Wednesday, February 7, 2018

कामाची दखल घेतली जाते तेव्हा...


आपण ज्या कामासाठी बांधिल आहोत नव्हे नव्हे ते काम आपल्या आवडीचे असल्याने आपण ते प्रामाणिकपणे आणि उत्तमच करण्याचा प्रयत्न करतो, अशात त्या कामाची पावती मिळाली तर त्याचा आनंद अतिव असतो. मलाही दिल्लीत शासनात येण्या आधी आणि शासनात आल्यावर याचा चांगला अभुनव आला.        मात्र, शासकीय सेवेतील कामाची दखल विशेषत: वृत्तांकणाची जो माझा आवडीचा प्रांत आहे त्याचा मला अत्यानंद आहे. महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधिन  क्षत्रिय यांनी धन्यवाद देत गुड असा दिलेला रिमार्क, राज्यपाल महोदयांचे जनसंपर्क अधिकारी श्री. काशिकर यांनी स्वत: मेल करून धन्यवाद मानत उत्तम काम केल्याबाबत दिलेले प्रोत्साहन हे विशेष आहे.
        






 भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केवळ माझ्या बातमी लेखनावर खूश होऊन मला स्वत:च्या कार्यालयात बोलवून घेणे. पुढे त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राशी संबंधित पासपोर्ट विभागाचे वृत्त प्रसुत करणे व त्याला प्रसार माध्यमातून चांगली प्रसिध्दी मिळण्याचा अनुभवही ग्रेट. तसेच, २०१७ च्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्र पॅवेलियनचे केलेले वृत्तांकन व त्याला मिळालेली  उत्तम प्रसिध्दी त्याची दखल स्वत: महाराष्ट्र लघु उद्योग मंडळाच्या जॉइंट एमडी श्रीमती बनसोडे यांनी कामाची केलेली तारीफही स्मरणीय ठरली. यासंदर्भातील त्यांच्या वाटसअपवरील  प्रतिक्रियांचे स्नॅपशॉट येथे देत आहे.

 


P S BURDE 
Sun, Dec 31, 2017 at 8:06 PM
Reply-To: P S BURDE
To: MIC New Delhi
dear dayanand sir and ritesh ji
it was nice to be with you at your center in delhi on 4 dec. it is too late on my part to write you. this happened as i was on tour to bhopal, satana, nagpur and chandrapur.
i am please to share the clippings of the news appeared in almost all the newspapers across the state. this wouldn't have happened without your efforts. once again thank you very much.

P.S. BURDE
General Secretary 
PARIVAAR, National Confederation of Parents' Organizations for PwIDDs, New Delhi
&
EC Member
Maharashtra State Executive Committee, Govt of Maharashtra
Co-opted EC Member
PARIVAAR SAHYADRI, the Apex Council of Parents of Persons with Intellectual and Developmental Disabilities in Maharashtra and Goa
&
Affiliate Member 
Down Syndrome International, London, UK (No.683)
&
Member
Down's Syndrome Association, UK (No.53123)

A/301, Shivashish CHS, S.V.Road, Andheri (W), MUMBAI-400058
Mob:9920447481
Email: psburde@yahoo.com

















सोनाली भुयार यांची दैनिक लोकमत दिल्ली आवृत्तीत अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया


केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ संदर्भात माझी पत्नी सोनाली भुयार हीची प्रतिक्रिया दैनिक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत प्रकाशित झाली. 



Wednesday, January 24, 2018

राष्ट्रीय युवा पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा- जव्वाद पटेल


प्रत्येकाच्या आयुष्यात युवा काळ हा अत्यंत महत्वाचा. काही करून दाखविण्याचा व आपल्या व्यक्तीमत्वाची वेगळी छाप सोडण्याचा. असेच एक व्यक्तीमत्व, आपल्या कर्तृत्वाची छाप राष्ट्रीय स्तरावर उमटविणारा अकोला येथील युवा संशोधक जव्वाद पटेल. त्यांनी सामाजिक भान आणि संशोधक वृत्ती यांची उत्तम सांगड घालून संशोधन कार्य केले. आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात केलेल्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल म्हणून २३ व्या वर्षीच या संशोधकाला राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच ग्रेटर नोएडा येथील गौतमबुद्ध विद्यापीठात आयोजित २२ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रदान करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक संशोधन केले असून त्यातील दोन संशोधनाला पेटंट मिळालेली आहेत. तसेच ३९ रिसर्च पेपर्सही सादर केले आहेत. या युवा संशोधकाची नेट भेट सदरासाठी घेतलेली खास मुलाखत.




सर्वप्रथम आपले अभिनंदन, राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय?
धन्यवाद. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने देशातील युवकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद आहे. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

आपले मूळ गाव आणि शैक्षणिक प्रवास याविषयी थोडक्यात काय सांगाल?
मी मूळचा अकोल्याचा. जुना अकोला भागात काळा मारोती रोड येथे मी राहतो. दहावी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे नंतर अकरावी आणि बारावी औरंगाबाद येथे आणि आता हैद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून मी बी.टेक. करीत आहे.

तुमच्यातील संशोधक वृत्तीची सुरुवात कशी झाली?
साधारणत: चार वर्षाचा असताना पासूनच माझा संशोधनाकडे कल सुरु झाला. घरातील विविध उपकरणे एकमेकांपासून वेगळे करणे व ते पुन्हा जोडून पाहणे अशी ही सुरुवात झाली. जसजसा मोठा होत गेलो आणि संशोधनातील समज आणि आवड वाढत गेली, तसा माझ्यातील संशोधक घडत गेला. हा प्रवास आतापर्यंत मी केलेले दोन हजारांहून अधिक संशोधन, विविध ठिकाणी मी सादर केलेले ३९ रिसर्च पेपर इथपर्यंत येऊन पोहचला आहे. ‘ड्युड्रॉप डिवाईस’ आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ या माझ्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्काराविषयी काय सांगाल?
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय विकास व समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना याशिवाय स्वयंसेवी संघटनांना प्रदान करण्यात येतो. समाज सेवा, आरोग्य, संशोधन, मानवाधिकार आदि क्षेत्रांसाठी २५ व्यक्तीगत व १० संस्थागत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. व्यक्तीगत पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये, पदक आणि मानपत्र असे असून संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये चषक आणि मानपत्र असे आहे.

आपणास ज्या संशोधन कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे, त्याविषयी काय सांगाल? 
मला समाजोपयोगी संशोधनात विशेष रस आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची आवड आणि संशोधकवृत्ती यांची सांगड घालून आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात मी केलेल्या संशोधनाची दखल राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी घेण्यात आली. आरोग्य क्षेत्रातील संशोधनात मी छातीचा कर्करोग शोधून काढणारे इपीडम्सी डिवाईस आणि रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईस तयार केले आहे. उर्जा क्षेत्रात सौर उर्जेवर चालणारी कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर १०० कि.मी. पर्यंत आरामात चालू शकते. जल क्षेत्रात हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे ड्युड्रॉप डिवाईस तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील संशोधनात मी रोपट्यांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत पुरविण्यासाठी उपयोगी पडणारे ॲग्रीटेक हे तंत्र विकसीत केले आहे, ज्या माध्यमातून रोपट्यांना योग्य प्रमाणात व वेळेत पाणी व खत देऊन उत्पादन क्षमता वाढविता येते.

देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी करण्यात येते. देशातील प्रतिभावान युवा शक्तीच्या उल्लेखनीय योगदानासाठी याच दिवशी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कर्तृत्वाच्या जोरावर जव्वाद पटेल यांनी हा मानाचा पुरस्कार मिळवून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची मुद्रा उमटविली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

नांदेडचा शूर बालक अब्दुल रौफच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल











 
आयुष्याच्या वळणावरील अगदी सुरुवातीचा टप्पा म्हणजे बालपण. हे वय खेळण्या-बागडण्याचं तसंच ते आपल्या भोवतालच्या वातावरणातून शिकण्याचं. या वयातच सामाजिक बांधिलकीचे संस्कार घडतात. याच वयात माणसाची शूरवृत्तीही बरेचदा दिसून येते. बालवयातील याच शूरवृत्तीचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान म्हणजे, ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’. दरवर्षी या मानाच्या पुरस्कारावर मराठी मोहर उमटते हे ही अभिमानास्पद. यावर्षी हा मान मिळवला आहे पाण्यात बुडण्यापासून दोन मुलींना वाचविणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ या बालकाने.

अब्दुल रौफच्या धाडसाची कहाणी

पार्डी गावाशेजारून वाहणाऱ्या नदीवर दोन हजार फूट लांब, 60 फूट रूंद आणि 20 फूट खोल असा एक बंधारा आहे. या बंधाऱ्यावर 30 एप्रिल 2017 ला गावातील काही महिला व मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती बंधाऱ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, ती ही बुडायला लागली. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. यावेळी शेताकडे निघालेल्या अब्दुल रौफ ने बंधाऱ्या जवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली.

जमावातील कोणीच पाण्यात उडी घेण्याचे धाडस दाखवत नव्हता. मात्र अशात अब्दुल रौफ ने प्रसंगावधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. 20 फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यु झाला. अब्दुल रौफ ने धाडस दाखवून दोन मुलींना बंधाऱ्यात बुडण्यापासून वाचविले. त्याच्या साहसाची नोंद घेत त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अब्दुल रौफ हा पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात 10 व्या वर्गात शिकत असून भारतीय लष्करात रूजू होऊन त्याला देशसेवा करायची आहे. त्याचे वडील होमगार्ड आहेत. अब्दुल ला एक थोरली बहीण व थोरला भाऊ आहे. 11 व्या वर्षापासूनच अब्दुल पोहणे शिकला. याशिवाय कबड्डी, हॉलीबॉल, रनिंग हे त्याचे आवडते खेळ आहेत.

शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेला अब्दुल रौफ केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. तो सध्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात सामील झाला आहे. यावर्षी आशिया खंडातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या दिमाखदार पथसंचलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अब्दुल रौफ ला उघड्या जिप्सीमधून सन्मानाने या खास परदेशी पाहुण्यांसह देशातील मान्यवरांना अभिवादन करण्याची संधीही मिळणार आहे. दिल्लीच्या वास्तव्यात तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून आशीर्वाद घेणार आहे. अब्दुल रौफच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रासह देशावासियांना प्रेरणादायी अशीच आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराविषयी
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

यावर्षी या पुरस्कारासाठी देशभरातून 200 अर्ज आले होते. केंद्र शासनाच्या 10 मंत्रालयासह 31 संस्थाच्या समितीने या अर्जांची छाननी केली. यातून वर्ष 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी देशातील सात मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांची निवड करण्यात आली आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

वर्ष प्रगतीचे; महाराष्ट्र परिचय केंद्राच्या झळाळीचे !






सरत्या वर्षाचा धांडोळा घेताना महाराष्ट्र परिचय केंद्राने राबविलेले उपक्रम आणि कार्यालयास मान्यवरांनी दिलेल्या भेटी या माध्यमातून राजधानी दिल्लीत मराठी बाणा जपण्याचे मोलाचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने वर्ष 2017 हे परिचय केंद्राच्या झळाळीचे ठरले.


महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, जगविख्यात पॅराशूट जंपर पद्मश्री शितल महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी व ‘जागतिक महिला दिन’, ‘मराठी भाषा गौरव दिन’,‘दिवाळी अंक प्रदर्शन’, ‘लोकराज्य अंक प्रदर्शन’, ‘विशेष मुलाखती’, ‘फेसबुक लाईव्ह’ आदी आयोजन आणि सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग यामुळे परिचय केंद्राने या वर्षात एक वेगळा यशालेख मांडला.

महाराष्ट्र परिचय केंद्र हे देशाच्या राजधानीत राज्याचे सांस्कृतिक दूत म्हणून समर्थपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हे कार्यालय राज्य शासनाच्या प्रसिध्दीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. कार्यालय आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांसाठीही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या व्यक्ती दिल्लीत काही कामानिमित्त येतात किंवा त्यांचा दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर सत्कार होतो. या पार्श्वभूमीवर, कार्यालयात अशा मान्यवरांना आमंत्रित केले जाते. त्यांचा सत्कार आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीतील मराठी बांधवांशी या कार्यक्रमात संबंधीत मान्यवारांच्या अनौपचारीक गप्पा रंगतात.

दिग्गजांच्या भेटी

परिचय केंद्राच्या कार्याची भूरळ व या कार्यालयाविषयी महाराष्ट्रातील दिग्गजांना आस्था आहे. कार्यालयास भेट देणाऱ्या अशा मान्यवरांमध्ये यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली सदिच्छा भेट महत्वाची ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचे बाबासाहेबांचे कार्य या निमित्ताने कार्यालयाच्या फेसबुक लाईव्ह उपक्रमातून जनतेपर्यंत पोचले. ७० च्या दशकात या कार्यालयास दिलेल्या भेटीच्या आठवणींना बाबासाहेबांनी उजाळा दिला. नोव्हेंबर महिन्यात समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची कार्यालयास भेट आणि त्यांच्याशी गप्पांतून उलगडलेली लोकबिरादरी प्रकल्पाच्या चार दशकांची यशस्वी वाटचाल संस्मरणीय ठरली. जगविख्यात पॅराशूट जंपर व स्काय डायव्हर पद्मश्री पुरस्कार प्राप्त शितल महाजन यांनी डिसेंबर महिन्यात कार्यालयास दिलेली भेट व स्कायडायव्हींगला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी सुरु असलेल्या त्यांच्या प्रयत्नांविषयी जाणून घेता आले. 

साहित्यिकांच्या भेटी

देशातील विविध भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट कलाकृतीसाठी साहित्य अकादमीच्यावतीने गौरविण्यात येते. यावर्षी मराठी लेखक आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहास गौरविण्यात आले यापार्श्वभूमीवर श्री. लोमटे यांची कार्यालयास भेट व त्यांच्या साहित्यिक वाटचालीची माहिती मिळाली. मराठी भाषेतील प्रसिध्द अनुवादक लिना सोहोनी यांचा कार्यालयातील संवाद कार्यक्रम अनुवाद क्षेत्रातील बारकाव्यांची विवेचणात्मक माहिती उपस्थितांना ज्ञान दान करून गेली.

दिग्गज महिलांच्या भेटी

विविध क्षेत्रात कार्यरत मराठी महिलांची कार्यालयास भेट व अनौपचारिक गप्पा संस्मरणीय ठरल्या. देशातील एकमेव सैन्य सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (Armed force medical collage),पुणेच्या अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कार्यालयास भेट व त्यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमधून सैन्य दलात महिलांच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती मिळाली. अपंगत्वावर मात करून दिव्यांगांच्या टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचाविणाऱ्या मुळच्या नागपूर येथील सुवर्णा राज यांची कार्यालयास भेट व गप्पांमधून उलगडलेली त्यांच्या कार्याची महती विशेष ठरली. आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक नारीशक्ती पुरस्कारप्राप्त मुमताज काजी यांच्याशी संवाद प्रेरणादायी ठरला. हॅप्पी रूट्स फुड्स अँड ब्रेवरेज इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी शेतकरी व महिलांसाठी कार्यरत महिला उद्योजिका रीमा साठे, ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लोककलावंत मंगला बनसोडे, राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कारप्राप्त महाराष्ट्रातील चंद्रकला झुरमुरे, लताबाई वाईंगडे आणि चंद्रकला चव्हाण या तीन अंगणवाडी सेविका, ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांनी भेट दिली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यालयास भेटी दिल्या व त्यांचे मार्गदर्शनही लाभले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि आयुक्त मिलींद शंभरकर, तत्कालीन सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, महाराष्ट्राचे सुपूत्र व दिल्लीतील सिमापुरी उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त हरेश्वर स्वामी, सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी कार्यालयास भेट दिली.

जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी

जनसंपर्क विभागाचे कार्यालय असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राला अन्य राज्यांच्या जनसंपर्क विभागाचे अधिकारी भेट देतात. यावर्षी कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरणासाठी माजी सनदी अधिकारी एम.आर. श्रीनिवास मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने कार्यालयास भेट दिली. या समितीच्या सदस्यांमध्ये ‘दैनिक प्रजावाणी’ चे माजी संपादक राजा शैलेशचंद्र गुप्ता, ‘द विक’ साप्ताहिकाचे दिल्लीतील निवासी संपादक सच्चिदानंद मुर्ती, कर्नाटक राज्य माहिती संचालक एन.आर विष्णुकुमार आणि उपसंचालक एच.बी.दिनेश यांचा समावेश होता. दिल्ली स्थित हरियाणा राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक जगदीप दुहान आणि जनसंपर्क अधिकारी अशोक राठी यांनीही परिचय केंद्रास भेट दिली. महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर यांच्या नेतृत्वातील वरिष्ठ सहायक संचालकांनी कार्यालयास भेट दिली.

प्रसार माध्यमांतील व्यक्तींच्या भेटी

प्रसार माध्यमांशी उचीत समन्वयाचे कार्य परिचय केंद्र समर्थपणे करीत असल्याने प्रसार माध्यमांतील विविध मान्यवर या कार्यालयास भेट देतात. दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, दैनिक पुढारीचे दिल्लीस्थित सहयोगी संपादक श्रीराम जोशी, वरिष्ठ पत्रकार विजय सातोकर, राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कारप्राप्त कोल्हापूर येथील दीपक कुंभार आणि मुंबईचे अतुल चौबे यांनी कार्यालयास भेट दिली.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांच्या भेटी

पत्रकारितेचे शिक्षण घेणारे राज्यातील विविध महाविद्यालयाच्या दिल्ली अभ्यास दौऱ्याप्रसंगी हे विद्यार्थी शासनातील जनसंपर्क हा विषय समजून घेण्यासाठी परिचय केंद्रास भेट देतात. नाशिक येथील एच.पी.टी कला आणि आर.वाय.के विज्ञान महाविद्यालय, पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवादशास्त्र विभाग, मुंबई येथील गुरुनानक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी कार्यालयास भेट दिली.

खासदार, आमदार व माजी मंत्री महोदयांच्या भेटी

या कार्यालयास राज्यातील खासदार, आमदार व माजी मंत्रीमहोदयांनी भेट दिली. यात राज्यसभेचे खासदार संजय राऊत, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार हरिभाऊ राठोड, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर भालेराव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावर्षी परिचय केंद्रास भेट दिली.

कार्यक्रमांचे आयोजन

कार्यालयाच्यावतीने प्रसंगानुरूप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी परिचय केंद्राने ‘मराठी भाषा गौरव दिना’ चे आयोजन केले परराष्ट्र व्यवहार सचिव तथा लेखक ज्ञानेश्वर मुळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. परिचय केंद्राच्यावतीने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात ‘जागतिक महिला दिनाचे’ आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व वक्त्या तर सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दिल्लीतील संसद मार्गावर महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’अंकांचे प्रदर्शन लावून अंक वितरीत करण्यात आले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत दिल्लीस्थित ओडिशा भवनात आयोजित महाराष्ट्र अन्न महोत्सवाप्रसंगी ही ‘लोकराज्य’ अंकाचे प्रदर्शन लावण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक असलेल्या ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन परिचय केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आले. पंजाब केसरी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आकू श्रीवास्तव यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून राजधानीत स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही कार्यालय ही वाटचाल समर्थपणे पुढे घेऊन जाईल हा दृढ विश्वास आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Tuesday, December 19, 2017

देवाच्या लाडक्या भक्ताचा अकस्माक निरोप

पंचपोथी असो, पंचक्रोशीतील कुठल्या गावी किंवा कुणाच्या घरी भजन असायचे तेव्हा तिथे आवर्जून उपस्थित राहून तल्लीनतेने हरिभजनात रमणारा देवाचा लाडका भक्त आयुष्याच्या अंतिम समयी भगवंताच्या नामस्मरणाने सर्वांचा निरोप घेतो. हा प्रसंग लिहीतानाही डोळे अश्रुंनी डबडबताहेत पण, नियतीने मांडलेला हा डाव स्वीकारण्यापलीकडे काहीच नसलेले आपण पामर असल्याची जाणीव सारखी होत असल्याचे शल्य मनाला बोचते. सर्वात मिसळणा-या व मनाने अत्यंत निर्मळ, स्पष्ट, वडील बंधुंप्रमाणेच सतत चेह-यावर हास्य असणारे सच्चे भाविक प्रिय नंदकिशोर काकांचे निधन झाल्याची वार्ता आली. मन पिळवटून टाकणारी ही दु:खद वार्ता स्वीकारण्याचा डाव नियतीने माझ्या प्रमाणेच आम्हा भुयार कुटुंबियांसमोर मांडला.




काही वर्षांपूर्वी आदरणीय नामदेव काकांचे अचानक आमच्यातून जाण्याची जखम ताजी असतानाच त्यांचे धाकटे बंधु आदरणीय नंदकिशोर काकांचे अकाली आमच्यातून जाने क्लेषदायी व आम्हा कुटुंबियांची मोठी हानीच ठरली. नौकरी व शिक्षणासाठी घरापासून लांब असणारे आम्ही (चि. अनुप्रित, कु. रेणु, सौ. सोनाली, चि. स्वरित आणि मी) तर त्यांचे अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही एवढा हा नियतीचा क्रुर डाव. यावर्षी आम्ही दिवाळीत काकांसोबत घालवलेला मुल्यवान वेळच त्यांचा व आमच्यातील अंतिम संवाद ठरला. 




मला भेटलेले काका........

आठवतात ते दिवस तिसरी-चौथीत असू आम्ही तेव्हा... बेगमपुरा(अचलपूर) येथे आत्याकडे जायचो आम्ही आई, मोठीआई व आजीसह तेव्हा देवडीवर आम्ही मुद्दाम काकांच्या दुकानाकडून मोर्चा वळवायचो. अन काकाही आम्हा लहानग्यांचा हट्ट पुरवत चॉकलेट दयायचे आम्हाला. आत्याकडे जाण्यापेक्षा काकांकडून चॉकलेट मिळविण्यात जास्त आनंद होत असे आम्हाला. काकांनीही आम्हाला कधीच निराष केले नाही, चॉकलेट देऊन आम्हाला खुश करण्याची त्यांची त-हा सदैव स्मरणात राहील आम्हा भावंडांना.


म्हणता म्हणता मोठा झालो. शिक्षणासाठी घरापासून लांब असल्याने जेव्हा-जेव्हा गावी यायचो तेव्हा काकांकडून हाली खुशाली घेण्याची त्यांची स्टाइल भारी आवडायची आपल्याला. सुटयांमध्येही घरी फारस राहायला मिळालच नाही त्यामुळे कमी कालावधीतील वेळेच्या सदुपयोगात काकांचा मोठा हातभार लागायचा तो म्हणजे, चला मग रितेश भाऊ आज  भजनालाया वाक्याने मग मी ही नकारघंटा न वाजवता निघायचो काकांसोबत. काकांना भजनाचा लडा  फार. घरातही भजन,अभंग,हरिपाठाच्या कॅसेटचा संग्रह, भजन-अभंगाची स्वतंत्र वही असा सर्व लवाजमा त्यांच्याकडे होता, कधी-मधी मलाही याचा लाभ मिळत असे. काकांचे हे भजनाचे वेड आदरणीय सुनिता काकुंनीही आपलेसे करून घेतले होते ही त्यात आणखी जमेची बाब.




काकांनी निरोप घेण्याआधी लाभलेला त्यांचा स्मरणीय सहवास....

तब्बल १० वर्षांनी मी किर्तन सादरीकरणाचा चंग मनाशी बांधला आणि यावर्षी (२०१७) आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरा शेजारील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात हे स्वप्न पूर्णत्वास आणताही आल. किर्तनाकरिता टाळकरी म्हणून काकांची समर्थ साथ ही या वर्षातील ठळक आठवण. किर्तनाचे  चित्रीकरण केले असल्याने  त्यात काका मला भेटतील आणि त्या स्वर्णीम आठवणीचा ठेवा ठरतील.




वैद्यकीय कारणास्तव मी जवळपास १ महिन्यासाठी गावी आलो होतो (याच वर्षी) या काळात काकांचा मोठा सहवास लाभला पण, तो सहवास शेवटचा ठरावा हे दुर्देवी. आमच्याकडे यावर्षी देवीचे घट बसले होते , घटाच्या आरतीसाठी काका नियमीत यायचे. घट विसर्जनासाठी काका सकाळीच उठले आम्ही तो घट विसर्जन करून आलो पण त्यांच्या आवडीची ही घट पुजाही शेवटचीच ठरावी हे दु:खद. याच काळात आम्ही कुळदैवत गनोजा देवी, अमरावतीची अंबादेवी आणि  पिंगळादेवी असे दर्शनाला गेलो यावेळी काका आणि काकुंचा सहवास अन धम्माल आम्हा उभयतांसह, आशिष दादा –मंजु वहिनी, उमेश व आदरणीय सुमन मोठे आई  आणि कु. निता यांच्यासाठी स्वर्णीम ठरली. या प्रवासातील गाण्यांच्या भेंडया व त्यातील काका-काकुंचा उत्स्फुर्त सहभाग ही स्मरणीयच.





आमच्या विलायतपु-यात यावेळी शारदोत्सवात ह.भ.प. अरबट बुवांच किर्तन होत. टाळकरी नसल्याने काका, गणेश राऊत, दिगंबर पाटील आणि मी असा आम्ही जोड बसवला व किर्तनात टाळकरी म्हणून साथ दिली. इथेच आम्ही काकडाआरती (प्रभात फेरी) करण्याचा संकल्प घेतला. व कार्तिक महिन्यातील ही काकडारतीची धुरा जवळपास १० ते १२ वर्षांनंतर काकांच्या उत्साही सहभागामुळे तळीस नेऊ शकलो. कर्मभूमिच्या हाकेमुळे मी तर हा डाव अर्ध्यावरच सोडून दिल्लीला निघून आलो. मात्र, आदरणीय अनिल मामा आणि काकांनी ही काकडारतीची धुरा समर्थपणे सांभाळली. याच काळात भोनखडे महाराजांकडून विठ्ठल मंदिराकडे येणा-या दिंडीतही काका सहभागी होत  मी ही काकांसोबत जायचो. याकाळातच माकनेरपंथी भजनात मी काकांसोबत गेलो होतो. पुढे दिवाळी निमित्त आम्हीसर्व काकांच्या दुकानात भेटलो तीच आमची  शेवटची कौटुंबिक भेट ठरली. काका-काकुंनी आमच्या स्वरित ला भेट दिलेला सुंदर असा ड्रेस आमच्या मुलालाही कायम आठवणीत राहणार.  






शेवटचा दिस गोड व्हावा...

           मनुष्याचा जन्म आणि मृत्यू कसा व कोठे होईल याचा अंदाज फास कमी असतो. ब-याच लोकांचा अंतिम क्षण हा अपघात, हॉस्पीटल किंवा अन्य असू शकतो मात्र, आपल्या आवडत्या कार्यातच आपला अंतिम श्वास घेतला जावा असा दुर्लभ योग क्वचित लोकांच्या वाटयाला येतो. नंदकिशोर काका याबाबतीत फार भाग्यवान ठरले. ज्यादिवशी त्यांनी अंतिम श्वास घेतला ते ठिकाण होते त्यांचे आवडते दत्त मंदिर आणि कार्यही होते पंचपथीचे भजन. त्यांनी यावेळी २ भजनेही सादर केली आणि आरतीसाठी उभे राहताच त्यांना त्रास झाला. आणि तेथून केवळ दीड तासात त्यांच निधन झाल. एका अर्थाने त्यांच्या आयुष्याचा तो क्षण म्हणजे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा या संत उक्ती प्रमाणेच ठरला.  





 आज जेव्हा सकाळी काकांच्या निधनाची वार्ता मनिष दादाने दिली तेव्हा यावर विश्वासच बसेना, मी आणि सोनाली अख्खा दिवस ही वार्ता पचवूच शकलो नाही. तिथे प्रत्यक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी आदरणीय सुनिता काकु, चि. सौरभ आणि आमच्या आदरणीय प्रतिभा काकु यांच्यासह भुयार कुटुंबियांची स्थिती वादळात सापडलेल्या नौके प्रमाणेच असेल. हा प्रसंग आपल्या हातचा नव्हता नियतीने मांडून ठेवलेला हा डाव समर्थपणे स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे काही नाही. या प्रसंगात सर्वांना बाहेर पडण्याची शक्ती मिळो ही निसर्गशक्तीकडे प्रार्थना.  

                                                                 आदरणीय काकांस भावपूर्ण श्रध्दांजली 
                                                      



 

Monday, November 6, 2017

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या महाकुंभात महाराष्ट्राची झळाळी : एक अनुपम्य अनुभव




                                                                                                    सोमवार, ०६ नोव्हेंबर, २०१७ 

देशाच्या राजधानीत केंद्र शासनाच्या महत्वांच्या आयोजनांना उपस्थित राहून महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीविषयी वार्तांकन सतत करीत असतो. वर्ष २०१७ चा समारोप होत असताना अशाच मोठ्या आयोजनाला हजेरी लावण्याचा व त्यात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीबाबत वार्तांकनाचा महत्त्वपूर्ण अनुभव. आयोजन होते अन्न प्रक्रिया उद्योगाविषयीचा देशातील सर्वात मोठा मेळा अर्थात “वर्ल्ड फुड इंडिया २०१७”.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या वतीने देशात प्रथमच अशा प्रकारचे भव्य आयोजन करण्यात आले. ६० देश आणि देश-विदेशातील २ हजार कंपन्या यात सहभागी झाल्या. ऐतिहासिक इंडिया गेट आणि विज्ञान भवनात हे आयोजन करण्यात आल्याने आयोजनास विशेष महत्व प्राप्त झाले. देशातील प्रत्येक राज्यांनाही आपापल्या राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक आकर्षित करण्याची नामी संधी या आयोजनामुळे चालून आली. ही महत्त्वाची घटना लक्षात घेता महाराष्ट्र शासनानेही या आयोजनात राज्याचे ‘अन्न प्रक्रिया धोरण २०१७’ जाहीर करून राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांबाबत देश व जगाला संदेश दिला.

३ ते ५ नोव्हेंबर पर्यंत चाललेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. महाराष्ट्राच्यावतीने कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर तिनही दिवस या कार्यक्रमात उपस्थित होते. श्री.फुंडकर आणि पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी याठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दालनात देश–विदेशातील कंपन्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. महाराष्ट्र सदनात राज्यातील उद्योजकांना केलेल्या संबोधनात श्री.फुंडकर यांनी राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय राज्यातून सहभागी झालेल्या उद्योजकांनीही या महाकुंभाचा भरपूर लाभ घेतला.

या आयोजनाच्या दुसऱ्‍या दिवशी राज्याचे ‘अन्न प्रक्रिया उद्योग धोरण २०१७’ जाहीर करणे ही महत्त्वपूर्ण घटना ठरली, याचे कौतुक दस्तुरखुद्द केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी या आयोजनाच्या समारोपीय कार्यक्रमात देश विदेशातील उद्योजकांसमोर केले. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले ‘अन्न प्रकिया धोरण २०१७’ जाहीर केले. राज्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणे, या उद्योगात शेतकऱ्‍यांचा सहभाग वाढवून येत्या ५ वर्षात शेतकऱ्‍यांचे उत्पन्न वाढविणे, या क्षेत्रात जवळपास ५ लाख कौशल्याधारीत मनुष्यबळ निर्माण करणे, सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे आदी महत्त्वाचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.

२०१०-११ मध्ये देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नोंदणीत तिसऱ्‍या क्रमांकावर होता. तसेच, १९९१ ते मार्च २०१२ पर्यंत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १,०३९ कोटींची परकीय गुंतवणूक झाली. या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने फुड पार्क, वाईन पार्क, फ्लोरीकल्चर पार्क उभारण्यात आले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी राज्याने विविध परवान्यांचे सुलभीकरण केले आहे तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात उद्योगासाठी असलेल्या गुंतवणूकपूरक वातावरणाची माहिती स्वत: मंत्र्यांनी देऊन उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आवाहन केल्याचा परिणाम या महाकुंभात दिसून आला.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत वर्ल्ड फुड इंडिया-२०१७ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार झाले. याअंतर्गत 65 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात होणार आहे. विशेष म्हणजे कोकाकोला, पेपस्किो, ऍमेझोन, ब्रिटानिया आणि पतंजली या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार उद्योग क्षेत्रात भारताने १३० व्या स्थानाहून १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच झाली असल्याचे विवरण आहे. या सर्व बाबी महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत महत्वाच्या व अभिमानास्पद आहेत.

‘वर्ल्ड फुड इंडिया’ मधील महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील गुंतवणुकदारांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन राज्याच्या मंत्री महोदयांसोबत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीबाबत चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाली. सिल्ड एअर आणि रिचग्रॅवीस या अमेरिकन कंपन्या, स्पेनमधील काँगल्डस नवारा याशिवाय ओएसआय विस्टा ग्रुप, युम ब्रांड, शरफ ग्रुप या विदेशी कंपन्यांच्या. तसेच, भारतातील ट्रांस इंजिनीअर इंडिया प्रा. लि. च्या कृषी विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सितिकांथा चौधरी, कारगील इंडिया कंपनीचे अध्यक्ष सिराज चौधरी, श्रीनी फुड पार्क प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील कुमार श्रीवास्तव, एल.एल. लॉजिस्टीक प्रा.ली. च्या कृषी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल आणि एजीटी फुड इंडिया प्रा. लि. च्या वरिष्ठ अधिका-यांनीही मंत्रिमहोदयांशी राज्यात उद्योग उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

‘महाराष्ट्र दालनात’ राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योजकांनी सहभाग घेतला. या प्रदर्शानामुळे त्यांना खूप लाभ झाल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या.

राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका कार्यक्रमांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्‍या ‘उमेद’ प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ४ वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सिमा पाटील या प्रकल्पाशी जुळल्या. गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग रोस्टकरून त्या बाजारात विकतात. ‘उमेद’ प्रकल्प सुरु झाला तेव्हा १० महिला या कार्यक्रमाशी जुळल्या होत्या आता हा आकडा १ हजाराच्याही पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. वर्ल्ड फुड इंडियातील महाराष्ट्र दालनात त्यांना स्टॉल लावण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने झाल्याचे समाधानच त्या व्यक्त करतात. या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली व आमच्या उद्योगाबाबत विचारणा केली. आमच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.आम्ही याठिकाणी रोस्टेड गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले असून आमचा बराच माल विकला गेला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत जागतिक प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आपला उद्योग कुठे आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने आणखी पुढे घेऊन जाऊ शकणार याबाबतचा दृष्टीकोन तयार झाला असून माझ्यासाठी हा अनुभव खूप महत्वाचा असल्याच्या भावना बोलक्या होत्या.

केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ‘वर्धा मेगा फुड पार्क’ हा शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देणारा वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील शिंदी-विहीरी गावातील स्टॉलही या ठिकाणी होता. माहिती देताना फुड पार्कचे आशिष अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्र दालनातील आमच्या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली हा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला. फुड पार्कविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, शिंदी-विहीरी या वर्धा जिल्ह्यातील दुर्गम भागात आम्ही वर्ष २०१२-१३ पासून शेतकऱ्‍यांच्या शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देत आहोत. या प्रकल्पासोबत परिसरातील जवळपास १ हजार शेतकरी आणि शेतमाल उत्पादित करणाऱ्‍या १२ कंपन्या जुळल्या आहेत. या प्रकल्पात ३०० कामगार आणि ५० कर्मचारी कार्यरत असून हे सर्व स्थानिक आहेत म्हणजेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी या प्रकल्पाचा लाभ घेत असून मोठ्या प्रमाणात शेतमाल परदेशात पाठविण्यात येतो. आतापर्यंत जवळपास अडीच हजार शेतकऱ्‍यांनी या प्रकल्पाचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीचे विठ्ठल चव्हाण यांनी २ महिन्याआधीच घाण्याच्या तेलाचा उद्योग सुरु केला आहे. वर्ल्ड फुड इंडिया या जागतिक प्रदर्शनाला भेट देऊन येथून नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी ते खास दिल्लीत आले. महाराष्ट्र दालनातील भेटीत आपल्याला खूप नवनवीन गोष्टी समजल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या दालनात उद्योजक व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांशी चर्चा करून आपल्या उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचा आपणास भविष्यात खूप फायदा होणार असल्याच्या श्री.चव्हाण यांच्या भावना सूचक व प्रेरक होत्या.

महाराष्ट्र दालनामध्ये राज्य शासनाची व खाजगी अन्न प्रक्रिया उद्योजकांची एकूण 21 दालने उभारण्यात आली. खाद्य प्रक्रिया, जास्तकाळ टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आले. या दालनाचे सुरेख व सुंदर असे संकल्पनाचित्र तसेच आतील सजावटही जे.जे स्कुल ऑफ ऑर्ट या नामांकित संस्थेच्या चमुने केली.

‘वर्ल्ड फुड इंडिया’ प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंवतवणूकदार, तज्ञ सहभागी झाले. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने केलेले हे भव्य आयोजन आणि त्यात महाराष्ट्र शासनाचा दमदार सहभाग हा अनुभव अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.

- रितेश मोतीरामजी भुयार, 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.