव्या पीढीला जोडण्यासाठी प्रयत्नकरण्याची गरज ही त्यांनी बोलून दाखवली. पुढील वर्षी पंजाबसाहित्य संमेलन महाराष्ट्रात घ्यावे असे जाहीर निमंत्रण देत त्यास राज्य सरकार पूर्ण मदत करेल असे श्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  या संमेलनात मांडण्यात आलेल्या ठरावा पैंकी राज्य शासनाशीसंबंधीत ठरावांवर सर्वतोपरी विचार करण्यात येईत तसेच केंद्र शासनाशीसंबंधीत ठरावांबाबत राज्य सरकार पाठपुरावा करेल असेआश्वान ही मुख्यमंत्र्यांनी दिले.                                        
                     महाराष्ट्राचे ब्रॅण्डीग 

संत नामदेव नगरी घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या वतीने महाराष्ट्राची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्मिती करण्याच्या उद्देशाने मेक इन महाराष्ट्र ही पंजाबी भाषेतील पुस्तिका तयार करण्यात आली होती.दस्तुरखुद्द पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी या पुस्तिकेचे प्रकाशन करून कौतुक केले. साहित्य संमेलनास भेट देण्यास येणारे साहित्यप्रेमी, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह ही पुस्तिका पंजाबमध्ये लोकप्रिय ठरली. या शिवाय महाराष्ट्राची प्रगती सांगणारे पंजाबी भाषेतील फलकही साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शन दालनात लोकांचे लक्ष वेधून घेत होते.  

‘शिव आरोग्य सेवेचे’ राजधानीत कौतुक



दिल्लीत पावसाचा जोर.. त्यात आज (दिनांक १३ ऑगस्ट २०१५) 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. पहाडगंज या मध्यवर्ती वस्तीत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा व्हॅल्यूएबल स्टुडियो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार अरविंद सावंत आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन स्टुडिओत सकाळी ८ वाजता हजर. ही मंडळी येथील व्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करीत होते आणि याचवेळी महाराष्ट्रातील मेळघाट या दुर्गम व आदिवासी बहुल भागात सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक पथक आणि मुंबईतील स्टुडिओत तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक हजर होते. या तीनही स्टुडिओंचा परस्परांमधील समन्वय स्वत: मंत्रीमहोदय जातीने बघत होते. ठरल्या वेळेप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डांचा ९.३० वाजता स्टुडिओत प्रवेश झाला. ही सर्व लगभग होती महाराष्ट्र राज्याच्या शिव आरोग्य सेवाया टेली मेडिकल कॅम्पद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याबाबतचे सादरीकरण करण्याची. 

राजधानीत पूर्वीच्या योजना आयोग आणि आता बदललेल्या निती आयोगाकडून राज्याकरिता निधी मागण्यासाठीच्या सादरीकरणाचा मी साक्षीदार. पण, राज्याच्या आरोग्य सेवेतील प्रगतीबाबत स्वत: राज्याचे आरोग्य मंत्री आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्य क्षेत्रातील प्रयोग केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सहभागी करून सादरीकरण करण्याचा हा दुर्मीळ पण राज्याच्यादृष्टीने तेवढाच महत्वाचा प्रसंग. हे सादरीकरण केंद्रीय मंत्र्याना खूपच आवडले आणि त्यांनी शिव आरोग्य सेवेचेतोंडभरून कौतुक केले.

सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्रासाठी शिव आरोग्य सेवाही योजना. आणि टेली मेडिकल कॅम्पद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णावर कशा प्रकारे उपचार करता येतील याचे यशस्वी सादरीकरण. शिव आरोग्य सेवेच्या माध्यातून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे एक क्रांतिकारक पाऊल पुढे टाकले आहे. 
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिव आरोग्य सेवेअंतर्गतथेट प्रक्षेपणाद्वारे टेली मेडिसीनसेवेचे सादरीकरण केले. यावेळी दिल्लीतील स्टुडिओत प्रत्यक्ष केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत तर मुंबई येथील स्टुडीओत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.अवस्थी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निश सावंत, उरोतज्ज्ञ डॉ.ना.म.जोशी या तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू आणि सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजाराने ग्रस्त रूग्ण व त्यावर उपचार करणारे डॉक्टर्स यांचा सहभाग होता.

यावेळी झालेल्या सादरीकरणाप्रसंगी सर्वप्रथम सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात तनजीम शेख रशिद या ८ महिन्यांच्या बालकाची डॉक्टरांनी तपासणीकरून आजाराची पार्श्वभूमी व विविध चाचण्यांबाबत माहिती दिली. त्यानुसार रूग्णाचे वजन कमी असून कुपोषणाची लक्षणे दिसून आले तर बालकाच्या आईचे वजनही कमी असून तिलाही कुपोषण असल्याचे लक्षण दिसून आले. त्यादृष्टीने मुंबई स्टुडीओतील तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी बाळाला सकस पोषण आहार देण्याचा, स्तनपान व परंपरागत आहार देण्याचा सल्ला देत पुढील उपचारांबाबत निर्देश दिले. बाळाच्या आईलाही पोषण आहार देण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर सादरीकरणात वयोवृद्ध महिला मिथान भिसांडरे यांच्या डोळ्याच्या आजाराबाबत निदान व उपचारांबाबत चर्चा झाली. निदानासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे कागदपत्र यावेळी प्रत्यक्ष स्क्रीनवर दिसत होती त्याआधारे तज्ज्ञ डॉक्टर्स सल्ला व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करीत होते. श्री.कृष्णा या वयोवृद्ध रूग्णाबाबत चर्चा झाली. हृदयात सारखं दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. यावेळी सेमाडोह येथील डॉक्टरांना दिल्लीतील स्टुडिओत बसलेल्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि मुंबई स्टुडीयोतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे यांनी रूग्णाच्या छातीला टेथॅस्कोप लावण्यास सांगितला. यावेळी रूग्णाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकायला येत होते. यावरून तज्ज्ञ डॉक्टरांनी निर्देश दिले व रूग्णाच्या इसीजी चाचणीबाबत विचारणा करून तो दाखविण्यास सांगितले. हा रिपोर्ट बघून त्यांनी पुन्हा सेमाडोह येथील डॉक्टरांना रूग्णावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. अर्थात रुग्णाचा रक्तदाब, ईसीजी, सीटीस्कॅन रिपोर्ट, डोळ्याच्या इमेज पाहून त्याचे निदान कसे करता येऊ शकते हे प्रत्यक्षात मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून दिसत होते.
या सादरीकरणादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी डॉक्टर व रूग्णांशी संवाद साधला. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण आणि डॉक्टर्स तसेच मुंबई येथील स्टुडीओत बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली शिव आरोग्य सेवादुर्गम भागातील रूग्णांना संजीवनी ठरली असल्याची प्रशंसा श्री.नड्डा यांनी यावेळी केली. देशातील टेली मेडिसीनकार्यक्रमात शिव आरोग्य सेवेचेमोलाचे आणि सरस योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या कौतुकाच्या थापेने या योजनेला यशस्वी करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व मंत्रीमहोदयांचा उत्साह वाढला आणि या योजनेच्या यशस्वीतेकडे जाण्याचा राजमार्ग प्रशस्थ झाला अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. 
सादरीकरण्याच्यावेळी राज्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशसकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व होते. सर्वश्री खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अरविंद सावंत, कृपाल तुमाने आणि महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन यांची याप्रसंगी उपस्थिती राज्याचा दिल्लीतील आवाज बुलंद करण्यासाठी पुढे आलेल्या नेतृत्वाचे चित्र बघणे उर अभिमानाने भरून आणणारे होते.

रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.

Thursday, April 23, 2015

मरण स्वस्त झालय, अन मानवी भावना ?











मराठी साहित्यात आपल्या लेखनातून मानवी भाव-भावनांचे कंगोरे उलगडून दाखवत साहित्य प्रांतात वेगळी छाप सोडणारे  लेखक आबा बागूल यांच्या 'मरण स्वस्त होत आहे' या साहित्यकृतीची आठवण व्हावी अशीच घटना काल दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी  दिल्लीतील जंतरमंतर येथे घडली. राजस्थान राज्यातील दौसा येथील शेतकरी गजेंद्र सिंह याने भर दूपारी येथील भल्या मोठया निंबाच्या झाडावर चढून आपल्याच दुपटटयाने गळफास लाऊन घेतला. हे घडत असताना त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाची सभा सुरु होती. सभेसाठी आलेले लोक, सतत इथे बंदोबस्तासाठी राहणारे जवळ पास २० ते २५ पुरूष व महिला पोलीस अन वार्तांकन करायला येणारे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा जवळपास १० हजार लोकांसमोर हा आत्महत्येचा थरार घडला. पण एकालाही आपल्या कर्तव्याची  अन माणुसकीची जाणीव  होऊ नये?  म्हणूनच वाटतय मरण स्वस्त झालय अन मानवी भावनांवरही आता  प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे.

                     दिल्लीत पत्रकारीतेसाठी आलो तेव्हाच जंतर मंतर येथे होणारे धरणे आंदोलन बघने, त्याची व्याप्ती समजून घेणे अन वार्तांकन करने हा नित्यक्रम असायचा. आज माझं ऑफीस जंतर मंतरच्याच परिसरात आहे. हा भाग संसद, राष्ट्रपती भवन, आकाशवाणी, पीटीआय, युएनआय, जनतादल (सं.) चे मुख्यालय, केरळ भवन यांना हाकेच्या अंतरावर आणि कॅनॉटप्लेस या दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. संसदेच्या अधिवेशनाच्यावेळी देशाच्या विविध भागातील लोकं आपल्या मागण्या सरकार दरबारी  पोचविण्यासाठी इथे धरणे आंदोलन देतात. यावेळी त्या-त्या भागातील नेते मंडळी संसदेच्या कामकाजा निमित्त दिल्लीत  उपलब्ध असल्याने धरणे आंदोलनात भाषणबाजी ही करतात. धरणे संपले की मग संबंधीत मंत्रालयाच्या मंत्र्याला किंवा सचिवाला भेटून धरणेकरी निवेदन सोपवतात. अन मग त्या निवेदनाचा पाठपुरावा करतात. धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. अन त्यानंतर त्यांना  इथे पोलिस संरक्षणही मिळते. दिल्लीतील  माझ्या वास्तव्यात  जंतर मंतर वरील समाजसेवक अन्ना हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठीचे  आणि निर्भयासाठी झालेले धरणे आंदोलन हे देश-विदेशात पोचल्या‍चे मी बघीतले. यावरून जंतर मंतरचा अन धरणे आंदोलनाचा सहसंबंध आपणास लक्षात आला असावा.
                        माझ्या दिल्लीतील ७ वर्षांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच जंतरमंतर वर आत्महत्येची घटना घडल्याचे बघीतले. पण, ही आत्महत्या एका गरीब शेतक-याची आहे. जी देशातील प्रत्येक मानसाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
                         या घटनेच्या ठिकाणच्या परिस्थितीवर प्रकाश टाकता ते अधिक स्पष्‍ट होईल. याठिकाणी आम आदमी पक्षाची भूसंपादन विषयावरील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठया संख्येने लोक इथे एकत्र झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी  इथे नेहमी प्रमाणे मोठया प्रमाणात पोलिस उपस्थित होते. तसेच, आम आदमी पक्षाच्या रॅलीेचे वार्तांकन करण्यासाठी आलेले प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विशेषकरून इलेक्ट्रॉनीक मिडियाचे कॅमेरामन आणि प्रिंट मिडीयाचे फोटोग्राफर इथे उपस्थित होते अन त्यांच्या देखत राजस्थानातील शेतकरी गजेंद्र सिंह याने गळफास लाऊन आपला जीवन प्रवास संपवला.  इथे अधोरेखीत करावसं वाटतं हा प्रकार घडत असताना ज्या पोलिसांनी खाकी वर्दी  परिधान करताना आपल्या विभागाच्या "शांती सेवा न्याय" या ब्रीदाला जागून कर्तव्य करण्याची शपथ घेतली होती ती पूर्ण न करता   त्यांनी नाकर्तेपणा दाखवला. ज्या 'आम आदमी पक्षाने' आपल्या पक्षाचे नावच सर्व सामान्य माणसाच्या  हितासाठी लढा देऊ या सदहेतुने देत हा पक्ष उभा केला त्याच्या एकाही सदस्याला आम आदमीचा कळवळा आला नाही . शोकांतीका तर त्याही पलीकडे आहे ही रॅली मुळात शेतक-यांच्या मागण्यासंबंधात होती. म्हणजे मुख्यमंत्र्यासहीत अन्य मंत्री व पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित  होते पण एकालाही आपल्या कर्तव्याची जाणीव झाली नाही . सर्वांनी हा आत्महत्येचा थरार घडत असताना भाषणबाजी करण्यात धन्यता मानली. इथे शेतक-यांच्या प्रश्नांची फार कमी जान असलेल्या शहरी तरूण पिढीला आत्महत्या करणारा शेतकरी दिसत असताना हा प्रसंग रोखता आला नाही. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या आत्महत्येच्या प्रत्येक क्षणाचे चित्र टिपत होते. राष्ट्रीय वृत्तपत्र पंजाब केसरी अन दैनिक जागरण चे छायाचित्रकार अनुक्रमे हरी प्रकाश आणि ध्रुव कुमार यांनीही पत्रकारीतेतील नैतिकतेला बगल देत आपल्या बेगडी कर्तव्याला प्राधान्य दिेले. ( Photo & Photo Caption in Punjab Kesari :  पहले पेड पर चढकर किया ऐलान, मोबाइल पर की किसी से बात, लिखा अंतीम पत्र, लगाई फाँसी और फंदे पर झूल गया गजेंद्र)
               हा सर्व वृत्तांत आपल्यापुढे ठेवला त्याच विश्लेषण आपणच करा. अन " मरण स्वस्त झालय अन मानवी भावना ?" या ओळीचाही अंतर्मूख होऊन विचार करा.