Saturday, November 22, 2025

मधु ; एक प्रवास पूर्णत्वाकडे



     ही घटना आहे साधारण 11 डिसेंबर 2014ची.परराज्यात युगल जोडप्याला फिरण्यास व निवासास अडचणी येऊ नये म्हणून लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नगरपरिषदेत विवाह प्रमाणपत्र बनविण्यात व्यस्त असलेले आम्ही. तिथल्या वेळखाऊ प्रोसिजरमध्ये एवढे व्यग्र झालो की सायंकाळी ७ वाजता अमरावतीहुन आपली ट्रेन आहे याचं भानच राहिल नाही. नगरपरिषद कार्यालय (परतवाडा) येथून विवाह प्रमाणपत्राच्या प्रत घेऊन आम्ही अचलपूरला (माझं गाव) आलो. बॅग आधीच भरल्या होत्या त्या घेतल्या व बसमध्ये बसलो आणि वलगावपर्यंत आल्यावर कळलं की आता आपल्याला अमरावती स्टेशनहून निघणारी अंबा एक्स्प्रेस ट्रेन कुठल्याही परिस्थितीत पकडता येणार नाही. म्हणून भात्यातलं ब्रम्हास्त्र उपसण्याचा निर्णय घेतला.अमरावतीच्या शेगाव नाक्यावर बस पोहोचली आणि माझी नवपरिणीत सहचारिणी सोनाली आणि मी दोघेही बसमधून उतरलो. तिथेच आमच्या दिमतीला एक स्कुटी येऊन उभी राहिली. स्कुटीच्या सारथ्यासाठी मी सज्ज झालो. सहचरणी, मी, ती आणि आमची आठवड्याभराची कपड्यांची बॅग या लवाजाम्यासह आम्ही  बडनेरा रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झालो. इकडे अमरावती स्टेशनहून अंबा रेल्वे गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली आणि आता आमची शर्यत याच रेल्वेगाडी सोबत होती. ती रुळावरून धावू लागली तर स्कुटीहून मिळेल ते सिग्नल तोडत रस्त्यावरील गर्दीला तुडवत आमचा प्रवास सुरू होता. (कृपया,असे वाहतूक नियम तोडू नये)

  (चित्र : ए.आय. साभार)

बडनेरा स्टेशन आलं. स्कुटी पार्क केली. माझ्या हाती बॅग, सहचरणीला प्रोत्साहन देत ,'पळा वहिनी पळा, वहिनी पळा'च्या ती आरोळ्या देत होती. आम्ही स्टेशनच्या फुटवेअर ब्रिजवर पोहोचलो आणि आमच्यासमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं. मोठ्या सायासान बडनेरा स्टेशनला सापडलेली अंबा रेल्वे आता रुळावरून निघाली होती. फुटवेअर ब्रिज व नंतर पायऱ्या उतरून ही ट्रेन पकडणे हे चॅलेंज चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा वेगळं नव्हतं.पण, ध्येय प्राप्तीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची आजपर्यंतची माझी धडपड इथेही काम करीत होती.ट्रेनकडे सरसावलो. बॅग स्टेशनवर खालीच ठेवली. ट्रेनच्या एसी डब्यात शिरलो व दारात उभा राहिलो. सहचारिणीला हात दिला आणि तिला डब्यात आत खेचलं. तिकडून आवाज आला, 'दादा बॅग राहिली ,ही घे बॅग!',तिने बॅग फेकली अचूक झेल घेऊन ती बॅग मी रेल्वेच्या डब्यात घेतली. गाडीने वेग घेतला तशी स्टेशनवर उभी असलेली ती आम्हाला दोन्ही हाताने अगदी मनापासून निरोप देत होती. यापूर्वी उल्लेख केलेलं हेच ते माझं ब्रम्हास्त्र 'मधु'. त्या दिवशी तिच्यामुळेच आमच्या हनिमूनच्या प्रवासाची इमारत ढासळता ढासळता सावरली. तीच आमची ,लाडकी मधु. 

      नुकताच 3 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा विवाह संपन्न झाला. तिच्याशी जुळलेलं हे नातं खूपच खास ठरलं. आम्ही दोघं आणि आमच कोकरू स्वरित असे तिघेही मधुच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असणाऱ्या तिचा साखरपुडा, मेहंदी, हळदी, संगीत आणि विवाह या सर्व आनंदात सहभागी राहिलो. विवाह बंधनाच्या प्रवासातील हे सर्व प्रसंग अटेंड करण्याची ही माझ्या आयुष्यातली आजपर्यंतची पहिली वेळही ठरली आणि त्याच भाग्यही मधु मुळेच मिळालं. 

      दीर्घकाळ आजोळ,अमरावती, पुणे, दिल्ली असा प्रवास केल्याने आपल्या गोतावळ्यातील माणसांसोबत आनंदाचे क्षण एंजॉय करायला खूपच कमी वेळ मिळाला.अशा कमीवेळात युवा पिढीशी जुळलेल्यापैकी प्रतिनिधिक नातं म्हणजे मधुशी जुळलेलं एक छान नातं. खूप कमी वेळा मधुशी भेटणं झालं, या सर्व भेटीगाठींमध्ये जे आकलन झालं त्यातून उलगडणारा हा मधूचा पूर्णत्वाकडील प्रवास.

        बहुदा इंजिनिअरिंग करायला अमरावतीला असताना परिचय झाला मधुचा, तेंव्हा मी दिल्लीला होतो. लग्नापूर्वी एक छोटी शस्त्रक्रिया झाली माझ्यावर अमरावतीला त्यावेळेस आमच्या काकुंकडे एक-दोन दिवस मुक्काम होता माझा, तेंव्हा ही सगळी यंगिस्तान भावंड भेटली. या भावंडांच आपसातील ट्युनिंग वाखाणण्या सारखं होतं. राखी पौर्णिमा,भाऊबीज , वा. सी. काळे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन व त्यात या सर्वांचा आपल्या घरच्या सदस्यांबरोबर घडणारा मेळाही मला नेहमीच भावला. त्यात मधुही आपली स्पेस तयार करत मोठी होत गेली. आई शिक्षकीपेशात असल्याने 'मोहित' आणि 'मधू ' या दोघांच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. मग भविष्याचा विचार करता अमरावतीतच त्यांनी टुमदार घर बांधलं. याची रचनाही मुलांच्या मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्यही आईने दिल होतच.

       इकडे मी, शासकीय नोकरीत रुजू झालो तेंव्हा घरच्यांनी छोटेखानी रोडगे पार्टी आयोजित केली होती आमच्या शेतावर. जवळच्या लोकांना बोलवलं होत तेंव्हा मधु आवर्जून आली होती. मग माझ्या लग्नातही हजेरी लावली तिने. 

     मधुच शिक्षण होत असताना करिअरकडेही तिचं पुरेपूर लक्ष होत. भावंड जस जशी वेगवेगळ्या क्षेत्रात झेप घेत होती तसा तिनेही आपला स्पेस शोधून काढला व कमावती झाली. आता तिचा आत्मविश्वास दुणावला होता. 'लग्न' या सुंदर नात्याच्या बंधणाला स्वीकारण्यासही ती सज्ज झाली. कांदे- पोह्यांच्या अनेक बैठकाही तिने अनुभवल्या. अन् तिच्या स्वप्नातला राजकुमार हा प्रथमेशरावांच्या रूपाने तिच्या आयुष्यात आला. पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला.साखरपुडा आनंदाने पार पडला. लग्नास अवकास असल्याने दोघांना एकमेकास समजण्यास थोडा अवधीही मिळाला.

       साखरपुडा व पुढे लग्नानिमित्ताने जमलेले सगळे आप्त स्वकीय व त्यांची बडदास्त राखण्यापासून आपली हौस- मौज पूर्ण करण्यातही ती सक्रिय होती. लग्नानिमित्त कराव्या लागणाऱ्या सर्व बारीक-सारीक बाबींच तिनं उत्तम नियोजन केलं. प्रत्यक्ष त्या जबाबदाऱ्या पार पाडत इतरांकडून ती कामे तिने नीट करून घेतली. मेहंदी, हळद आणि संगीत या तिन्हीच चोख नियोजन आणि या प्रसंगांचा पूर्ण आनंद ती घेत होती. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत संगीत कार्यक्रमात नवरी म्हणून भावी जोडीदार आणि सासरकडील मंडळी समोर मधुने दिलेले डान्स परफॉर्मन्स हे तर लाजवाब होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पदोपदी झळकत होता.



     लग्नही वेळेत लागल व शानदार या शब्दाला साजेसा हा सोहळाही संस्मरणीय ठरला. तुडुंब गर्दीने खचाखच भरलेले मंगल कार्यालय व नवरी- नवरदेवास आशीर्वाद देण्यासाठी बराच काळ लागलेली लांब रांग मग सप्तपदी, कन्यादान व पाठवणी असा खूपच देखणा सोहळा कायमच डोळ्यात व मनात भरून गेला. 

        या उत्तम सोहळ्यानंतर आई आणि धाकट्या भावाने मधुला दिलेला निरोप आता फक्त तिच्या वडिलांच्या नसण्याची अपूर्णता दर्शवत होता. पण, आयुष्याची एक यशस्वी पारी पूर्ण करणारी लेक बघून तिचे वडीलही स्वर्गातून या लेकीचा अभिमानच बाळगत असतील यात तिळमात्र शंका नाही.

           मधुचा स्वतःला सिद्ध करण्याचा एकटीचा प्रवास आता संपला व जोडीदारासोबतचा प्रवास आता सुरू झाला आहे. माहेर व आप्त स्वकीयाकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवर ती हा जीवनाचा सुंदर टप्पाही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडेल, त्यासाठी 'मधु' तुला मनापासून शुभेच्छा!.

  आमची  आयर्नलेडी काकू

 इंजीनियरिंगच शिक्षण घेताना मधु आपल्या आत्याकडे वास्तव्यास होती. त्याच आमच्या आदरणीय व आयर्नलेडी काकु प्रतिभा नामदेवराव भुयार. काकुंमुळेच मधु नावाच्या या सालस पात्राचा आम्हाला परिचय झाला. एकामागून एक दुःखाचे प्रसंग ओढवले तरी जराही नडगमगता धैर्याने जीवनाची वाट चालत राहणारी 'आमची काकु' म्हणजे मायेची पाखर आणि स्वभावाने मऊ मेणाचा गोळा. काकुच आमचा कृतिशील आदर्श.सेवानिवृत्त झाल्या तरी सेवेत असणाऱ्या आम्हाला लाजवणारा उत्साह व दिनक्रम त्या अजूनही पाळतात. सतत नवनवीन शिकत राहतात. चांगुलपणाच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. नातेवाईकांना सतत जोडून ठेवतात, त्यांच्या सुख दुःखात कायम सहभागी असतात. आम्हाला खूप माया लावतात. सर्वार्थाने ग्रेट असणाऱ्या आमच्या काकूंना प्रणाम करत या लेखनप्रपंचास विराम.

                 00000

Thursday, November 20, 2025

"मुख्यमंत्री" एक अवलोकन

                                                (चित्र : ए.आय. साभार)

 १०व्यांदा शपथ ; मात्र मुख्यमंत्रीपदाचा विक्रम करण्यापासून वंचित राहणार नितीश कुमार

     १९ वर्ष ९३ दिवस असे तब्बल ९ वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नितीश कुमार यांनी आज १०व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी निर्वघ्न पाच वर्षांचा कार्यकाळ जरी पूर्ण केला तरीही ते देशातील सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम मात्र करू शकणार नाहीत. 

सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर २४ वर्ष १६५ दिवस हा सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम आहे तर विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (२४ वर्ष ९९ दिवस) यांचा विक्रम मोडण्यासही नितीश कुमार यांना केवळ ६ दिवस कमी पडतात असे चित्र आहे. 

      नितीश कुमारांनी आतापर्यंत एकूण १९ वर्ष ९३ दिवसांच्या कालावधीत १० वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. जर त्यांचे स्वास्थ्य ठिक राहिले व राजकीय परिस्थितीही त्यांच्याबाजुनेच राहिली तर ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील जो २४ वर्ष आणि ९३ दिवस होईल (वर्ष २०३० पर्यंत) व सध्या ८ क्रमांकारील यादीतील त्यांचे स्थान सुधारुन तिसऱ्या क्रमांकावर राहू शकेल असे दिसून येते.


                                             (चित्र : ए.आय. साभार)

एक नजर जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या टॉप १० व्यक्तींवर

     मुख्यमंत्रीपदी दीर्घकाळ (किमान १८ वर्षे) कार्य करणाऱ्या पहिल्या १० व्यक्तींमध्ये ६ व्यक्तींचा कार्यकाल हा २० वर्षांवरील आहे. २४ वर्ष १६५ दिवसांच्या कार्यकाळासह सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग पहिल्या स्थानावर आहेत.ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक २४ वर्षे ९९ दिवसांच्या कार्यकाळासह दुसऱ्या तर २३ वर्षे १३७ दिवसांच्या कार्यकाळासह पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू तिसऱ्या स्थानावर आहेत. 

     अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून २२ वर्षे २५० दिवस पद भूषविणारे गेगाँग आपांग हे यादीत चौथ्या तर २२ वर्षे ६० दिवस पद भूषविणारे मिझोरमचे माजी मुख्यमंत्री लाल थांगवाला पाचव्या क्रमांकावर आहेत. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह हे २१ वर्षे १३ दिवसांसह ६ व्या स्थानावर आहेत.  

 पहिल्या १०च्या यादीत चार मुख्यमंत्री हे १८ ते २० वर्षांच्या कार्यकाला दरम्यान आहेत. यात १९ वर्षे आणि ३६३ दिवसांसह त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार ७ व्या स्थानावर आहेत. तर बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे १९ वर्षे ९३ दिवसांच्या कार्यकाळासह ८ व्या स्थानावर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी १८ वर्षे ३६२ दिवसांसह ९व्या तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल १८ वर्षे ३५० दिवसांसह १० व्या स्थानावर आहेत.

मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 13 वर्षांची कारकीर्द 

     भारतदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2001 ते 2014असे सलग 13 वर्ष मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे.सध्या (2025मध्ये) पंतप्रधानपदाचा 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी यांनी 2029 पर्यंत पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यास 13 वर्ष मुख्यमंत्री आणि 15 वर्ष पंतप्रधानपद भूषविण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावार होणार आहे. 

    आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 1995 ते 2004 पर्यंत सलग दोन कार्यकाळ आणि विभाजीत आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्रीपद भूषविणारे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनी आतापर्यंत एकूण 4 वेळा 15 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली तेंव्हापासून आतापर्यंत एकूण 31 मुख्यमंत्री झाले (विद्यमान मुख्यमंत्री यांच्यासह).यात एकूण 3 वेळा आणि 11 वर्ष 78 दिवस मुख्यमंत्रीपद भूषविणारे राज्याचे चौथे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपदी राहिले. शरद पवार हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असून ते 6 वर्ष 221 दिवस या पदावर होते. विलासराव देशमुख यांनी एकूण 7 वर्ष 129 दिवस राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. राज्याच्या एकूण 31 मंत्र्यांपैकी केवळ वसंतराव नाईक आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच 5 वर्षांचा सेवा पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. ( पहिला कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2014- 8 नोव्हेंबर 2019) (दुसरा कार्यकाळ 23 -26 नोव्हेंबर 2019) आणि तिसरा कार्यकाळ 5 डिसेंबर 2024 ते आतापर्यंत) एकूण दिवस 5 वर्ष 347 ( दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत)

18 महिलांनी भूषविले मुख्यमंत्रीपद ; शिला दीक्षित सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्री

     सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या व देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांनी 1963 ते 1967 असा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला. देशात आतापर्यंत 18 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. यात सर्वाधिक 15 वर्षांचा कार्यकाळ दिल्लीच्या मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचा राहिला आहे तर 23 दिवसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व्ही.एन. जानकी या सर्वात कमी कार्यकाळ लाभलेल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. 

       महिला मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या सुचेता कृपलानी (1963-67),ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नंदिनी सत्पथी (1972-77 व 1980),गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर(1973 -79),आसामच्या मुख्यमंत्री अनवरा तैमुर (1980), तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व्ही.एन.जानकी (1988) आणि या स्वराज्याच्या पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जे.जयललिता (1991-2016),उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री मायावती (1995,1997,2002-03,2007-2012),पंजाबच्या मुख्यमंत्री राजिंदरकौर भट्ठल (1996-97),दिल्लीच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज (1998 (52 दिवस),बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी (1997-2005), दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री शिला दीक्षित (1998-2013), मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती (2003(259 दिवस),राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे (2003 -08,2013 -18),पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (2011 ते आतापर्यंत 2025),गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (2014-16), जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (2016-18),दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री अतिशय मार्लेना (सप्टेंबर 2024-फेब्रुवारी 2025) आणि दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री रेखा गुप्ता (20 फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत ) यांचा समावेश आहे. 

         महिला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काही खास बाबी अशा की, देशात सर्वाधिक 4 महिला मुख्यमंत्री दिल्लीलाच लाभल्या व देशात सर्वात जास्तकाळ महिला मुख्यमंत्रीही दिल्लीच्याच ठरल्या. (दिल्ली हे अर्ध राज्य आहे त्यास अजूनपर्यंत पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झालेला नाही).उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांना दोन वेळा महिला मुख्यमंत्री लाभल्या. देशातील 13 राज्यांनाच महिला मुख्यमंत्री लाभल्या असून महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांमध्ये अजूनही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत.

                      0000

Wednesday, November 19, 2025

फबिंगच्या विळख्यात आम्ही ?

 (चित्रे : साभार ए.आय.)

अर्पानेट व्हाया इंटरनेटचा जागतिक प्रवास आता सोशल मीडियाच्या सुळसुळाटापर्यंत येऊन ठेपला आहे. सातासमुद्रापार असलेली आपली व्यक्ती थेट व्हिडियो कॉल किंवा  व्हॉईसकॉलद्वारे हुबेहूब समोर येत असल्याने जग खऱ्या अर्थाने एक मोठ खेडं झाल्याची अनुभूती येत आहे. भारतातही साधारणत: २०१० पासून बेसीक मोबाईल,अँड्रॉइड ,स्मार्टफोन आदींच्या माध्यमातून माहितीचा मोठा खजीनाच सर्व सामान्यांच्या हातात आला आहे. हे सर्व छान छान होत असताना एखादी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असताना आपण तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये डोक खुपसन्याच्या ‘फबिंग’ या आज्ञावलीचाही जन्म झाला आहे. फबिंग संस्कृती आता जागो-जागी दिसून येत आहे. खेडयाची प्रचिती घेणारे जग आता मार्शल मॅकलोहन या संवादशास्त्राच्या अभ्यासकाने वर्तवलेल्या “आदिम संस्कृती प्रारुपा”कडे तर जाणार नाही ना ! ही शंका उपस्थित होण्यापर्यंत पोचली आहे.

मानवी समाज जस-जसा विकसित होतो तस-तसा या बदलानुरुप नव-नवे भाषिक परिमाणही घेवून येत असतो. “फबिंग” हा भाषिक आविष्कारही त्याचाच एक भाग होय. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. “कराग्रे वसते लक्ष्मी,करमध्ये तू गोविंदम् , प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणत बिछान्याहून दिवासाची सुरुवात होण्याचा काळ बदलून आता “करमध्ये तू मोबईलम्” अशी झाली असून त्यावर (मोबाईल) सकाळपासूनच सर्फींगने जागा घेतली आहे.

चर्चेचा मूळ विषय “फबिंग” हा आहे. बहुतेकदा घर, सार्वजनिक ठिकाणं,कार्यालयात असे चित्र दिसून येते की, एक व्यक्ती दुसरीला काही सांगत असते मात्र दुसरी व्यक्ती मोबाईलमध्ये डोक खुपसून बसलेली असते आणि एखाद्या गवय्याचे गाने ऐकताना दर्शक विंगेत कानात बोट घालून “गाओ बेटा गावो” म्हणणारे प्रेक्षक असावे, असाच प्रतिसाद जणू ते संबंधित व्यक्तीला देत असतात. (मुळात प्रतिसाद शून्यच असतो तो)

मोबाईलवरच आपले व्यावसायिक व कार्यालयीन कामे आल्याने त्यात डोकावने ही अपरिहार्यता असली तरी माणसाने माणसाचे किमान ऐकूण घ्यावे अशी आर्जव करणारा दुर्बल माणूसही जागो जागी दिसून येत आहे. "माणूस दया मज माणूस दया ही भिक मागता हरी दिसला.."अशी स्थिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून मांडतात तर आज या माणसाने निदान दुसऱऱ्या माणसााला प्रतिसाद तरी दयावा या नवीन हाकेपर्यंत येवून पोचला आहे.



दोन व्यक्तीमधील संवादाचा सेतू हा भाषेच्या माध्यमातून होतो. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळातील पहिल्या टप्प्यात तो खाना खुणांनी सांकेतिक संवाद साधायचा. मग त्याने लेखणीतून आपले मत इतरांपर्यत पोहचवून संवाद साधला. प्रिंटींगच्या शोधाने लेखकाचे मत समाजातील मोठया घटकांपर्यंत पोचले. संवादाच्या माध्यमांच्या विकासात रेडियो,टेलिफोन ,टिव्ही,इंटरनेट असा हा प्रवास अधिक जोरकसपणे सुरु असताना आता संवादाच्या उच्च शिखरावर सोशल मीडिया, आर्टीफिशीयल इंटेलिजन्स पर्यंतचा हा प्रवास विविध प्रश्नही सोबत घेवून आला आहे. कोणसही कल्पना नसलेले सायबर भामटे काही सेकंदात जनतेचे बँक खाते रिकामे करीत आहेत. नव माध्यमांच्या आधारेच कल्पक  पण अकल्पनीय गुन्हे घडण्याचे सर्रास प्रकारही पदोपदी बघण्यास मिळताहेत. आणि आता संवादाचा हा प्रवास आपापसातील शुष्क होत चाललेल्या संवादापर्यंत अर्थात “फबिंग” पर्यंत आला आहे. 

“फबिंग” हा मानवी समाजाला सतर्क करण्याचा संकेत आहे जर तो आज आम्हाला कळला नाही तर मार्शल मॅकलोहन यांनी वर्तवलेल्या “आदिम संस्कृती प्रारुपा”ची अर्थात माणूस आदिमानवाप्रमाणे न बोलणारा व केवळ हाताने खुनाकरून संवाद साधणारा बनु नये म्हणजे मिळवल! चला तर मग आपण स्वत:ला व आपल्या आजुबाजुच्या लोकांना फबिंगच्या विळख्यातून बाहेर काढुया व संवादाचे सक्रीय वाहक बनुया!

                                         0000000

Monday, November 17, 2025

ती च्या छटा....





                     (चित्र : ए आय साभार)

 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (नागपूर) कमानी शेजारी मी एकदम थांबलो त्याला कारणही तसे सज्जड! लगबगीने येणारी कार व तिने घेतलेला शार्प कट. कारची फ्रेम डोळ्यासमोरून दूर होत नाही तोच पुढे ती कार जुने सचिवालय इमारत परिसरातील ध्वजारोहण स्थळी दिमाखात उभी राहते आणि त्यातून एक महिला अधिकारी ऐटीत बाहेर पडतात व गेट क्र. ४ कडे आपल्या ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ होतात.

      तिथेच गेट क्र. ४ कडून ३ कडे अगदी हळू-हळू येणारी एक स्कुटी आणि त्यावर आरूढ असलेल्या महिला कर्मचारी कार्यालयात जाण्यापूर्वीच फार थकलेल्या अवस्थेत गाडी पार्क करीत होत्या.

         मी ही कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होत गेट क्र. ३ ने आत शिरलो तोच जिन्यावर पायरी चढायला गेलो आणि माझ्या पुढे परत दोन महिला फार दमल्यागत पायऱ्या चढत होत्या व त्यांची कुजबुज की, मॅडम आता काय १० वर्षाची नोकरी राहिली. खूप थकवा येतो आता अन दुसऱ्या महिला म्हटल्या आतापर्यंत निघालाच न वेळ तो उरलेलाही निघूनच जाईल!. (हे तीन्ही दृष्य एकाच वेळचे म्हणजे साधारण सकाळी १०.३० वाजताचे.)

(ध्वजारोहण स्थळी पार्क असलेली हीच ती कार)

          मग दुपारी बचत गटाच्या स्टॉलवर जेवायला गेलो तर तिथेही दोन महिलांचा जेवताना इतराना ऐकू जाईल/जावा असा संवाद सुरू होता. त्यातील संभाषण असे, "बघा न मॅडम माझं लग्न होऊन ६ महिने झाले, माझा नवरा फारच समंजस व कोऑपरेटिव आहे. मी जेव्हा सासरी जाते तेव्हा आमचे हे तर इथला पाण्याचा ग्लास तिथे सुद्धा करीत नाहीत अन् इकडे माझ्याकडे रूमवर आले तर स्वयंपाक, कपडे, भांडी अशी सर्व मदत आनंदाने करतात बघा! खूपच चांगला आहे माझा नवरा".

           एकाच दिवशी साधारण सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या अवलोकन व निरिक्षणातून ही स्त्रीपात्र समोर आलीत. मग, कामकरी महिलांच्या (नोकरदार) या प्रातिनिधिक अभिव्यक्तिला 'ती अशीही आणि तशी' हे एका शब्दात मांडताना "ती च्या छटा.." एवढच मला काय ते गवसल  ते ब्लॉगवर खरडून ठेवलं.

        ०००००

Thursday, October 9, 2025

झुंडीत कायमचा हरवला ‘बाबु‘


नागपुरातील झोपडपट्टीमधील मुलांची मोट बांधुन त्यांना थेट परदेशात फुटबॉल स्पर्धेची पर्वणी घडविणाऱ्या विजय बोरसे यांच्या कार्यावर आधारीत व महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भुमिकेतील ‘झुंड’ चित्रपटात बाबुची भूमिका  वठवणारा हरहुन्नरी कलाकार प्रियांशु छेत्री याच्या हत्तेची बातमी आज नागपुरच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झडकली. ‘झुंड’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनींग शो च्या वेळी प्रियांशुची प्रत्यक्ष भेट व वार्तालाप झाला होता माझा त्यामुळे ही बातमी बघताच सकाळपासून मनात कालवा कालव सुरु होती म्हणून हा लेखन प्रपंच.

 नागराज मंजुळे हे मुळात जीवन संघर्षात घडलेले व कामातून सर्वप्रिय झालेले दिग्दर्शक.‘सैराट’ चित्रपटात त्यांनी रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांना संधी देवून त्याचे सोने केले व सर्व प्रेक्षकांनीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला. ‘फँन्ड्री’तील झब्ब्या (सुरज पवार) आणि मंजुळे निर्मित व त्यांच्या भूमिकेतील ‘नाळ’ मधील चैत्या (श्रीनिवास पोकळे) ही पात्रे म्हणजे मंजुळे यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना दिलेली नवी ओळख होय. या प्रवासात पुढे जात मंजुळेंनी  ‘बीग बी’ यांना घेवून थेट हिंदी चित्रपट सृष्टीत झुंड चित्रपटाद्वारे पदार्पण केलं.२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण नागपुरात झाले या चित्रपटासाठीही मंजुळे यांनी आपला मराठी चित्रपट निर्मितीतील कित्ता कायम ठेवून अनोळखी चेहरे आणि चक्क झोपडपट्टीतील चेहरे संपूर्ण देशासमोर ठेवले. या चेहऱ्यांमध्ये बाबुच्या भूमिकेतील प्रियांशु छेत्री याने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली व चक्क बीग बीं सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्याला मिळाली.

        ९ मार्च २०२२ रोजी दिल्लीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ‘सिरीफोर्ट ऑडेटोरियम’ मध्ये विशेष स्क्रिनींग शो आयोजित करण्यात आला होता. बीग बी वगळता नागराज मंजुळेंसह या चित्रपटातील सर्व कलाकारांनी या शो ला हजेरी लावली होती. या शोच्या मध्यंतरात सर्व कलाकारांच्या भेटी झाल्या त्यात प्रियांशुही भेटला. त्याच्या डोक्यातील ती टोपी,केसांना एका ठिकाणी केलेला वेगळया धाटणीतील कलर अशा थाटातील प्रियांशु सोबत सहज गप्पा मारल्या व तेवढयाच सहज व आत्मविश्वासाने तो प्रतिसादात्मक बोलता झाला. मी स्वत: झोपडपट्टीत राहतो व फुटबॉल खेळतो असे सांगणाऱ्या प्रियांशुसोबत त्याच्या आवडी निवडी, चित्रपटाचे चित्रिकरण व अभिनय अशा सर्व गोष्टींवर चर्चा झडली. उर्वरीत चित्रपट बघून आणि चित्रपटाच्या चमुचे अभिनंदन करत व स्टँडिंग ओवेशन देवून घरी परतलो.

या घटनेला तीन वर्ष उलटून गेले व माझाही पावने तीन वर्षांचा मुक्काम नागपुरात आहे आणि आज अचानक प्रियांशुच्या हत्तेची बातमी वाचली. प्रियांशुच्या आयुष्यातील हा सर्व पट खूपच झटपट झाल्याचे वाटते. बातम्यांमधील मजकुराहून प्रियांशुच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. प्रियांशुचे दारुचे व्यसन व ते पूर्ण करण्याकरिता कधी मधी तो चोरी करीत असल्याचेही बातमीत म्हटले आहे.

एकंदरीतच प्रियांशुने ‘झुंड’ चित्रपटात बाबुच्या भूमिकेला न्याय दिला व प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मात्र, जीवनाच्या चित्रपटात तो परिस्थितीने फ्लॉफ ठरला असच वाटत. आणि झुंडीत बाबु कायमचा हरवल्याचे सत्यही अधोरेखित करते.आपल्या समाजाचे हे विदारक चित्रही त्यातून समोर आले हे बदलण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका निभवण्याचे स्मरण करून देणारी ही घटना आहे.  

                               00000






 

Thursday, September 18, 2025

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘नवीन नागपूर’

 


            महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रात विकासाची घोडदौड सुरु ठेवली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण भागाच्या विकासाचा समतोल साधन्यासही यात प्राधान्य आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक त्रिकोण, पुणे येथे आयटी क्षेत्राची भरभराट तसेच कोकण, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील औद्योगिक विकासातून त्या-त्या भागातील उद्योगाला चालना देण्याचे कार्यही जोमाने सुरु आहे. नवे आव्हान व नव्या संधी यांची सांगड घालत नव्या युगाच्या अपेक्षांना पूर्ण करुन विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महाराष्ट्रानेही आपली जबाबदारी स्वीकारली आहे. याचदिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अग्रेसर होत नागपूरसह विदर्भाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी ‘नवीन नागपूर’ या महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय व्यवसाय व वित्तीय केंद्र उभारणीच्या दिशेने नुकतेच महत्वाचे निर्णय व सामंजस्य करार झाले आहेत. या प्रकल्पाचे नामाभिदान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले आणि त्यांच्याच अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पास मंजुरी मिळाली  आणि त्यांच्याच उपस्थितीत ६ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करारही झाला. विदर्भासह महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसाय केंद्र बनण्याच्या दिशेने पडलेले हे एक निर्णायक पाऊल आहे.नागपूरच्या आर्थिक नकाशावर हा प्रकल्प “गेम चेंजर” ठरणार आहे.

           भौगोलिकदृष्टया भारताचे हृदय अर्थात झिरो माईल्सचे शहर व मध्यभारतातील सर्वात मोठे, महाराष्ट्राची उपराजधानी, टायगर कॅपिटल, विदर्भाचे मुख्यालय आणि राज्यातील लोकसंख्येच्यादृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे शहर आदी बिरुदावल्यांसह गौरवशाली सामाजिक,आर्थिक,ऐतिहासिक, राजकीय व संस्कृतिक वारसा असणारे नागपूर शहर. आता समृद्धी महामार्गाचा झिरो माईल,मेट्रो ट्रेन,ग्रीन बसेस,उड्डानपुल,एलिवेटेड मार्ग,विमानतळ आणि रेल्वेसह सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, महत्वाची प्रशासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्थांनी हे शहर समृद्ध झाले आहे.देशातील पहिले प्रायोगिक तत्वावरील स्मार्ट व इंटेलिजंट गाव उभारण्याचा मानही नागपुरला नुकताच मिळाला आहे. याच कडीत शहराच्या विकासाला गती देत जागतिक दर्जाच्या सुविधांनी युक्त असे महत्वाचे व्यवसाय व वित्तीय केंद्र बनन्याच्या दिशेने ‘नवीन नागपूर’च्या  रुपाने महत्वाचे पाऊल टाकले गेले  आहे.



            मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या द्रष्टया नेतृत्वात व मार्गदर्शनात नागपूरला कॉर्पोरेट ऑफिसेसचे राष्ट्रीय केंद्र बनविण्यासह व्यवसाय, निवासी आणि सामाजिकबाबींचा अंतर्भाव असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच शहराला मध्य भारतातील तंत्रज्ञान व नवोपक्रम केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने ‘नवीन नागपूर’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी होत आहे. महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (आयबीएफसी ) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि केंद्र शासनाच्या नवरत्न दर्जाच्या राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ लिमिटेड (एनबीसीसी-इंडिया लि.) आणि गृह आणि नगर विकास महामंडळ लिमिटेड (हुडको ) यांच्यात दोन महत्वपूर्ण  सामंजस्य करार करण्यात आले.

          एनएमआरडीए आणि एनबीसीसी (इंडिया) लि. यांच्यात झालेल्या करारानुसार एकूण १ हजार ७१० एकरावरील ग्रीन फिल्ड कृषी जमीनीवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रती पाच वर्षानुसार एकूण तीन टप्प्यात या प्रकल्पाच्या  विकासासाठी १००० एकर जमीनीचा उपयोग करण्यात येणार असून उर्वरित ७१० एकर जमीन भविष्यातील विस्तारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा विकास प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित असेल. यात समाविष्ट होणाऱ्या सुविधांमध्ये समाकलित भूमिगत उपयुक्तता टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, स्वयंचलित कचरा संकलन व वर्गीकरण प्रकल्प, स्टार्ट-अप्स, एमएसएमई , आयटी कंपन्या, व्यावसायिक केंद्रे, तसेच निवासी व मिश्र वापर प्रकल्प यांचा समावेश आहे. यासाठी  एनएमआरडीएच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सक्षम समिती स्थापन करण्यात येणार आहे.

         दुसरा महत्चाचा करार एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करण्यात आला. या करारांतर्गत हुडको ६,५०० कोटी रुपये नवीन नागपूर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी  देण्यात आले आहे. या निधीमुळे हा प्रकल्प वेगाने आकार घेणार आहे व  या भागीदारीत कार्यशाळा, प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमांचाही समावेश आहे.

         नागपूर महानगर प्रदेशांतर्गत हिंगणा तहसिलच्या लाडगाव-रिठी आणि गोधणी-रिठी परिसरात समृद्धी महामार्गालगतच्या एकूण १ हजार ७१० एकरावरील ग्रीन फिल्ड कृषी जमीनीवर बाह्य रिंगरोड पासून २ कि.मी.अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रती पाच वर्षानुसार एकूण तीन टप्प्यात या प्रकल्पाच्या  विकासासाठी १००० एकर जमीनीचा उपयोग करण्यात येणार असून उर्वरित ७१० एकर जमीन भविष्यातील विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे. दळणवळणाच्यादृष्टीने हा प्रकल्प समृद्धी महामार्गाला लागून आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १५ मिनिटांच्या तर रेल्वे स्थानकापासून ३० मिनिटांच्या अंतरावर तर लवकरच विस्तारीत मेट्रो मार्गाच्या लगत असणार आहे.


                            कॉर्पोरेट क्षेत्राला मिळणार विदर्भातील कुशल मनुष्यबळ

        राज्याचे ज्ञान कॉरीडॉर म्हणून हा प्रकल्प नावारुपाला येणार आहे. भौगोलिकदृष्टया लगत असल्याने नागपुरच्या परिसरातील ४१ अभियांत्रिकी महाविद्यालये,२८ खाजगी शैक्षणिक संस्था, सर्वात जास्त अभियात्रिकी महाविद्यालये असणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा विभाग व येथील विद्यार्थ्यांना नोकरीची नामी संधी असणार आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भातून वर्षाकाठी अभियांत्रिकी पदवी घेवून उत्तीर्ण होणाऱ्या जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनाही यातून संधीची दारे उघडी होणार आहेत.भरीस भर म्हणून या प्रकल्पासाठी नागपुरातील आयआयएम, एम्स, ट्रीपल आय आयटी, व्हिएनआयटी, व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था (आयएमटी), महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एन.एल.यु.) यांच्यासह निम्स व सिम्बॉयसिस या भारतीय व जागतिक शैक्षणिक संस्थांसोबत करार करण्यात येणार आहे.

                 एकाच ठिकाणी डिजीटल समाधान व एकल खिडकी मंजुरी

      या प्रकल्पात समाविष्ट होण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्सचे एकाच ठिकाणी डिजीटल समाधान होणार असून एकल खिडकी मंजुरी मिळणार आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध मान्यता, आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक केंद्र (आयबीएफसी) मंजुरी तसेच आरबीआय, सेबी आणि इरडईकडून नाहरकत प्रमाणपत्र,जीएसटी नोंदणी, अर्जाची रियल टाईम स्थिती, शुल्काचा ऑनलाईन भरणा आणि पॅन,डिन व सीन यांचे रियल टाईम पडताळणी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विविध मान्यता सुलभ होण्यासाठी नगर रचना, वीज व सार्वजनिक सुविधा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ(आवश्यक पर्यावरणीय मंजुरी), कामगार व कर विभाग, ऊर्जा विभाग आणि नोंदणी,मुद्रांक व महसूल विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.


प्रकल्पातील महत्वाचे टप्पे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘नवीन नागपूर’ नाव
         या प्रकल्पाच्या उभारणीसाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यातील गिफ्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (गिफ्ट सिटी), बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई आणि पंजाब राज्यातील मोहाली येथील आयटी सिटी तथा स्टार्टअप हब ला भेटी देवून पाहणी करण्यात आली. डिसेंबर २०२४ मध्ये नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता  यांच्या समक्ष प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकल्पास प्राथमिक मान्यता दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ‘नवीन नागपूर’ हे समर्पक नाव दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिले. या सर्व प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळण्याबाबत एप्रिल-मे २०२५ मध्ये केंद्र शासनाच्या नवरत्न दर्जाच्या राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ लिमिटेड (एनबीसीसी-इंडिया लि.) आणि गृह आणि नगर विकास महामंडळ लिमिटेड (हुडको लि.) यांच्या सोबत प्राथमिक स्तरावरील बैठका पार पडल्या.
         जून महिन्यात या प्रकल्पास गती देण्याच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यानुसार नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना कायद्याच्या कलम ३७ अंतर्गत नवीन नागपुरसाठी भूमी आरक्षित करण्यास मंजुरी दिली. २४ जून २०२५ रोजी राजपत्र प्रकाशित करण्यात आले व स्थानिक वृत्तपत्रामध्येही ते प्रसिद्ध झाले. याअंतर्गत याबाबत ७/१२ उताऱ्यावरुन एकूण ७३८ व्यक्तीगत सूचना देण्यात आल्या. याच महिण्यात प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार संस्था म्हणून एनबीसीसीची ४ टक्के शुल्काने नेमणूक करण्यात आली व हुडकोला ८.६० टक्के त्रैमासिक व्याजदराने निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मान्यता देण्यात आली. जुलै २०२५ मध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर (व्हीएनआयटी) च्या मदतीने सामाजिक व पर्यावरणीय परिणाम मुल्याकंन अभ्यास करण्यात आला. याच महिण्यात हुडकोने या प्रकल्पासाठी भूमीअधिग्रहणाकरिता ८.६० टक्के व्याजदराने ३ हजार कोटींच्या निधीस मंजुरी दिली. या सर्वांचा परिपाक म्हणून ३ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. येथून ५ दिवसांनी म्हणजे ८ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवीन नागपूरच्या विकासासाठी एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हुडको यांच्या दरम्यान दोन महत्वपूर्ण सामंजस्य करार झाले.

                                अंदाजित ५ लाख कामकरी व १ लाख रोजगार

        ‘नवीन नागपूर’ हा  प्रकल्प एकूण ६९२ हेक्टर (१ हजार ७१० एकर) परिसरात उभारला जाणार असून येथे १ लाख निवासी तर ५ लाख कामकरी असण्याचा तसेच जवळपास १५ अब्ज अमेरिकन डॉलर अर्थ निर्मितीचा अंदाज आहे.  एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी ४५ टक्के क्षेत्र व्यावसायीक कार्यासाठी, २० टक्के क्षेत्र दळणवळणासाठी तर निवास, सेवा-सुविधा आणि हरित व मोकळया क्षेत्रासाठी प्रत्येकी १० टक्के भूभागाचा उपयोग होणार आहे तसेच ५ टक्के क्षेत्रावर सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

           प्रकल्पाद्वारे सुरुवातीच्या पाच वर्षांपर्यंत सरासरी प्रतिवर्षी २५ हजार ७२१ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सरासरी ३० हजार मासिक वेतनानुसार १८ हजार ५१९ कोटी रुपये वेतनावर खर्ची पडणार आहे. एकूण प्रकल्पापैकी ४५ टक्के म्हणजेच ४५० एकर भूमीही व्यावसायिक परिसर म्हणून वापरण्यात येणार असून येथे २० हजार ९१६ कार्यालये उभारण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जवळपास ७४ हजार कोटींची गुंतवणूक होऊ शकेल. कॉर्पोरेट क्षेत्र आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्स यांची योग्य सांगड घालण्यात येणार आहे. याअंतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रासाठी ५० टक्के तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी ३० टक्के विभागणी होवून मॉडयुलर युनिटसह बिझनेस पार्क उभारण्यात येईल आणि १०० टक्के प्लग-अँड-प्ले कोवर्कींग स्पेस नुसार २० टक्के क्षेत्र स्टार्टअप्ससाठी  देण्यात येणार आहे.

                                  अशी होणार आर्थिक उलाढाल

            जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र उभारतांना योग्य आर्थिक घडी बसविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. यानुसार पहिल्या पाच वर्षांपर्यंत ९८ हजार ८६० कोटींचा महसूल निर्माण होणार आहे. मुख्यत्वे व्यावसायीक युनिट विक्रीच्या माध्यमातून ८४,६८०.६४ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. निवासी युनिट विक्रिद्वारे ११,२९१ कोटी तर सोयी सुविधासाठी २,०९१ कोटी आणि विकास कार्य मंजुरींच्या मोबदल्यात ७९८ कोटींचा महसूल निर्माण होणार आहे. तुलनेत एकूण खर्च ११,३५६ कोटी होणार असून यातील ५७ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर, २६ टक्के खर्च जमीन अधिग्रहणासाठी, रस्ते निर्माणासाठी ५ टक्के, पर्यावरणीय मंजुरीसाठी १ टक्के आणि सोयीसुविधांसाठी २ टक्के खर्च येणार आहे. यासोबतच सल्लागार सेवेसाठी ४ टक्के आणि विपणन आणि आकस्मिक खर्चापोटी ५ टक्के खर्च होणार आहे.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत नागपूरसह विदर्भामध्ये उद्योग आणण्यासाठी  विविध कंपन्यांसोबत केलेले सामंजस्य करार, गडचिरोली  जिल्ह्याला विकासाच्या  मार्गावर अग्रणी करण्याकरिता घेतलेले निर्णय व त्याची होत असलेली अंमलबजावणी, विदर्भात विमानतळ उभारण्यासाठी घेतलेला सक्रीय पुढाकार आणि नगळगंगा -वैनगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील दुष्काळी भागात सिंचनाद्वारे शेतीच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार आता या विकास प्रवासाला ‘नवीन नागपूर’ प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक बळ मिळून विकासाची गतीही वाढणार  आहे.


रितेश मो.भुयार
माहिती अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,नागपूर.