Tuesday, January 27, 2015

राजपथाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची शान


शनिवार, २४ जानेवारी, २०१५
देशाच्या राजधानी दिल्लीत दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव दिमाखात साजरे होतात. प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्रता दिन. दोन्हीही उत्सव देशवासियांचे ऊर अभिमानाने भरून यावे या ताकदीचे. प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी राजपथावर (इंडियागेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा जवळपास साडेतीन किमी मुख्य रस्ता) देशाच्या शस्त्रसज्जतेचे व सांस्कृतिक वैविध्यतेतून एकतेचे दर्शन घडवितो. दरवर्षी या कार्यक्रमास बाहेरील देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची परंपरा आहे.

      यावर्षी प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत. त्यामुळे देशाभिमान वाढविणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजपथावरील पथसंचलनात भारताच्या विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी बहुतांश वेळा प्रथम क्रमांक मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
        यावर्षी राज्याच्या वतीने ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचा यावर्षीचा चित्ररथ कसा आहे?, याआधीच्या चित्ररथांची संकल्पना काय होती ? आणि राज्य सरकारकडून चित्ररथासाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावापासून ते राजपथावरच्या पथसंचलनातील सहभागापर्यंतची संपूर्ण प्रकिया काय आहे हे जाणून घेऊ या.

       राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत नौदल, वायुदल आणि सेनेचा बँड आणि सैनिक पथकाचे तसेच विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथाचे पथसंचलन पार पडते. राजपथावरील पथसंचलनात चित्ररथ प्रदर्शनाची सुरुवात १९५२ ला झाली. त्यावेळी फक्त ५ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात वाढ होऊन आतापर्यंत हा आकडा राज्यांचे जवळपास १६ तर विविध मंत्रालयांचे साधारण ६ असे एकूण २२ चित्ररथ असा होता. यावर्षी विविध राज्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता १६ राज्यांचे तर ९ विविध मंत्रालयांचे चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहे. गेल्या ६५ वर्षातील हा एक विक्रमही म्हणता येईल.

       महाराष्ट्राचा चित्ररथ हा ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. वारीत सगळया जाती धर्माचे लोक असतात यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतो. महत्वाचे  म्हणजे भारतात ज्या धार्मिक यात्रा आहेत, त्यापेक्षा पंढरीची वारी ही वेगळी आहे. येथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पिडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो. असा हा निरागस दृष्टीकोण असलेला भला मोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. केवळ ग्लॅमर नसल्याने पंढरपूरची वारी देशाला कळू शकली नाही. म्हणून राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीसमोर लावून धरण्यात आला. अखेर त्यास मंजुरी मिळाली.
    या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे दैवत अन् तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन घडणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 65 कारागिरांनी अतिशय देखणा चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री दाखविण्यात आली आहे. मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर दाखविण्यात आले आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुर्ती बसविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पतका, टाळ-मृदंग, विणेसह वारीत सहभागी 130 वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. या चित्ररथावर ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.... तुला साद आली, तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली...., वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली’ या गीतावर टाळ-मृंदग, वीणेच्या गजरात पंढरीची वारी सादर होणार आहेत. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कलाकारांचा चमू वारीतील सहभागी वारकऱ्यांचे नृत्यप्रकारांचे सादरीकरण राजपथावर करणार आहेत.

राज्याच्या वतीने अशी पार पडते प्रक्रिया 
      महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचालनालयाचे कार्य पार पडते एकुण हे १० टप्पे असतात. देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चित्ररथाबातचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र येते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यसरकारकडून चित्ररथा संदर्भातील प्रस्ताव पाठविला जातो. सप्टेंबर महिन्यात पहिली बैठक यात राज्याला किमान ४ - ५ विषय मांडायला सांगतात. नंतर त्यातील एक विषय निवडतात व त्यावर काम करायला सांगतात. नंतर ऑक्टोबरमधे दोन बैठका होतात यात पहिल्या बैठकीत विषय विस्ताराने मांडायला सांगतात.
      एकुणात तिसऱ्या बैठकीत राज्यातर्फे देण्यात आलेल्या संकल्पनेचे प्रारुप सादर करावे लागते. त्यातील ३-४ प्रारुपांपैकी एक प्रारुप निवडले जाते वा नवीन प्रारुप तयार करण्याच्या सूचना केल्या जातात. निवड समितीमध्ये चित्रपट, साहित्य, चित्रकला, स्थापत्य आदी विषयातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ असल्याने जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत चालणाऱ्या १० ते १२ बैठकांमध्ये राज्यातर्फे आपल्या चित्ररथाबाबत बाजु मांडण्यासाठी वैचारीक वादावादी भांडण होवून अखेर चित्ररथाची प्रतिकृती आणि चित्ररथासोबतच्या कला आविष्काराच्या सादरीकरणास मान्यता मिळते. येथूनच चित्ररथाच्या बांधणी व कला सादरीकरणाच्या तयारीला सुरुवात होते. त्यासाठी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट भागातील राष्ट्रीय रंगशालेच्या शिबीरात चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावाचे काम सुरु होते.

संरक्षण मंत्रालयाकडून चित्ररथास अशी मिळते मान्यता 
        चित्ररथाची निवड करताना नाविन्यपूर्ण विषय, विविध राज्यांतील संस्कृतिचे दर्शन, ईशान्येकडील राज्य व जम्मू आणि काश्मिर राज्याला जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या राज्यातील कला संस्कृति देशबांधवांना कळावी आणि या राज्यांनाही आपण भारत देशाच्या टोकाच्या भागात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना येऊ नये, हा यामागील उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती सांगतात. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने राज्याला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात येते. त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालया तर्फे ११ सदस्यीय समिती नेमण्यात येते. या समितीत संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि कला, दिग्दर्शन, स्थापत्य आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. राज्यांकडून एक ते दीड पानांचा चित्ररथासंबंधीत आलेख मागविला जातो. आपत्तीजनक संकल्पनाना कात्री लावली जाते तर काही संकल्पनांना सुधार करण्याचे निर्देश समितीकडून दिले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेतली जाते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चित्ररथाच्या प्रतीकृतीला मान्यता दिली जाते. निवड समितीची शेवटची बैठक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते याचवेळी चित्ररथांची अंतिम निवड केली जाते.
       पथसंचलनाचा कालावधी बघता एकूण २२ चित्ररथ असावेत याची काळजी घेतली जाते. यात देशातील एकूण २९ राज्यांपैकी १६ राज्यांचे चित्ररथ तर विविध केंद्रीय मंत्रालयाचे ६ चित्ररथ निवडले जातात. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नव्यानेच निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याचा चित्ररथ आणि प्रथमच २५ चित्ररथ आहेत.

 महाराष्ट्राच्या चित्ररथांवर एक दृष्टीक्षेप
     महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाच्या मानासह बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. दर्जेदार चित्ररथाची हिच परंपरा कायम ठेवत यावर्षी 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे.
         महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य की, चित्ररथाची प्रतिकृती त्याची बांधणी आणि सादरीकरणासाठीचे कलाकार हे राज्यातूनच दिल्लीत पाठवले जातात. अन्य राज्यांच्याबाबतीत तसे घडताना दिसत नाही म्हणूनच महाराष्ट्राचा चित्ररथ बहुतांशवेळा पुरस्कार विजेता ठरतो. राज्याच्या वतीने सर्वप्रथम १९७१ मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवार आधारीत चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला. ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ या संकल्पनेवरील १९८० मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. १९८३ मध्ये राज्यातर्फे प्रदर्शित ‘बैल पोळा’ विषयावरील चित्ररथाला सुध्दा प्रथम पारितोषिक मिळाले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. १९८८ मधे राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला’ याला द्वितीय पारितोषीक मिळाले होते. ‘लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषीक मिळवून दिले. २००७ मधे ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तृतिय तर २००९ मधे ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे.
        दर्जेदार चित्ररथाची हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी राजपथावर 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ देशबांधवाचे कौतुक मिळवत प्रथम पारितोषीकावरही आपली मुद्रा उमटेल हा विश्वास आहे.

रितेश मो. भुयार
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र ,नवी दिल्ली.

अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल


गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

Sunday, January 18, 2015

व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राची उद्योग झळाळी…






देशातील व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या वाणिज्य व व्यापार मंत्रालयांतर्गंत कार्य करणाऱ्या व आंतरराष्ट्रीय ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनतर्फे (आयटीपीओ) येथील प्रगती मैदानावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिल्लीच्या मध्यभागी स्थित प्रगती मैदान हा १२३ एकराचा परिसर म्हणजे देश-विदेशातील व्यापारी, पर्यटक, ग्राहकांना भारतातील व्यापार आणि उद्योगाचं एकत्रित दर्शन घडण्यासाठी हे महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. 

भारतीय उपखंडात अगदी सन्मानाने नाव घेतल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे हे ३४ वे वर्ष. देशातील विविध राज्यातील लघु, मध्यम व महिला उद्योजकांना आपल्या उद्योग-वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि त्या त्या राज्याचे खाद्य पदार्थ व संस्कृतीच्या देवाण-घेवाणासाठीचे मोलाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ. 

बी२बी (बिजनेस टू बिजनेस) आणि बी२सी (बिजनेस टू कंज्युमर) या विपणनाच्या महत्वाच्या संकल्पनेची प्रचिती येणारा हा मेळावा. मेळाव्याची यावर्षीची संकल्पना “महिला उद्योजकता” आहे. यात दक्षिण आफ्रिकेला भागीदार देशाचा मान देण्यात आला आहे. यावर्षीचा मेळाव्यातील फोकस देश थायलंड तर फोकस राज्याचा दर्जा दिल्ली राज्याला देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदानावर दरवर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या व्यापार मेळाव्यासाठी कायमस्वरूपी महाराष्ट्र दालन उभारण्यात आले आहे. नोव्हेंबर महिना उजाडण्याआधीच या व्यापार मेळाव्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महाराष्ट्र दालनाकडे आकर्षित करणारे प्रवेशद्वार तयार करणे हे एक जिकिरीचे काम. कुठल्याही राज्याच्या दालनाचे प्रवेशद्वार हे त्यावर्षी मेळाव्यासाठी निश्चित झालेल्या संकल्पनेशी सुसंगत असावे आणि त्या त्या राज्याचे प्रतिबिंब त्यात दिसावे असा एक दंडक असतो. महिला उद्योजकता संकल्पनेला अनुसरून दालनाचे प्रवेशद्वार हे महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचे मोठे कटआऊटस आणि त्याखाली ठळक अक्षरात लिहिलेली ओळ “महाराष्ट्र की रण रागिणीयां” मेळाव्याला भेट देणाऱ्यांना आकर्षित करते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, प्रतिभा पाटील, रोहिणी हट्टंगडी, अनु आगा अशा १५ मराठी महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे वैभव दर्शविणारा पुण्यातील विश्रामबाग वाड्याचा देखावा आणि त्याच्या मधोमध ठळक व सुबक अक्षरात लिहिलेला ‘महाराष्ट्र’ हा शब्द महाराष्ट्राची छाप पाडण्यास पुरे ठरावा. दालनाच्या मध्यभागी एक आई आपल्या चिमुकलीला आकाशी झेप घेण्यासाठी प्रोत्साहित करीत असलेली भली मोठी कास्यची मूर्ती म्हणजे महिलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अग्रेसर असल्याचे प्रतिक आहे.

दालनाच्या तळ मजल्यावर स्टॉल एकवर आपल्या नजरेस पडतो पालघर जिल्ह्यातील सावरेगावाहून आलेले नरसू देवजी दुमडा आणि त्यांची मुलगी रेखा यांचा स्टॉल. येथे आहेत आदिवासी जमातीचा समृध्द सांस्कृतिक वारसा दर्शविणारे तारपा नृत्य, गौरी नृत्य, कांबळी नृत्य आदींचा समावेश असलेली वारली पेंटींग. देश-विदेशातून येथे भेट देणारे पाहुणे लक्षात घेता वारली पेंटिंगने सजलेले टी शर्ट, साडया, टोप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २० वर्षांपासून या उद्योगात असलेले दुमडा हे पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभागी होत आहेत. त्यांनी परिसरातील बचत गटाच्या महिलांना वारली पेंटीगचे प्रशिक्षण दिले. परिणामी या महिला गटाने तयार केलेल्या पिशव्या व अन्य वस्तूंवर वारली पेंटीगचा साज चढला व त्या महिलांच्या उत्पादक वस्तूंना चांगला दर मिळू लागला.

दालनातील स्टॉल पाच हा आपलं लक्ष वेधून घेतो तो दोन महिला उद्योजिकांच्या विशेष कलेनं. त्यातील एक आहेत वैशाली अविनाश रिंगणे ज्यांनी इंटेरियर डिझाइनसाठी लागणाऱ्या वैविध्यपूर्ण वस्तू बनवून स्वतंत्र उद्योग थाटला. दुसऱ्या उद्योजिका आहेत रजनी शिर्के ज्यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या कशिदाकारीला आपला छंद व नंतर जीवन चरितार्थाचे व समाजकार्याचे माध्यम बनवले. कशिदाकारी जीवंत रहावी व या कलेच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे इतरही महिला सक्षम करण्याचे कार्य त्या करताहेत. स्वत: सक्षम झालेल्या शिर्के यांनी किशोरी बचत गट आणि महाविद्यालयीन मुलींना कशिदाकारीच प्रशिक्षण देत त्यांनाही स्वावलंबी बनविले. येत्या २९ नोव्हेंबरपासून इटलीतील मिलान येथे सुरू होत असलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय हस्तकला विक्री प्रदर्शनात शिर्के या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने सहभागी होणार आहेत.

दालनाच्या स्टॉल ९ वर सुंदर, रेखीव-आखीव अशा सतार व तानपुरा आपल्या नजरेस पडतात. आणि हळूच या वाद्यांच्या तारा छेडण्यालाही आपले मन धजावते. तसेच हे आकर्षक वाद्ये दालनास भेट देणाऱ्या देश-विदेशातील कलाप्रेमींना भुरळ घालत आहेत. मिरजेच्या सतारमेकर गल्लीतील मोहसीन रियाज सतारमेकर आणि जुबेर शौकत बेडगे सांगतात, आम्ही पहिल्यांदाच दिल्लीत विक्रीसाठी वाद्य आणली आहेत. मिरजेतील सतारमेकर गल्लीतील संगीत वाद्य बनवणारी जवळपास ५०-६० दुकान आणि आमच्याकडे चालून येणारे कलाप्रेमी यापेक्षा देश विदेशातील कलाप्रेमी स्वत: आपल्या स्टॉलला भेट देवून येथील वाद्यांची माहिती जाणून घेत आहेत. इथे आम्हाला सतार व तानपुरा तयार करून देण्यासाठी ऑडर्सही मिळाल्याचे ते उत्साहाने सांगतात. हे ऐकताना या कलाकार व उद्योजकांचा चेहरा समाधानाने फुलल्याचे पदोपदी जाणवते.

या प्रातिनिधिक स्टॉल्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे व्यासपीठ महत्वाचे ठरत असल्याची प्रचिती येते. या दालनात महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, सिडको, एमसीइडीसह राज्यातील मध्यम उद्योग, लघु उद्योग, राज्याच्या विविध भागातील महिला उद्योग, महिला बचत गट, हस्तकला कारागीर यांचे ८० स्टॉल्स आहेत. यात ९७ महिला उद्योजक सहभागी झाल्या आहेत. 

मराठी पाककला आणि राज्याची संस्कृती प्रदर्शित करण्याचीही मोलाची संधी या मेळाव्यात मिळते. व्यापार मेळाव्याला भेट देणाऱ्या देश- विदेशातील पाहुण्यांना येथील फूड कोर्ट 2 मध्ये स्टॉल क्रमांक 8 वर मराठमोळ्या व्यंजनांचा आस्वाद घेण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुड स्टॉल्सच्या माध्यमातून त्या त्या राज्यांना आपापल्या राज्यातील व्यंजन प्रदर्शित व विक्री करण्याचे व्यासपीठही हा मेळावा ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षी उत्तम व्यंजनांच्या स्टॉल्सची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात येतो. २०१२ साली महाराष्ट्र फुड स्टॉलला सर्वोत्तम व्यंजनाचा प्रथम पुरस्कारही मिळाला होता. 

दररोज सायंकाळी येथील लाल चौक खुला रंगमंचावर व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. यावर्षी व्यापार मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. मुंबई येथील ‘साईकला ग्रुप’ ने ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या वासुदेव, दिंडी या लोककलांच्या सादरीकरणाने उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडेकपारीत राहणाऱ्या ठाकर जमातीचे दर्शन घडविणारे नृत्य, संतांच्या आध्यात्मिक कुटींचा अर्थ उलगडणारे भारूड, श्रीकृष्णाच्या लीलावर आधारित गणगौळण, मल्लखांबाच्या कसरती आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांना आपला उद्योग, कला आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी उपलब्ध होणारे व्यासपीठ व त्याच्या उपयोगीतेची जाण असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केले. केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश महेता, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तारिक फारुकी, खासदार रामदास आठवले, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांची उपस्थितीही या व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे महत्व अधोरेखीत करते. उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास व्यक्त करत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन नवे धोरण आखणार असल्याची ग्वाही देणे हे मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्दिष्ट सार्थक ठरवून जाते.

-रितेश मो. भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

कलाकुसरीतून बनली उद्योजिका



दरवर्षी राजधानी दिल्लीत थंडीची सुरुवात आणि प्रगती मैदानावर आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा हे जोड समीकरण... देशातील विविध राज्यातून येणाऱ्या लघु व महिला उद्योजकांना या मेळाव्यास भेट देणाऱ्या देश विदेशातील ग्राहकांसमोर आपल्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्याची उपलब्ध होणारी नामी संधी... महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या संधीचे अनेक उद्योजक सोनं करताना दिसतात...

प्रगती मैदानावर कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या दालनात यावर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान खास उद्योजकांची भेट होते. त्यांची उद्योग क्षेत्रातील वाटचाल अनुभवता येते. यावर्षी हे व्यापारी मेळाव्याचे ३४ वे वर्ष आहे. या मेळाव्यात यवतमाळ येथील रजनी शिर्के यांची कशीदाकारी कलेच्या माध्यमातून उद्योग उभारणी व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने या मेळाव्यातील त्यांचा सहभाग लक्षणीय ठरत आहे. येत्या महिन्याअखेर इटली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनासाठीची त्यांची निवड देखील त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देते. येत्या २९ नोव्हेंबर पासून इटलीतील मिलान येथे सुरु होत असलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय हस्तकला विक्री प्रदर्शनात रजनी शिर्के या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने तयार केलेल्या महाराष्ट्र दालनात पुणे येथील विश्रामबाग वाड्याची प्रतिकृती असणाऱ्या भव्य प्रवेशदारातून आत प्रवेश करताच दालनाच्या तळ मजल्यावर स्टॉल क्रमांक ५ आहे. येथेच महिला उद्योजिका रजनी शिर्के यांची भेट झाली. या स्टॉलवर १० हजारांपासून ते २ लाख रूपयांपर्यंतच्या कलाकृती बघून आपसूकच त्यांच्या उद्योग वाटचालीबाबत जाणून घ्यावेसे वाटले. सुसंवादी शिर्के यांनी या उद्योगाचा प्रवास उलगडायला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाच्या मार्गदर्शन व प्रोत्साहाने आज स्वत: तयार केलेल्या वस्तू येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात देश-विदेशातील ग्राहकांसमोर शिर्के प्रदर्शित करीत आहेत. स्वत: सक्षम झालेल्या शिर्के यांनी किशोरी बचतगट आणि महाविद्यालयीन मुलींना कशीदाकारीच प्रशिक्षण देत त्यांनाही स्वावलंबी बनविले आहे.

रजनी शिर्के यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या कशीदाकारीला आपला छंद व नंतर जीवनचरितार्थाचे व समाजकार्याचे माध्यम बनविले. गणित विषयात एमएससीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या शिर्के यांनी लग्नानंतर दाराशी चालून आलेली नोकरी नाकारत कशीदाकारी ही अवघड समजली जाणारी कला शिकण्याचा चंग बांधला. यजमान व कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे आज त्यांचा उद्योग नावारूपाला आला. कशीदाकारी ही कला जीवंत ठेवून या कलेच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे इतरही महिलांना सक्षम बनविण्याचा त्यांचा मानस प्रेरणादायी आहे.

विविध प्रकारच्या अनकुचीदार सुई, साजेशे रंगीत धागे आणि विणकामासाठी उपयोगी पडणारी माफक दरातील साधने या कलाकृती तयार करण्यासाठी लागतात, असे शिर्के सांगतात. मात्र कामातील सातत्य आणि संयम यांची गरज प्रतिपादन करताना एक पेंटीग तयार करण्यासाठी ४ महिने लागत असल्याचेही त्या अधोरेखित करतात. घरातील सर्व कामे आटोपून त्या दररोज ५ तास या कामासाठी देतात. स्वत:च्या कामाचा त्यांना योग्य मोबदलाही मिळतो.

ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व या कलेच्या माध्यमातून आपल्यासारख्या अन्य महिलाही स्वावलंबी व्हाव्यात या संकल्पनेने त्यांच्या मनात घर केले होते. मग त्यांनी त्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी महिला बचतगटांप्रमाणेच मुलींचा बचतगट अर्थात किशोरी बचतगटाच्या मुलींना कशीदाकारीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यातूनच या मुलींची आर्थिक बाजू सक्षम व्हायला मदत झाली. शिर्के यांनी यवतमाळ येथील सावित्री-ज्योती समाजकार्य महाविद्यालयातील मुलींनाही ‘कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत कशीदाकारीचे प्रशिक्षण देऊन या कलेकडे व पर्यायाने उद्योगाकडे वळण्यास प्रोत्साहन दिले. मुलींना आर्थिक स्वरूपात कामाचा मोबदला मिळू लागला.

महाराष्ट्र दालनात ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून ९७ महिला उद्योजकांनी यात सहभाग नोंदविला आहे. येथे येणारे ग्राहक दालनाच्या स्टॉल क्रमांक ५ वर रजनी शिर्के यांनी तयार केलेल्या विविध पक्षी, प्राणी, फुले-झाडे, निसर्ग देखावे आणि व्यक्तिरेखांच्या कलाकृती बघण्याबरोबरच त्या विकत घेऊ शकतात. एका महिला उद्योजिकेची जिद्द, त्यास शासनाचे सहकार्य आणि तिची गरुड झेप, असा सकारात्मक बदल अनुभवून मीही कृतकृत्य झालो.
- रितेश मो. भुयार, उपसंपादक

Wednesday, December 31, 2014

लग्न




लग्न

आयुष्याचे वेग-वेगळे वळणं बालपण, तारुण्य, गृहस्थ जीवन आणि म्हातारपण. मी जेव्हां आयुष्याच्या एका वेगळया अर्थात लग्न या टप्प्यावर येऊन पोचलो आणि या टप्प्याला जाणीवपूर्वक सामोरे गेलो तेव्हा स्वानुभवाने लग्न या शब्दाची उकल करावी असा विचार झाला, तेव्हा हा लेखन प्रपंच. काय लिहायचयं हे मला माहित नाही पण, घेतलेल्या अनुभवातून काही तरी छान लिहीलं जाईल हा विश्वास.
    जन्मगांव अचलपूर येथे आई- बाबा, दादा- स्वर्गवासी ताई, मोठी आई- मोठे वडिल आणि त्यांचे मूल-मुली, आजोबा-आजी अशा संयुक्त कुटुंब पध्दतीत गेलेलं बालपण रमनीयचं. बाबांना लग्नात आजोबांनी(आईचे वडिल) दिलेली राजदूत गाडी त्याहून मनसोक्त केलेला प्रवास, आईने सकाळी उठल्या पासून ते झोपेपर्यंत अगदी शिस्तबध्द  व संस्कारी आयुष्याचा घालून दिलेला वस्तूपाठ, आजोबांचा मस्त मिजास स्वभाव आणि त्यातून आपसूक मिळतगेलेलं सामाजिक भानाचे धडे अधून-मधून आजीच्या मायेची पाखर अन यात स्वगृही व स्वग्रामी निघून गेलेलं ५ वी पर्यंतच शालेय शिक्षण. एका अर्थाने सतत घरी वास्तव्य करण्याचा हाच काळ (एका अर्थाने सुवर्णकाळ) परत माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलाच नाही म्हणून हा उल्लेख आवर्जून करावासा वाटला.
    ५ वी नंतरच शालेय शिक्षण आजोळी विहीगांवला. येथून बालपणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात. स्वत:च्या घरापासून लांब राहण्याची ही आयुष्यातील पहिलीच वेळ अन त्या अर्थाने आयुष्यात नात्यांच  महत्व, तडजोडी, जीवन शिक्षण समजून घेण्याचा महत्वाचा टप्पाही म्हणेन मी याला. एक सुंदर घर, आपली माणसं त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम अन शिस्त आयुष्याची मोठी शिदोरी ठरली. विहीगांव या खेडेगांवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक, राजकीय असे बरेच पैलू समजून घेण्यास येथील वास्तव्यात मदत झाली.
    महाविद्यालयीन जीवन हा ही उल्लेखनीय टप्पा म्हणावा लागेल. अंजनगांवसुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालयाचा बीए द्वितीय व तृतीय वर्षाचा विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, युवा महोत्सव, विविध क्रिडा व वक्तृत्व स्पर्धांतील सहभाग आणि त्यातून माझी निर्माण झालेली स्वतंत्र ओळख. अन सोबत-सोबत रितसर धार्मीक शिक्षण घेऊन किर्तणकार म्हणून मिळवलेली पदवी आणि कार्यक्रम करण्यास केलेली सुरुवात, तदनंतर रस्त्याच्याकडेला पालात, आदीवासी वसतीगृहात अन झोपडपट्टीत राहणारे मुल-मुली यांना मोफत शिकविण्याचे कार्य, वयाच्या १८ व्या वर्षांपासून  जन्मदिन आणि गुरुपोर्णिमा हे सामाजिकभान राखत आजतागायत रक्तदानाने साजरा करण्याचा जाणीवपूर्वक राबविलेला उपक्रम हे ही महत्वाचे टप्पे. अमरावती , पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षणपूर्ण करीत असतांना आलेले बरेवाईट अनुभव. अन २००८ मधे दिल्लीत पत्रकारिता क्षेत्रात करीअर करण्यासाठी सुरु झालेली लढाई. अखेर २०१३ मधे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या परिक्षेत दुसराक्रमांक पटकवून शासकीय नोकरी मिळवत दिल्लीतच नोकरीचा श्रीगणेशा करणारा मी. एकेकाळी वयाच्या २८ व्या वर्षी लग्न करण्याची योजना आखणारा मी. वयाच्या एकतीशीनंतर लग्न या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्याला सामोरे जाण्याचं धाडस करून या प्रसंगाला सामोरे जातो.
    आतापर्यंत जगलेलं आयुष्य आता पुढे काय होणार?, आजपर्यंत जपलेल्या आपल्या आवडी-निवडी, विचार, मित्र त्यांच पुढे काय?, दोनाचे चार हात झाल्यानंतर येणार्‍या कौटुंबिक, सामाजिक अशा असंख्य जबाबदार्‍या पेलवता येतील का?, जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणारी मुलगी कशी असेल?  टयूनींग जूळेल का? असे एकानेक प्रश्न. अन समर्पक उत्तर शोधून अन मिळवून घेत हे आयुष्य पूर्वीसारखच सुंदर, सुबक अन व्यवस्थीत असावं हा माझा मानस पूर्ण होण्यासाठीच्या मी ठरवलेल्या योजना पूर्ण होतील का? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत इतर प्रश्नांची उत्तर मिळवू, तूर्तास घडयाळीत पाच वाजत आलेत. लग्न झाल्यानंतर झालेला एक महत्वाचा बदल म्हणजे ऑफीस सूटलं की घरी बायको वाट बघत असेल आता घरी जायला पाहिजे अस वाटनं अन माझी बायको माझी मैत्रीण वाटणं हा होय. बाकीच नंतर लिहीन वेळ मिळेल तसं So its time to say good bye……….
    आज यावर्षीच्या शेवटच्या दिवशी परत हा लेखन प्रपंच पुढे नेतो. मूळ मुदृा लग्न. लग्न जरी एका मुलाचं वा मुलीच होत असलं तरी कुटुंब ,नातेवाईक अन समाज अशा सर्व मान्यता या प्रसंगाला लागतात. मग या मान्यता पूर्ण करण्याकरिता करावयाचे सोपस्कार जसे मुलगा-मुलगी यांच्याकडून पाहणीचा कार्यक्रम ते साखरपुडा अन लग्नापर्यंतची प्रक्रीया ही रुढी, मान्यता(काही अंशी परंपरावदी अन रटाळ)याला चिटकूनच चालते. तिथे मुलगा किती सुशिक्षीत आहे वा नोकरीवर आहे असचं मुलीच्याही बाबतीत सारख्या परिस्थितीत किती काळजी घेतली जातं असावी हे मला अजूनपर्यंत न सुटलेलं कोड आहे जे मी अतिशय जाणीव पूर्वक उदधृत करतोय. दोन अनोळखी व्यक्ती काही पारंपरिक सोपस्कार आटोपून आयुष्याचा नवा डाव मांडतात. ती आणि तो ज्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणात वाढले, त्यांचे भावविश्व हे पूर्णपणे भिन्न मग अशात लग्नकरून स्वीकारलेली जबाबदारी पेलताना सर्व गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार हे निश्चित.पण लग्नाआधीच या अनोळखी व्यक्तींनी उपलब्ध संवाद साधणांद्वारे एकमेकांना समजून घेतल तर निश्चितच सुरुवातीचा एकमेकांना जाणून घेण्याचा काळ तेवढा सुलभ होतो हे मी अनुभवांती सांगू शकतो.
    लग्नावर मोठया प्रमाणात खर्च होणारा पैसा अन झगमगाट याला फाटा देण्याचाच माझ्यासह माझ्या कुटुंबिंयाचाही विचार. त्यानुसार आम्हाला हे साधता आल. तूमच्यावर प्रेम करणारे सच्चे नातेवाईक अन मित्र या नाजूक प्रसंगी तूमच्या जवळ असावे अस वाटण सहाजिक आहे अन ते मला मिळाल याबाबत मी स्वत: खूप आनंदी आहे. आपल चांगल होत हे तुमच्या हितशत्रुंच्या डोळयात खूपत असेल ही शक्यताही नाकारता येत नाही तसं काहीस चित्र आढळून आलं. पण आपल्याला त्याच काय? लोक आपल्याशी कसेही वागूदेत पण आपण आपली माणुसकी सोडायची नाही हा आजपर्यंतचा माझा फॉर्मुलाच यावर रामबाण उपाय ठरला. एकंदरीतच लग्नाच्या प्रसंगाला सामोरे जाताना आई-वडिल व आपल्यावर खर प्रेम करणारे नातेवाईक अन मित्र यांच्या साक्षीने जीवनाच्या नवीन टप्प्याला सामोरे जाताना तेवढं टेंशन नाही वाटतं. आपल चांगल होण्यासाठी त्यांना सतत असणारी तळमळ एक सुखद आंनद अन आत्मविश्वास देवून जाते. तुमचा जोडीदार सुशिक्षीत अन समुजदार असेल तर लग्नानंतरच नवरा बायकोच नात जगण्याचं आलेल अप्रत्यक्ष टेंशन आणखी हलकं होतं हाही माझा अनुभव.
    लग्न या विधिच्या पुढे अन मागे अस सर्व गोष्टींना वेळ देण्यासाठी लागणारा कालावधी हा १ महिन्याचा असणे अतिशय योग्य होत पण १८ दिवस सुटी उपभोगून १३ दिवस आधिच ऑफीस जॉईन करण्याचा मधेच आलेला क्रायसीसही उल्लेखनीय. एरवी महाविद्यालयीन जीवनापासूनच क्रायसीसमधे योग्यरितेने जबाबदारया पार पाडणारा मी यावेळीही विचलीत न होता सर्व गोष्टींना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होतो. मात्र बायकोला तिच्या अन मला माझ्या आई वडिलांना पुरेसा वेळ न देण्याचं शल्य आहेच. पण नोकरी अन त्याला जोडून आलेल्या शक्य शक्यता सांभाळून आम्हा उभयतांच्या कुटुंबियांनी आम्हाला समजून घेण्याच दाखवलेल धाडसही आमचा आत्मविश्वास वाढवून गेला.

    सुंदर आयुष्य जगायला लागत तरी काय. सुंदर मन, एकमेकांना समजून घेण, अन एकमेकांचा आदर करण त्यातूनच आपल जीवन सुंदर होत जात अन आयुष्यातील लग्न हा टप्पाही सुरळीत पार पडून त्यानंतर येणार आयुष्य सुखर होत असा माझा समज यापुढे तो प्रत्यक्ष अनुभवताना काय होत ते बघुया तुर्तास येथे लिखानास विराम देतो.                           

Saturday, May 31, 2014

राजधानीत मी पाहिलेले गडकरी



राजधानी दिल्लीत आलो. राजकीय पत्रकारितेतील बर्‍याच बारिक सारिक गोष्टींचा गुंता आणि त्यातून जन्माला येणारी बातमी अस सर्व जाळ समजून घेत असतानाच दिल्लीत मराठी माणूस देशातील दुसर्‍या क्रमांकाचा राजकीय पक्ष असणार्‍या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि नंतर केंद्रात मंत्री होतो. ती मराठी व्यक्ती आहे नितीन गडकरी. दिल्लीत त्यांनी दोन मोठया पदाचा पदभार स्वीकारतानाचा मी साक्षीदार आहे. आज मी पाहिलेल्या गडकरींबदृल लिहाव अस वाटल आणि हा लेखन प्रपंच.
      वर्ष 2009 सायंकाळची वेळ साधारणत: नोव्हेंबरचा महिना भाजपचे मुख्यालय 11, अशोक रोडलाच लागून असलेले अरूण जेटली यांचे 9 , अशोक रोड वरिल निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसोबत भाजपच्या नेत्यांच्या खलबती सुरु होत्या. सर्वांना या बैठकीत काय चर्चा सुरु असेल याची चुणुक लागली होती. बराच वेळ लोटल्यानंतर सायंकाळच्या वेळेस रामलाल हे भाजपचे तत्कालीन खजीनदार आणि संघाचे विश्वासू बाहेर आले त्यांच्या पाठोपाठ एक व्यक्ति बाहेर आली. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली भाजपचे अध्यक्ष म्हणून तूमच नाव पुढे येत आहे त्यावर उत्तर होत मै पार्टी का एक मामुली कार्यकर्ता हू दिवारों पर पोस्टर चिपाकाने का काम करते करते पार्टी में आगे बडा महाराष्ट्र में pwd मंत्री के तौर पे काम करने का मौका मिला. नाही मै इस से पहले कभी ज्यादा दिल्ली में आया हू . तो मुझे दिल्ली की आदत नही है. ना मुझे यहा की राजनिती से ज्यादा ताल्लूक रहा. त्यांच्या या उत्तराने ते भाजपचे अध्यक्ष होतील आणि ते यशस्वीपणे आपला कार्यकाळ पार पाडून दिल्लीवर छाप सोडतील अस वाटलही नव्हत. पण बातमी लिहायची होती म्हणून दिसत्या परिस्थितीवर बातमी लिहीली.
      पुढे डिसेंबर 2009 मध्ये भाजपचे अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी 9, अशोक रोड वर पत्रकारांसमोर केलेले वक्तव्य सतत 3 वर्ष देशभरातील विविध भाषणातून ऐकायला मिळाले. पत्रकारांकडून त्यांच्यावर होत असलेली शेरेबाजी अण पक्ष मुख्यालयातील कर्मचारी नेत्यांचा आडमुठेपणाचे वागणे नी बोलणे मी स्वत: बघीतले होते, पण गडकरींनी आपल्या कतृत्वातून या सर्वांची तोंड बंद केली.  त्यांच्या कार्यकाळात भाजपात अनेक प्रकोष्ठ (सेल) सुरु केलेत त्यांनी पक्षातील तज्ज्ञ नेत्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेत काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार विरोधात 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोलगेट घोटाळा आदींसह विविध घोटाळयांची माहिती बाहेर काढून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी गतीमान केले. तर दुसरीकडे भाजप पक्षसंघटनेत नवी उर्जा निर्माण केली. त्याचे सुपरिणाम पक्षाला मिळालेच आणि देशानेही बघीतले त्यामुळे केवळ महाराष्ट्रात ओळख असणारे गडकरी हे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय नेते झाले.
      गडकरींचे स्थान भाजपमध्ये कमालीचे वाढले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही ते आता महत्वाची भूमिका बजावू लागले. वर्ष 2014 मध्ये पक्षाने त्यांना नागपूर या गृह जिल्हयातून खासदारकीची उमेदवारी दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ त्यांनी सर करत 2 लाख मताधिक्याने विजय मिळवला. आता केंद्रात भाजपला 282 च्या जादुयी आकडयाच्या मताधिक्याने भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या मंत्रिमंडळात गडकरी मंत्री झाले. खात मिळाल दळणवळण, नवनवन व राजमार्ग मंत्रालाय.

      त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा आणि आता केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा एक साम्य मी अनुभवले. ते म्हणजे गडकरींची अर्धांगिणी कांचनताई गडकरी आणि मुलगी केतकी हया यावेळी आवर्जून उपस्थित असणं, नी, गडकरींच मीशन ईगव्हर्नन्स राबवू आणि पारदर्शी कारभार करू हे ठाम व तितकचं आत्मविश्वासानं प्रसार माध्यमां समोर प्रतिपादन करणं Hats up गडकरी जी.

Tuesday, March 4, 2014

शासकीय नोकरीतील एक वर्ष : ‘एक सिंहावलोकन’



शासकीय नोकरीतील एक वर्ष : एक सिंहावलोकन
(माझ्या लॅपटॉपवर काही शब्द उमटत नसल्याने या पोस्टमधे व्याकरणीक चुका झाल्याचे आपणास जाणवेल त्यासाठी क्षमस्व, पण कधी-मधी वेळ मिळताच त्या चुका दुरुस्त करेल.)
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2014 ला आम्ही कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. रात्री मस्त पु.लं. चे नाटक अंतु बर्वाअण नारायण बघीतले. उद्या सकाळीच ऑफीस असल्यानं झोपण्याकडे मोर्चा वळवला. आज झोप येईना. वीजांचा कळकळाट होतोय, पाऊस सुध्दा सुरु झालाय अण झोपायचा प्रयत्न करतोय. पण, कसली मेली झोप यायच नाव नाही. मग मला आठवल मी माझ्या ब्लॉगवर लिहीलेली पहिली पोस्ट(माझ्या आठवणीतील पाऊस) सुध्दा अशाच 2009 च्या एका मध्यरात्री दिल्लीत कोसळलेल्या पावसाच्या वातावरणात लिहीली होती.  आज नेमकं तसच वातावरण आहे पण, वर्ष 2014 अण दिल्लीत पत्रकारिता व नोकरी करण्यासाठी सुरु झालेल्या तत्कालीन प्रवासाला आता योग्य वळण लागलय.‍ या शहरात 5 वर्ष पत्रकारितेच्या विविध प्रांतात मुक्त संचार केल्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत माझ्या आवडत्या व्यवसायात स्थीर झालो. मी शासकीय नोकरीत येवून 18 फेब्रुवारी 2014 रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झाल. तेव्हा या कालावधीचे सींहावलोकन हा विषय निवडलाय मी. Sorry , बर का ! थोड अपडेट करतो तुम्हाला. घडयाळीत रात्रीचे 1 वाजले आहेत. आता पावासाचा अण वारयाचाही जोर वाढलाय, वीजांचा कळकळाट अण गारपीटही होत आहे भोवताली.  
       या एक वर्षात यापूर्वी सरकारवर सतत ओरखडे ओढणारा मी, सरकारी पध्दतीची बातमी लिहायला शीकलो. बातमी लिहीताना बातमीतील अचूक आकडेवारी, वक्त्यांचे कोट असणे गरजेचे असते. बातमी उशीरा गेली तरी चालेल पण, ती अचूक असावी कारण आपण देत असलेली माहिती ही शासनाचा भरवशाचा स्त्रोत म्हणून ओळखली जाते याच महत्व प्रकर्षाने पटल. बातमी संदर्भात या एक वर्षाच्या काळात घडलेल्या 2 चुका अण त्यासाठी झालेली ‍शीक्षा हे आधी प्रांजळपणे कबुल करतो. पण त्यात पूर्णपणे मी दोषी नसल्याच वास्तवही कथन करतो. उत्तराखंडमध्ये 2013 च्या जून महिन्यात आलेली नैसर्गीक आपत्ती अण आमच्या कार्यालयाने यावेळी उत्तराखंडतून परतलेल्या अण महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही जाण्यासाठी आतुर असणारया भावीकांसाठी दिल्लीत सुरु केलेल्या मदत समन्वय कक्षातील कामाचा वेगळा अनुभव. त्यातही प्रसारमाध्यमांना अचूक माहिती पुरवणे अण मदत समन्वय कक्षाच्या कार्याच्या प्रसिध्दीची धुरा सांभाळण्याचा अनुभव वेगळाच. तसेच, आमच्या कार्यालयातर्फे महाराष्ट्राच्या पश्चीम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खांदेश, मराठवाडा या भागातील पत्रकारांसाठी आयोजित दिल्ली अभ्यास दौरयात समन्वयक अण प्रसीध्दीची धुरा सांभाळण्याचा अनुभव उल्लेखनीय ठरला. हित शत्रुंच्याही नव्याने ओळख्या झाल्या. पण, या नोकरीमुळे स्वत:च वेगळ स्थान निर्माण केल्याचा क्षण व त्यामुळे जन्मदात्या आई –वडिलांच्या चेहरयावर झळकत असलेल्या आंनदातून डोळे सूखावून जातात.   (घडयाळीत मध्यरात्रीचे अडिच वाजलेत. पाऊस पूर्णपणे थांबलाय. अण जोराची झोप येतीय मला. उर्वरीत भाग पूर्ण करेल वेळ मिळताच)
                शासकीय नोकरीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ पत्रकार अण कथाकार अशोक थोरात यांना 19 फेब्रुवारी 2013 ला मराठीतील साहितयिक योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळणार होता. लगेच त्यांना गाठल अण मुलाखत केली, नी झाली सुरुवात नोकरी नी कामाला.‍ दिल्लीतच पत्रकारिता केली असल्यानं पत्रकारांच मन, त्यांचे बलस्थान, त्यांच्या अडचणी-मागण्या अण पत्रकारितेचा ground चा असलेला अभ्यास अण ज्या कार्यालयात नोकरी करतोय तेथील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी अण वातावरणाशी familiar असल्यान सुरुवात जोरात झाली. पण, माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेल्या फळामुळे पत्रकारितेतील काही हीत शत्रूंच्या अण संपर्कातील सभ्यतेचा मुखवटा घालून मीरवणारया हीत शत्रूंचाही जवळून परिचय झाला. त्याचा एक किस्सा मुददाम सांगतो. माझं selection ही व्हायच होतं तेव्हा, एकाने मी दिल्लीत येईल अण त्याच महत्व कमी होईल या विचाराने घाबरून मला सल्ला दिला तू कामासाठी मुंबईच कार्यक्षेत्र माग, त्याचा तूला फायदा होईलत्यावर संबंधीताला मी उत्तर दिल, अजून selection प्रक्रीयेतील टप्पे बाकी आहेत. मी लेखी परिक्षाच उत्तीर्ण झालोय. बघू पुढच पुढे, अण राहिला प्रश्न कुठे काम करायचा? तर मी कुठेही काम करू शकतो तेवढा आत्मविश्वास आहे मला. मग काय सर्व हीत शत्रूंचे चेहरे समोर येत गेले पण त्याचा अंदाज घेत त्यास कस सामोर जायच याची रणनिती करण्याच कसब हळू हळू  शिकतोय त्यात मनस्वी अण हीत चिंतकांची खूप मदत होतीये.      
 उपलब्धी :
1)      आई वडिलांच्या चेहर्‍यावर आनंद. दिर्घ काळाच्या मेहनतीला आलेल फळ.
2)      महाराष्ट्र सदनात स्थापीत उत्तराखंड मदत समन्वय कक्षात 24x7 काम करण्याच्या अनुभवातून सरकारी नोकरीत मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात रमून समाजाची उत्तम सेवा करू शकता हा ‍विश्वास आला. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारयांचा मेहनतीचा अण कौशल्याचा जवळून परिचय झाला.
3)      दिल्ली अभ्यास दौरयासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातून येणार्‍या पत्रकारांकडून तेथील सामाजिक, राजकिय, ‍आर्थीक व संस्कृतीक  स्थीती त्यांच्य नजरेतून समजता आली. त्यांच्याशी मैत्री झाली अण नवा जनसंपर्क वाढला. दौरयाचा समन्वयक अण प्रसिध्दीची जबाबदारी मीळाल्याने स्वत:ला सीध्द करण्याची संधी मिळाली.
4)      फण-फणत्या तापात अण विपरीत वातावरणात स्वत: फिल्ड वर जावून दिवसाला 3-3 बातम्या करण्याचा अनुभव स्वत:तील मेहनतीचा टेम्पो कायम असल्याचा आत्मविश्वास दूनावून गेला.
5)      कार्यालयातर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन या व्यतिरीक्त गावाकडे गेल्यावर विविध शाळा, महाविद्यालये, धार्मिक आयोजन,सामाजिक संस्थांमध्ये भाषण, डॉक्युमेंटरी, व्याख्यानाच्या माध्यमातून नोकरीतील 1 वर्षाच्या काळात आत्मविश्वासाने केलेल काम.