Wednesday, August 6, 2025

भाजी अंबाडीची अन् फोडणी सुरस आठवणींची…


 

 ‘श्रावण मासी हर्ष मानसी….’ या बालकवींच्या ओळी निश्चीतचं समर्पक असल्याची अनुभूती पदोपदी येते ती पावसाळा ऋतू व विशेष करून श्रावण महिन्यात. याच काळात निसर्गाने मानवाला भरभरून दिलेली रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्य संपदाही ठळकपणे अधोरेखित होते. चला.. आता मला जे सांगायचं आहे त्याकडे वळुया. 

   त्याच झालं अस ! आज जेवायला गेलो तेव्हा शेजारीच बसलेल्या वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या गप्पा आपसूक काणावर आल्या. विषय अंबाडीच्या भाजीचा. त्यातला एकजण उच्चारला, ‘काल खेडे गावात जाणं झालं अन् अंबाडीची भाजी खरेदी केली. आणि आईला भाजी बनविण्याची विनंती केली त्याच भाजीचा आपण आस्वाद घेवूया.’ हा संवाद संपतो न संपतो तोच दुसरा उत्तराला, ‘हो, मी पण माझ्या आईलाच अंबाडीची भाजी बनवायला सांगितली काल-परवा.’ हा संवाद सुरू असतांना अंबाडी प्रेमी मी कसा मागे राहणार. मग मीही आपलं घोड दामटलं, आईच्या हातच्या अंबाडीच्या भाजीला निश्चितच चव आहे त्यात अजिबात दुमत नाही. पण, माझी बायको या अंबाडीच्या भाजीच्या पुऱ्याही छान बनवून खायला देते. म्हणजेच अंबाडीची भाजी आणि सासु-सुनेच्या खवय्येगीरीत सासुलाचं नुसतं झुकत माप नको बरं का !. आई ही अंबाडीच्या भाजीच्या रेसीपीची संवाहक ठरते तर पत्नी ही पीझ्झा, बर्गर, मॅगीच्या आधुनिक काळात अंबाडीची पुरी करून मुलांच्या गळी उतरवणारी स्मार्ट मम्मी ठरते. 

        आजच्या धकाधकीच्या काळात अशी अंबाडीच्या भाजीवर चर्चा होणेही थोड्या अर्थाने कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. या चर्चेतून अंबाडीच्या भाजीचे सुरस आठवणींनाही उजाळा मिळत होता. भुप्रदेशनिहाय अंबाडीची भाजी बनवीण्याची पद्धत आणि हंगामा शिवाय अन्य वेळी या भाजीची चव चाखयची असेल तर या भाजीला साठवून ठेवण्याच्या विविध तऱ्हा असे एकानेक विषय चर्चेत निघत गेले. जेवणाच्या मेजावरील या आगंतूक संवंगड्यांनी आपले टिफीन सदृष्य शिदोऱ्या सोडल्या आणि मी ही खाणावळीतील ताटावर ताव मारला. पण या चर्चेतून माझाच फायदा झाला. या संवंगड्यांनी आपल्याजवळचा अंबाडीचा ऐवज पुरता उघडून माझ्या ताटात दिला. आणि मी क्षणभर सुखावलो. जर अंबाडीच्या चर्चेत उडी घेतली नसती तर या ऐवजाला मुकलो असतो असा विचारही मनात आला. शेवटी बोलत राहिल्याने तोटे कमी आणि फायदे जास्त होतात असे म्हणायलाही हरकत नाही. ही भाजी वेगळ्या तऱ्हेची म्हणजे खास मुगाच्या डाळीत घोळलेली आंबटसर व स्वादिष्ट चवीची आणि पहिल्यांदाच या थाटातील अंबाडीचा आस्वाद घेण्याची वेळही पहिलीच. 

        गेल्या आठवड्यातच गावी जाणे झाले. आई-बाबांची भेट म्हणजे बॅटरी चार्ज आणि शरीरात ऊर्जेचा संचार.अर्धांगिनीची प्रकृती बरी नव्हती अशात मुलाला फक्त गावी चलतो! असं म्हणताच पठ्ठयाने तयारी केली आणि गाडीवरही बसला. माझं गाव जस माझ्या मनात तसंच मुलाच्या मनातही ते तेवढचं ठासून असल्याच अप्रुपही वाटते. घरून निघतांना आईने नेहमीप्रमाणे खुप सार साहित्य भरलेली भली मोठी पिशवी दिली. आणि पिशवी मला सुपुर्द करतांना सांगती झाली, सुनबाईच्या आवडीची अंबाडीची भाजी सोबत दिली आहे. भाजीत घालायला कण्याही दिमतीला आहेत ! यात भरून पावण्यासारखी बाब म्हणजे सासु बाईलाही अंबाडीच्या भाजीची आपली पुर्वा पार परंपरा सुनबाई पर्यंत पोचवायची आहे व सुनबाईच्या आवडही जपायची आहे. एक क्षणतर अंबाडीची भाजी मला सासु-सुनेतील मायेचा पुलही वाटतो. सरते शेवटी दुसऱ्या दिवशी ऑफीसची घाई असतांना नाष्ट्याच्या प्लेटमध्ये अंबाडीच्या पुऱ्या पडल्या आणि भरून पावलो.  

      चला, श्रावण महिन्यात इतर रानभाज्यांसह अंबाडीचाही आस्वाद घेवूया. बर्गर, मॅगी व पिझ्झा संस्कृतीत अंबाडीच्या आधुनिक रेसेपी बनवून आपल्यातील पाककौशल्याला झळाळी देवूया आणि अंबाडीची खाद्य संस्कृती येणाऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रणही घेवूया.

                              ००००

Tuesday, June 3, 2025

'...प्रवासे सर्व सुखानां'

 



      जाणकार म्हणतात आणि माझाही विश्वास आहे की, स्थानिक लोक व तेथील संस्कृती समजून घ्यायची असेल तर त्या-त्या भागातील बस गाड्यांचा प्रवास हा सुखकर ठरतो. मग आम्हीही निघालो (अर्धांगिनी,चिरंजीव आणि मी) मालवणहून रत्नागिरीला महामंडळाच्या बसनेच. 

     सतत नागमोडी वळण घेणारे डांबरी व सुस्थितील रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा आंबे, काजू आणि नारळाची झाडे. आम्ही बसलो जलद गती गाडीत आणि प्रत्येक थांबा घेत प्रवाशांची ने-आण करणारी ही सामान्य गाडी भासावी अशी हिची गती. 

       जेष्ठ नागरिक सुविधेचा लाभ जणू आपला अधिकार असल्याच्या व तशी जाणीव असणारे हाफ सदरा व हाफ पँट मधील ज्येष्ठ नागरिक, रानफुले तर कुठे प्लास्टिकचे गजरे माळलेल्या स्त्रिया, शाळकरी मुल-मुली यांची सतत चढ-उतर असणारा बस प्रवास.

    ही गाडी म्हणजे कोकणच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंबच जणू. कोणी एम.आर.आय/ एक्सरे ची रिपोर्ट सोबत घेऊन जामसंडे व मीठबावं सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल स्टॉपवर उतरली यात लेकुरवाळ्या व ज्येष्ठ महिलांचाच समावेश दिसून येतो.

     भाळी लालभडक कुंकवाचा बारीकसा टीळा व त्यात ठासून  दिसणारी अक्षत ल्यालेल्या व कोकणी पेहरावातील महिला प्रामुख्याने बसने वस्तुंची काही तरी ने आण करतानाचे चित्र दिसून येते. यात पिकलेला व गाडीभर घमघमाट सुटलेला फणस, बारदाण्यात भरलेली नारळ वाहून नेणाऱ्या स्त्रिया दिसून येतात. तर बेसिक मोबाईल फोन कानाला लावून जोरजोरात फोनवर बोलणारे व आपलं कोकणीतील संभाषण ऐकवणारे ज्येष्ठही मजेशीर आहेत.

      या प्रवासात बहुतेक आढळून येणाऱ्या खाड्या आणि त्यात सुरू असलेले राज-रोस अवैध वाळू उत्खननही (स्थानिकांकडून प्राप्त माहितीनुसार) आढळून येते. तर खाडीत स्थानिक लोक काठीने मासेमारी करताना तर महिला समुद्री जीव वेचतानाही दिसून आली. जागो- जागी कातळ जमीन (वने)  दिसून येते. या जमिनीतून निघणारा 'चिरा' नावाचा दगड जो येथे बहुतांश घर बांधणीत वापरतात. या जमिनीला चिरा दगडाच्याच छोट्याशा संरक्षक भिंतीही दिसून येतात. (येथून दगड काढण्यासाठी शासनाची रीतसर परवानगी लागते असे लोक सांगतात).

      प्रवासात दिसलेल्या शाळा सुंदर व सुस्थितीतील इमारती असलेल्या दिसून येतात व बसचा प्रवास करणाऱ्यामध्ये निम्मे प्रवासी हे शाळकरी असल्याचे दिसले.(आजच शाळा सुरू झाल्या आहेत).रस्ते अरुंद असल्याने एकाचवेळी जास्त गाड्या रस्त्यावर आल्यास लगेच भला मोठा जामही अनुभवास येतो.

      ...आणि वल्ली सापडली

       प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांचे कोकणातील व्यक्तींच्या स्वभाव गुणावर आधारित पुस्तक 'व्यक्ती आणि वल्ली' वाचनात आले होते. आज अशाच एक वल्लीचे दर्शन घडले.

       प्रवासाची सुरुवातच एका वल्लीच्या भेटीने झाली. मालवण बस डेपोत हाफ पँट आणि लांब सदरा फोल्ड केलेला व हातामध्ये कुरकुरेच पाकीट असलेली एक व्यक्ती जी तेथे बसची वाट बघत बसलेल्या प्रवाशांची तगमग बघता व त्यांना धावते समालोचन (Live Commentary) ऐकवणारी वल्ली. 'आगाराच्या फलाट क्रमांक 4 वर कुडाळ गाडी लागली आहे, त्याच्या शेजारी ओरस गाडीही आहे प्रवाशांनी गाडीकडे प्रस्थान करावे', 'रत्नागिरी देवगड मार्गे बस थोड्याचवेळाय फलाट क्रमांक 6 वर लागणार आहे पण त्याचा ड्रायव्हर सध्या हरवला आहे त्यामुळे गाडीला उशीर होईल' अशी मिश्किल कोटी करणारी ही वल्ली आम्ही उभे असू तिथे आले अन् स्वरितकडे (आमचा चिरंजीव) कटाक्ष टाकत समालोचन करते झाले, 'कोणत्याच वस्तूचा हट्ट न करणारा डेपोत एक शांत मुलगा दिसला आहे अन् हळूच डोक्यावर हात ठेवत बेटा चांगला अभ्यास कर,मोठा हो' म्हणत पुढे जातो व परत सांगू लागतो 'चला ऑटोरिक्षा इथे गर्दी करू नका आणि ऑटो स्टँडलाच ऑटो लावा.' पेहरावाणे नीट- नेटकी ही वल्ली एक तर पूर्वाश्रमी एसटी खात्यात असावी नाही तर त्यांच मानसिक संतुलन ढासळल असावं अस वाटतं, मात्र कोणीही त्यांच्या अशा धावत्या समलोचनाचा त्रागा करून घेत नसल्याचे व एक विरंगुळा म्हणून यास बघत असल्याचे निरीक्षण.

       मालवण ते रत्नागिरी बस प्रवासात प्रामुख्याने आसरा, मीठबावं, कुणकेश्वर,जामसंडे,देवगड (तालुक्याचे ठिकाण व नगरपंचायत),देवरूखवाडी, कात्रादेवी, पावस आदी महत्वाची गावे लागतात. कुठे जोरदार पावसाची बॅटिंग अन् कुठे वरून राजाचा तीक्ष्ण कटाक्ष अनुभवत येथील भूप्रदेश, व्यक्ती त्यांचे निरीक्षण करत ५ तासांचा 'प्रवासे  सर्व सुखानां..' असा आमचा हा प्रवास अखेर रत्नागिरी बस स्थानकात येऊन  स्थिरावला.

               ००००००

Monday, December 30, 2024

लेकीचा सर्वोच्च सन्मान पाहून कृतकृत्य झाले.....




            विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास, राष्ट्रपती भवन आणि भारत मंडपम या गौरवशाली वास्तुंमधील वावर, राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणांची सहेर. यावर कळस ठरलेला प्रसंग अर्थात, लेकीच्या धाडसी कामगिरीमुळे बालकांसाठीचा देशातील सर्वोच्च सन्मान साक्षात राष्ट्रपतींकडून मिळण्याचा व पंतप्रधानांसोबत लेकीच्या संभाषणाचे चित्र प्रत्यक्षात डोळ्यात साठवून आयुष्याची कृतकृत्यता झाल्याच्या भावनाच माझ्या मनात आहेत.

 

              पुरस्कार स्विकारण्यासाठी लेकीसोबत दिल्लीत जायचं ठरलं आणि मनावर दडपणही आलं. मुलीचा राष्ट्रीय गौरव बघायला मिळणार म्हणून मी हरखून गेले. आयुष्यात असा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवायला मिळणार याचा विचार करत करत दिल्लीच्या तयारीसाठी बॅग भरतांना मजेशीर किस्से घडले. आम्ही माय लेकिंनी त्याततही भारी एन्जॉय केला. विमानात खिडकीची सिट घेवून टेक ऑफ व लँडींगच्यावेळी मस्त फोटो व्हिडीयो घेण्याचे प्लॅनिंगही झाले. राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे शद्ब केवळ कधी मधी वाचून किंवा ऐकूण असणाऱ्या आम्ही माय-लेकी त्यांना प्रत्यक्ष जवळून बघणार होतो याचाही वेगळाच आनंद होता. पण, यासर्वात पाय जमीनीवरच होते.    

     पाचविला पुजलेली गरीबी. त्यामुळ हात मजुरीवर चालणार आमच्या संसाराच गुऱ्हाड. घरापासून कोसो दूर पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाच बिऱ्हाड पाठीशी घेऊन कधी हा प्रदेश तर कधी तो प्रदेश आम्ही चाललो. आमच्या या बिऱ्हाळात दोन लेकी. त्यांच्या संगोपनासोबत सुरक्षेचीही मोठी जबाबदारी आलीच. पण, आयुष्याच्या या धबडग्यात लेकीचा राष्ट्रीय सन्मान होण्याची घटना माझ्या आयुष्याची फलश्रुती ठरावी अशी आहे.

     लोकांच्या घरची धुनी,भांडी,केर काढण्यात चाललेलं आयुष्य असच अडगळीत पडून होत. मात्र, लेक करीना (१७ वर्ष) हिने आम्ही मजुरी करीत असू त्या जय अंबा अपार्टमेंटला आगीच्या विळख्यातून वाचवल अर्थात जीव धोक्यात घालून. क्षणभर डोळ्यासमोर तो प्रसंग आणला तर आग लागलेल्या फ्लॅटमधून सिलेंडर बाहेर काढताना अपघात घडला असता  व आपली मुलगी... नको!,असले भलते विचार नकोत. मुळात प्राणांची आहुती देवून आपल्या मायभूचे इथल्या नागरिकांचे रक्षण करण्याची आमची महान परंपरा राहिली आहे म्हणूनच तर माझ्या लेकीने ही परंपरा कायम ठेवली आहे.

       लेकीच्या धाडसाची वार्ता हा हा करता पंचक्रोशित पसरेल व तिच्या सोबत आम्हाला ठिक-ठिकाणी सन्मानित करण्यात येईल,अस स्वप्नवत वाटणार सर्व आमच्या आयुष्यात घडू लागल. १५ में २०२४ च्या सायंकाळी अमरावतीतील कठोरा परिसरातील आम्ही मोलमजुरी करीत असू त्या जय अंबा अपार्टमेंटला अचानक आग लागली. समयसूचकता व धाडस दाखवत जीवाची बाजी लावून  माझ्या लेकीने आमच्या पोशिंद्या अपार्टमेंट मधील ७० सदनिका धारकांच्या कुटुंबांचे रक्षण केले.

       या प्रसंगानंतर  जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन आवश्यक ते सोपसकार पार पाडले. इकडे अधून-मधून आम्हाला निमंत्रण येऊ लागलं .सत्कार होत राहिले. मात्र, पती अशोक थापा यांचे अपार्टमेंटचे केअर टेकर म्हणून सुरू असलेले काम आणि  मी व माझ्या दोन्ही लेकींचे याच अपार्टमेंटमध्ये धुनी, भांडीचे काम अव्याहत सुरूच होते.

     अशात वार्ता धडकली लेक करिनाला केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार" जाहीर  झाल्याची. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याच कळल. ज्ञान, अधिकार, शासन -प्रशासन  याचा दुरान्वयाने संबंध नसलेल्या आमच्या आयुष्यात असे सोनेरी प्रसंग येतील याची तसुभरही कल्पना नव्हती.

            लेकीच्या कर्तुत्वामूळ हे सर्व घडून आलं. समाजामध्ये  जिथ मुलगा हाच वंशाचा दिवा समजला जातो तिथं आमच्या मुलींन थेट एवढा मोठा सन्मान मिळवून देत मुलीचं योगदान अधोरेखित केलं.

                          या पुरस्काराने आमच्या जीवनात फार फरक पडणार नाही. आम्ही याचा काही अहंम बाळगणार नाही. पण, आमच्या एका कामाची एवढी मोठी दखल शासन दरबारी घेतली जावू शकते याची जाणीव झाली. आणि आपल कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडायचं बळ मिळालं. लेक करीनाला शिक्षणात व तिच्या आवडीच्या बॉक्सिंग खेळात पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही उभयता होईल ते सर्व प्रयत्न करू. या पुरस्काराने करीनाला मोठा मंच मिळाला आहे. शासन व समाजाकडून तिला सहकार्य मिळतेय त्याचा सार्थ आदर व जाणीव आम्हाला कायम आहे.

      करीनाच्या राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतच्या या सर्व प्रवासात आम्हा कुटुंबियां एवढाच जय अंबा परिवारातील प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी आम्ही कायम कृतज्ञच राहू. सर्वांचे मनापासून आभार!

                                                                                      आपली

 

                                                                                                      निशा अशोक थापा



 

Tuesday, November 12, 2024

सुई सुई मुंगी ….



स्वातंत्र्याची  पंचाहत्तरी  साजरी केल्यानंतरही आमच्या देशात त्यातल्या-त्यात शहरी भागात अंधश्रद्धा पाळली जात असेल तर हे दुर्देवी आहे. हा अनुभव इथे मांडताना सुरुवात करतो ते प्रत्यक्ष घडलेल्या प्रंसगापासूनच. दिवस मावळला अन्ऑफिस आटोपून मुक्कामाकडे जायला निघालो तेव्हा नागपुरातील दाभा परिसरातील दाभा चौकात आल्यावर लक्षात आलं की, आपल्या आवडत्या ब्रँडच्या पँटला एक छोटासा खोसा लागल्याने तो वापरणीतून बाहेर पडला आहे. तेव्हा, त्या पँटला छोटासा रफ्फु करण्याकामी साधन लागणार होतं तेसुई व रिळ (धागा)’. मग जनरल स्टोअर्स धुंडाळली त्यात पहिला दुकानदार म्हटला, ‘सुई तर नाही साहेब ! पण, धागा आहे.’, म्हटलं, द्या धागा पुढच्या दुकानातून सुई घेतो व धागा खरेदी झाला.

          पुढं एका मिनिमार्केट सदृष्य स्थळी गेलो तिथं चार जनरल स्टोअर्स होते. प्रत्येकाकडे गेलो तर एकच उत्तर समोर आल, ‘ सुई आहे पण आम्ही रात्री देत नाही ‍(विकत नाही)’. मी म्हटल असं का! तर ते म्हटले, ‘आप कही पर भी ट्राय करलो, रात में आपको सुई नही देगा कोई दुकानदार’. मग त्यातील एकाला आपसुकच विचारलं, तुम्हाला माहित आहे देशाला स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली अन् तुम्ही अजूनही अंधश्रद्धा पाळता, तर ते महाशय म्हणाले, हमे ओ पता नही बाकी हम पढे लिखे नही उतना.

          सुरुवातीलाच असा हिरमोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर मग एक अगदी छोट सुपर मार्केट -कम-दुकान गाठलं तिथंही सर्च मोहिमेला काही यश नाही आलं . रात्री असे कोणी सुई देतील अस काही वाटत नाही पण पुढे काही दुकाने आहेत त्यात एकदा बघा असा डिसमूड करत हलका दिलासा  देवून त्यांनी मार्गदर्शन केलं. मग पुढील दुकान बघून आशा पल्लवीत झाल्या कारणही तस सज्जडच होत म्हणजे चक्क दुकानात  शीवन मशीन दिसून आल. आता म्हटल इथं तर शीवनकामासाठी लागणारं साहित्य सुई दोरा तर नक्कीच असेल. तोच काउंटरवर १६-१७ वर्षाचा मुलगा उभा ठाकला अन्विचारता झाला काय पाहिजे. मग माझी मागणी धुडकावत  लावून म्हणाला सुई आहे पण नाही देत आम्ही रात्री. मग म्हटल देशाचे भवितव्य असणा-या तरुणाला काय वाटतं या रात्री सुई न देण्याच्या प्रकाराबद्दल तर तो मुलगा सालस पणे म्हणाला ही म्हातारी मंडळी विकू देत नाहीत सुई रात्री पण का ते आम्हाला अन् त्यांना नाही सांगता येत. आता असा प्रतिसाद पाहून पुढेही अपयश हाती लागेल असच वाटत असतानाही प्रयत्न सोडायचा नाही म्हणून परत पुढच्या दुकानात गेलो तरतिथेही नकार घंटा अन् अनाहूत सल्ला पण आला की, आमच्या शेजरच्या दुकानात असेल पण ते नाही देणार रात्री सुई.

          आता मात्र, त्या परिसरातील हे शेवटच दुकान असल्यानं निराशेतही माझी उत्सुकता कायम होती. अशात त्या दुकानात गेलो अन् सकारात्मक उत्तर आलं, ‘हो आहे सुई, किती हव्यात’. तसा सुटकेचा सुस्कारा घेत पटा पटा पाच सुया खरेदी केल्या अन् त्या दुकानदाराला विचारलं, काहो सर्व दुकानदार सुई द्यायला नकार देताना तुम्ही कस धाडस केलं. अन् हे रात्री सुई न देण्याच्या भानगडीविषयी तुम्हाला काय वाटतं ? .तर ते म्हणाले, मी दुकानदार आहे अन् माल विकायलाच बसलोय आता दुस-या प्रश्नाच उत्तर अस की, ‘मुळात जुन्या काळी वीज नव्हती मग रात्री सुई दिल्यास ती पायात  रुतून इजा होईल म्हणून ती देत नसत’. आता चित्र बदललय अन् वीजही आलीये म्हणून दुकानदाराने रात्री सुई विक्री करायला काहीच हरकत नाही. मग हे एवढ सुंदर  उत्तर व त्याने माझ समाधान झाल्यानं त्यांना म्हटल आता  सुया खरेदीच कॉम्प्लीमेंट म्हणून मला चॉकलेट द्या . तिथून बाहेर पडलो अन् तसचं मनात अचानक शब्दांनी रुंजी घातली ती बालपणी ऐकलेल्या बडबडगितकम-लोकगिताचीसुई सुई मुंगी भुई भुई ते…..’.    

            एक याला जोडून माहिती अशी की, काही भागात अजुनही  रात्री लोणी (हा स्वानुभव),दही,हळद,गुलाल या वस्तू देत नाहीत. त्याच्या मागील कारण मिमांसा शोधून तशीही पोस्ट करेल याच नोट वर थांबतो.

  संबंधीत लोकगीते

सुई सुई भुंगा भुई भुई ते

पान सुपारी जीभ रंगते,

येरे कुत्र्या आटा माटा घाटा खायाले

स्त्रोत- श्री. प्रफुल खंडारे- अकोला

सुई सुई मुंगी भुई भुई ते

मुंगी मुंगी माशी माशी ते

माशी माशी कुत्याने खाल्ली

कुत्याने पायजामा घातली

 मुंगी मुंगी भुई भुई ते

सुई सुई मुंगी भुई भुई ते

 

स्त्रोत-व्हॉट्स अप एआय

 

 

 


 

Wednesday, October 23, 2024

संसदेत महाराष्ट्र गुणात्मकदृष्टया अव्वल-ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

 



संसदेत महाराष्ट्र गुणात्मकदृष्टया अव्वल
-ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली,१७ : महाराष्ट्राचा भारतीय संसदेतील इतिहास प्रेरणादायी आहे.सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना विधायक काम करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा बाणा संसदेत वेगवेगळया रुपात पहायला मिळतो म्हणूनच संसदेत गुणात्मकदृष्टया महाराष्ट्र अव्वल राहिला आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी आज मांडले.

                संसदेतील महाराष्ट्र या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे  २९वे पुष्पगुंफताना श्री. केसरी बोलत होते.

            देशाचे पहिले विधी मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र कन्या व देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपपंतप्रधान भूषविणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे पहिले अध्यक्षपद भूषविणारे दादासाहेब मावळणकरांपासून पुढे या पदावर सरस कार्य करणारे महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्ष नेते,कर्तबगार केंद्रीय मंत्री व उत्तमोत्तम संसदपटू देणा-या महाराष्ट्राची संसदेतील कामगिरी अभिमानास्पद आहे. विधायक कार्य करण्याचा मराठी बाणा जपत महाराष्ट्रातील नेत्यांनी संसदेत गुणात्मकदृष्टया उत्तम काम करून राज्याला संसदेत अव्वल स्थान मिळवून दिले आहे,असे श्री केसरी म्हणाले. 

            स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्राने संसदीय कार्यप्रणालीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महत्वाचे मंत्री होते. ते राज्यसभेचे सदस्य होते.त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व संसदेत होते. सोबतच काकासाहेब गाडगीळ हेही महाराष्ट्राचे मंत्री देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात होतेदेशावर आलेले संकट दूर करण्यात मराठी माणसं पुढे होती. चीनच्या भारत आक्रमनानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात बोलवून संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीश्री चव्हाण यांनी १९६५ मध्ये पाकिस्तान विरुध्दचे युध्द जिंकून भारतीय सैन्यास आत्मबल दिले. त्यानंतर त्यांनी गृह,अर्थ,परराष्ट्र व्यवहार ही खाती समर्थपणे सांभाळली आणि उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही वठविली असे श्री. केसरी यांनी सांगितले.

       लोकसभेचे पहिले अध्यक्षपद गणेश वासुदेव उर्फ दादासाहेब मावळणकर या मराठी माणसाने भूषविले त्यांनी उत्तम प्रथा पंरपरा संसदेत स्थापित केल्याशिवराज पाटील चाकुरकर लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी संसदेचे कामकाज दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहचविले. दूर चित्रवाणीद्वारे प्रश्नकाळ व महत्वाच्या चर्चा देशभर पोहचविण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी सभागृहाच्या कामाकाजाला वळण लावण्याचेही कार्य केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मध्यप्रदेशच्या असल्या तरी मूळ मराठी असलेल्या सुमित्रा महाजन यांची लोकसभाअध्यक्षपादाची कारकीर्दही उल्लेखनीय राहिल्याचे श्री केसरी म्हणाले.

            महाराष्ट्राच्या कर्तबगार मंत्र्यांचे ,खासदारांचे राष्ट्रीय स्तरावरील योगदान व संसदीय कामगिरी उल्लेखनीय आहेलोकसभेचे नेते म्हणून सुशील कुमार शिंदे यांना मान मिळाला आहे तर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कामगार नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगेसमाजवादी नेते एस.एम.जोशी,नानासाहेब गोरे,बॅ.नाथ पैमधू दंडवते,जॉर्ज फर्नांडीसविठ्ठलराव गाडगीळप्रमोद महाजनराम नाईक तसेच महाराष्ट्रातून निवडूण न आलेले पण अखेर पर्यंत मराठी बाणा जपणारे संसदपटू मधु लिमये,नानाजी देशमुख आदींनी संसदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवून उत्तम कार्य केलेमृणाल गोरे, प्रमिला दंडवते सरोज खापर्डे जयवंतीबेन मेहता या महिला खासदारांनीही संसदेत चमकदार कामगिरी केल्याचे श्री केसरी म्हणाले.  

            शंकराव चव्हाण यांनी गृहमंत्रीपदी केलेली कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहेत्यांच्या काळात पंजाबमध्ये शांततेत निवडणुका पार पडल्यात्याचवेळी जम्मू-काश्मीर व आसाम मध्ये शांतता प्रस्थापीत करण्यातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका वठविलीयशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर आणि सुशिल कुमार शिंदे यांनीही देशाच्या गृहमंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळलीदेशाचे अर्थमंत्री राहिलेले चिंतामणराव देशमुख यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनीही अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. सलग दहा वर्ष कृषीमंत्री म्हणून कार्य करणारे शरद पवार यांची कामगिरीही दमदार राहिली आहे.मधु दंडवते, राम नाईक ,सुरेश प्रभु आणि विद्यमान रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या रेल्वे मंत्रीपदाची वेगळी छाप सोडली आहे. दिलेली जबाबदारी चोख व समर्थपणे पूर्ण करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा स्वभाव आहे म्हणूनच त्यांना केंद्रात विविध महत्वाच्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळाली व त्यांनी ती उत्तमरित्या निभवली, असे श्री. केसरी यांनी सांगितले.

             संसदेत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून जातात लोकशाहीच्या या मंदिरात महाराष्ट्राचा केवळ संख्येनेच नाही तर कर्तृत्चाने व गुणात्मकदृष्टयाही दबदबा आहेमहाराष्ट्राचा हा दबदबा सत्तेत दिसतो तसाच विरोधातही खुलतो म्हणूनच संसदेत महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहेराज्याचे हे स्थान भाविष्यातही कायम राहिल ,असा विश्वास  श्री. केसरी यांनी यावेळी व्यक्त केला.

   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     

     http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.विक्र.११०/दिनांक १७.०४.२०२  

दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका- ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक

 






दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक

नवी दिल्ली,१६ महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाज ही शंभर वर्ष जुनी संस्था,मराठी शाळा, मराठी मंडळे आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मराठी माणसांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैचारीक वारसा जपत दिल्लीतील महाराष्ट्राची पताका उंचाविली असल्याचे, मत ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक  विजय नाईक यांनी आज व्यक्त केले  

 

        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‍‍दिल्लीतील महाराष्ट्र  या विषयावर २८वे पुष्पगुंफताना श्री. नाईक बोलत होते.

 

             महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, बाडा हिंदुराव रुग्णालय,तालकटोरा उद्यान,नोएडा गोल्फ कोर्स येथील स्तंभ आदी वास्तू तसेच शिवाजी स्टेडियम, खाशाबा जाधव स्टेडियम, शिवाजी ब्रिज, तिलक ब्रिज, बाजीराव पेशवे रोड, न्या.सुनंदा भंडारे रोड अशा महाराष्ट्राच्या ठसठसीत खुणा आज देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये बघायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचे पद भुषवून प्रदीर्घ काळ दिल्लीत वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्राला आकार दिला तर दिल्लीत मराठी माणसांसाठी सदैव मदतीस तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ हे मराठी जणांचे आधारवडच ठरले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील मराठी संस्था. मंडळे व वेगवगेळया क्षेत्रात कार्यरत मराठी माणसांनी महाराष्ट्राची वेगळी छाप दिल्लीत सोडली असून राज्याची पताका अभिमानाने उंचाविली असल्याचे श्री नाईक म्हणाले.   

            जन्मभूमी अहमदनगर असलेले व गेल्या ५२ वर्षांपासून दिल्लीवासी  झालेले आणि सक्रीय पत्रिकारीतेत ४५ वर्ष कार्यरत श्री नाईक यांनी यावेळी दिल्लीतील महाराष्ट्राच्या वेगवेगळया पाऊल खुणांबाबत माहिती दिली. २०व्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीत मराठी माणसांची पहिली वसाहत नया बाजार भागात झालीमराठी लोकांनी एकत्र येत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या २ कि.मीअंतरावरील पहाडगंज भागात १९१९ मध्ये महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून मराठी सण,उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. पुढे दिल्लीत मराठी माणसाला हक्काची व अल्पदरात राहण्याची व्यवस्थाही संस्थेने बृह्नमहाराष्ट्र भवनच्या रुपाने केली, नुतन मराठी शाळाही पहाडगंज भागातच उभारली. पुढे खारी बावली, चांदणी चौक भागात मराठी लोकांचा विस्तार झाला आजही या भागात मराठा सेनानी गंगाधर यांनी बांधलेले शिवपार्वती मंदीर असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

मराठी महिलांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यकलापासाठी १९५३ मध्ये लोधी कॉलनी परिसरात वनिता समाजाची स्थापना झालीदिल्ली  राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात अंदाजे ३ लाख मराठी लोकसंख्या असून वेगवेगळया भागात जवळपास ४५ मराठी मित्रमंडळ कार्यरत आहेतनुतन मराठी शाळा, चौगुले पब्लिक स्कुल या मराठी शाळा दिल्लीत कार्यरत आहेतदिल्लीत कार्यरत मराठी अधिका-यांनी स्थापन केलेली पुढचे पाऊल संस्था व दिल्लीत दिवाळी पहाटचा अनोखा उपक्रम राबविणा-या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या अलीकडच्या संस्थांही दिल्लीत महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे श्री नाईक म्हणाले.

                     दिल्लीत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता‍ ‍दिल्लीतील महाराष्ट्राच्या महत्वाच्या तीन पाऊल खुणा सापडतात, असे श्री नाईक म्हणाले. १७३७-३८ मध्ये बाजीराव पेशवे यांनी मोघल सुलतान सादत खान याला पराभूत केले तेव्हा पेशव्यांच्या सैन्यांच्या येथील मुक्कामात त्यांना थाळी व कटोरीतून जेवन दिले जात असे म्हणून येथील उद्यानाला तालकटोरा उद्यान’ असे नाव पडले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील महाराजा दौलतराव यांचे जावई मराठा उमराव राजा हिंदुराव यांनी १८५७ च्या उठावानंतर जुन्या दिल्लीत मुक्काम ठोकला. १९५८ मध्ये त्यांच्या महालाचे रुपांतर बाडा हिंदुराव रुग्णालयात करण्यात आले. 

नोएडा येथील गोल्फ कोर्समध्ये १९१६ साली उभारण्यात आलेला स्तंभ आजही मराठा सैन्याच्या शौर्याची गाथा सांगत आहे. ४० फुट उंचिच्या या स्तंभावर २१८ वर्षांआधी मराठा सैन्यांनी या परिसरात गाजविलेल्या  शौर्याचा उल्लेख आढळतो   

                           दिल्लीतील  महाराष्ट्राची जडणघडण

            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले विधी मंत्री  झाले व त्यांच्या रुपाने दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री झाले. पुढे १९८४ पर्यंत केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत असताना त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात दिल्लीतील महाराष्ट्राची जडणघडण झाल्याचे श्री नाईक म्हणाले.महाराष्ट्राचे उत्तुंग नेते म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होतीच याबरोबरच साहित्याचे उपासक, कलाकारांना वाव देणारे त्यांचे व्यक्तीमत्व होतेदिल्लीत भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलाचे अध्यक्षपद श्री चव्हाण यांनी भूषविले होतेयानंतर दिल्लीत अनेक मराठी नाटके ,गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. दिल्लीत महाराष्ट्र घडविणा-या मान्यवरांमध्ये मराठी माणसांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळमहाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे मानद अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे,मुरलीधर भंडारे,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात भर घालणारे महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले रा.मोहेजीबपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव व राजदूत द्वय सुधीर देवरे आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे आदी मंडळींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

 यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रानेही दिल्लीतील महाराष्ट्राला बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगून परिचय केंद्राच्या आजवरच्या प्रमुखांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. उदरनिर्वाहासाठी दिल्लीच्या रस्त्यावर चहाची टपरी चालविणारे लक्ष्मण राव यांनी लिखणाचा व्यासंग जपला व आज ते ख्यातीप्राप्त लेखक झाले ॲमेझॉन, किंडल, फ्लीपकार्टवर त्यांची पुस्तके विकली जातात. जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अरबी समुद्रातील छत्रपती शिवराय, अयोध्येतील राममंदिरात रामाचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम करीत असलेले जय काकतीकर यांच्यासह राजकारण,प्रशासन,पत्रकारिता आदी क्षेत्रात दिल्लीतील मराठी माणसांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचाविली आहे.

     मराठी संस्था,मंडळे, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी महाराष्ट्राचा समृध्द वारसा जपत राज्याची पताका दिल्लीत उंचाविली असल्याचे श्री नाईक यांनी यावेळी सांगितले.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:

         http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.विक्र.१०८/दिनांक १६.०४.२०२