
देशातील व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या वाणिज्य व व्यापार मंत्रालयांतर्गंत कार्य करणाऱ्या व आंतरराष्ट्रीय ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनतर्फे (आयटीपीओ) येथील प्रगती मैदानावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिल्लीच्या मध्यभागी स्थित प्रगती मैदान हा १२३ एकराचा परिसर म्हणजे देश-विदेशातील व्यापारी, पर्यटक, ग्राहकांना भारतातील व्यापार आणि उद्योगाचं एकत्रित दर्शन घडण्यासाठी हे महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे.
भारतीय उपखंडात अगदी सन्मानाने नाव घेतल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे हे ३४ वे वर्ष. देशातील विविध राज्यातील लघु, मध्यम व महिला उद्योजकांना आपल्या उद्योग-वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि त्या त्या राज्याचे खाद्य पदार्थ व संस्कृतीच्या देवाण-घेवाणासाठीचे मोलाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ.
बी२बी (बिजनेस टू बिजनेस) आणि बी२सी (बिजनेस टू कंज्युमर) या विपणनाच्या महत्वाच्या संकल्पनेची प्रचिती येणारा हा मेळावा. मेळाव्याची यावर्षीची संकल्पना “महिला उद्योजकता” आहे. यात दक्षिण आफ्रिकेला भागीदार देशाचा मान देण्यात आला आहे. यावर्षीचा मेळाव्यातील फोकस देश थायलंड तर फोकस राज्याचा दर्जा दिल्ली राज्याला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदानावर दरवर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या व्यापार मेळाव्यासाठी कायमस्वरूपी महाराष्ट्र दालन उभारण्यात आले आहे. नोव्हेंबर महिना उजाडण्याआधीच या व्यापार मेळाव्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महाराष्ट्र दालनाकडे आकर्षित करणारे प्रवेशद्वार तयार करणे हे एक जिकिरीचे काम. कुठल्याही राज्याच्या दालनाचे प्रवेशद्वार हे त्यावर्षी मेळाव्यासाठी निश्चित झालेल्या संकल्पनेशी सुसंगत असावे आणि त्या त्या राज्याचे प्रतिबिंब त्यात दिसावे असा एक दंडक असतो. महिला उद्योजकता संकल्पनेला अनुसरून दालनाचे प्रवेशद्वार हे महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचे मोठे कटआऊटस आणि त्याखाली ठळक अक्षरात लिहिलेली ओळ “महाराष्ट्र की रण रागिणीयां” मेळाव्याला भेट देणाऱ्यांना आकर्षित करते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, प्रतिभा पाटील, रोहिणी हट्टंगडी, अनु आगा अशा १५ मराठी महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे वैभव दर्शविणारा पुण्यातील विश्रामबाग वाड्याचा देखावा आणि त्याच्या मधोमध ठळक व सुबक अक्षरात लिहिलेला ‘महाराष्ट्र’ हा शब्द महाराष्ट्राची छाप पाडण्यास पुरे ठरावा. दालनाच्या मध्यभागी एक आई आपल्या चिमुकलीला आकाशी झेप घेण्यासाठी प्रोत्साहित करीत असलेली भली मोठी कास्यची मूर्ती म्हणजे महिलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अग्रेसर असल्याचे प्रतिक आहे.
दालनाच्या तळ मजल्यावर स्टॉल एकवर आपल्या नजरेस पडतो पालघर जिल्ह्यातील सावरेगावाहून आलेले नरसू देवजी दुमडा आणि त्यांची मुलगी रेखा यांचा स्टॉल. येथे आहेत आदिवासी जमातीचा समृध्द सांस्कृतिक वारसा दर्शविणारे तारपा नृत्य, गौरी नृत्य, कांबळी नृत्य आदींचा समावेश असलेली वारली पेंटींग. देश-विदेशातून येथे भेट देणारे पाहुणे लक्षात घेता वारली पेंटिंगने सजलेले टी शर्ट, साडया, टोप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २० वर्षांपासून या उद्योगात असलेले दुमडा हे पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभागी होत आहेत. त्यांनी परिसरातील बचत गटाच्या महिलांना वारली पेंटीगचे प्रशिक्षण दिले. परिणामी या महिला गटाने तयार केलेल्या पिशव्या व अन्य वस्तूंवर वारली पेंटीगचा साज चढला व त्या महिलांच्या उत्पादक वस्तूंना चांगला दर मिळू लागला.
दालनातील स्टॉल पाच हा आपलं लक्ष वेधून घेतो तो दोन महिला उद्योजिकांच्या विशेष कलेनं. त्यातील एक आहेत वैशाली अविनाश रिंगणे ज्यांनी इंटेरियर डिझाइनसाठी लागणाऱ्या वैविध्यपूर्ण वस्तू बनवून स्वतंत्र उद्योग थाटला. दुसऱ्या उद्योजिका आहेत रजनी शिर्के ज्यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या कशिदाकारीला आपला छंद व नंतर जीवन चरितार्थाचे व समाजकार्याचे माध्यम बनवले. कशिदाकारी जीवंत रहावी व या कलेच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे इतरही महिला सक्षम करण्याचे कार्य त्या करताहेत. स्वत: सक्षम झालेल्या शिर्के यांनी किशोरी बचत गट आणि महाविद्यालयीन मुलींना कशिदाकारीच प्रशिक्षण देत त्यांनाही स्वावलंबी बनविले. येत्या २९ नोव्हेंबरपासून इटलीतील मिलान येथे सुरू होत असलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय हस्तकला विक्री प्रदर्शनात शिर्के या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने सहभागी होणार आहेत.
दालनाच्या स्टॉल ९ वर सुंदर, रेखीव-आखीव अशा सतार व तानपुरा आपल्या नजरेस पडतात. आणि हळूच या वाद्यांच्या तारा छेडण्यालाही आपले मन धजावते. तसेच हे आकर्षक वाद्ये दालनास भेट देणाऱ्या देश-विदेशातील कलाप्रेमींना भुरळ घालत आहेत. मिरजेच्या सतारमेकर गल्लीतील मोहसीन रियाज सतारमेकर आणि जुबेर शौकत बेडगे सांगतात, आम्ही पहिल्यांदाच दिल्लीत विक्रीसाठी वाद्य आणली आहेत. मिरजेतील सतारमेकर गल्लीतील संगीत वाद्य बनवणारी जवळपास ५०-६० दुकान आणि आमच्याकडे चालून येणारे कलाप्रेमी यापेक्षा देश विदेशातील कलाप्रेमी स्वत: आपल्या स्टॉलला भेट देवून येथील वाद्यांची माहिती जाणून घेत आहेत. इथे आम्हाला सतार व तानपुरा तयार करून देण्यासाठी ऑडर्सही मिळाल्याचे ते उत्साहाने सांगतात. हे ऐकताना या कलाकार व उद्योजकांचा चेहरा समाधानाने फुलल्याचे पदोपदी जाणवते.
या प्रातिनिधिक स्टॉल्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे व्यासपीठ महत्वाचे ठरत असल्याची प्रचिती येते. या दालनात महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, सिडको, एमसीइडीसह राज्यातील मध्यम उद्योग, लघु उद्योग, राज्याच्या विविध भागातील महिला उद्योग, महिला बचत गट, हस्तकला कारागीर यांचे ८० स्टॉल्स आहेत. यात ९७ महिला उद्योजक सहभागी झाल्या आहेत.
मराठी पाककला आणि राज्याची संस्कृती प्रदर्शित करण्याचीही मोलाची संधी या मेळाव्यात मिळते. व्यापार मेळाव्याला भेट देणाऱ्या देश- विदेशातील पाहुण्यांना येथील फूड कोर्ट 2 मध्ये स्टॉल क्रमांक 8 वर मराठमोळ्या व्यंजनांचा आस्वाद घेण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुड स्टॉल्सच्या माध्यमातून त्या त्या राज्यांना आपापल्या राज्यातील व्यंजन प्रदर्शित व विक्री करण्याचे व्यासपीठही हा मेळावा ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षी उत्तम व्यंजनांच्या स्टॉल्सची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात येतो. २०१२ साली महाराष्ट्र फुड स्टॉलला सर्वोत्तम व्यंजनाचा प्रथम पुरस्कारही मिळाला होता.
दररोज सायंकाळी येथील लाल चौक खुला रंगमंचावर व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. यावर्षी व्यापार मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. मुंबई येथील ‘साईकला ग्रुप’ ने ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या वासुदेव, दिंडी या लोककलांच्या सादरीकरणाने उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडेकपारीत राहणाऱ्या ठाकर जमातीचे दर्शन घडविणारे नृत्य, संतांच्या आध्यात्मिक कुटींचा अर्थ उलगडणारे भारूड, श्रीकृष्णाच्या लीलावर आधारित गणगौळण, मल्लखांबाच्या कसरती आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांना आपला उद्योग, कला आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी उपलब्ध होणारे व्यासपीठ व त्याच्या उपयोगीतेची जाण असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केले. केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश महेता, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तारिक फारुकी, खासदार रामदास आठवले, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांची उपस्थितीही या व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे महत्व अधोरेखीत करते. उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास व्यक्त करत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन नवे धोरण आखणार असल्याची ग्वाही देणे हे मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्दिष्ट सार्थक ठरवून जाते.
-रितेश मो. भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.




++Ritesh+Bhuyar+One+Page+scan++30.10.2013.jpg)