Friday, November 1, 2013

रोजगार म्हणून पत्रकारितेस दिल्लीत संधी आणि मुला मुलींची अनास्था



कोणताही समाज एकत्र यायला त्या समाजाशी बांधील नितीमूल्य आणि त्याचे अनुपालन महत्वाचे असते. तसेच कोणत्याही समाजाची प्रगती, ही त्या समाजाच्या शैक्षणीक प्रगतीवरही तेवढीच अवलंबून असते. तद्वत, भारतात शिक्षणासाठी आग्रही असणारे आणि स्वत: वर्तमानपत्र चालवणारे महात्मा ज्योतीबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महात्म्यांची बहूजन समाजास उज्ज्वल परंपरा आहे. आज या समाजातील मुलं-मुली उच्च शिक्षण घेऊन देश-विदेशात आपल्या किर्तीची पताका डौलाने फडकवत आहेत. मात्र, हात मजूरी आणि फारच फार शेती  प्रमुख व्यवसाय असणार्‍या या समाजातील मुला-मुलींनी आता पारंपरिक नौकर्‍यां(वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण शाखा) न करता पत्रकारितेसारख्या आव्हानात्मक आणि इंटरेस्टींग विषयाकडे वळण्याची गरज आहे. पत्रकारितेतील पदवी आणि किमान एक वर्ष अनुभव असणार्‍या व्यक्तीस दिल्लीत पत्रकारिता करण्यास प्रचंड वाव आहे आणि भविष्यासाठी खूप सार्‍या संधीही आहेत. मात्र, समाजात या विषयी कमालीची अनास्था असल्याचे चित्र आहे.हे चित्र बदलावे गैरसमज दूर व्हावे याच उद्देशाने हा अनुभवआधारित लेखन प्रपंच.
मुळात पत्रकारिता हे क्षेत्र आपले नाही, पत्रकारिता हे चरितार्थाचे साधन होऊ शकते का? पत्रकारितेच्या शिक्षणासाठी खूप खर्च येत असावा असे एकानेक प्रश्न सामान्य माणसाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात गलका करने सहाजिक आहे. पण, त्याचं योग्य उत्तर न मिळवताच किंवा तत्संबंधी आपली जिज्ञासा पूर्ण करुन न घेताचं आपण पत्रकारिता क्षेत्राकडे पाठ वळवतो हे वास्तव आहे. त्यातही दिल्ली सारख्या शहरात पत्रकारिता करणे म्हटल्यावर तर काही विचारता सोय नाही. या सर्व प्रश्नांचा अनुभवाधारित धांडोळा घेतानाच पत्रकारिता हे करिअर कसे होऊ शकते आणि या क्षेत्रातातील विविध संधीही आपणापुढे मांडता येतील.
घरी थोडीफार शेती असल्याने मुलाने शेतीच्या कामात मदत करावी हीच माफक अपेक्षा बहूजन समाजातील सामान्य माणसाची असते. थोडी आर्थिक परिस्थिती बरी असेल तर मुला-मुलीचे शिक्षण होऊ शकते. मग, ती स्थिती थोडी समाधानकारक असेल तर मुला-मुलींच्या उच्च शिक्षणास परवानगी किंवा त्याला वा तिला तशी संधी मिळते. पण, हे चित्र मुख्यत्वे नोकरीव्यवसायात असणार्‍या वर्गाच्या कुटुंबात आढळते. आता इथेही आपल्या मुलाने वा मुलीने कोणती स्ट्रीम निवडावी हे त्याचे पालकच ठरवतात आणि त्याने वा तीने आयुष्यात काय बनावं वा करिअर म्हणून कोणतं क्षेत्र निवडाव हेही पालकच ठरवतात. कलाशाखा घेऊन शिक्षण करणारे 12 वी नंतर डीएड तर पदवी शिक्षण व्हाया डीएड शिक्षक पेशा निवडतात. विज्ञान शाखा घेऊन 12 वी उत्तीर्ण होणारे वैद्यकीय वा अभियांत्रिकी शाखा निवडतात. त्यात पालकांनीही तोच व्यवसाय स्वीकारला असल्याने आपल्या पाल्यानेही तोच व्यवसाय स्वीकारावा हा अनाठायी आग्रह असतोच. हे शिक्षण पूर्ण करताना शासकीय विद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण झाल तर लाखांच्या घरातील खर्च निदान हजारांमध्ये येतो. पण, या सर्वांनी पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट, एअर होस्टेज, एव्हीयेशन आदी आव्हानात्मक व्यवसायांकडे जाणून बुजून पाठ फिरवली असते. ज्यांनी ही पठडी स्वीकारली तेही आपला निर्णय उचित होता हे सिध्द करून दाखविण्यासाठी तितकी मेहनत घेत नाहीत परिणामी त्यांच्या वाटयाला अपयश येते आणि म्हणूनच असले अभ्यासक्रम वा क्षेत्र नकोरे बाबा हा संदेश  समाजात पसरतो. मात्र, आता हे सर्व थांबण्याची नितांत गरज आहे. बहूजन समाजाचा टक्काही आता पत्रकारिते सारख्या क्षेत्रात चमकायला हवा.
 कोणत्याही शाखेची पदवी धारण करणारा विद्यार्थी- विद्यार्थीनी पत्रकारितेचे शिक्षणास पात्र ठरतो. आजमितीस राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच यशवतंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातूनही पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. पण माझ्या मते दिल्लीस्थित इंडीयन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्यूनीकेशन एण्ड जर्नालिझम(IIMC) ही केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणारी संस्था, दिल्लीतीलच जामीया मिलीया इस्लामीया विद्यापीठाचा वृत्तविद्या विभाग तसेच महाराष्ट्राचा विचार करता पुणे विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंज्ञापन विभाग या शासकीय संस्थांच्या पात्रता परिक्षा उत्तीर्ण करून अगदी नाममात्र खर्चात  पत्रकारितेचे उत्तम शिक्षण अर्जीत करता येणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक तयारी अर्थात वाचन, मनन आणि इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे. या उल्लेखीत संस्थांमध्ये वसतीगृह आणि उत्तम स्टुडिओसह प्रत्याक्षीक आधारित पत्रकारितेचे शिक्षण दिले जाते. त्यामुळेच या संस्थांची ब्रॅण्ड व्हॅल्यू सुध्दा जास्त आहे.
 मुळात समाजकार्याची आवड आणि कामाची धडाडी       असणार्‍या मुला मुलीस पत्रकारिता क्षेत्रात प्रंचड वाव आहे. त्यातही पत्रकारितेतील करिअरसाठी दिल्ली शहर ही उत्तम निवड ठरेल हा माझा स्वानुभव. पत्रकारिता म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करून मुलगा वा मुलगी आपल्या खांदयात शबनम लटकवून आणि मोठासा झब्बा परिधान करून बातम्या संकलीत करेल अशीच सर्वसाधारण धारणा या व्यवसायाबदृल आहे. पण, चित्र वेगळे आहे. पत्रकारितेचा अभ्याक्रम पूर्ण करून शासकीय व खाजगी जनसंपर्क कार्यालय, जाहिरात क्षेत्रात संहिता लेखन वा व्हाईस वोव्हर, पुस्तक व प्रसिध्दी साहित्यासाठी अनुवाद, माध्यम सल्लागार, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रात झळकण्याची नामी संधी आहे. पत्रकारितेचा अभ्यासपूर्ण करून आणि किमानपक्षी एक वर्ष पत्रकार म्हणून वृत्तपत्र वा वृत्तवाहिनीची कार्यपध्दत त्यात चालणारे कार्य याचा अनुभव घेवून आलेल्या मुला मुलींसाठी दिल्लीतील पत्रकारिता आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणारी व आत्मभान मिळवून देणारी आणि विचाराने पोक्त बनवणारी ठरेल. कारण, देशासाठी कायदे दिल्लीस्थित संसदेतूनच तयार होतात, सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांची मुख्यालय येथे असल्याने त्यांची रचना व कार्यपध्दतीचा देशव्यापी डोलारा समजून येतो, मोठया प्रमाणात भेटी देणारे परदेशी पाहुणे आणि भारत सरकारशी त्यांचे होणारे करार मदार, विविध मंत्रालयाच्या भव्य इमारतीत त्यात चालणारे काम तेथील प्रशासकीय यंत्रणा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विविध विभागांचे मंत्री,   विविध पक्षांचे आमदार, खासदार, राज्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांच्या दिल्ली भेटी आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी या शहरात पत्रकारिता करणार्‍ यास सहज शक्य आहे. शिवाय दिल्ली शहरात महानगर पालिका, विधानसभा आणि संसद अशा तिनही कार्यकारीमंडळ आहेत. त्यांच्या कामाची पध्दत एकाच ठिकाणी बघावयास मिळते. याशिवाय देशभरातील वृत्तपत्र आणि वृत्त वाहिण्यांचे प्रतिनिधी येथे कार्यरत आहेत त्यांच्याशी व त्या त्या राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांशी भेटण्याची सहज संधी उपलब्ध होत असल्याने देशव्यापी जनसंपर्क वाढतो आणि ज्ञानाच्या कक्षाही रुंदावतात. बहुभाषी व वैविद्यपूर्ण संस्कृतीने नटलेला भारत देश या राजधानीच्या शहरातून अनुभवन्याची नामी संधी पत्रकारितेच्या माध्यमातून मिळने शक्यप्राय आहे.
 दिल्लीत पत्रकारितेतील संधीबाबत थोडा प्रकाश टाकतो. आकाशवाणी दिल्लीतील मराठी विभागात अनुवादक-वृत्तनिवेदक पदी काम करण्याची नामी संधी उपलब्ध आहे. त्यासाठी आकाशवाणीच्या www.newsonair.nic.in या संकेत स्थळावर एप्रिल- मे महिण्यात जाहिरात दिली जाते. ही परिक्षा आणि आवाजाची परिक्षा उत्तीर्ण होताच आपण या विभागात कामास सुरुवात करू शकता. याशिवाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल तर पात्रता परिक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन आकाशवाणीच्या संकेतस्थळासाठी किंवा मुख्य न्युज रुम मध्ये संपादन सहायक पदावर काम करता येते. त्यासाठीची जाहिरात आणि निवड प्रक्रिये संबंधी माहिती आकाशवाणीच्या संकेत स्थळावर उपलब्ध असते. मराठी विभागात प्रत्येक डयुटीला कामाचे तास 3 असतात तर त्याचा मोबदला 850 रुपये आणि मुख्य न्युज रुममध्ये 6 तास काम असतं त्याचा मोबदला प्रति डयुटी 1600 रूपये असतो. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मीडिया मॉनिटरींग सेंटर मध्ये मराठी मनोरंजन व वृत्त वाहिन्यांबाबत येणार्‍या तक्रारी समजून घेवून रिपोर्ट तयार करणे व दैनंदिन रिपोर्ट तयार करण्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झालेल्या मराठी मुला मुलीस उत्तम संधी आहे. मॉनीटर सिनीयर, मॉनीटर आणि सिए ही पद येथे आहेत त्या त्या पदानुसार पगार आणि आठवडयातून 2 सुटया, प्रतिदिन 8 तास डयुटी येथे दयावी लागते.
   उपरोक्त उल्लेखीत दोनही ठिकाणी काम करून डबींग आणि अनुवादाची कामही करण्याची नामी संधी दिल्लीत आहे. डबींग बदृल सांगायचे झाल्यास कोणतेही मोठे ब्रँड जेव्हा बाजारात येते तेव्हा त्याची लाँचींग हिंदी भाषेतील जाहिरातीच्या माध्यमातून देशभर केली जाते. पण आपला संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचावा यासाठी बँडचे मालक ती जाहिरात आपल्या देशातील प्रत्येक प्रादेशिक भाषेत देतो. ती जाहिरात महाराष्ट्रासाठी बनवताना  मूळ जाहिरातीतील पात्र व संवाद तसेच ठेवून केवळ जाहिरातीची मुख्य संहिता मराठीत अनुवादीत करून स्टुडिओमध्ये डब केली जाते. अशाच प्रकारे भारत सरकारचे जगजागृतीबाबत टिव्ही किंवा रेडिओवरील कार्यक्रमातही मराठी भाषकांची निकड असते. या क्षेत्रात दिल्लीत काम करणार्‍या व्यक्तिंची भेट घेवून आपण त्यांच्या सोबत काम करून पैसे व अनुभव मिळवू शकतो.
          
      
                                     
   

2 comments:

  1. Job and social work opportunity. We are provide village level technology. We are recruiting COORDINATOR
    PLEASE CALL-:7798191319 ONLY SERIOUS PERSON

    ReplyDelete