Friday, December 12, 2025

दिग्विजयी अर्जुन ; अनिरुद्ध अष्टपुत्रे सर


 

  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील ३० वर्षांच्या उत्कृष्ट कार्यकाळानंतर या वर्षाचा शेवटचा दिवसचं आपल्या शासकीय नोकरीचा समारोप अनुभवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा महासंचालनालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे हे खऱ्या अर्थाने ‘आपण सारे अर्जुन’ या व.पुंच्या पुस्तकातील संकल्पनेनुसार दिग्विजयी अर्जुन ठरतात. 

   मुळात पत्रकारितेचा पींड असणाऱ्या अष्टपुत्रे सरांनी महासंचालनालयाची परीक्षा व मुलाखत दिली आणि ते  पुन्हा आपल्या पत्रकारितेत रममाण झाले. दोन वर्षांनी अंतिम निकाल लागला आणि १९९५ मध्ये ते अधिकारी म्हणून माहिती खात्यात रुजु झाले. तेंव्हापासून सुरु झालेला हा प्रवास सतत या विभागाला व त्यांनाही समृद्ध करीत गेला. जिल्हा माहिती अधिकारी आणि तब्बल ६ मुख्यमंत्री आणि १ उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा हा प्रवास विशेष उल्लेखनीय ठरला. 

   मला सरांचा थेट सहवास लाभला नाही. मात्र, फोनवर बोलणे व्हायचे व व्हाट्अपच्या माध्यमातूनही संपर्कात असायचो. साधारणत: २०१५ साली घुमान (पंजाब) येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या वेळी मला त्यांचा फोन आला आणि तत्कालीन राज्य शासनाला वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने तिथे आमच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे पंजाबी भाषेतील बॅनरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रदर्शनाबाबत त्यांनी माहिती घेतली. याबाबत मी केलेल्या बातमीचं त्यांनी कौतुक केलं. पुढे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी असताना अंगणवाडी सेविकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या बातमीसाठी त्यांचा फोन आला. त्यांनी बातमीतील व्यक्तींची नावे आणि गावांच्या नावाबाबतही मला व्हाट्सअपद्वारे दुरुस्त्या सूचविल्या. पण, ते सांगतानाही या बातमीत चुकीची माहिती जायला नको एवढेच वाटते! अस, त्यांनी  त्यावेळी नमूद केल्याच आजही आठवतं. 

  पुढे, रशियाने युक्रेनवर हल्ला प्रारंभ केला आणि युक्रेनमधील भारतीयांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी दिल्लीस्थित  त्या त्या राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांनी दिल्ली विमानतळावरून विद्यार्थी व नागरीकांना स्वगृही पाठविण्याची मोहिम राबविली होती. महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र सदनाने हे कार्य हाती घेतले होते व त्याची सर्व प्रसिद्धीची धुरा महाराष्ट्र परिचय केंद्राने हाताळली व त्या व्यवस्थेचा मी एक भाग होतो. युक्रेनहून मध्यरात्री आलेले विमान व त्यातील महाराष्ट्राचे विद्यार्थी ही बातमी आम्ही मध्यरात्री ३ वाजता विमानतळाहूनच दिली. याबाबत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला अवगत करीत होतो. यावेळी अष्टपुत्रे साहेबांनी आमच्या टिमचे तोंड भरून कौतुक केले व तसा व्हाट्सअप संदेशही केला. 

     

  त्यांना सहकुटुंब दिल्लीला फिरायला यायच होतं त्यावेळी त्यांच्यासोबत फोनवर व व्हाट्सअपवर सतत बोलणं होत असे. त्यातून साहेबांच्या मृदू व प्रेमळ स्वभावाचं दर्शन घडलं. २०२२ मध्ये माझी पदोन्नती झाली तेंव्हाही साहेबांनी आवर्जून मेसेज करून अभिनंदन केलं. २०२३ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सरांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली. त्याचवेळी मला व्हर्टीगोचा त्रास सुरु झाला होता. अशात ते आस्थेनं माझी चौकशी करीत होते. त्यामुळे या त्रासातून बाहेर निघायला मदतच झाली. 

   आता समजून घेवूया ‘दिग्विजयी अर्जुन’ या त्यांना मी दिलेल्या बिरुदाविषयी. ‘कुरुक्षेत्र’ हे प्रत्येकाच्या आत असलेलं ताण-तणाव, जबाबदारी, ऑफिस पॉलिटिक्स आणि जीवघेणी स्पर्धा असते. या कुरुक्षेत्रावर ‘कौरव’ आणि ‘पांडवां’ पैकी एकाची निवड करण्याचा प्रसंगही येतो. नकारात्मक विचार, अहम्, आळस आणि भूतकाळ यांच्यापासून दूर राहणे म्हणजे कौरवांचा त्याग करणे आणि धैर्य, नितिमत्ता आणि प्रेम यांचा स्वीकार करणे म्हणजे पांडवांचा संग करणे होय. या प्रवासात शांत बुद्धी, विवेक आणि संयमरुपी कृष्णाचे मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा क्रम कुरुक्षेत्रावर यश रुपी दिग्विजयी अर्जुन ठरतो. हे सर्व वर्णन अष्टपुत्रे सरांबद्दल वरिष्ठांकडून ऐकलेल्या चांगुलपणाला चपखल बसते आणि म्हणूनच ते दिग्विजयी अर्जुन ठरतात. सर, आपणास सेवानिवृत्ती नंतर निरोगी व सुखी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!


0000

Saturday, November 22, 2025

मधु ; एक प्रवास पूर्णत्वाकडे



     ही घटना आहे साधारण 11 डिसेंबर 2014ची.परराज्यात युगल जोडप्याला फिरण्यास व निवासास अडचणी येऊ नये म्हणून लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नगरपरिषदेत विवाह प्रमाणपत्र बनविण्यात व्यस्त असलेले आम्ही. तिथल्या वेळखाऊ प्रोसिजरमध्ये एवढे व्यग्र झालो की सायंकाळी ७ वाजता अमरावतीहुन आपली ट्रेन आहे याचं भानच राहिल नाही. नगरपरिषद कार्यालय (परतवाडा) येथून विवाह प्रमाणपत्राच्या प्रत घेऊन आम्ही अचलपूरला (माझं गाव) आलो. बॅग आधीच भरल्या होत्या त्या घेतल्या व बसमध्ये बसलो आणि वलगावपर्यंत आल्यावर कळलं की आता आपल्याला अमरावती स्टेशनहून निघणारी अंबा एक्स्प्रेस ट्रेन कुठल्याही परिस्थितीत पकडता येणार नाही. म्हणून भात्यातलं ब्रम्हास्त्र उपसण्याचा निर्णय घेतला.अमरावतीच्या शेगाव नाक्यावर बस पोहोचली आणि माझी नवपरिणीत सहचारिणी सोनाली आणि मी दोघेही बसमधून उतरलो. तिथेच आमच्या दिमतीला एक स्कुटी येऊन उभी राहिली. स्कुटीच्या सारथ्यासाठी मी सज्ज झालो. सहचरणी, मी, ती आणि आमची आठवड्याभराची कपड्यांची बॅग या लवाजाम्यासह आम्ही  बडनेरा रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झालो. इकडे अमरावती स्टेशनहून अंबा रेल्वे गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली आणि आता आमची शर्यत याच रेल्वेगाडी सोबत होती. ती रुळावरून धावू लागली तर स्कुटीहून मिळेल ते सिग्नल तोडत रस्त्यावरील गर्दीला तुडवत आमचा प्रवास सुरू होता. (कृपया,असे वाहतूक नियम तोडू नये)

  (चित्र : ए.आय. साभार)

बडनेरा स्टेशन आलं. स्कुटी पार्क केली. माझ्या हाती बॅग, सहचरणीला प्रोत्साहन देत ,'पळा वहिनी पळा, वहिनी पळा'च्या ती आरोळ्या देत होती. आम्ही स्टेशनच्या फुटवेअर ब्रिजवर पोहोचलो आणि आमच्यासमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं. मोठ्या सायासान बडनेरा स्टेशनला सापडलेली अंबा रेल्वे आता रुळावरून निघाली होती. फुटवेअर ब्रिज व नंतर पायऱ्या उतरून ही ट्रेन पकडणे हे चॅलेंज चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा वेगळं नव्हतं.पण, ध्येय प्राप्तीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची आजपर्यंतची माझी धडपड इथेही काम करीत होती.ट्रेनकडे सरसावलो. बॅग स्टेशनवर खालीच ठेवली. ट्रेनच्या एसी डब्यात शिरलो व दारात उभा राहिलो. सहचारिणीला हात दिला आणि तिला डब्यात आत खेचलं. तिकडून आवाज आला, 'दादा बॅग राहिली ,ही घे बॅग!',तिने बॅग फेकली अचूक झेल घेऊन ती बॅग मी रेल्वेच्या डब्यात घेतली. गाडीने वेग घेतला तशी स्टेशनवर उभी असलेली ती आम्हाला दोन्ही हाताने अगदी मनापासून निरोप देत होती. यापूर्वी उल्लेख केलेलं हेच ते माझं ब्रम्हास्त्र 'मधु'. त्या दिवशी तिच्यामुळेच आमच्या हनिमूनच्या प्रवासाची इमारत ढासळता ढासळता सावरली. तीच आमची ,लाडकी मधु. 

      नुकताच 3 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा विवाह संपन्न झाला. तिच्याशी जुळलेलं हे नातं खूपच खास ठरलं. आम्ही दोघं आणि आमच कोकरू स्वरित असे तिघेही मधुच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असणाऱ्या तिचा साखरपुडा, मेहंदी, हळदी, संगीत आणि विवाह या सर्व आनंदात सहभागी राहिलो. विवाह बंधनाच्या प्रवासातील हे सर्व प्रसंग अटेंड करण्याची ही माझ्या आयुष्यातली आजपर्यंतची पहिली वेळही ठरली आणि त्याच भाग्यही मधु मुळेच मिळालं. 

      दीर्घकाळ आजोळ,अमरावती, पुणे, दिल्ली असा प्रवास केल्याने आपल्या गोतावळ्यातील माणसांसोबत आनंदाचे क्षण एंजॉय करायला खूपच कमी वेळ मिळाला.अशा कमीवेळात युवा पिढीशी जुळलेल्यापैकी प्रतिनिधिक नातं म्हणजे मधुशी जुळलेलं एक छान नातं. खूप कमी वेळा मधुशी भेटणं झालं, या सर्व भेटीगाठींमध्ये जे आकलन झालं त्यातून उलगडणारा हा मधूचा पूर्णत्वाकडील प्रवास.

        बहुदा इंजिनिअरिंग करायला अमरावतीला असताना परिचय झाला मधुचा, तेंव्हा मी दिल्लीला होतो. लग्नापूर्वी एक छोटी शस्त्रक्रिया झाली माझ्यावर अमरावतीला त्यावेळेस आमच्या काकुंकडे एक-दोन दिवस मुक्काम होता माझा, तेंव्हा ही सगळी यंगिस्तान भावंड भेटली. या भावंडांच आपसातील ट्युनिंग वाखाणण्या सारखं होतं. राखी पौर्णिमा,भाऊबीज , वा. सी. काळे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन व त्यात या सर्वांचा आपल्या घरच्या सदस्यांबरोबर घडणारा मेळाही मला नेहमीच भावला. त्यात मधुही आपली स्पेस तयार करत मोठी होत गेली. आई शिक्षकीपेशात असल्याने 'मोहित' आणि 'मधू ' या दोघांच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. मग भविष्याचा विचार करता अमरावतीतच त्यांनी टुमदार घर बांधलं. याची रचनाही मुलांच्या मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्यही आईने दिल होतच.

       इकडे मी, शासकीय नोकरीत रुजू झालो तेंव्हा घरच्यांनी छोटेखानी रोडगे पार्टी आयोजित केली होती आमच्या शेतावर. जवळच्या लोकांना बोलवलं होत तेंव्हा मधु आवर्जून आली होती. मग माझ्या लग्नातही हजेरी लावली तिने. 

     मधुच शिक्षण होत असताना करिअरकडेही तिचं पुरेपूर लक्ष होत. भावंड जस जशी वेगवेगळ्या क्षेत्रात झेप घेत होती तसा तिनेही आपला स्पेस शोधून काढला व कमावती झाली. आता तिचा आत्मविश्वास दुणावला होता. 'लग्न' या सुंदर नात्याच्या बंधणाला स्वीकारण्यासही ती सज्ज झाली. कांदे- पोह्यांच्या अनेक बैठकाही तिने अनुभवल्या. अन् तिच्या स्वप्नातला राजकुमार हा प्रथमेशरावांच्या रूपाने तिच्या आयुष्यात आला. पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला.साखरपुडा आनंदाने पार पडला. लग्नास अवकास असल्याने दोघांना एकमेकास समजण्यास थोडा अवधीही मिळाला.

       साखरपुडा व पुढे लग्नानिमित्ताने जमलेले सगळे आप्त स्वकीय व त्यांची बडदास्त राखण्यापासून आपली हौस- मौज पूर्ण करण्यातही ती सक्रिय होती. लग्नानिमित्त कराव्या लागणाऱ्या सर्व बारीक-सारीक बाबींच तिनं उत्तम नियोजन केलं. प्रत्यक्ष त्या जबाबदाऱ्या पार पाडत इतरांकडून ती कामे तिने नीट करून घेतली. मेहंदी, हळद आणि संगीत या तिन्हीच चोख नियोजन आणि या प्रसंगांचा पूर्ण आनंद ती घेत होती. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत संगीत कार्यक्रमात नवरी म्हणून भावी जोडीदार आणि सासरकडील मंडळी समोर मधुने दिलेले डान्स परफॉर्मन्स हे तर लाजवाब होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पदोपदी झळकत होता.



     लग्नही वेळेत लागल व शानदार या शब्दाला साजेसा हा सोहळाही संस्मरणीय ठरला. तुडुंब गर्दीने खचाखच भरलेले मंगल कार्यालय व नवरी- नवरदेवास आशीर्वाद देण्यासाठी बराच काळ लागलेली लांब रांग मग सप्तपदी, कन्यादान व पाठवणी असा खूपच देखणा सोहळा कायमच डोळ्यात व मनात भरून गेला. 

        या उत्तम सोहळ्यानंतर आई आणि धाकट्या भावाने मधुला दिलेला निरोप आता फक्त तिच्या वडिलांच्या नसण्याची अपूर्णता दर्शवत होता. पण, आयुष्याची एक यशस्वी पारी पूर्ण करणारी लेक बघून तिचे वडीलही स्वर्गातून या लेकीचा अभिमानच बाळगत असतील यात तिळमात्र शंका नाही.

           मधुचा स्वतःला सिद्ध करण्याचा एकटीचा प्रवास आता संपला व जोडीदारासोबतचा प्रवास आता सुरू झाला आहे. माहेर व आप्त स्वकीयाकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवर ती हा जीवनाचा सुंदर टप्पाही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडेल, त्यासाठी 'मधु' तुला मनापासून शुभेच्छा!.

  आमची  आयर्नलेडी काकू

 इंजीनियरिंगच शिक्षण घेताना मधु आपल्या आत्याकडे वास्तव्यास होती. त्याच आमच्या आदरणीय व आयर्नलेडी काकु प्रतिभा नामदेवराव भुयार. काकुंमुळेच मधु नावाच्या या सालस पात्राचा आम्हाला परिचय झाला. एकामागून एक दुःखाचे प्रसंग ओढवले तरी जराही नडगमगता धैर्याने जीवनाची वाट चालत राहणारी 'आमची काकु' म्हणजे मायेची पाखर आणि स्वभावाने मऊ मेणाचा गोळा. काकुच आमचा कृतिशील आदर्श.सेवानिवृत्त झाल्या तरी सेवेत असणाऱ्या आम्हाला लाजवणारा उत्साह व दिनक्रम त्या अजूनही पाळतात. सतत नवनवीन शिकत राहतात. चांगुलपणाच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. नातेवाईकांना सतत जोडून ठेवतात, त्यांच्या सुख दुःखात कायम सहभागी असतात. आम्हाला खूप माया लावतात. सर्वार्थाने ग्रेट असणाऱ्या आमच्या काकूंना प्रणाम करत या लेखनप्रपंचास विराम.

                 00000

Thursday, November 20, 2025

"मुख्यमंत्री" एक अवलोकन

                                                (चित्र : ए.आय. साभार)

 १०व्यांदा शपथ ; मात्र मुख्यमंत्रीपदाचा विक्रम करण्यापासून वंचित राहणार नितीश कुमार

     १९ वर्ष ९३ दिवस असे तब्बल ९ वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या नितीश कुमार यांनी आज १०व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी निर्वघ्न पाच वर्षांचा कार्यकाळ जरी पूर्ण केला तरीही ते देशातील सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम मात्र करू शकणार नाहीत. 

सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर २४ वर्ष १६५ दिवस हा सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम आहे तर विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (२४ वर्ष ९९ दिवस) यांचा विक्रम मोडण्यासही नितीश कुमार यांना केवळ ६ दिवस कमी पडतात असे चित्र आहे. 

      नितीश कुमारांनी आतापर्यंत एकूण १९ वर्ष ९३ दिवसांच्या कालावधीत १० वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. जर त्यांचे स्वास्थ्य ठिक राहिले व राजकीय परिस्थितीही त्यांच्याबाजुनेच राहिली तर ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील जो २४ वर्ष आणि ९३ दिवस होईल (वर्ष २०३० पर्यंत) व सध्या ८ क्रमांकारील यादीतील त्यांचे स्थान सुधारुन तिसऱ्या क्रमांकावर राहू शकेल असे दिसून येते.


                                             (चित्र : ए.आय. साभार)

एक नजर जास्तकाळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या टॉप १० व्यक्तींवर

     मुख्यमंत्रीपदी दीर्घकाळ (किमान १८ वर्षे) कार्य करणाऱ्या पहिल्या १० व्यक्तींमध्ये ६ व्यक्तींचा कार्यकाल हा २० वर्षांवरील आहे. २४ वर्ष १६५ दिवसांच्या कार्यकाळासह सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग पहिल्या स्थानावर आहेत.ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक २४ वर्षे ९९ दिवसांच्या कार्यकाळासह दुसऱ्या तर २३ वर्षे १३७ दिवसांच्या कार्यकाळासह पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू तिसऱ्या स्थानावर आहेत. 

     अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून २२ वर्षे २५० दिवस पद भूषविणारे गेगाँग आपांग हे यादीत चौथ्या तर २२ वर्षे ६० दिवस पद भूषविणारे मिझोरमचे माजी मुख्यमंत्री लाल थांगवाला पाचव्या क्रमांकावर आहेत. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह हे २१ वर्षे १३ दिवसांसह ६ व्या स्थानावर आहेत.  

 पहिल्या १०च्या यादीत चार मुख्यमंत्री हे १८ ते २० वर्षांच्या कार्यकाला दरम्यान आहेत. यात १९ वर्षे आणि ३६३ दिवसांसह त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार ७ व्या स्थानावर आहेत. तर बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे १९ वर्षे ९३ दिवसांच्या कार्यकाळासह ८ व्या स्थानावर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी १८ वर्षे ३६२ दिवसांसह ९व्या तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल १८ वर्षे ३५० दिवसांसह १० व्या स्थानावर आहेत.

मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 13 वर्षांची कारकीर्द 

     भारतदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2001 ते 2014असे सलग 13 वर्ष मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे.सध्या (2025मध्ये) पंतप्रधानपदाचा 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी यांनी 2029 पर्यंत पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यास 13 वर्ष मुख्यमंत्री आणि 15 वर्ष पंतप्रधानपद भूषविण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावार होणार आहे. 

    आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 1995 ते 2004 पर्यंत सलग दोन कार्यकाळ आणि विभाजीत आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्रीपद भूषविणारे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनी आतापर्यंत एकूण 4 वेळा 15 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली तेंव्हापासून आतापर्यंत एकूण 31 मुख्यमंत्री झाले (विद्यमान मुख्यमंत्री यांच्यासह).यात एकूण 3 वेळा आणि 11 वर्ष 78 दिवस मुख्यमंत्रीपद भूषविणारे राज्याचे चौथे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्रीपदी राहिले. शरद पवार हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असून ते 6 वर्ष 221 दिवस या पदावर होते. विलासराव देशमुख यांनी एकूण 7 वर्ष 129 दिवस राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. राज्याच्या एकूण 31 मंत्र्यांपैकी केवळ वसंतराव नाईक आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच 5 वर्षांचा सेवा पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. ( पहिला कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2014- 8 नोव्हेंबर 2019) (दुसरा कार्यकाळ 23 -26 नोव्हेंबर 2019) आणि तिसरा कार्यकाळ 5 डिसेंबर 2024 ते आतापर्यंत) एकूण दिवस 5 वर्ष 347 ( दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत)

18 महिलांनी भूषविले मुख्यमंत्रीपद ; शिला दीक्षित सर्वात जास्तकाळ मुख्यमंत्री

     सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या व देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांनी 1963 ते 1967 असा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला. देशात आतापर्यंत 18 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. यात सर्वाधिक 15 वर्षांचा कार्यकाळ दिल्लीच्या मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचा राहिला आहे तर 23 दिवसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व्ही.एन. जानकी या सर्वात कमी कार्यकाळ लाभलेल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. 

       महिला मुख्यमंत्र्यांच्या यादीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या सुचेता कृपलानी (1963-67),ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नंदिनी सत्पथी (1972-77 व 1980),गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर(1973 -79),आसामच्या मुख्यमंत्री अनवरा तैमुर (1980), तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व्ही.एन.जानकी (1988) आणि या स्वराज्याच्या पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जे.जयललिता (1991-2016),उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री मायावती (1995,1997,2002-03,2007-2012),पंजाबच्या मुख्यमंत्री राजिंदरकौर भट्ठल (1996-97),दिल्लीच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज (1998 (52 दिवस),बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी (1997-2005), दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री शिला दीक्षित (1998-2013), मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती (2003(259 दिवस),राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे (2003 -08,2013 -18),पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (2011 ते आतापर्यंत 2025),गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (2014-16), जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (2016-18),दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री अतिशय मार्लेना (सप्टेंबर 2024-फेब्रुवारी 2025) आणि दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री रेखा गुप्ता (20 फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत ) यांचा समावेश आहे. 

         महिला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काही खास बाबी अशा की, देशात सर्वाधिक 4 महिला मुख्यमंत्री दिल्लीलाच लाभल्या व देशात सर्वात जास्तकाळ महिला मुख्यमंत्रीही दिल्लीच्याच ठरल्या. (दिल्ली हे अर्ध राज्य आहे त्यास अजूनपर्यंत पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झालेला नाही).उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांना दोन वेळा महिला मुख्यमंत्री लाभल्या. देशातील 13 राज्यांनाच महिला मुख्यमंत्री लाभल्या असून महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांमध्ये अजूनही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत.

                      0000

Wednesday, November 19, 2025

फबिंगच्या विळख्यात आम्ही ?

 (चित्रे : साभार ए.आय.)

अर्पानेट व्हाया इंटरनेटचा जागतिक प्रवास आता सोशल मीडियाच्या सुळसुळाटापर्यंत येऊन ठेपला आहे. सातासमुद्रापार असलेली आपली व्यक्ती थेट व्हिडियो कॉल किंवा  व्हॉईसकॉलद्वारे हुबेहूब समोर येत असल्याने जग खऱ्या अर्थाने एक मोठ खेडं झाल्याची अनुभूती येत आहे. भारतातही साधारणत: २०१० पासून बेसीक मोबाईल,अँड्रॉइड ,स्मार्टफोन आदींच्या माध्यमातून माहितीचा मोठा खजीनाच सर्व सामान्यांच्या हातात आला आहे. हे सर्व छान छान होत असताना एखादी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असताना आपण तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये डोक खुपसन्याच्या ‘फबिंग’ या आज्ञावलीचाही जन्म झाला आहे. फबिंग संस्कृती आता जागो-जागी दिसून येत आहे. खेडयाची प्रचिती घेणारे जग आता मार्शल मॅकलोहन या संवादशास्त्राच्या अभ्यासकाने वर्तवलेल्या “आदिम संस्कृती प्रारुपा”कडे तर जाणार नाही ना ! ही शंका उपस्थित होण्यापर्यंत पोचली आहे.

मानवी समाज जस-जसा विकसित होतो तस-तसा या बदलानुरुप नव-नवे भाषिक परिमाणही घेवून येत असतो. “फबिंग” हा भाषिक आविष्कारही त्याचाच एक भाग होय. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. “कराग्रे वसते लक्ष्मी,करमध्ये तू गोविंदम् , प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणत बिछान्याहून दिवासाची सुरुवात होण्याचा काळ बदलून आता “करमध्ये तू मोबईलम्” अशी झाली असून त्यावर (मोबाईल) सकाळपासूनच सर्फींगने जागा घेतली आहे.

चर्चेचा मूळ विषय “फबिंग” हा आहे. बहुतेकदा घर, सार्वजनिक ठिकाणं,कार्यालयात असे चित्र दिसून येते की, एक व्यक्ती दुसरीला काही सांगत असते मात्र दुसरी व्यक्ती मोबाईलमध्ये डोक खुपसून बसलेली असते आणि एखाद्या गवय्याचे गाने ऐकताना दर्शक विंगेत कानात बोट घालून “गाओ बेटा गावो” म्हणणारे प्रेक्षक असावे, असाच प्रतिसाद जणू ते संबंधित व्यक्तीला देत असतात. (मुळात प्रतिसाद शून्यच असतो तो)

मोबाईलवरच आपले व्यावसायिक व कार्यालयीन कामे आल्याने त्यात डोकावने ही अपरिहार्यता असली तरी माणसाने माणसाचे किमान ऐकूण घ्यावे अशी आर्जव करणारा दुर्बल माणूसही जागो जागी दिसून येत आहे. "माणूस दया मज माणूस दया ही भिक मागता हरी दिसला.."अशी स्थिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून मांडतात तर आज या माणसाने निदान दुसऱऱ्या माणसााला प्रतिसाद तरी दयावा या नवीन हाकेपर्यंत येवून पोचला आहे.



दोन व्यक्तीमधील संवादाचा सेतू हा भाषेच्या माध्यमातून होतो. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळातील पहिल्या टप्प्यात तो खाना खुणांनी सांकेतिक संवाद साधायचा. मग त्याने लेखणीतून आपले मत इतरांपर्यत पोहचवून संवाद साधला. प्रिंटींगच्या शोधाने लेखकाचे मत समाजातील मोठया घटकांपर्यंत पोचले. संवादाच्या माध्यमांच्या विकासात रेडियो,टेलिफोन ,टिव्ही,इंटरनेट असा हा प्रवास अधिक जोरकसपणे सुरु असताना आता संवादाच्या उच्च शिखरावर सोशल मीडिया, आर्टीफिशीयल इंटेलिजन्स पर्यंतचा हा प्रवास विविध प्रश्नही सोबत घेवून आला आहे. कोणसही कल्पना नसलेले सायबर भामटे काही सेकंदात जनतेचे बँक खाते रिकामे करीत आहेत. नव माध्यमांच्या आधारेच कल्पक  पण अकल्पनीय गुन्हे घडण्याचे सर्रास प्रकारही पदोपदी बघण्यास मिळताहेत. आणि आता संवादाचा हा प्रवास आपापसातील शुष्क होत चाललेल्या संवादापर्यंत अर्थात “फबिंग” पर्यंत आला आहे. 

“फबिंग” हा मानवी समाजाला सतर्क करण्याचा संकेत आहे जर तो आज आम्हाला कळला नाही तर मार्शल मॅकलोहन यांनी वर्तवलेल्या “आदिम संस्कृती प्रारुपा”ची अर्थात माणूस आदिमानवाप्रमाणे न बोलणारा व केवळ हाताने खुनाकरून संवाद साधणारा बनु नये म्हणजे मिळवल! चला तर मग आपण स्वत:ला व आपल्या आजुबाजुच्या लोकांना फबिंगच्या विळख्यातून बाहेर काढुया व संवादाचे सक्रीय वाहक बनुया!

                                         0000000

Monday, November 17, 2025

ती च्या छटा....





                     (चित्र : ए आय साभार)

 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (नागपूर) कमानी शेजारी मी एकदम थांबलो त्याला कारणही तसे सज्जड! लगबगीने येणारी कार व तिने घेतलेला शार्प कट. कारची फ्रेम डोळ्यासमोरून दूर होत नाही तोच पुढे ती कार जुने सचिवालय इमारत परिसरातील ध्वजारोहण स्थळी दिमाखात उभी राहते आणि त्यातून एक महिला अधिकारी ऐटीत बाहेर पडतात व गेट क्र. ४ कडे आपल्या ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ होतात.

      तिथेच गेट क्र. ४ कडून ३ कडे अगदी हळू-हळू येणारी एक स्कुटी आणि त्यावर आरूढ असलेल्या महिला कर्मचारी कार्यालयात जाण्यापूर्वीच फार थकलेल्या अवस्थेत गाडी पार्क करीत होत्या.

         मी ही कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होत गेट क्र. ३ ने आत शिरलो तोच जिन्यावर पायरी चढायला गेलो आणि माझ्या पुढे परत दोन महिला फार दमल्यागत पायऱ्या चढत होत्या व त्यांची कुजबुज की, मॅडम आता काय १० वर्षाची नोकरी राहिली. खूप थकवा येतो आता अन दुसऱ्या महिला म्हटल्या आतापर्यंत निघालाच न वेळ तो उरलेलाही निघूनच जाईल!. (हे तीन्ही दृष्य एकाच वेळचे म्हणजे साधारण सकाळी १०.३० वाजताचे.)

(ध्वजारोहण स्थळी पार्क असलेली हीच ती कार)

          मग दुपारी बचत गटाच्या स्टॉलवर जेवायला गेलो तर तिथेही दोन महिलांचा जेवताना इतराना ऐकू जाईल/जावा असा संवाद सुरू होता. त्यातील संभाषण असे, "बघा न मॅडम माझं लग्न होऊन ६ महिने झाले, माझा नवरा फारच समंजस व कोऑपरेटिव आहे. मी जेव्हा सासरी जाते तेव्हा आमचे हे तर इथला पाण्याचा ग्लास तिथे सुद्धा करीत नाहीत अन् इकडे माझ्याकडे रूमवर आले तर स्वयंपाक, कपडे, भांडी अशी सर्व मदत आनंदाने करतात बघा! खूपच चांगला आहे माझा नवरा".

           एकाच दिवशी साधारण सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या अवलोकन व निरिक्षणातून ही स्त्रीपात्र समोर आलीत. मग, कामकरी महिलांच्या (नोकरदार) या प्रातिनिधिक अभिव्यक्तिला 'ती अशीही आणि तशी' हे एका शब्दात मांडताना "ती च्या छटा.." एवढच मला काय ते गवसल  ते ब्लॉगवर खरडून ठेवलं.

        ०००००

Thursday, October 9, 2025

झुंडीत कायमचा हरवला ‘बाबु‘


नागपुरातील झोपडपट्टीमधील मुलांची मोट बांधुन त्यांना थेट परदेशात फुटबॉल स्पर्धेची पर्वणी घडविणाऱ्या विजय बोरसे यांच्या कार्यावर आधारीत व महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भुमिकेतील ‘झुंड’ चित्रपटात बाबुची भूमिका  वठवणारा हरहुन्नरी कलाकार प्रियांशु छेत्री याच्या हत्तेची बातमी आज नागपुरच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झडकली. ‘झुंड’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनींग शो च्या वेळी प्रियांशुची प्रत्यक्ष भेट व वार्तालाप झाला होता माझा त्यामुळे ही बातमी बघताच सकाळपासून मनात कालवा कालव सुरु होती म्हणून हा लेखन प्रपंच.

 नागराज मंजुळे हे मुळात जीवन संघर्षात घडलेले व कामातून सर्वप्रिय झालेले दिग्दर्शक.‘सैराट’ चित्रपटात त्यांनी रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांना संधी देवून त्याचे सोने केले व सर्व प्रेक्षकांनीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला. ‘फँन्ड्री’तील झब्ब्या (सुरज पवार) आणि मंजुळे निर्मित व त्यांच्या भूमिकेतील ‘नाळ’ मधील चैत्या (श्रीनिवास पोकळे) ही पात्रे म्हणजे मंजुळे यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना दिलेली नवी ओळख होय. या प्रवासात पुढे जात मंजुळेंनी  ‘बीग बी’ यांना घेवून थेट हिंदी चित्रपट सृष्टीत झुंड चित्रपटाद्वारे पदार्पण केलं.२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण नागपुरात झाले या चित्रपटासाठीही मंजुळे यांनी आपला मराठी चित्रपट निर्मितीतील कित्ता कायम ठेवून अनोळखी चेहरे आणि चक्क झोपडपट्टीतील चेहरे संपूर्ण देशासमोर ठेवले. या चेहऱ्यांमध्ये बाबुच्या भूमिकेतील प्रियांशु छेत्री याने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली व चक्क बीग बीं सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्याला मिळाली.

        ९ मार्च २०२२ रोजी दिल्लीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ‘सिरीफोर्ट ऑडेटोरियम’ मध्ये विशेष स्क्रिनींग शो आयोजित करण्यात आला होता. बीग बी वगळता नागराज मंजुळेंसह या चित्रपटातील सर्व कलाकारांनी या शो ला हजेरी लावली होती. या शोच्या मध्यंतरात सर्व कलाकारांच्या भेटी झाल्या त्यात प्रियांशुही भेटला. त्याच्या डोक्यातील ती टोपी,केसांना एका ठिकाणी केलेला वेगळया धाटणीतील कलर अशा थाटातील प्रियांशु सोबत सहज गप्पा मारल्या व तेवढयाच सहज व आत्मविश्वासाने तो प्रतिसादात्मक बोलता झाला. मी स्वत: झोपडपट्टीत राहतो व फुटबॉल खेळतो असे सांगणाऱ्या प्रियांशुसोबत त्याच्या आवडी निवडी, चित्रपटाचे चित्रिकरण व अभिनय अशा सर्व गोष्टींवर चर्चा झडली. उर्वरीत चित्रपट बघून आणि चित्रपटाच्या चमुचे अभिनंदन करत व स्टँडिंग ओवेशन देवून घरी परतलो.

या घटनेला तीन वर्ष उलटून गेले व माझाही पावने तीन वर्षांचा मुक्काम नागपुरात आहे आणि आज अचानक प्रियांशुच्या हत्तेची बातमी वाचली. प्रियांशुच्या आयुष्यातील हा सर्व पट खूपच झटपट झाल्याचे वाटते. बातम्यांमधील मजकुराहून प्रियांशुच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. प्रियांशुचे दारुचे व्यसन व ते पूर्ण करण्याकरिता कधी मधी तो चोरी करीत असल्याचेही बातमीत म्हटले आहे.

एकंदरीतच प्रियांशुने ‘झुंड’ चित्रपटात बाबुच्या भूमिकेला न्याय दिला व प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मात्र, जीवनाच्या चित्रपटात तो परिस्थितीने फ्लॉफ ठरला असच वाटत. आणि झुंडीत बाबु कायमचा हरवल्याचे सत्यही अधोरेखित करते.आपल्या समाजाचे हे विदारक चित्रही त्यातून समोर आले हे बदलण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका निभवण्याचे स्मरण करून देणारी ही घटना आहे.  

                               00000