Tuesday, August 30, 2016

महाराष्ट्राच्या देशभक्तीपर कार्यक्रमाने “भारत पर्व” चा समारोप ; 40 हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांची महाराष्ट्र दालनास भेट





नवी दिल्ली, 18 : महाराष्ट्राच्या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने भारत पर्वप्रदर्शनाचा आज समारोप झाला. प्रदर्शन काळात महाराष्ट्र दालनास जवळपास 4० हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांनी भेट दिली.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने 70 व्या स्वतंत्र दिनानिमित्त राजपथ लॉनवर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधित भारत पर्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज सुभाष नकाशे यांच्या दिग्दर्शनाखालील राज्यातील 300 कलाकारांचा सहभाग असणा-या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी  केंद्रीय नगर विकास, माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, पर्यटन सांस्कृतिक मंत्री  डॉ. महेश शर्मा, माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
            विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची तीन दालने या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनाला उदंड प्रतिसाद मिळाला . या ठिकाणी  ‘मेकइन महाराष्ट्राच्या माध्यमातून  राज्यात झालेली गुंतवणूक  विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात ले.  महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवी दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान  हे आकर्षक पॅनलच्या माध्यमांतून येथे भेट देणा-यांपर्यंत पोहचविण्या आले. ‘व्हर्च्यअल टुरीजमच्या माध्यमातून  शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर घडविण्यात आली. अन्य एका एलइडीवर फेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद येथे येणा-या प्रेक्षकांनी घेतला. या दालनास भेट देणा-या शाळकरी , महाविद्यालयीन मुलांनी पझल गेमच्या माध्यमातून लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र जोडून या महापुरुषांविषयी जाणून घेतले. ‘ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळाला.
                 राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले. यात राज्यातील ७ लघु उद्योजकांनी  सहभाग घेतला. पैठणी साडया, वारली पेटींग, लाखाच्या बांगडया, कोल्हापूरी चपला, हुपरी ज्वेलरी, आयुर्वेदिक साबण , पॅच वर्क, सतार आदी वस्तुंचे स्टॉल येथे लावण्यात आले. प्रदर्शनासोबतच या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या, मोठया प्रमाणा वस्तूंची विक्री झाल्याले लघु उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. 
खाद्य दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणा-या प्रेक्षकांना चाखता आली. पुरण पोळी, साबुदाना खिचडी, साबुदाना वडा, पीठल भाकरी, भरली वांगी, वडा पाव, मिसळ पाव आदी मराठमोडया व्यंजनांचा खवय्ये ग्राहकांनी मनमुराद आनंद घेतला.  
                     महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला उदंड प्रतिसाद
डिजीटल दालनात महाराष्ट्र अहेड व लोकराज्य या महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्राचा स्टॉल लावण्यात आला. केंद्रीय पर्यटन   सांस्कृतिक मंत्री  डॉ. महेश शर्मा आणि संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे  यांनी  या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला. प्रदर्शन काळात विविध क्षेत्रात कार्यरत अधिकारी, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या तरूणांचा या स्टॉल ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्टॉल वर भेट देणा-यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला.
००००००००००

भारत पर्व : देश-विदेशातील तरुणांना ‘व्हिजीट महाराष्ट्र’ चे आकर्षण




नवी दिल्ली, 17:  महाराष्ट्र दालनास भेट  दिल्यावर देश-विदेशातील तरुणांनी राज्यातील पर्यटन स्थळांना  भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या निमित्ताने राज्य शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र-2017 ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.   
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पारशी नववर्ष दिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनात बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा पाचवा दिवस असून इथे भेट देणा-या देश–विदेशातील तरुणांनी  महाराष्ट्र दालनात एकच गर्दी केली. इथे डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबाबत, पर्यटन स्थळांबाबत आणि राज्यातील महापुरुषांचे  स्वातंत्र्य चळवळ व देश विकासातील योगदानाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे. आणि हे दालन तंत्रज्ञान युगात वावरणा-या  देश विदेशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरत आहे.
अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स सध्या भारत भेटीवर असून आज त्यांनी भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास भेट दिली. दालनाबद्दल सांगताना सॅम सांगतो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचा प्रयोग करुन दर्शविण्यात आलेला महाराष्ट्र मला खूप आवडला. एलइडी वॉल वर दिसणारा ताडोबा जंगलातील वाघ आणि त्याच्या सोबत सेल्फी घेण्याचा अनुभव फारच छान  होता.  तर ॲलेक्स सांगतो, इथे ठेवण्यात आलेला पझल गेम मी खेळलो आणि लोकमान्य टिळक या महापुरुषाचे चित्र यशस्वीरित्या तयार केले. पुणेरी पगडी आणि फेटा परिधान केला. येथील विविध स्क्रीनवर दर्शविण्यात आलेली महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयची माहिती अप्रतिम आहे. ॲलेक्स आणि सॅम यांनी या दालनात महाराष्ट्रा विषयी उत्तम माहिती मिळाल्याचे सांगून आम्ही लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे सांगितले. या दोघांना महाराष्ट्रातील प्रसिध्द लोणावळा चिक्की आणि व्हिजीट महाराष्ट्र ची कॅप भेट स्वरुपात देण्यात आली.  
दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चमुने महाराष्ट्र दालनास भेट दिली. त्यांना हे दालन फार आवडले. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला निरज कुमार भारत सांगतो, व्हर्च्यअल टुरीच्या माध्यमातून  शिर्डी  येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर ा दालनात करायला मिळाली. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या सामाजिक सुधारणेतील योगदान तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदानबद्दल उपयुक्त माहिती मिळाल्याचे तो सांगतो. याआधी आपण वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला भेट दिली असून महाराष्ट्र दालनातील प्रदर्शनामुळे मी प्रभावित झालो आहे व लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली  प्रतिभा सेठ सांगते, एलइडीवरफेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता आला. विशेष म्हणजे, याची छायाचित्रे ब्लूटूथ वायफायच्या माध्यमातून मला व माझ्या मैत्रिणींना मोबाईलमध्ये घेण्याची  इथे सोय करून देण्यात आली त्यामुळे आंनदात आणखी भर पडली. ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभवही मजेशीर होता असे तीने सांगितले.आम्हा सर्व मैत्रिणींना महाराष्ट्र दालनातील प्रदर्शन खूप आवडले असून आम्ही सर्व महाराष्ट्राला लवकरच भेट देणार असल्याचे तीने सांगितले. 

यावर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाजत्रा प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीट महाराष्ट्र-2017 ची घोषणा केली. आणि राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी महाराष्ट्रास भेट द्या अशा शब्दात दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना  खुले निमंत्रण दिले होते. त्यास भारत पर्व मधे  देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

Friday, August 19, 2016

भारत पर्वची अपेक्षित संकल्पना महाराष्ट्र दालनात- डॉ.सुभाष भामरे














नवी दिल्ली : महाराष्ट्रातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती तसेच राज्याने विविध क्षेत्रात केलेला विकास महाराष्ट्र दालनात मांडण्यात आला आहे. भारत पर्वची अपेक्षित संकल्पनाच येथे प्रत्यक्ष बघायला मिळाली, अशी भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.

डॉ.भामरे यांनी ‘भारत पर्व’ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दिल्लीतील प्रतिनिधी सुनिल कुगिंरी यांनी डॉ. भामरे यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने येथील राजपथ लॉनवर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणारे आणि देश विकासात राज्याचे योगदान दर्शविणाऱ्या डिजीटल दालनास डॉ. भामरे यांनी भेट दिली. याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे गौरोद्‌गार त्यांनी काढले. तसेच राज्यातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती आकर्षक पद्धतीने येथे मांडण्यात आली आहे. यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनतेला महाराष्ट्रातील थोर पुरुषांची माहिती मिळते. देशातील विविध राज्यांचा गौरवपूर्ण इतिहास व महापुरुषांचे योगदान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश भारत पर्व या प्रदर्शनाचा असून महाराष्ट्र दालनात ही संकल्पना प्रत्यक्षात मांडण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.

येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील हस्तकला दालनासही डॉ.भामरे यांनी भेट दिली. राज्यातील लघु उद्योजकांच्या पैठणी साड्या, वारली पेटींग, लाखेच्या बांगड्या, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे प्रदर्शनास व विक्रीस मांडण्यात आल्या आहेत. डॉ. भामरे यांनी या दालनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन लघु उद्योजकांशी संवाद साधला व त्यांची आस्थेने चौकशी केली.
महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाचे कौतुक

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी महाराष्ट्र दालनातील महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. भामरे यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक भेट स्वरूपात दिले. डॉ.भामरे यांनी यावेळी महाराष्ट्र फूड स्टॉलला भेट देऊन मिसळ-पावचा आस्वाद घेतला.
                                                                                                                  बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६




भारत पर्व : महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री







                                                                                                              मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

नवी दिल्ली :
 ‘भारत पर्व’मध्ये महाराष्ट्राच्या लघु उद्योजकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती, हस्तकला दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपल्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या आहेत. महाराष्ट्र दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून लघु उद्योजकांच्या हस्तकलेचे प्रदर्शन व विक्री येथे सुरु आहे. राज्यातील लघु उद्योजकांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उद्योजकांच्या वस्तूचीं मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याबद्दल ते समाधान व्यक्त करीत आहेत. प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनात गर्दी केली आहे.

पैठणीसह अन्य साड्या येथे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. याविषयी राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे हस्तकलाकार जितेंद्र परदेशी सांगतात, पैठणीसह महाराष्ट्रातील साड्यांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून या प्रदर्शनामध्ये राज्य शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाने आम्हाला सहभागाची संधी दिली आहे. महाराष्ट्र दालनास भेट देणाऱ्या महिलांची पुणेरी कॉटन साडीला विशेष मागणी आहे. साडीची रंगसंगती, रचना उत्तम असल्याने आणि ही साडी परिधान करण्यास खूपच सोयीची असल्याने ही साडी महिलांना पसंत पडत आहे. दिल्लीतील प्रदर्शनात सहभागी होताना आम्ही येथील बाजारपेठेचे आणि महिलांच्या आवडी-निवडीचा आधी अभ्यास करून सज्जतेने या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

सोलापूरचे लघु उद्योजक राजेंद्र अंकम गेल्या 36 वर्षांपासून विणकर क्षेत्रात आहेत. महाराष्ट्र दालनात त्यांनी वॉल हॅकिंगच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीस ठेवल्या आहेत. कटवर्क, बॅग, पोट्रेट, सुतापासून तयार केलेली विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींची तयार केलेली व्यक्तीचित्रे येथे आहेत. श्री.अंकम महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाशी गेल्या सात वर्षांपासून जुळले असून प्रगती मैदान, दिल्ली हाटनंतर आता राजपथवर आपल्या वस्तूंची प्रदर्शन व विक्री करत आहेत. याठिकाणी आपल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाल्याबद्दल ते समाधानी आहेत.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे महमद इकबाल लखेरा आणि अफझल जावेद लखेरा यांचा लाखेच्या बांगड्यांचा व्यवसाय आहे. त्यांनीही महाराष्ट्र दालनात वैविध्यपूर्ण बांगड्या प्रदर्शन व विक्रीसाठी महाराष्ट्र दालनात ठेवल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. घरातील महिलाही या व्यवसायात मदत करीत असल्याचे ते सांगतात. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडाळाशी ते मागील वर्षी जुळले आहेत. पहिल्यांदाच ते दिल्लीतील प्रदर्शनात भाग घेत आहेत. त्यांना येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत असल्यामुळे ते आनंद व्यक्त करत आहेत. या प्रदर्शनाच्या उर्वरित दिवसात मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रगती मैदान आणि दिल्ली हाट येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बानगे येथील लघु उद्योजक राजेंद्र शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणांचा स्टॉल येथे आहे. गणतंत्र दिवसाचे पथसंचलन ज्या राजपथावर होते आणि प्रत्येक भारतीयांचे मन स्वाभिमानाने भरुन येते. तेथे कोल्हापुरी चप्पल विक्री व प्रदर्शन करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणतात. कोल्हापुरी चप्पलला प्रचंड मागणी असून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट व दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून कोल्हापुरी चप्पलची माहिती ग्राहकांना मिळाली असल्याचे ते सांगतात. याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे येथील त्यांचे गुरु आनंदा रावण त्यांच्यासोबत आहेत.

पालघर जिल्ह्याच्या मोखाळा तालुक्यातील वासाळा येथील लघु उद्योजक विठ्ठल डगळ यांच्या वारली पेंटिंगचा स्टॉल येथे बघायला मिळतो. गेल्या चार वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाशी गेल्या दोन वर्षांपासून ते जोडले गेले आहेत. याआधी दिल्ली हाट येथे त्यांनी प्रदर्शनात भाग घेतला व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. राजपथावरील ‘भारत पर्व’ या प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. डगळ सांगतात.

महाराष्ट्राच्या हस्तकलेला पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद






                                                                                                                   सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

नवी दिल्ली :
 ‘भारत पर्व’ मध्ये महाराष्ट्र दालनास पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात महाराष्ट्राच्या दालनास 15 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटीग, पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या आदी महाराष्ट्रातील हस्तकलांना दिल्लीत येणारे पर्यटक व दिल्लीकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्‍या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिल्लीकर आणि दिल्लीस येणाऱ्‍या पर्यटकांची मोठी गर्दी ‘भारत पर्व’ प्रदर्शनास बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस असून प्रदर्शनास भेट देणाऱ्‍यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास गर्दी केली. इथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील लघुउद्योजक व हस्तकलाकारांच्या कामांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या, वारली पेंटीग आणि कोल्हापुरी चप्पल स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे चित्र होते.

केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्ह्याच्या दूरस्थ शिक्षण समन्वयक डॉ.रेणू सांगतात, त्यांना पुणेरी पॅटर्नची कॉटन साडी फार आवडली. त्या सध्या दिल्लीत फिरायला आल्या असून भारत पर्व प्रदर्शनीत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास भेट दिली. या दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पैठणीसह राज्यातील साड्यांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. डॉ.रेणु सांगतात, ‘पुणेरी पॅटर्न कॉटन साडीची रंग संगती आणि रचना उत्तम असल्याने ही साडी आवडली म्हणूनच मी ही साडी खरेदी केली. महाराष्ट्राच्या साड्यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत असून महाराष्ट्र दालनात प्रत्यक्ष खरेदीची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील आर.के.पुरम भागातील रहिवाशी लता पाराशर यांनी मोठ्या प्रमाणात लाखेच्या बांगड्या खरेदी केल्या. त्यांच्या सोबत त्यांच्या अन्य तीन मैत्रिणींनीही बांगड्या घेतल्या. श्रीमती पाराशर म्हणाल्या, लाखाच्या बांगड्यांची गुणवत्ता भावली. उत्तम रंग, कलाकुसर आणि परवडणारी किंमत यामुळे या बांगड्या आम्ही सर्व मैत्रिनींनी विकत घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठीही या बांगड्यांची विशेष खरेदी करुन घेतली. भारत पर्वच्या निमित्ताने विविध राज्यांच्या कलावस्तु खरेदी करायला मिळत आहे त्यात महाराष्ट्रातील हस्तकला आम्हाला विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील उत्तमनगर येथे राहणारे अमरप्रकाश जोशी यांनी कोल्हापूरी चप्पल खेरदी केली. हिंदी चित्रपटामधून मला कोल्हापूरी चप्पलची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पलबाबत माझ्या वाचनातही आले होते. आज महाराष्ट्र दालनात कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद असल्याचे ओमप्रकाश सांगतात.