(22 जुलै 2019 रोजी मला दिल्लीत येऊन 11 वर्ष
पूर्ण झालीत या पार्श्वभूमीवर हा लेखन प्रपंच)
दिल्ली, देशाची
राजधानी. मोगल, इंग्रज आदी सत्तांनी भारत देशावर राज्य करताना याच शहराला राजधानी
म्हणून पसंती दिली. आज स्वतंत्र भारतातही राजधानी म्हणून या शहराचं महात्म्य कायम
आहे. देशाचे राजशकट चालविणा-या या
शहरात विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व आहे तसे ते महाराष्ट्राचेही आहे. या शहारात माझ्या वास्तव्याला 22 जुलै 2019 रोजी तब्बल अकरा वर्ष पूर्ण झाली
करीअरसाठी या शहरात
आलो त्यात यशही संपादन केलं, खूप शिकायला मिळालं शिकतही आहे. या शहरातील माझ्या
वास्तव्यात महाराष्ट्र व मराठीच्या वैविध्यपूर्ण व सकारात्मक खूणा दिसून आल्या, त्याचा घेतलेला हा धांदोळा.
दिल्लीत मराठी माणसांना
भाडयाने घर घेण्यास अजिबात अडचण जात नाही हे माझं निरीक्षण प्रथमत: नोंदवतो. महाराष्ट्राचं देशातील महत्वाच स्थान आणि मराठी संस्कृतिच्या
पुण्याईवर लगेच दिल्लीकर भाडेकरून म्हणून तुम्हाला स्विकारण्याचं शुभकार्य पार
पाडतात. केंद्र सरकारमधील मराठी मंत्री आणि त्यांनी सिध्द केलेले कर्तृत्व, देशाच्या
पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मान मिळविणा-या महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई
पाटील, भाजपाचे पहिले मराठी अध्यक्ष ठरलेले केंद्रातील विद्यमान मंत्री नितीन
गडकरी यांच्या रूपाने मराठी माणसांचे सर्वोच्च नेतृत्व दिसून माझ्या दिल्लीतील
वास्तव्यात दिसून आले. तर केंद्रात मंत्रीपद भूषवित असतानाच अचानक काळाने घाला
घातल्याने दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे या लोकनेत्यांना
दिल्लीकर मराठी जणांनी साश्रू नयनांनी निरोप दिल्याचा दु:खद अनुभवही पाठीशी आहे .
भ्रष्टाचार विरोधी
आंदोलनाचा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा एल्गार आणि देश व जगात गेलेला
त्यांचा डंका व दिल्लीत झालेला राजकीय
सारीपाटावरील बदल आणि त्यामुळे राज्याचा
सामाजिक ठसा राजधानीत उमटल्याचा अनुभव
संस्मरणीय ठरला. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून गौरव असणा-या
राष्ट्रीय नाटय विद्यालय (एनएसडी), ललित कला अकादमी, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे
प्रमुख म्हणून मराठी माणसांची मोहरही कौतुकास्पद आहे. दिल्लीची भिती मनातून
निघाल्याने स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मोठया प्रमाणात मराठी तरूण या शहरात
येताहेत आणि यश मिळवित आहेत. मराठी तरूणांनी स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक केंद्रही
उभारल्याचे सकारात्मक चित्र आहे. दिल्लीत मराठी प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत
मराठीचा टक्का विशेषत: यात तरूणांचा वाढता सहभाग ही कौतुकास्पद बाब आहे.
दीड कोटी लोकसंख्येच्या
दिल्ली व राजधानी क्षेत्रामध्ये ५ लाख मराठी लोक वास्तव्य करतात. मराठी जणांना
जोडून ठेवणारी येथील ३९ मंडळ व त्यांच्याद्वारे साजरा होणारा गणपती उत्सव. येथील
दोन मराठी शाळा, विविध क्षेत्रातील महिलांच्या पुढाकाराने जोमाने कार्यरत मंडळ,
दिल्लीकर मराठी माणसांचे हक्काचे प्रतिपंढरपूर म्हणून येथील आर.के.पूरम भागात
स्थित विठ्ठल मंदिर, दिल्लीतील प्रमुख रस्ते, रेल्वेस्थानक व स्टेडीय यांना
देण्यात आलेली मराठी मान्यवरांचे नावे ही ख-या अर्थाने मराठी म्हणून दिल्लीत
मानाने शीर उंचावणारे प्रेरणास्थळेच ठरली आहेत. ल्युटियन दिल्लीतील ऐतिहासिक
इंडिया गेट शेजारी कस्तुरबा गांधी मार्गावर डौलाने उभे असलेले महाराष्ट्र सदन हे
महाराष्ट्र शासनाचे मिनीदुतावास म्हणजे महाराष्ट्राची शान असलेली दिल्लीतील भव्य मराठी वास्तू ,जी
दिल्लीतील अन्य कोणत्याही राज्याच्या वास्तूपेक्षा कलात्मकता, क्षेत्रफळ व
उंचीच्याबाबतीत सरस आहे. दैनिक लोकसत्ता नंतर आता दैनिक लोकमत दिल्लीतून प्रकाशित
होत आहे व महाराष्ट्रातील व दिल्लीतील माहितीचा पिटाराच दैनिक लोकमतच्या
माध्यमातून दिल्लीकर मराठी बांधवांसाठी खुला झाला आहे.
मी, दिल्लीत 22 जुलै
2008 रोजी प्रवेश केला तेव्हा काँग्रेसप्रणीत राष्ट्रीय पुरोगामी लोकशाही आघाडीचे
(रालोआ) सरकार केंद्रात सत्तेवर होते, दिल्लीतही शिला दीक्षित या काँग्रेसच्याच
मुख्यमंत्री होत्या. पुढे 2009 मध्ये 15 व्या लोकसभेसाठी निवडणुका होऊन जनतेने
रालोआच्याच बाजुने कौल दिला. यावेळी केंद्रात सुशील कुमार शिंदे यांना ऊर्जा
मंत्री व नंतर गृहमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याच काळात
मुंबईच्या 26/11 च्या दहशतवादी हल्यातील आरोपी अजमल कसाबला फासी देण्याची
कार्यवाही अतीशय गोपनीयपणे व कोणत्याही पध्दतीची हिंसक घटना न घडता पार पडली.
विलासराव देशमुख या राजकाराणातील मातब्बर नेत्याने केंद्रसरकारमध्ये अवजड उद्योग
मंत्री पदाची धुरा सांभाळत दिल्लीत प्रवेश केला. पुढे याच सरकारमध्ये ग्रामीण
विकास मंत्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द मोलाची
राहीली. सर्वश्री शरद पवार, प्रफुल्ल
पटेल, मुकुल वासनिक, स्व.गुरुदास कामत, माणिकराव गावीत, मिलींद देवरा, प्रतिक
पाटील यांनी मंत्रीपदाची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.
वर्ष 2009 मधे तत्कालीन
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दबदबा असणा-या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची
धुरा विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांभाळली व दिल्लीत मराठी
माणसाने नवीन इतिहास रचला. भाजपाचे पहिले मराठी अध्यक्ष तथा पक्षाच्या इतिहासात
सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. तर, याच काळात 15 व्या लोकसभेत
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत भाजपाच्या
लोकसभेतील उपनेते पदाची जबाबदारी सांभाळली. पहिल्या महिला राष्ट्रपती व मराठी कन्या
प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012 या
कालावधित देशाच्या प्रथम नागरीक अर्थात राष्ट्रपती पदाचा बहुमान समर्थपणे
सांभाळला. महाराष्ट्रीय महिलांचे प्रतिनिधीत्वच त्यांच्या रूपाने दिल्लीत
सर्वोच्चस्थानी विराजीत असल्याचा अनुभव स्वर्णीम ठरला. मात्र, 2012 ते 2014 या दोनच वर्षाच्या काळात दिल्लीने महाराष्ट्रातील
दोन लोकनेत्यांचे अकाली निघून जाण्याचा कटू अनुभवही घेतला. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणून
कार्यरत असतानाच मूत्रपिंडाच्या आजाराने विलासराव देशमुख यांचे
14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले. या दु:खातून दिल्लीकर मराठी सावरत नाही तोच 3 जून
2014 च्या पहाटे एका रस्ते अपघातात तत्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
गोपिनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले. या
दोनही दुर्देवी घटना येथील मराठी जणांना चटका लावून जाणा-या ठरल्या.
सध्या केंद्रीय
मंत्रिमंडळात मराठी मंत्र्यांचा मोठा बोलबाला आहे. सर्वात कार्यक्षम केंद्रीय
मंत्री म्हणून भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी
यांनी दिल्लीत वेगळी छाप सोडली आहे.
त्यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळेच मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना
केंद्रात जलसंपदा मंत्रीपदाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता. याशिवाय,
सर्वश्री केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, अनंत गिते, सुरेश प्रभू आणि
सर्वश्री राज्यमंत्री हंसराज अहिर, डॉ. सुभाष भामरे आणि रामदास आठवले केंद्रात व दिल्लीत
मराठीची पताका डौलाने उंचावली आहे. आता मोदी सरकारच्या दुस-या कार्यकाळात
नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद
सांवत, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे या मंत्र्यांची वर्णी लागली असून राज्यातील
सात मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात जोमाने कार्यरत आहेत. दिल्लीतील विविध मराठी
संस्थांच्या आयोजनात या मंत्र्यांची उपस्थिती व सहभाग असतो.
मै अन्ना हॅूं
महाराष्ट्राला समाजसुधारक
आणि सामाजिक कार्यकर्त्यांची थोर परंपरा लाभली आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. मात्र, वर्तमानकाळात
महाराष्ट्रातील एका सामाजिक कार्यकर्त्याला देशव्यापी आंदोलन करावे लागेल व अख्खा
देश त्यांच्या मागे उभा असेल असा विचार कधी केला नव्हता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
अन्ना हजारे यांनी 2011 मध्ये पुकारलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि या
आंदोलनाचे नायक म्हणून त्यांची किर्ती देश-विदेशात गेली. त्यावेळी मी एका वृत्तपत्रात
व आकाशवाणी दिल्लीत कार्यरत होतो. त्यामुळे प्रसार माध्यमांनी अन्नांच्या
आंदोलनाला दिलेली जागा व त्यांचे कौतुक म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक
कार्यकर्त्याच्या देशाच्या राजधानीतील तो प्रभाव अनुभवताना प्रचंड अभिमान वाटायचा.
दिल्लीतील गल्ली बोळांमध्ये तिरंगी झेंडे आणि पांढरी टोपी व त्यावर लिहीलेले
ह्यमै अन्ना हॅूह्ण हे वाक्य ठळकपणे सर्वत्र दिसत होते. त्यावेळी बसेस, मेट्रो ने
प्रवास करणा-या प्रवाशांपैकी जवळपास ८० टक्के लोकांच्या डोक्यावर ‘मै अन्ना हॅू’
हे वाक्य पाहून मराठी माणसाचा प्रभाव आणि तो ही देशाच्या राजधानीत
अनुभवताना स्वाभीमान दुनावला. रिक्शा टॅक्सींवर अन्नांच्या समर्थनार्थ पोस्टर्स
बघितले त्यावेळी ‘जंतर मंतर’ आणि ‘रामलिला मैदानावर’ अन्नांच्या आंदोलनाच्या
समर्थनार्थ विविध स्तरातील दिल्लीकर व देश विदेशातील समर्थक बघण्याचा अनुभव
स्वर्णीम ठरला. अन्नांच्या आंदोलनामुळे तयार झालेल्या वातावरणामुळे पुढे
दिल्लीतील राजकीय सारीपाटीवर झालेला ऐतिहासिक बदल संपूर्ण देश व जगाने
बघितला.
एक कटु अनुभवही येथे
विषद केल्या वाचून राहवत नाही. महाराष्ट्रात अमराठींना मुंबई व महाराष्ट्रातून
हाकलून लावायची भाषा होऊ लागली त्यासाठी निदर्शने ,प्रदर्शने आदी झाली. त्याचा
परिणाम म्हणून दिल्लीतील महाराष्ट्र सदनासमोर निषेद करण्यासाठी मोठा जमान आला व
त्यांनी दगडफेकही केली. याच काळात दिल्लीत या आंदोलनाचा जाहीर निषेद म्हणून
जागो-जागी चर्चा होऊ लागली. प्रसार माध्यमातूनही तोच रोख होता. बस व मेट्रोत
प्रवास करतानाही हा अनुभव येत असे. त्यामुळे आम्हा दोन मराठी व्यक्तींना आपलं
मराठीपण झाकण्यासाठी हिंदीतून संवाद करावा लागत असे. दिल्लीतही त्यादृष्टीने आम्ही
उपरेच. नोकरीसाठी या शहरात आलो. जात-पात, धर्म, प्रदेश विसरून भारतीय झालो पण
महाराष्ट्रातील अमराठी विरोधी आंदोलनाने हे आंदोलन संकुचित असल्याचा विचार
आम्ही जगलो हे ही तेवढच खर.
मानाच्या सांस्कृतिक संस्थांवर मराठीची पताका
दिल्ली स्थित देशातील
नामवंत सांस्कृतिक संस्थाच्या अध्यक्षपदी मराठी माणसांचे नेतृत्व अभिमानास्पद आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत देशातील नाटय क्षेत्रातील सर्वोच्च
संस्था राष्ट्रीय नाटय् विद्यालयाच्या
(एनएसडी) अध्यक्षपदी ज्येष्ठ कलावंत वामन केंद्रे यांच्या रूपाने प्रथमच मराठी
माणसाने मोहर उमटवली. २०१३ पासून ते या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे
सांभाळली व नाटय क्षेत्रातील दिर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी या संस्थेमध्ये
नवनवीन उपक्रम राबविले. सांस्कृतिक
क्षेत्रातील आणखी दोन महत्वाच्या व मानाच्या संस्थावर मराठी मोहर उमटली आहे.
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी जानेवारी २०१८ मध्ये परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय सांस्कृतिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार
स्वीकारला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे
यांच्या नंतर डॉ. सहस्त्रबुध्दे हे या संस्थेचे अध्यक्षपद भुषविणारे तिसरे मराठी
व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून परदेशातील ३७ केंद्रामध्ये
मेळघाटातील आदिवासी महिलांद्वारे निर्मित पर्यावरण स्नेही राख्या पाठविण्याचा
स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
जून २०१८ मध्ये भारतीय
सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत कला क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ललीत कला
अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचरने यांची निवड झाली. या
तिन्ही महत्वाच्या संस्थांवरील निवडीतून दिल्लीत सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी
दबदबा बघायला मिळतो.
स्पर्धा परिक्षेच्या
तयारीसाठी दिल्लीत येणा-या मराठी विद्यार्थ्यांच्या टक्यात वाढ
या शहरात २००८ मध्ये ज्या प्रमाणात मराठी विद्यार्थी केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या(युपीएससी) परिक्षांची तयारी करण्यासाठी येत असत ती संख्या आता
झपाटयाने वाढली आहे. युपीएससीच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी वर्षाला या शहरात
जवळपास १५ हजार मराठी विद्यार्थी येतात. दिल्लीत येऊन युपीएससीच्या परिक्षेत घवघवीत
यश मिळविण्यातही महाराष्ट्राची सरसी आहे. या परिक्षेतील उत्तर प्रदेश आणि
बिहार या राज्यांचा दबदबा मोडून काढत महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनी हे
स्थान पटकाविले आहे. नागरी सेवेसह असीस्टंट कमांडट, वनसेवेत मोठया प्रमाणात मराठी
विद्यार्थी यश मिळवित असल्याचे सकारात्मक चित्र आहे. दरवर्षी युपीएससीच्या निकालात
उत्तीर्ण होणा-या एकूण १२०० पैकी महाराष्ट्रातील १०० ते १२५ विद्यार्थ्यांचा
समावेश असतो यातूनच चित्र अधिक स्पष्ट होते.
दिल्लीच्या करोलबाग, ओल्ड राजेंद्रनगर, डॉ. मुखर्जी नगर या भागात
युपीएससी परिक्षेचे मार्गदर्शन केंद्र मोठया प्रमाणात असून याच भागात मराठी
विद्यार्थींची रेलचेलही बघायला मिळते. अनुभवानुसार या भागात २००८ मध्ये एखाद दुसरा
मराठी विद्यार्थी दिसायचा हे चित्र बदलून आता १०-१० ते २०-२० च्या समुहाने
मराठी विद्यार्थी या भागात बघायला मिळतात. येथील प्रसिध्द जवाहरलाल नेहरू
विद्यापीठातही युपीएससी परिक्षेचा अभ्यास करणारे मराठी विद्यार्थी मोठया प्रमाणात
आढळतात.
कौतुकाचीबाब म्हणजे राजधानीत युपीएससी केंद्र सुरु करण्यातही
मराठीजणांची आघाडी दिसून येते. डॉ. मुखर्जीनगर भागात संजीव कबीर या मराठी तरूणाने
२००८ मध्ये ‘करीअर क्वेस्ट’ नावाने युपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे
त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोलापूरचे सुपूत्र व चंडीगडचे
जिल्हाधिकारी अजित जोशी यांनी श्री.कबीर यांना मार्गदर्शन केंद्र उभारण्यास मदत
केली आहे हे ही वैशिष्टयपूर्ण बाब नमूद करावी वाटते. करोलबाग परिसरात संजय राठोड
या मराठी व्यक्ती ने ह्यव्हिजन इंडियाह्ण नावाने २००८ मध्ये युपीएससी मार्गदर्शन
केंद्र सुरु केले २०१० पासून सलग तीन वर्ष या केंद्राचे विद्यार्थी युपीएससीच्या
परिक्षेत चांगल्या रँकने उत्तीर्ण झाले. काही कारणास्तव २०१७ मध्ये श्री. राठोड
यांनी हे केंद्र बंद केले. याशिवाय ह्यचाणक्य मंडळह्ण आणि ह्यस्टडी सर्कलह्ण या
महाराष्ट्रातील नामांकीत संस्थांनीही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उघडली
मात्र येथील विद्यार्थ्यांच्या गरजा व या संस्थांचा मूळ पिंड तसेच व्यवसाय व
माकेर्टींगचे तंत्र आदीतील काही अडचणी या कारणास्तव या संस्थांना दिल्लीत पाय
रोवता आले नाही. या पार्श्वभूमीवर ह्ययुनीक अकादमीह्णने मोठे धाडस दाखवून नुकतीच
दिल्लीत शाखा उघडली आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्यावतीने आणि दिल्ली स्थित विविध
मंत्रालये व विभागांमध्ये कार्यरत मराठी अधिका-यांच्या षटकार गृप यांनी पुढाकार
घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी दिल्लीत येणा-या
विद्यार्थ्यांसाठी अभिमत मुलाखतीचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. राज्य शासनाचा
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि षटकार गृप यांच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास १००
पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अभिमत मुलाखतीच्या माध्यमातून तयारी करून घेण्यात
येते. महाराष्ट्र सदनात या अभिमत मुलाखती होतात व या उपक्रमामुळे राज्यातील
विद्यार्थ्यांना युपीएससीच्या मुख्य मुलाखतीसाठी खूप चांगला फायदा होत असल्याचे
चित्र आहे.
दिल्लीतील मराठी प्रसार माध्यम प्रतिनिधींमध्ये
तरूणांचा टक्का वधारला
केवळ गाव, तालुका, जिल्हा व प्रादेशिक पातळीवर कार्यरत मराठी
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आता राजधानी दिल्लीसर केली आहे. गेल्या
दहा वर्षात यात तरूणांचा सहभाग वाढल्याचे चित्र आहे. राजधानीत विविध राज्यांतील
वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचे ब्युरो
कार्यालये आहेत. यात महाराष्ट्रातील पत्रकारांची वेगळी ओळख आहे. या
पत्रकारांना विशेष मान आहे. मुळात मराठी तरूण दिल्लीत यायला कचरत असत त्यामुळे
आतापर्यंत दिल्लीतील मराठी वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांमध्ये वरिष्ठांचा राबता
असायचा. आता मात्र हे चित्र बदलले असून झी २४ तास, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी,
नेटवर्क १८ लोकमत, ई टिव्ही इंडिया, लोकसभा या वृत्त वाहिन्यांकरिता कार्यरत
तरूण पत्रकार आहेत व त्यांनी राष्ट्रीय पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण
केली आहे. दैनिक लोकमत, पुढारी व सकाळ या वृत्तपत्रांमध्येही तरूण दमाचे मराठी
पत्रकार कार्यरत असून त्यांनी ज्येष्ठांचा आदर्श पुढे नेत दिल्लीत मराठीची पताका
डौलाने उंचविली आहे. सर्वश्री विजय नाईक, अनंत बागाईतकर, सुनील चावके, विकास झाडे,
व्यंकटेश केसरी, श्रीराम जोशी, श्यामकांत जहागिरदार, राजीव शर्मा, अशोक वानखडे,
विजय सातोकर, प्रमोद मुजुमदार, निवेदिता खांडेकर, अभिलाष खांडेकर, अजय बुवा हे
ज्येष्ठ पत्रकार दिल्लीचे भूषण आहेत.
लोकमत व लोकसत्ताचे वाचक दिल्लीकर
दीड दशकांपूर्वी
दिल्लीतून दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनास सुरुवात झाली. मराठी जणांनी या
वृत्तपत्रास डोक्यावर घेतले. आणि सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय मराठी दैनिक लोकमतने
गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिण्यात दिल्ली आवृत्ती सुरु करून येथील मराठीजणांना
मोठी भेट दिली. लोकमतच्या दिल्ली आवृत्तीतील पहिल्या तीन पानांवर प्रकाशित होणा-या
दिल्लीतील महत्वाच्या बातम्या व अन्य पानांवरील महाराष्ट्रातील विविध विभागांतील
बातम्या दिल्लीकर वाचकांचे खास आकर्षण ठरत आहे. म्हणता म्हणता
महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकांनी दिल्ली आवृत्ती सुरु करणे यातूनच दिल्लीतील
मराठी वाचक व मराठी समाज यांना जोडून ठेवण्यासाठी माध्यमांचा पुढाकारही अधोरेखीत
होतो.
दिल्लीत विविध रस्ते व स्मारकांना मराठी नेत्यांची नावे
देशाची राजधानी म्हणजे प्रत्येक राज्यांच्या खूणा इथे
सापडतात. त्या-त्या राज्यांतील थोर व्यक्तींच्या नावाचे रस्ते, स्टेडीयमला नावे
आहेत. यात महाराष्ट्राची सरसी आहे. महात्माफुले मार्ग, पेशवा मार्ग, टिळक मार्ग,
सावरकर मार्ग, श्रीमंत माधवराव शिंदे रोड, मधू लिमये मार्ग, राणी लक्ष्मीबाई
मार्ग, डॉ. हेडगेवार मार्ग, राजमात विजयाराजे सिंधीया मार्ग, न्या. सुनंदा भंडारे
मार्ग असे दिल्लीतील रस्त्यांना मराठी मान्यवरांची नावे आहेत. शिवाजी ब्रिज
रेल्वे स्थानक, तिलक ब्रिज रेल्वे अशा दोन रेल्वे स्थानकांना मराठी नेत्यांची नावे
आहेत तर मेट्रो स्टेशनलाही शिवाजी स्टेडीयम मेट्रो स्टेशन, सुनंदा देशमुख मेट्रो
स्टेशन अशी नावे आहेत.
याशिवाय संसदेच्या आवारात महत्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी
महाराज, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे
उभारण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या जवळील टिळकमार्गावरील बाळगंगांधर
टिळक यांचा पुतळा, के.कामराज मार्ग व राजाजी मार्गाच्या क्राँसींगवर यशवंतराव
चव्हाण यांचा पुतळा, डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा सरोजनी मार्केट जवळील
पुतळा, लोधी कॉलनी येथील वीर सावरकर पार्क येथील विनायक दामोदर सावरकर यांचा
पुतळा, पहाडगंज भागातील डॉ. बाळकृष्ण मुंजे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच
शिवाजी स्टेडीयम हे हॉकीचे स्टेडीयम तर खाशाबा जाधव कुस्तीचे स्टेडीयमही दिल्लीत
आहे. गंमत म्हणजे नामवंत शिल्पकार राम सुतार यांनी दिल्लीतील बहुतांश भव्य पुतळे
तयार केले आहेत. आजही ते मोठमोठ्या मान्यवरांच्या प्रतिमेला आकार देत आहेत. सुतार
हे दिल्लीत महाराष्ट्राचा अभिमान आहेत.
मराठी व्यावसायिक
महाराष्ट्र सदनाच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाले व सर्वप्रथम
इथे मराठी माणसाच्या बीव्हीजी या हाऊस किंपींग कंपनीने प्रवेश केला. या कंपनीचा
प्रवास २०१३ ते आॅगस्ट २०१८ असा दीर्घ चालला आणि आता सप्टेंबर २०१८ पासून
सुमीत या मराठी माणसाच्याच हाऊसकिपींग कपंनीने महाराष्ट्र सदनातील हे कंत्राट
चालवायला घेतले आहे. करोल बागेतील महाराष्ट्र ज्वेलर्स, पाटील ज्वेलर्स,
हँडीक्राफ्ट, फुल व्यवसायिक काल निर्णय व गणेशमुर्ती विक्रेते स्पर्श
एडव्हर्टायजींग ,आयएन मार्ग स्थित दिल्ली हाट येथील ह्यमराठी फुड स्टॉलह्ण जुने व
नवीन महाराष्ट्र सदन येथील कँटीन आदी माध्यमातून मराठी व्यवसाय या ठिकाणी बघायला
मिळते.
महाराष्ट्र सदनाची भव्य वास्तू
ऐतिहासिक इंडिया गेट जवळील कस्तुरबा गांधी मार्गावर महाराष्ट्राची
भव्य वास्तू ‘महाराष्ट्र सदन’ हे या शहरात येणा-या देश- विदेशातील जनतेचे
खास आकर्षण आहे. एकूण ६.११ एकर परिसरात ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. ४
जून २०१३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्र
शासनाच्या या भव्य वास्तूचे उदघाटन झाले. याठिकाणी एकूण १३८ कक्ष असून
मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांसाठी स्वतंत्र सुट आहेत. प्रेस सभागृह, व्हीडीओ
कॉन्फरसींग हॉल आणि भव्य प्रेक्षागृह येथे आहे. मोठया प्रमाणात दिल्लीकर
मराठी मंडळी व स्थानिक दिल्लीकर परदेशी पाहुणे या वास्तूला अवश्य भेट देतात.
दिल्लीतील
महाराष्ट्रीय संस्कृतीची जपणूक
राजधानी दिल्लीत विविध मराठी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या
विभागांच्यावतीने राज्याची संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे सुरु आहे. पहाडगंज
स्थित दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १९९२ पासून महाराष्ट्र
राज्य नाटय स्पधेर्चे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
संस्थेच्या आरामबाग येथील नूतन मराठी शाळेतील सभागृहात या नाटय स्पधेर्चे आयोजन
करण्यात येते. मात्र, तीन वर्षांपासून हे आयोजन बंद आहे. बृहन्महाराष्ट्रातील
विविध राज्यातील नाटय संस्था या स्पर्धेत सहभाग घेत. स्पर्धेत निवड झालेल्या
पहिल्या तिन नाटकांना महाराष्ट्र राज्य नाट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळतो.
महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था ही १९७२ पासून नाटय व सुगम संगीत
स्पर्धा, अखिल भारतीय गद्य व संगीत नाटय स्पधेर्चे आयोजन करीत आहे. या
संस्थेच्यावतीने नूतन मराठी शाळा चालविण्यात येते. ५ वी ते १२ वी पर्यंत या शाळेत
शिक्षण दिले जाते या शाळेत मराठी विषय अनिवार्य आहे.
महाराष्ट्र
स्नेह-संवर्धक समाज संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव, दासनवमी, स्वातंत्र्यदिन
कोजागिरी, संक्रांत आदी कार्यक्रम साजरे केले जातात. लोधी रोड स्थित वनिता
समाजाच्या वतीने वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने
समाजातील गरीब मुलांसाठी ज्युनीअर व सिनीअर किंडर शाळा चालविण्यात येते. करोलबाग
येथील फैज रोड स्थित मराठा मित्र मंडळाच्यावतीने वर्ष भर विविध सण उत्सव साजरे
करण्यात येतात. झंडेवालान भागात संस्थेच्या वतीने चौगुले पब्लिक स्कुल चालविण्यात
येते. ही इंग्लीश मेडीयमची शाळा असून या शाळेत पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले
जाते इथे मराठी विषय अनिवार्य आहे. सार्वजनिक उत्सव समिती विविध दजेर्दार
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. गणेशोत्सव काळात समितीच्या वतीने महाराष्ट्र
महोत्सव साजरा करण्यात येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, यशवंतराव चव्हाण स्मृति
सामारोह , कोजागिरी पोर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी
करण्यात येते. याशिवाय करोलबाग स्थित राणी लक्ष्मी भगिनी समाज, जनकपुरी आणि
लाजपतनगर स्थित महाराष्ट्र मित्र मंडळ, पुर्वांचल मित्र मंडळांच्या माध्यमातून
वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेशोत्सव काळात
दिल्ली व परिसरात जवळपास 39 मराठी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा
करण्यात येतो.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीनेही मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे
काम प्रभावीपणे केले जाते. पत्रकार दिन, मराठी भाषा दिन, ग्रंथोत्सव, महाराष्ट्र
दिनाचे आयोजन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात येते. महान व्यक्तींची जयंतीचे
वर्षभर साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील विविध लेखक, साहित्यिक, प्रशासकीय
अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जनतेचा थेट संवाद घडवून आणण्यासाठी परिचय
केंद्राच्यावतीने आयोन करण्यात येते. जनसंपर्क, वृत्त व माहिती असा मोठा डोलारा
कार्यालयाच्यावतीने सांभाळला जातो. पुस्तकांचे नैमित्तिक प्रकाशन करण्यात येते, दर
दोन वर्षांनी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारी ‘दिल्ली डायरी’ ही विविध
माहितींनी परिपूर्ण पुस्तिका विशेष प्रसिध्द आहे. परिचय केंद्राचे सुसज्ज असे
ग्रंथालय असून दिल्लीतील मराठी जन तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे
विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात.
राजधानीत
नव्या मराठी संस्था
‘दिल्ली मराठी प्रतिष्ठाण’ ही संस्था गेल्या तीन वर्षात नावारूपाला
आली असून त्यांनी दर्जेदार मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठीजणांना
एकासुत्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठाण या संस्थेमध्ये
या शहरात कार्यरत जुण्याच मराठी संस्थाचे तरूण व विविध केंद्रीय मंत्रालयातील
मराठी अधिकारी वर्ग यांचा समावेश आहे. या संस्थेने महाराष्ट्रात आयोजित करण्यात
येणारा व लोकप्रिय असलेला ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम थेट इंडिया गेट या ऐतिहासिक
वास्तू समोर आयोजित करून तरूण दमाची संस्था म्हणून जोरदार सुरूवात केली. सलग दोन
वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षीही संस्थेच्यावतीने दिवाळी पहाट
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रसिध्द गायिका भगीणी बेला व सावनी शेंडे
यांच्या सुरांची मोहिनी दिल्लीकर मराठी जाणांना मोहवून घेणार आहे. ऐतिहासिक लाल
किल्ला येथे यावर्षी ह्यजाणता राजाह्ण या शिवाजी महाराजांवरील महानाटयाच्या हिंदी
प्रयोगाचे सलग तीन दिवस सादरीकरण झाले.
भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ आधिकारी तथा पराराष्ट्र विभागाचे
सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने ‘पुढचे पाऊल’ ही दिल्ली स्थित मराठी
प्रशासकीय अधिका-यांची नवी संस्था स्थापन करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यांच्या
आयोजनासह स्पर्धापरिक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत येणा-या मराठी तरूणांना
मार्गदर्शन करणे व महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीत प्रशासकीय कामांमध्ये मदत
करण्यासाठी या संस्थेच्या प्रत्येक अधिका-याने एक-एक खासदार विभागून घेतले आहेत.
संस्थेने यावर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तीन दिवसांचा महाराष्ट्र महोत्सव
आयोजित केला, यात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले यात
केंद्र व राज्य शासनातील मंत्री व अधिका-यांनी सहभाग घेतला. संस्थेच्यावतीने
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणा-या मराठी विदयार्थ्यांचा केंद्रीय
मंत्र्यांच्या हस्ते कौतुक सोहळा व विशेष मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. ह्यपुढचे पाऊलह्ण संस्थेच्या माध्यमातून दिल्ली स्थित विविध मंत्रालय
व विभागांमध्ये कार्यरत जवळपास २५० मराठी अधिकारी जुळले आहेत. संस्थेच्या
सदस्यांनी मराठी खासदारांकडेही मार्गदर्शक म्हणून कार्यास सुरुवात केली आहे.
विविध राज्यांतील जनता दिल्लीमध्ये नौकरी व्यवसाय करण्याच्या
उद्देशाने येतात. आणि बरेच लोक तर या शहरातच स्थायीक होतात. या शहरात वास्तव्यास
स्थायी व अस्थायीपणे वास्तव्यास असणा-या मराठी जणांनी मात्र आपली एक स्वतंत्र ओळख
निर्माण केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रगल्भ कार्य व
लोकसंस्कृतीमुळे या राज्यांतील जनतेला दिल्लीने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे
दिल्लीकर भाडयाने घर देण्यास महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या जनतेला प्राधान्य
देतो. महाराष्ट्राचीहीच शान टिकवून ठेवण्याचे व हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम
येथील मराठीजण करीत आहेत.
कृषी शास्त्रज्ञ!
दिल्लीत विविध क्षेत्रातील मराठी शास्त्रज्ञांची संख्या उल्लेखनीय
आहे. विशेष म्हणजे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे दिल्लीतील कृषी
शास्त्रज्ञांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. माजी कुलगुरु डॉ. चारुदत्त मायी,
डॉ. गोविंद गुजर, डॉ. प्रताप देशमुख, डॉ. कोकाटे, डॉ. अनिल मोहरील आदी ज्येष्ठ
शास्त्रज्ञ इथलेच. कृषी संशोधन संस्थेत जवळपास ५० मराठी शास्त्रज्ञ आहेत.
अटकेपार मराठीचे झेंडे लावणा-या महाराष्ट्रातील शूर सैन्यास
दिल्लीच्या तख्तावर बसण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले नाही व पंतप्रधानपदाची
माळही मराठी व्यक्तींच्या गळात पडली नाही ही खंत मात्र आहे. पण गेल्या अकरा वर्षात
दिल्लीत मराठी जणांनी विविध क्षेत्रात रोवलेले झेंडे व त्यामुळे तयार झालेले एक
सकारात्मक वातावरण म्हणजे नव्या उजेर्ने व जोमाने पुढे जाण्यास नक्कीच
पुरक ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे.
-----
रितेश मोतीरामजी भुयार
-----------------------समाप्त----------------------------





No comments:
Post a Comment