Thursday, September 18, 2025

हातमाग व विणकारांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न

 



          राज्यात परंपरागत व्यवसाय व कलांच्या विकासासाठी व संवर्धनासाठी राज्य शासन संवेदनशीलपणे कार्य करीत आहे. वस्त्रोद्योग व यात कार्यरत सर्व हातमाग व विणकरांच्या विकासालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. वस्त्रोद्योग विभागाद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कापड स्पर्धा व विविध प्रकारे अर्थ सहाय्यही करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित आयुक्तालय यात अग्रेसर ठरले आहे.

        वस्त्रोद्योग आयुक्तालयाद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून हातमाग क्षेत्राचा विकास साधण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत सर्वसमावेशक हातमाग विकास योजना ही यातील प्रमुख असून या योजनेमध्ये आतापर्यंत बऱ्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा एक भाग म्हणून 30 मार्च 2017 पासून राज्यात पैठण, येवला, मोहाडी, पाचगांव व सोलापूर या पाच ठिकाणी ब्लॉक लेव्हल हॅण्डलूम क्लस्टर मंजूर करण्यात आले. या क्लस्टरद्वारे राज्यातील 540 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच 84 लाभार्थ्यांना लाईटींग युनिट तर 59 लाभार्थ्यांना वर्कशेड देण्यात आले.

           केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यामध्ये स्मॉल क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेखाली 5 क्लस्टर मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 4 विदर्भातील असून नागपूर जिल्ह्यातील 2 क्लस्टरचा यात समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात तांडापेठ येथे 1 कोटी 8 लाख 84 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले असून या अंतर्गत 120 लाभार्थी येतात. नागपूर जिल्ह्यातीलच धापेवाडा येथे 1 कोटी 24 लाख 94 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले आहे व यातंर्गत 93 लाभार्थी येतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे 1 कोटी 25 लाख 34 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले असून 132 लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे 1 कोटी 16 लाख 29 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर होवून त्याचा 108 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील नागडे येथे 75 लाख 21 हजारांचे क्लस्टर मंजूर होवून 183 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

                      राज्यात 3 हजार 509 विणकर तर 3 हजार 354 हातमाग
            केंद्र शासनाने 2018-19 मध्ये देशभर केलेल्या चौथ्या हातमाग गणनेनूसार राज्यातील 4 प्रादेशिक उपायुक्त कार्यालयांतर्गत 3 हजार 509 विणकर तर 3 हजार 354 हातमाग असल्याची नोंद झाली आहे. नागपूर प्रादेशिक विभागात 317 हातमाग तर 401 विणकर आहेत. सोलापूर प्रादेशिक विभागात 473 हातमाग तर 548 विणकरांची नोंद झाली आहे.  छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागात 262 हातमग तर 430 विणकर आहेत. मुंबई प्रादेशिक विभागात सर्वाधिक 2 हजार 302 हातमाग तर 2 हजार 130 विणकर असल्याचेही या गणनेतून दिसून येत आहे.
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर आयुक्तालयाच्यावतीने राज्यशासन अर्थसहय्यीत योजना राबवून हातमाग व विणकरांच्या विकासासाठी कार्य करण्यात येते. याअंतर्गत एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विविध विकास योजना तसेच बक्षीस योजना अतिरिक्त अनुदान योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, हातमाग कापड स्पर्धा, जाहिराती व प्रसिध्दी योजना आदी प्रभावीपणे राबविण्यात येतात.
                                        हातमाग कापड स्पर्धा
              राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला वाव मिळावा या उद्देशाने सर्व गटातील हातमाग विणकरांकरिता नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व मुंबई या चार ठिकाणी विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करुन बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागीय स्पर्धेतील बक्षीसपात्र नमुन्यासाठी राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येते. आणि विणकरांना बक्षीसे व प्रशस्तीपत्र पदान करण्यात येते. वर्ष 2023-24 ची विभागीय स्पर्धा नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे तर राज्यस्तीय स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना 4.50 लाखांची बक्षीसे प्रदान करण्यात आली.

  वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे विविध अर्थसहाय योजनांद्वारे विणकर व रेशीम उद्योग विकास

          राज्यातील विणकर,रेशीम उद्योग व हातमागाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केले आहे. तसा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिने वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. ‘अर्बन हाट केंद्र’ ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील विणकर आणि हस्तकलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणारी योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  राज्यात प्रमुख ठिकाणी ‘अर्बन हाट केंद्र’ स्थापीत करण्यासाठी प्रकल्प किंमतीच्या 80 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडे तर उर्वरित 20 टक्के हिस्सा राज्य शासन वहन करणार आहे.  महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर येथे अर्बन हट उभारणीसाठी राज्य शासनाने 11 जुलै 2025 अन्वये मान्यता दिली आहे. मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
             200 युनिट पर्यंत हातमाग विणकरांना मोफत वीज, कच्चा माल पुरवठा योजनेंतर्गत हातमाग विणकरांना अतिरिक्त अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये केंद्र व राज्याकडून प्रत्येकी 15 टक्के सवलत देण्याची तरतूद आहे. सदर अनुदान हे कॉटन हँक धागा, घरगुती रेशीम, लोकरी आणि लीनन धागा आणि नैसर्गिक तंतुच्या मिस्त्रीत धाग्यावरच देण्यात येते. वर्ष 2024-25 मध्ये 1037 लाभार्थ्यांना 96 लाख 37 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.
           केंद्राप्रमाणे राज्य शासनाकडूनही हातमाग विणकर, रेशीम उद्योग विकासासाठी योजना तयार करण्यात आल्या असून वस्त्रोद्योग आयुक्तालय व रेशीम संचालनालयाच्याकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. हातमाग विणकर कुटुंबांना प्रती महिना 200 युनिटपर्यंत मोफत वीज अनुदान देणारी ‘मोफत वीज अनुदान योजना’ आयुक्तालयाच्यावतीने राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत एकूण 1063 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. वर्ष 2023-24 मध्ये 660 लाभार्थ्यांच्या वीज अनुदानापोटी महावितरण मुंबईला वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे 1 कोटी 30 लाख रुपये अदा करण्यात आले. तर वर्ष 2024-25 मध्ये 403 नवीन लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
           राज्यातील हातमागाच्या 5 पारंपरिक वाणांमधील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता गणेश चतूर्थी उत्सव भत्ता पुरुष विणकर 10 हजार रुपये तर महिला विणकरांना 15 हजार रुपये देण्यात येतो. वर्ष 2024-25 मध्ये 185 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून 219.50 लाख रूपये वितरीत करण्यात आले. राज्यातील पैठणी साडी, हिमरु शाल, करवत काटी, घोंगडी व खणफॅब्रीक या पाच पारंपरिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईनला ‘पारंपरिक हातमाग विणकरांना बक्षीस योजना’ अंतर्गत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त बक्षीस वितरीत करण्यात येते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येते.
              हातमाग व विणकरांच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाच्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याचे कार्य वस्त्रोद्योग आयुक्तालय निष्ठेने पार पाडत आहे. हातमाग व विणकरांच्या सकारात्मक वाटचालीसाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे. 

रितेश मो. भुयार,
माहिती अधिकारी,
माहिती व जनसंपर्क, नागपूर.
              0000

Wednesday, September 17, 2025

‘सिव्हिल लाईन्स’ ते ‘धंतोली’तील सकाळचे नागपूर


       रस्त्याने शिस्तीत धावणारी तरुण मंडळी, सिटी बसेसची लगबग, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम,भीक मागण्याच्या तयारीत असलेल्या चिमुरड्या मुली, आपल्या आईच्या डोक्यावर कॅन ने पाणी ओतणारा मुलगा आणि  आयसियु मध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकाच्या तब्येतीत सुधार होण्याच्या आशेने हॉस्पीटलच्या व्हरांड्यात झोपलेली मंडळी अस चित्र सकाळी ६.१५ ते ७.०० वाजे दरम्यान नागपूरच्या सिव्हिल लाईन्स ते धंतोली या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भागाचे.

         काल रात्री वरुण राजाची जोरदार बॅटिंग झाल्यानंतर वाटल होतं नागपूर सुस्तावल असेल पण, पोटाची खडगी भरण्यासाठी सायकलवर बुड्डी का बाल (हा शब्द आमच्या बालपणातील आता त्याला कँडी म्हणतात सोपेस्टीकेटेड लँग्वेज मध्ये),फुगे व खेळणी बांधून निघालेला व्यक्ती बघून माझ्यातही उत्साह संचारला. मग थोडा विचार केला हा आपल्या समाजाचा एक घटक आहे. या व्यक्ती सारख्या कित्येक व्यक्तींच्या सायकली एव्हाना महाराष्ट्र आणि देशाच्या असंख्य भागात रस्त्यावर धावत असतील  असा विचारही मनात आला.

        सर्व महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालये, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, आकाशवाणी, विधिमंडळ असणाऱ्या या  रस्त्यावर मार्गस्थ झालो तसा एका पाठोपाठ धावणारी 25-35 वयोगटातील तरुण आणि जोडीला साठी ओलांडलेली स्त्री व थोडा वेळाने पुरुषही दिसले. आकाशवाणी चौकात तर एवढ्या सकाळी गळ्यात गळा घालून चालणारी युगल जोडीही दिसली.

           येथून पुढे युटर्न घेत महाराजबाग कडे जाताना एका-मागोमाग मोरभवन कडून येणाऱ्या व आपल्या गंतव्य स्थानकाकडे जाणाऱ्या सिटी बसेसचे दर्शन घडले. बसेस मध्ये चालक व वाहक वगळता तुरळक प्रवासी दिसले. मग विचार केला चालक-वाहक मंडळी कर्तव्यावर उपस्थित होण्यासाठी घरून किती वाजता निघत असेल बरे ! हा विचार करता थोडा पुढे चालताच झालो तर सर्वोच्च प्रतिष्ठितांच्या बंगल्यातून भली मोठी चार चाकी निघताना दिसली  म्हणून औत्सुक्याने आजूबाजूच्या बंगल्यांना न्याहाळले तेव्हा लक्षात आले ही बंगल्याची मालक मंडळी बहुतेक एडवोकेट,जजेस आणि सीएच आहेत. वाटेत एक भली मोठी निर्माणाधीन इमारत जवळपास 30 माळ्यांची दिसली त्याहून लक्ष ढळत नाही तर नागपूर विद्यापीठाच्या विस्तारित इमारती समोर एक तरुण-तरुणी ‘मेरा नंबर कब आयेगा’ अशा काहीश्या स्थितीत मला लांबूनच दिसली जवळ गेल्यावर कळलं आज स्टाफ सिलेक्शन कमिशनची येथे ऑनलाइन परीक्षा आहे.

        


  महाराजबाग पासून बर्डी कडे वळण घेतले आता मात्र अमरावती रस्त्यावरील सुसाट रहदारी येथे दिसत होती. आता या रस्त्याहून मोरभवन या सिटी बसेस मध्यवर्ती स्थानकाच्या मागच्या बाजूचा रस्ता घेत हे मार्गस्थ झालो. वाटेत लागलेली नालासदृश्य नागनदी आणि त्यात स्नान करणारे वराहराज पाहून  गंमत तर वाटली पण नदी खोलीकरण व विस्तारीकरणाची सकारात्मकबाब दिसून आली. म्हणजे कितीही जोराचा पाऊस आला तरी या नदीतून पाण्याचा विसर्ग सहज होऊ शकतो. एवढ्यात मोरभवनच्या टर्मिनल 4 वर गाड्यांची ये-जा करण्याची गती वाढल्याचे चित्रही दिसले. तिथून पुढे जातो तोच चार-पाच लोकांचा घोळका दिसला तरी फारशी बाब काही लक्षात आली नाही. जस-जसं या घोळक्याचा आणि माझं अंतर कमी होत होतं तशीही फारशी काही कल्पना आली नाही. मात्र, जसं या घोळक्याच्या जवळ आलो. तिथं रक्ताने पूर्णपणे माखलेला एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. अगदी आपाद मस्तक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व्यक्ती एवढ्या सकाळी मी पहिल्यांदाच बघितला.

प्रथमदर्शनी तर वाटलं की हा मृतदेह असाव. पण त्या इसमाचा पाय हलत होता हे पाहून चित्र लक्षात आलं की या इसमाला प्रथमोपचार मिळावे म्हणून हा घोळका प्रयत्नरत होता.




झाशी राणी पुतळ्याकडे व तिथून लोकमत चौकाकडे आता माझा मार्च सुरू झाला. यालाच धंतोली भाग म्हटल जात. पहिल्या चौकात दर्शन झाले ते साधारण 8 ते 12 वर्ष वयोगटातील चिमूरड्या मुलींचे. हातात कसल्याशा प्लास्टिकच्या कटोऱ्या आणि त्यांच्यात  आपसातच सुरू असलेल नियोजन बहुतेक भिक्षा मागण्याचे. इथून पुढे दुभाजकावर अर्थात फ्लाय ओव्हरच्या खाली बहुतेक संसार थाटलेले दिसतात. यांचीही सकाळ झाली होती. कोणी गप्पा हाणण्यात, तर कोणी काहीतरी हादडण्यात व्यस्त असताना  पन्नाशी-साठीतील एक स्त्री  आपल्या चेहऱ्याच्या दिशेने केस पूर्णतः वळवत असल्याचे लक्षात आले. तेवढ्यात तिच्या मुलाने पाण्याच्या कॅनमधून जलधारा सोडण्याचे खास कौशल्य व या महिलेने केश सांभार स्वच्छ करण्याचा चालवलेला प्रयत्न पाहूनही मी थक्क झालो.





     आता या पायदळ वारीची सांगता होताना चक्षुनी टिपलेली दृश्येही सांगता होतो. आयसियुमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना थांबणेही आवश्यक असल्याने व जागा उपलब्ध नसल्याने हॉस्पिटलच्या रिसेप्शन शेजारीच गाढ झोपलेले नातेवाईक व स्टाफची सारखी ओरड ‘चलो सब जगजाओ फर्श की सफाई करनी हैं’. अशात केविलवाणे नातेवाईक आवर-सावर करण्याची ही वेळ. आता मला सांगितलं होतं की डॉक्टरांची अपॉइंटमेंट सकाळी 7.00 वाजता घेतली जाते तर तो डेस्क पूर्ण रिकामा त्यांनीच दिलेल्या ऑप्शन नुसार मोबाईलवर संपर्क करतो तर मी फोन करतो तेंव्हा आतून एक फोन नेमका खणखनण्याचा आवाज येत होता मग लक्षात आलं येथील वेळेच नियोजन. सरते शेवटी 7.45 वाजता मी नातेवाईकासाठी अपॉइंटमेंट घेतली व इथेच माझ्या या पायदळ वारीचा सुखांत झाला.

        पण या सर्व प्रवासात, शहरातील सकाळची लगबग व त्यात समरस होत जाणारी सामाजिक परिस्थिती ठळकपणे दिसून आली. अर्थातच हे शहरातील एका भागाचं प्रातिनिधिक अवलोकन आहे हेही तेवढच खरं.

00000


Tuesday, August 19, 2025

आजपासून सवय बदलणार ….. मनाला हुरहूर

 

       घडयाळीत सायंकाळचे ६.३० वाजले की आपसूक पायांना चाहूल लागायची एका ठिकाणाची. मग, कार्यालयाचा जिना उतरुन नजिकच्या गिरीपेठ किंवा लॉ कॉलेज रोडच्या बस थांब्याकडे (नागपूर) मार्गस्थ होणे, मग दाभा किंवा मारुती सेवा थांब्यापर्यंत मिळणारी सीटीबस किंवा ऑटो घेणे, वेळ झाला तर मारुती सेवा थांब्यापासून घ्यायला जिवाभावाचा व्यक्ती येणे नाही तर पायी चालण्याचा आनंद घेत पुढे जाणे, मग एकदाचा गंतव्यस्थानावर पोहचून 'त्या वास्तूत' प्रवेश केला की खूप बर वाटणे असं सर्व घडत होतं गेल्या पावने तीन वर्षांपासून आज त्याला पूर्ण विराम लागत असल्याने हुरहूरपणाची ही भावना काही तरी हरवल्याचं आतून सांगतीये. 

      आयुष्याचे विविध टप्पे ओलांडतांना पदोपदी अडचणी मग प्राप्त अनुभवाच्या जोरावर व कमवलेल्या आत्मविश्वासाच्या एकमेव शस्त्राने या लढाया जिकंतही आलो. मग हा प्रवास शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण आणि नोकरी मिळविण्याचा असो त्यात गाव,निमशहर,शहर,महानगर,पर राज्य अशा ठिकाणी वास्तव्य व त्याच्याशी लळाही ओघानेच आला.पण, यावेळी त्या पलीकडे जावून हुरहूर वाटण्याचा अनुभव हा काही वेगळाच आहे. याला कारणीभूत आहेत स्वच्छ व निर्मळ मनाची माणसं व त्यांच्या गोतावळयाची सवय आणि त्यातून आलेला आपलेपणाचा ओलावा, जो अन्य ठिकाणांहून निघतांनापेक्षा यावेळी सरस आहे म्हणूनच प्रभावीही आहे.

       घरापासून दीड शेकडा कि.मी. दूर अंतरावर नियमित अंतराने सतत पावने तीन वर्ष जाणे, मग तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे व मग त्या वातावरणाचाच एक भाग होणे म्हणता म्हणता त्यात समरस होवून जाणे हा या सर्वांचाच तर परिपाक नाही ना !. हा गोतावळा मिळण्याचे कारण ठरते नोकरी निमित्ताचे वास्तव्य व आपल्या वाटणाऱ्या उदार मनाच्या माणसांचा मदतीचा हात. आणि सुरु झाला हा प्रवास. या वास्तूत आपली समस्या घेवून आले आणि तीचं समाधान शोधून जीवनात योग्य मार्गाला लागलेले हजारो लोक यात मिळाले. त्यांचे भावविश्व व ‘स्व’ सोबतच्या त्यांच्या लढाईत या वास्तूने दिलेला आधार आजपर्यंत अगदी ठळकपणे जाणवत होता. तसाच तो काही व्यक्ती ही लढाई हारत पुन्हा या वास्तुचा आसरा घेताणाही आढळले.

       पण अप्रूप वाटत होतं या वास्तुची शान वाढविणाऱ्या त्या प्रामाणिक हातांचे, त्यांच्या त्यागाचे व इथे बरे होण्याकरिता आलेल्यांना २४x७ तास सांभाळण्याचे.या हातांचे स्वत:चे प्रश्न आहेत पण त्याला मुरड घालत इतरांना सुखावह वाटाव म्हणून सदैव हास्य वदनी ही मंडळी बरच मोठ अनुभवाच गाठोड देवून गेली. यांची खरी कसरत ही आर्थिक परिस्थितीपासून सुरु होवून त्याभोवतीच्या असंख्य बारीक-बारीक कंगोऱ्यांशी जुळलेली आढळतात. पण त्यांच्यासोबतचा सहवास सदैव भारी  वाटायचा.मला वेळ होत असल्याचे पाहून काळजीपोटी येणारा फोन दरम्यान तुम्ही केंव्हा येणार पासून सुरु होणारा संवाद माझ्या जेवणाची व्यवस्थाही लावून जायचा. आस्थेने विचारपूस अन् सुख दु:ख वाटणारी मंडळी कधी मधी माझ्या गायनाचीही साथीदार व्हायची तर मारुती सेवा थांब्यापर्यंत नेण्यासाठी आनंदी चेहऱ्याने सारथ्यपण करायची. गेल्या पावने तीन वर्षात यातील कित्तेक गेलेत नव्याने आलेत जुने गेले अन् पुन्हा आले अस हे सत्र सुरुच राहिल. पण दु:खीतांचे अश्रू पुसणारी ही वास्तू त्यांना आश्रय देत राहिल हेही तेवढेच खरे.

      हा हा करता हा प्रवास बऱ्याचदा अनपेक्षित घटना घडण्याचे अनुभवही देत गेला. पण, ही घटना आपल्यासोबत घडावी हा योगही जुडवून गेला. जेवणासाठी हाक मारणारा आवाज आता घरातील वासे फिरताच आपसूक फिरला आणि वाटलं आता हीच वेळ आहे थांबण्याची.

         जीवन हा एक निरंतर प्रवास आहे.यात अनेक लोक भेटतात बरेच थांबेही येतात. मात्र पावने तीन वर्षांचा हा थांबा काही ओरच होता कायम स्मरणातला व कृतज्ञभावही व्यक्त करणारा. तसेच लळा लागण्याची सवय बदलविण्यास लावणारा आणि संत वचनातून संदेश देणारा की, "पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती,तैसे असावे संसारी , जोवरी प्राचीनाचीदोरी..."

                    ००००००

Thursday, August 7, 2025

कृतकृत्यतेची अनुभूति


  आपण करीत असलेल्या कामाची पावती देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळया आखिव रेखिव पद्धती ठरलेल्या आहेत.शासकीय कामांची पावती म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांना गोपनिय अहवालाद्वारे याची प्रचिती येते. बर्गर किंग,सीसीडी आदी फुड आऊटलेट मध्ये एम्पलॉयी ऑफ द डे, विक, मंथ हे संबंधितांचा फोटो चिटकवून दर्शनीभागात लावल्याचेही निदर्शनास येते. मात्र लौकिकापलीकडे जावून तुमच्या कामाची पावती जर प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळाली तर ती कृतकृत्यतेची अनुभूति ठरते. आज हीच अनुभूति घेतली म्हणूनच लेखन प्रपंच.

     नियमितपणे काही प्रबोधनात्मक विषय घेवून मांडणी करण्याचा माझा नियमित सिरस्ता आजही तसाच होता. यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’वर मांडणी केली. समोर बसलेल्यांसोबत जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वत: उपस्थित राहू शकत नाही त्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहचावा म्हणून ध्वनिक्षेपकाचा (माईक) उपयोग करतो तसा तो आजही केला. विषय मांडून झाला आणि आता निघणार तेवढ्यात वयाची पासष्टी ओलांडलेले (जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पहिल्या माळ्याहून श्रवण करीत होते.) अंगात पांढरा सदरा, पायजामा घातलेले एक निरागस गृहस्थ समोर उभे ठाकले आणि म्हणाले, “सरजी, पसायदानपर आपके विचार सुनकर बहुतही अच्छा लगा ! मै धन्य हो गयाहॅू आपको सूनकर, आपके प्रती आभार !” (त्यांच्या डोळयात आसवही तरळत होते) हे शब्द ऐकताच मी त्यांना चरणस्पर्श केला आणि नुसता अनुभव घेतला तो कृतकृत्यतेचा.

      ही अनुभूति ताजी असतानाच  कार्यालयाकडे जाण्यासाठी परम मित्राच्या गाडीवर बसलो तेव्हा कोणी समोरून येत असल्याचे बघून त्यांनी जागीच गाडी थांबवली.तेवढ्यात एका मुलीने समोर येत सदाफुलीचं फुलं दिलं ते फुल आनंदाने व आदराने स्वीकारुन मी भरुन पावलो व कृतकृत्यतेचा हा दुसार अनुभव लागोलग घेतला (पोस्ट सोबत इथं तेच फुल दिलं आहे.). मुळात त्या मुलीला मंचावर उभ राहण्यासाठी काही मार्गदर्शन करु शकलो आणि त्याप्रतीचा कृतज्ञभाव म्हणून हे सदाफुलीच फुल मी स्वीकारलं होत जे माझ्या कामाची पावती मी मानतो. खरे तर तुम्ही काम करत जायच असत फळाची अपेक्षा न ठेवता हे तेवढच खरं आहे. पण, कधीमधी असा अनुभवही You are on Correct Track सांगून जातो व नवी ऊर्जा देवून जातो हेही तितकच खरं.

                       ००००००

Wednesday, August 6, 2025

भाजी अंबाडीची अन् फोडणी सुरस आठवणींची…


 

 ‘श्रावण मासी हर्ष मानसी….’ या बालकवींच्या ओळी निश्चीतचं समर्पक असल्याची अनुभूती पदोपदी येते ती पावसाळा ऋतू व विशेष करून श्रावण महिन्यात. याच काळात निसर्गाने मानवाला भरभरून दिलेली रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्य संपदाही ठळकपणे अधोरेखित होते. चला.. आता मला जे सांगायचं आहे त्याकडे वळुया. 

   त्याच झालं अस ! आज जेवायला गेलो तेव्हा शेजारीच बसलेल्या वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या गप्पा आपसूक काणावर आल्या. विषय अंबाडीच्या भाजीचा. त्यातला एकजण उच्चारला, ‘काल खेडे गावात जाणं झालं अन् अंबाडीची भाजी खरेदी केली. आणि आईला भाजी बनविण्याची विनंती केली त्याच भाजीचा आपण आस्वाद घेवूया.’ हा संवाद संपतो न संपतो तोच दुसरा उत्तराला, ‘हो, मी पण माझ्या आईलाच अंबाडीची भाजी बनवायला सांगितली काल-परवा.’ हा संवाद सुरू असतांना अंबाडी प्रेमी मी कसा मागे राहणार. मग मीही आपलं घोड दामटलं, आईच्या हातच्या अंबाडीच्या भाजीला निश्चितच चव आहे त्यात अजिबात दुमत नाही. पण, माझी बायको या अंबाडीच्या भाजीच्या पुऱ्याही छान बनवून खायला देते. म्हणजेच अंबाडीची भाजी आणि सासु-सुनेच्या खवय्येगीरीत सासुलाचं नुसतं झुकत माप नको बरं का !. आई ही अंबाडीच्या भाजीच्या रेसीपीची संवाहक ठरते तर पत्नी ही पीझ्झा, बर्गर, मॅगीच्या आधुनिक काळात अंबाडीची पुरी करून मुलांच्या गळी उतरवणारी स्मार्ट मम्मी ठरते. 

        आजच्या धकाधकीच्या काळात अशी अंबाडीच्या भाजीवर चर्चा होणेही थोड्या अर्थाने कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. या चर्चेतून अंबाडीच्या भाजीचे सुरस आठवणींनाही उजाळा मिळत होता. भुप्रदेशनिहाय अंबाडीची भाजी बनवीण्याची पद्धत आणि हंगामा शिवाय अन्य वेळी या भाजीची चव चाखयची असेल तर या भाजीला साठवून ठेवण्याच्या विविध तऱ्हा असे एकानेक विषय चर्चेत निघत गेले. जेवणाच्या मेजावरील या आगंतूक संवंगड्यांनी आपले टिफीन सदृष्य शिदोऱ्या सोडल्या आणि मी ही खाणावळीतील ताटावर ताव मारला. पण या चर्चेतून माझाच फायदा झाला. या संवंगड्यांनी आपल्याजवळचा अंबाडीचा ऐवज पुरता उघडून माझ्या ताटात दिला. आणि मी क्षणभर सुखावलो. जर अंबाडीच्या चर्चेत उडी घेतली नसती तर या ऐवजाला मुकलो असतो असा विचारही मनात आला. शेवटी बोलत राहिल्याने तोटे कमी आणि फायदे जास्त होतात असे म्हणायलाही हरकत नाही. ही भाजी वेगळ्या तऱ्हेची म्हणजे खास मुगाच्या डाळीत घोळलेली आंबटसर व स्वादिष्ट चवीची आणि पहिल्यांदाच या थाटातील अंबाडीचा आस्वाद घेण्याची वेळही पहिलीच. 

        गेल्या आठवड्यातच गावी जाणे झाले. आई-बाबांची भेट म्हणजे बॅटरी चार्ज आणि शरीरात ऊर्जेचा संचार.अर्धांगिनीची प्रकृती बरी नव्हती अशात मुलाला फक्त गावी चलतो! असं म्हणताच पठ्ठयाने तयारी केली आणि गाडीवरही बसला. माझं गाव जस माझ्या मनात तसंच मुलाच्या मनातही ते तेवढचं ठासून असल्याच अप्रुपही वाटते. घरून निघतांना आईने नेहमीप्रमाणे खुप सार साहित्य भरलेली भली मोठी पिशवी दिली. आणि पिशवी मला सुपुर्द करतांना सांगती झाली, सुनबाईच्या आवडीची अंबाडीची भाजी सोबत दिली आहे. भाजीत घालायला कण्याही दिमतीला आहेत ! यात भरून पावण्यासारखी बाब म्हणजे सासु बाईलाही अंबाडीच्या भाजीची आपली पुर्वा पार परंपरा सुनबाई पर्यंत पोचवायची आहे व सुनबाईच्या आवडही जपायची आहे. एक क्षणतर अंबाडीची भाजी मला सासु-सुनेतील मायेचा पुलही वाटतो. सरते शेवटी दुसऱ्या दिवशी ऑफीसची घाई असतांना नाष्ट्याच्या प्लेटमध्ये अंबाडीच्या पुऱ्या पडल्या आणि भरून पावलो.  

      चला, श्रावण महिन्यात इतर रानभाज्यांसह अंबाडीचाही आस्वाद घेवूया. बर्गर, मॅगी व पिझ्झा संस्कृतीत अंबाडीच्या आधुनिक रेसेपी बनवून आपल्यातील पाककौशल्याला झळाळी देवूया आणि अंबाडीची खाद्य संस्कृती येणाऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रणही घेवूया.

                              ००००

Tuesday, June 3, 2025

'...प्रवासे सर्व सुखानां'

 



      जाणकार म्हणतात आणि माझाही विश्वास आहे की, स्थानिक लोक व तेथील संस्कृती समजून घ्यायची असेल तर त्या-त्या भागातील बस गाड्यांचा प्रवास हा सुखकर ठरतो. मग आम्हीही निघालो (अर्धांगिनी,चिरंजीव आणि मी) मालवणहून रत्नागिरीला महामंडळाच्या बसनेच. 

     सतत नागमोडी वळण घेणारे डांबरी व सुस्थितील रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा आंबे, काजू आणि नारळाची झाडे. आम्ही बसलो जलद गती गाडीत आणि प्रत्येक थांबा घेत प्रवाशांची ने-आण करणारी ही सामान्य गाडी भासावी अशी हिची गती. 

       जेष्ठ नागरिक सुविधेचा लाभ जणू आपला अधिकार असल्याच्या व तशी जाणीव असणारे हाफ सदरा व हाफ पँट मधील ज्येष्ठ नागरिक, रानफुले तर कुठे प्लास्टिकचे गजरे माळलेल्या स्त्रिया, शाळकरी मुल-मुली यांची सतत चढ-उतर असणारा बस प्रवास.

    ही गाडी म्हणजे कोकणच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंबच जणू. कोणी एम.आर.आय/ एक्सरे ची रिपोर्ट सोबत घेऊन जामसंडे व मीठबावं सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल स्टॉपवर उतरली यात लेकुरवाळ्या व ज्येष्ठ महिलांचाच समावेश दिसून येतो.

     भाळी लालभडक कुंकवाचा बारीकसा टीळा व त्यात ठासून  दिसणारी अक्षत ल्यालेल्या व कोकणी पेहरावातील महिला प्रामुख्याने बसने वस्तुंची काही तरी ने आण करतानाचे चित्र दिसून येते. यात पिकलेला व गाडीभर घमघमाट सुटलेला फणस, बारदाण्यात भरलेली नारळ वाहून नेणाऱ्या स्त्रिया दिसून येतात. तर बेसिक मोबाईल फोन कानाला लावून जोरजोरात फोनवर बोलणारे व आपलं कोकणीतील संभाषण ऐकवणारे ज्येष्ठही मजेशीर आहेत.

      या प्रवासात बहुतेक आढळून येणाऱ्या खाड्या आणि त्यात सुरू असलेले राज-रोस अवैध वाळू उत्खननही (स्थानिकांकडून प्राप्त माहितीनुसार) आढळून येते. तर खाडीत स्थानिक लोक काठीने मासेमारी करताना तर महिला समुद्री जीव वेचतानाही दिसून आली. जागो- जागी कातळ जमीन (वने)  दिसून येते. या जमिनीतून निघणारा 'चिरा' नावाचा दगड जो येथे बहुतांश घर बांधणीत वापरतात. या जमिनीला चिरा दगडाच्याच छोट्याशा संरक्षक भिंतीही दिसून येतात. (येथून दगड काढण्यासाठी शासनाची रीतसर परवानगी लागते असे लोक सांगतात).

      प्रवासात दिसलेल्या शाळा सुंदर व सुस्थितीतील इमारती असलेल्या दिसून येतात व बसचा प्रवास करणाऱ्यामध्ये निम्मे प्रवासी हे शाळकरी असल्याचे दिसले.(आजच शाळा सुरू झाल्या आहेत).रस्ते अरुंद असल्याने एकाचवेळी जास्त गाड्या रस्त्यावर आल्यास लगेच भला मोठा जामही अनुभवास येतो.

      ...आणि वल्ली सापडली

       प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांचे कोकणातील व्यक्तींच्या स्वभाव गुणावर आधारित पुस्तक 'व्यक्ती आणि वल्ली' वाचनात आले होते. आज अशाच एक वल्लीचे दर्शन घडले.

       प्रवासाची सुरुवातच एका वल्लीच्या भेटीने झाली. मालवण बस डेपोत हाफ पँट आणि लांब सदरा फोल्ड केलेला व हातामध्ये कुरकुरेच पाकीट असलेली एक व्यक्ती जी तेथे बसची वाट बघत बसलेल्या प्रवाशांची तगमग बघता व त्यांना धावते समालोचन (Live Commentary) ऐकवणारी वल्ली. 'आगाराच्या फलाट क्रमांक 4 वर कुडाळ गाडी लागली आहे, त्याच्या शेजारी ओरस गाडीही आहे प्रवाशांनी गाडीकडे प्रस्थान करावे', 'रत्नागिरी देवगड मार्गे बस थोड्याचवेळाय फलाट क्रमांक 6 वर लागणार आहे पण त्याचा ड्रायव्हर सध्या हरवला आहे त्यामुळे गाडीला उशीर होईल' अशी मिश्किल कोटी करणारी ही वल्ली आम्ही उभे असू तिथे आले अन् स्वरितकडे (आमचा चिरंजीव) कटाक्ष टाकत समालोचन करते झाले, 'कोणत्याच वस्तूचा हट्ट न करणारा डेपोत एक शांत मुलगा दिसला आहे अन् हळूच डोक्यावर हात ठेवत बेटा चांगला अभ्यास कर,मोठा हो' म्हणत पुढे जातो व परत सांगू लागतो 'चला ऑटोरिक्षा इथे गर्दी करू नका आणि ऑटो स्टँडलाच ऑटो लावा.' पेहरावाणे नीट- नेटकी ही वल्ली एक तर पूर्वाश्रमी एसटी खात्यात असावी नाही तर त्यांच मानसिक संतुलन ढासळल असावं अस वाटतं, मात्र कोणीही त्यांच्या अशा धावत्या समलोचनाचा त्रागा करून घेत नसल्याचे व एक विरंगुळा म्हणून यास बघत असल्याचे निरीक्षण.

       मालवण ते रत्नागिरी बस प्रवासात प्रामुख्याने आसरा, मीठबावं, कुणकेश्वर,जामसंडे,देवगड (तालुक्याचे ठिकाण व नगरपंचायत),देवरूखवाडी, कात्रादेवी, पावस आदी महत्वाची गावे लागतात. कुठे जोरदार पावसाची बॅटिंग अन् कुठे वरून राजाचा तीक्ष्ण कटाक्ष अनुभवत येथील भूप्रदेश, व्यक्ती त्यांचे निरीक्षण करत ५ तासांचा 'प्रवासे  सर्व सुखानां..' असा आमचा हा प्रवास अखेर रत्नागिरी बस स्थानकात येऊन  स्थिरावला.

               ००००००

Monday, December 30, 2024

लेकीचा सर्वोच्च सन्मान पाहून कृतकृत्य झाले.....




            विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास, राष्ट्रपती भवन आणि भारत मंडपम या गौरवशाली वास्तुंमधील वावर, राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणांची सहेर. यावर कळस ठरलेला प्रसंग अर्थात, लेकीच्या धाडसी कामगिरीमुळे बालकांसाठीचा देशातील सर्वोच्च सन्मान साक्षात राष्ट्रपतींकडून मिळण्याचा व पंतप्रधानांसोबत लेकीच्या संभाषणाचे चित्र प्रत्यक्षात डोळ्यात साठवून आयुष्याची कृतकृत्यता झाल्याच्या भावनाच माझ्या मनात आहेत.

 

              पुरस्कार स्विकारण्यासाठी लेकीसोबत दिल्लीत जायचं ठरलं आणि मनावर दडपणही आलं. मुलीचा राष्ट्रीय गौरव बघायला मिळणार म्हणून मी हरखून गेले. आयुष्यात असा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार याचा विचार करत करत दिल्लीच्या तयारीसाठी बॅग भरतांना मजेशीर किस्से घडले. आम्ही माय लेकिंनी त्याततही भारी एन्जॉय केला. विमानात खिडकीची सिट घेवून टेक ऑफ व लँडींगच्यावेळी मस्त फोटो व्हिडीयो घेण्याचे प्लॅनिंगही झाले. राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे शद्ब केवळ कधी मधी वाचून किंवा ऐकूण असणाऱ्या आम्ही माय-लेकी त्यांना प्रत्यक्ष जवळून बघणार होतो याचाही वेगळाच आनंद होता. पण, यासर्वात पाय जमीनीवरच होते.    

     पाचविला पुजलेली गरीबी. त्यामुळ हात मजुरीवर चालणार आमच्या संसाराच गुऱ्हाड. घरापासून कोसो दूर पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाच बिऱ्हाड पाठीशी घेऊन कधी हा प्रदेश तर कधी तो प्रदेश आम्ही चाललो. आमच्या या बिऱ्हाळात दोन लेकी. त्यांच्या संगोपनासोबत सुरक्षेचीही मोठी जबाबदारी आलीच. पण, आयुष्याच्या या धबडग्यात लेकीचा राष्ट्रीय सन्मान होण्याची घटना माझ्या आयुष्याची फलश्रुती ठरावी अशी आहे.

     लोकांच्या घरची धुनी,भांडी,केर काढण्यात चाललेलं आयुष्य असच अडगळीत पडून होत. मात्र, लेक करीना (१७ वर्ष) हिने आम्ही मजुरी करीत असू त्या जय अंबा अपार्टमेंटला आगीच्या विळख्यातून वाचवल अर्थात जीव धोक्यात घालून. क्षणभर डोळ्यासमोर तो प्रसंग आणला तर आग लागलेल्या फ्लॅटमधून सिलेंडर बाहेर काढताना अपघात घडला असता  व आपली मुलगी... नको!,असले भलते विचार नकोत. मुळात प्राणांची आहुती देवून आपल्या मायभूचे इथल्या नागरिकांचे रक्षण करण्याची आमची महान परंपरा राहिली आहे म्हणूनच तर माझ्या लेकीने ही परंपरा कायम ठेवली आहे.

       लेकीच्या धाडसाची वार्ता हा हा करता पंचक्रोशित पसरेल व तिच्या सोबत आम्हाला ठिक-ठिकाणी सन्मानित करण्यात येईल,अस स्वप्नवत वाटणार सर्व आमच्या आयुष्यात घडू लागल. १५ में २०२४ च्या सायंकाळी अमरावतीतील कठोरा परिसरातील आम्ही मोलमजुरी करीत असू त्या जय अंबा अपार्टमेंटला अचानक आग लागली. समयसूचकता व धाडस दाखवत जीवाची बाजी लावून  माझ्या लेकीने आमच्या पोशिंद्या अपार्टमेंट मधील ७० सदनिका धारकांच्या कुटुंबांचे रक्षण केले.

       या प्रसंगानंतर  जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन आवश्यक ते सोपसकार पार पाडले. इकडे अधून-मधून आम्हाला निमंत्रण येऊ लागलं .सत्कार होत राहिले. मात्र, पती अशोक थापा यांचे अपार्टमेंटचे केअर टेकर म्हणून सुरू असलेले काम आणि  मी व माझ्या दोन्ही लेकींचे याच अपार्टमेंटमध्ये धुनी, भांडीचे काम अव्याहत सुरूच होते.

     अशात वार्ता धडकली लेक करिनाला केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार" जाहीर  झाल्याची. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याच कळल. ज्ञान, अधिकार, शासन -प्रशासन  याचा दुरान्वयाने संबंध नसलेल्या आमच्या आयुष्यात असे सोनेरी प्रसंग येतील याची तसुभरही कल्पना नव्हती.

            लेकीच्या कर्तुत्वामूळ हे सर्व घडून आलं. समाजामध्ये  जिथ मुलगा हाच वंशाचा दिवा समजला जातो तिथं आमच्या मुलींन थेट एवढा मोठा सन्मान मिळवून देत मुलीचं योगदान अधोरेखित केलं.

                          या पुरस्काराने आमच्या जीवनात फार फरक पडणार नाही. आम्ही याचा काही अहंम बाळगणार नाही. पण, आमच्या एका कामाची एवढी मोठी दखल शासन दरबारी घेतली जावू शकते याची जाणीव झाली. आणि आपल कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडायचं बळ मिळालं. लेक करीनाला शिक्षणात व तिच्या आवडीच्या बॉक्सिंग खेळात पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही उभयता होईल ते सर्व प्रयत्न करू. या पुरस्काराने करीनाला मोठा मंच मिळाला आहे. शासन व समाजाकडून तिला सहकार्य मिळतेय त्याचा सार्थ आदर व जाणीव आम्हाला कायम आहे.

      करीनाच्या राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतच्या या सर्व प्रवासात आम्हा कुटुंबियां एवढाच जय अंबा परिवारातील प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी आम्ही कायम कृतज्ञच राहू. सर्वांचे मनापासून आभार!

                                                                                      आपली

 

                                                                                                      निशा अशोक थापा