Saturday, April 2, 2016

औद्योगिक महाराष्ट्राची जागतिक स्तरावर दखल : राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत राजधानीत महत्वाचे निर्णय


             
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडीया सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाच्या माध्यमातून मेक इन महाराष्ट्र संकल्पनेतून मिळवीलेल्या यशाने राज्याला जागतिक स्तरावर लौकीक प्राप्त झाला आहे. राज्यात विविध देशातील गुंतवणूक आकर्षित होत आहे. याचाच परिपाक म्हणून रशियातील स्वर्द लोस्क प्रांताचे गव्हर्नर येवगेनी कुयाशेव यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची राजधानीत भेट घेतली. उभय प्रातांमधे सहकार्याबाबत  बैठकीत चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना रशिया आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण  दिले.
 याशिवाय राज्यातील मंत्र्यांनी राजधानीत विविध मंत्रालयांकडे योजनांचा पाठपुरावा केला व महत्वांच्या बैठकांना उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत महाराष्ट्राचा महत्वपूर्ण सहभाग नोंदवला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे व सर्व साधारण अर्थ संकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते व बंदर विकासासाठी महत्वाच्या घोषणा झाल्या.राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबत बैठक झाली.  जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित महिला लोकप्रतिनिधींच्या परिषदेत राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रभावी भाषण आणि राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील चार महिलांचा नारी पुरस्काराने सन्मानाने राजधानीत वेगळी छाप सोडली.   




   रशियातील व्यापार मेळाव्यासाठी  मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण
रशियाच्या स्वर्द लोस्क प्रांताचे गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांच्या नेतृत्वाखालील 10 सदस्यीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र सदनात  मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन इनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण  दिले. दिनांक 11 ते 14 जुलै 2016  दरम्यान रशियातील एकातेरेनबर्ग येथे हा व्यापार मेळावा  आयोजित करण्यात येणार आहे. भारत या व्यापार मेळाव्याचा सहयोगी देश आहे. यावेळी उभय नेत्यांनी  महाराष्ट्र आणि स्वर्द लोस्क प्रांता दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य  करण्याबाबत  चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांना वारली  पेंटींग आणि नाशिक येथे पारपडलेल्या कुंभ मेळयाचे कॉफी टेबल बुक भेट स्वरूपात दिले. आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्यावतीने आयोजित जागतिक सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहभाग घेतला.    
          देशासह महाराष्ट्रातील रस्ते व बंदरे विकासाचा मार्ग मोकळा                                                                            
देशासह महाराष्ट्रातील रस्ते व बंदरे विकासाला गती येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्पात रस्ते व बंदरे विकासासाठी करण्यात आलेल्या भरघोस तरतुदींच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्रालयात आयोजित  पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होण्याच्या कामाला गती येणार. डहाणू बंदराचा  विकास आणि राज्य परिवहन महामंडळाची स्थिती सुधारण्याच्या कामातही प्रगती होणार आहे.  
                        लोकसभेत वर्ष २०१६-१७ साठी सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी  मंत्रालयासाठी १ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून आजपर्यंत संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील ही ऐतिहासिक तरतूद असल्याचे गडकरी म्हणाले. देशातील ५० हजार किलो मिटर राष्ट्रीय महामार्गास  अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. महाराष्ट्रातील  3 हजार 839 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास याआधीच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीमुळे राज्यातील आदिवासी भाग व धार्मिक पर्यटन स्थळांच्या विकासास चालना मिळेल. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील राज्य महामार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे.  
            भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या देशातील नद्यांमधून आणि बंदरातून होणारी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी १६०० कोटींची तरतूद असून महाराष्ट्रातील डहाणू बंदराचा विकास करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मंत्रालयाच्यावतीने आखण्यात आलेल्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधे बंदरे व नद्यांद्वारे होणा-या वाहतूकव्यवस्थेचा विकास करण्यात येणार आहे.देशातील विविध राज्य परिवहन मंडळांची स्थिती सुधारण्यासाठी आपले  मंत्रालय पुढाकार घेणार असून त्यासाठी संबंधित राज्य सरकारांची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले. राज्य परिवहन मंडळांच्या बसेस ने प्रवास करणा-यांची संख्या ७ कोटी असून ही संख्या १५ कोटींवर नेण्याचे आपल्या मंत्रालयाचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. यासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांना स्वस्तदरात सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 
                रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी महत्वाच्या घोषणा   
अपघात टाळण्यासाठी मुंबई उपनगरी रेल्वेच्या प्लॅट फॉर्मची उंची वाढविणे, राज्यातील बंदरांना रेल्वेने जोडणे, नाशिक व नांदेड रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करणे आदी महाराष्ट्रासाठी महत्वाच्या घोषणा  रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी लोकसभेत वर्ष २०१६-१७ साठी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केल्या.
त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान उन्नत मार्गाची घोषणा केली. हा मार्ग छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. हा कॉरीडॉर शहारातील मेट्रो मार्गांशी जोडण्यात येणार आहे. मुंबईतील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद शहरांदरम्यानच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या कामास सुरुवात झाल्याचे प्रभूंनी सांगितले . जपान सरकारच्या मदतीने हायस्पीड कॉरीडॉर उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याच सोबत रत्नागिरी जिल्हयातील जयगड बंदर आणि रायगड जिल्हयातील दिघी व रेवास बंदर रेल्वेशी जोडण्याच्या कामाला गती आली असल्याचे त्यांनी  सांगितले.  नाशिक आणि नांदेड रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.  देशातील व्याघ्र प्रकल्पांना रेल्वेशी जोडण्याची योजना असून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सिमांदरम्यान असलेल्या पेंच प्रकल्पांचा यात समावेश आहे.                                        
    सेतु भारतम्‍अंतर्गत महाराष्ट्रातील १२  मार्गांवर पुल बांधण्यात येणार                                           
सुरक्षित रस्त्यांच्यादृष्टीने भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीने आखण्यात आलेल्या सेतु भारतम्‍ योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. महाराष्ट्रातील १२ मार्गांसह देशातील २०८ मार्गांवर पुल  बांधण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे . या योजनेसाठी ५० हजार ८०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे.देशातील रस्ते मार्गावरील पुलांचे स्थानांतरण, रूंदीकरण व दुरुस्ती करण्यासाठी १५०० कामे हाती घेण्यात आली आहेत. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून  २०१९ पर्यंत देशातील रस्ते मार्ग व रेल्वे मार्गांवर मोठया प्रमाणात पुल उभारणी करून सामान्य जनतेला सुरक्षितता प्रदान करण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे.   
                                      महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षित होणार
 सेतु भारतम्‍ या महत्वाकांक्षी कार्यक्रमात  महाराष्ट्रातील १२  मार्गांवर पुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हयाच्या कळमेश्वर भागातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत.  राज्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात उत्तम व सुरक्षित रस्त्यांची सोय करण्यासाठी या कार्यक्रमात  भर  देण्यात आला आहे. यानुसार  गडचिरोली जिल्हयाच्या मुल भागातील कारंजी-वणी-चंद्रपूर-मुल- या जिल्हयाची सीमा असणा-या सावळी मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत. याच जिल्हयाच्या वडसा भागातील साकोली- लाखंदूर- वडसा-गडचिरोली- चामोर्शी-आष्टी-सिरोंचा मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत. विदर्भाच्या नागपूर विभागातील उमरेड व भिवापूर  आणि चंद्रपूर जिल्हयाच्या नागभीड व ब्रम्हपुरी भागातील चार मार्गांवर पुल बांधण्यासाठी नागपूर-उमरेड-भीवापूर-नागभीड-ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग निश्चित करण्यात आला आहे . विदर्भाच्या अमरावती विभागातील  वाशिम जिल्हयातील मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत.  यात अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड- देगलूर आणि आंध्र प्रदेशच्या सिमेवरील मार्गावरील पुलांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे व कर्नाटक राज्याला जोडणा-या सोलापूर जिल्हयातही महत्वाच्या मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत. यात सांगोला भागातील रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या मार्गावर  तसेच  दुधनी भागातील सोलापूर-अक्कलकोट-दुधनी-चौदापूर-गानगापूर-गुलबर्गा आणि महत्वाच्या सोलापूर –विजापूर मार्गावर पुल बांधण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्याच्या कोकण भागातील रस्ते मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर पुल बांधण्याचे प्रस्तावीत आहे .  
                             राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती येणार  
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या’( पीएमकेवायएस) अंमलबजावणीकामी सूचना देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची केंद्रीय जलसंपदा मंत्रालयात पहिली बैठक झाली . छत्तीसगडचे जलसंपदा मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. समीतीचे सदस्य तेलंगनाचे जलसंपदा मंत्री टी. हरीश राव आणि केंद्रीय जलसंपदा विभागाचे विशेष सचिव डॉ. अमरजित सिंह उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत राज्यांच्या मदतीने देशभर ४६ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वर्ष २०१७ पर्यंत यातील २३ प्रकल्प पूर्ण करण्याचे तर उर्वरीत प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या प्रकल्पांमधे महाराष्ट्रातील ७ प्रकल्पांचा समावेश असून वेगवर्धीत सिंचन प्रकल्प व पीएमकेवायएस योजनेतून हे प्रकल्प पूर्ण करण्याकरिता ७२१०.६२ कोटी रूपये खर्च  अपेक्षित आहे. 
                             या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ७ सिंचन प्रकल्प पूर्ण होणार
            जळगांव जिल्हयातील वाघूर नदीवरील वाघूर सिंचन प्रकल्प या योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे.  विदंर्भ सिंचन विकास महामंडळा अंतर्गत येणा-या भंडारा जिल्हयातील बावनथडी नदीवरील बावनथडी सिंचन प्रकल्पांचा विकास या योजने अंतर्गत होणार आहे. वर्धा जिल्हयातील वर्धा नदीवरील लोवर वर्धा सिंचन प्रकल्प, परभणी व जालना जिल्हयातील शेतीसाठी उपयुक्त ठरणा-या दुधना नदीवरील लोवर दुधना सिचंन प्रकल्प, कोल्हापूर जिल्हयातील चांदगड येथील तिल्लारी नदीवरील तिल्लारी प्रकल्प, धुळे जिल्हयातील पांझरा नदीवरील लोवर पांझरा प्रकल्प, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे जिल्हयांसाठी उपयुक्त ठरणा-या गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर -२ या प्रकल्पांचा समावेश आहे. 
महाराष्ट्रातील ४ महिलांना नारी शक्ती पुरस्कार 
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महाराष्ट्रातील प्रिती पाटकर, ज्योती म्हापसेकर, सिस्टर ल्युकी कुरीयन आणि शकुंतला मुजुमदार या महिलांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१५ च्या नारी शक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे राष्ट्रपती भवनात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातील १५ महिला व ५ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            भारत समुद्र परिषदेच्या माध्यम मोहिमेचा गडकरींच्या हस्ते आरंभ
 केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्यावतीने दिनांक १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान मुंबईच्या गोरेगाव भागातील बॉम्बे कव्हेंशन अँड ऐक्सिबीशन सेंटर मधे आयोजित करण्यात येणा-या भारत समुद्र परिषद २०१६ च्या माध्यम मोहिमेचे  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ मार्च ला दिल्लीत उदघाटन झाले .
महिनाभर चालणा-या माध्यम मोहिमेच्या माध्यमातून देश आणि विदेशात प्रिंट, इलेक्ट्रॉनीक आणि आऊट डोअर पब्लिसीटीच्यामाध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यात येणार आहे. भारतीय समुद्र क्षेत्रात असलेल्या गुंतवणूक क्षमतेकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. समुद्र क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती येणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. रिपब्लिक ऑफ कोरिया या परिषदेचा सहभागी देश असणार आहे.                                            
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन भाषा तज्ज्ञांचा सन्मान
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पं.श्रीकृष्णशास्त्री काशीनाथशास्त्री जोशी (कोडणीकर), डॉ. प्रसाद प्रकाश जोशी आणि डॉ. धम्मदीप पंढरी या तीन भाषा तज्ज्ञांना राष्ट्रपती  भवनात आयोजित कार्यक्रमात भाषा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                                            
                                 राज्यात इंधन स्वस्त होणार                                                                                                
महाराष्ट्रात पेट्रोल ९५ पैस्यांनी तर डिझेल ६६ पैस्यांनी स्वस्त होणार आहे. तसेच घरगुती वापराच्या गॅसवरही सुट मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि  ग्राहक संरक्षणमंत्री गिरीष बापट यांनी दिली. तेल कंपन्यांनी राज्यात इंधनावर लावलेला अतिरीक्त अधिभार कमी करण्याच्या राज्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी  श्री. बापट यांनी  केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु राज्य मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. श्री. प्रधान यांनी राज्याच्या प्रस्तावास मान्यता दिली.

रॉकेलवरील अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
घरगुती इंधनावर मिळणा-या अनुदानाप्रमाणे महाराष्ट्रात लवकरच रॉकेलवर देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची  माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी  केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु  मंत्रालयाच्यावतीने  आयोजित रॉकेलसाठी थेट लाभ हस्तांतरणपरिषदेत बोलताना दिली.
श्री बापट म्हणाले, ही योजना राज्यातील अमरावती, लातूर, नांदेड, नंदूरबार, गोंदिया, भंडारा या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार बाजार भावाप्रमाणे  रॉकेल खरेदी केल्यावर रॉकेलवर देण्यात आलेले अनुदान आणि बाजारभावामधला फरक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. राज्यातील जवळपास अडीच कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
                            पुणे विमानतळ विस्तारीकरण अंतिम टप्प्यात
पुणे रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असून पुणे विमानतळ विस्तारीकरणाची प्रकिया अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी श्री. गिरीष बापट यांना दिली.
            पुणे रिंग रोडबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून रिंग रोडचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले असल्याचश्री गडकरी यांनी या बैठकीत सांगितले. पुण्याच्या लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाकडे असलेली जमीन हस्तांरण प्रक्रिया  अंतीम टप्प्यात असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले. श्री बापट यांनी  केंद्रीय नगर विकास मंत्री श्री वैंकय्या नायडू यांची भेट घेऊन पुणे महानगरपालिकेने  मेट्रोबाबत त्रुटींची पुर्तता केली असल्याची माहिती दिली. यामुळे आता पुणे मेट्रोच्या प्रकल्पास गती येणार  आहे.  
                       अन्न पूर्णा योजनेच्या थकीत निधीची मागणी
अन्नपूर्णा योजनेचा  थकीत निधी मिळावा यासाठी  श्री बापट यांनी केंद्रीय नागरी पुरवठा   ग्राहक संरक्षण मंत्री  रामविलास पासवान यांची संसदेत भेट घेतली.  ऑक्टोंबर 2015 ते मार्च 2016 चा अन्नपर्णा योजनेचा निधी अद्याप मंजूर झालेला नाही. राज्यात अन्नपुर्णा योजनेचे 78,425 लाभार्थी आहेत. तरी  हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावा अशी मागणीही श्री बापट यांनी केली.
येत्या आर्थिक वर्षापासून बचत गटांना बीन व्याजी कर्ज
येत्या आर्थिक वर्षापासून राज्यातील बचत गटांना बीन व्याजी कर्ज दिले जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यानी  राजधानीत  आयोजित देशभरातील महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय संमेलनात दिली .
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या पुढाकाराने  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ५ आणि ६ मार्च २०१६ दरम्यान महिला लोकप्रतिनिधी-सशक्त भारताची निर्माता या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या उदघाटन सोहळयास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अंसारी, पंतप्रधान नंरेद्र मोदी  आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.
महिला या खूप प्रामाणिक असतात. म्हणूनच राज्यातील बचत गटांतर्फे घेण्यात येणारे कर्ज 100 टक्के परत केले जाते. हे लक्षात घेता राज्यातील  बचत गटाला बीन व्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्याची अमंलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येईल. अशी माहिती श्रीमती मुंडे यावेळी दिली. याशिवाय बचत गटांच्या महिलांना बारा महीने बाजार उपलब्ध व्हावा याकरिता जिल्ह्यांच्या ठीकाणी बचत गटांसाठी मॉल बनविण्यात येणार, महिलांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी  राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे  श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह महाराष्ट्रातील महिला खासदार व आमदार या परिषदेत मोठया संख्येने
उपस्थित होत्या.   

                                        महाराष्ट्र परिचय केंद्राला मान्यवरांच्या भेटी
परभणी जिल्हयाचे खासदार संजय जाधव, सांगली जिल्हयाचे खासदार संजयकाका पाटील , महिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, माहिती संचालक शिवाजी मानकर, विविध राज्यांच्या व महाराष्ट्रातील  माहिती व जनसंपर्क विभागाच्या ३७ अधिका-यांनी  आणि  कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट देऊन कार्यालयाच्या कामाची माहिती जाणून घेतली.

वर्षारंभी राजधानीत महाराष्ट्राचा वैविध्यपूर्ण गौरव


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने राज्यासाठी बरेच प्रकल्प मंजूर झाले व विविध योजनांसाठी निधी उपलब्ध झाला. सरत्या वर्षा अखेर महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ३ हजार ५० कोटींची मदत जाहीर झाली. हाच सकारात्मक उत्साह कायम राहत महाराष्ट्रासाठी देशाच्या राजधानीत वर्ष २०१६ ची सुरुवात यशस्वी ठरली.

               तेल व वायू संवर्धनासाठी महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यातील मुळा-मुठा नदयांच्या शुध्दीकरणासाठी जपानच्या जायका कंपनीसोबत केंद्र शासनाचा करार झाला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी मुंबई-काझीपेटया वर्षातील पहील्या रेल्वेगाडीचा व्हीडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून शुभारंभ केला. नागपूर शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत महाराष्ट्राचा करार झाला.पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील चार बालकांचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.स्वीप कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि मुंबई उपनरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर राज्यशासनाच्यावतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाराष्ट्राची संस्कृती, लघु उद्योग, हस्तकला यांचा अनोखा संगम असणा-या महा-जत्रा महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. वर्षारंभीच महाराष्ट्राचा असा वैविध्यपूर्ण गौरव राजधानीत दिसून आला.
           

             दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून हजार 50 कोटीची  मदत
                                                                                                                                                                                                                
गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवडयात राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रशासनाने 3 हजार 50 कोटींची मदत जाहीर केली. नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाला सामोरे जाणा-या राज्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेत पारपडलेल्या समितीच्या बैठकीत कृषी मंत्री राधा मोहन सिंग, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया, केंद्रीय वित्त राज्य मंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरीश उपस्थित होते.
      महाराष्ट्रा गेल्या 3 वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्रीय पथकाने राज्यातील दुष्काळ भागाची पाहणी  करून आपला अहवाल केंद्रशासनाला सादर केला. त्यानंतर राज्याला 3 हजार 50 कोटी रूपयांच्या मदतीची  घोषणा करण्यात आली.
आतापर्यंतची सर्वात मोठी मदत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले. केंद्राडून राज्याला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वातमोठी मदत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची घोषणा असून दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असल्याची भावना  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
तेल व वायू संवर्धनासाठी महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्कार
 देशात १६ ते ३१ जानेवारी हा तेल व वायू संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो. केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणा-या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने येथील डिआरडीओ भवनात आयोजित समारंभात पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या पंधरवाडयाचे उदघाटन झाले. मागील वर्षी तेल व वायू संवर्धन पंधरवाडयापासून देशभर सुरु झालेल्या जनजागृती कार्यक्रमात उल्लेखनीय कार्यकरणा-या महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी  पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  
गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्यकरणा-या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. केंद्र सरकराच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मधे तेल व वायू संवर्धन पंधरवाडयापासून महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमधे तेल व वायू संवर्धन जनजागृतीच्या दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हा स्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रात जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.

तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरीकांमधे जनजागृती करण्यासाठी १,०२२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतक-यांमधे इंधन वापर व  तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी ४२० शिबीर आयोजित करण्यात आले. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२,५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. उद्योग क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६,१५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे एका वर्षात राज्यात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून मोठया राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून निवड झाली.

                मुळा-मुठा नदी शुध्दीकरणासाठी जपान सोबत सामंजस्य करार
पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपानमधील जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) या कंपनीशी सांमजस्य करार केला. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या कराराला मंजुरीही देण्यात आलीयेथील इंदिरा पर्यावरण भवनात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सु यांनी या करारावर सह्या केल्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या देशातील प्रदूषित 302 नद्यांमधे पुण्यातून वाहणा-या मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश आहे. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या नद्यांच्या शुद्धीकरणाची पुण्यातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती. तसेच महाराष्ट्र सरकाकरने राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठविला होता. 

या करारानुसार मुळा आणि मुठेच्या शुद्धीकरणासाठी जपानची जायका कंपनी एक हजार कोटींचे कर्ज देणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी 40 वर्षांची मुदत ठेवण्यात आली आहे. या करारांतर्गत 11 नवीन मल-जल शोधन यंत्राचे निर्माण केले जाणार आहे. यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल. या नद्यांच्या शुद्धीकरणावर 990.26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पैकी  केंद्र सरकारचा वाटा 841.72 कोटी आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा 148.54 कोटींचा असणार आहे. ही शुद्धीकरणाची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे या करारात म्हणण्यात आले आहे.
             नागपूर शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत महाराष्ट्राचा करार
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नागपूर शहराचा विकास करण्यासाठी फ्रांसीसी विकास संस्था (एएफडी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सीस्को ओलांद यांच्या उपस्थितीत चंदीगढ येथे आयोजित भारत-फ्रांस व्यापार परिषदेत महत्वपूर्ण करार झाला. या परिषदेत महाराष्ट्रासोबतच पॉण्डेचेरी आणि चंदीगढ शहराच्या विकासासाठीही असा करार करण्यात आला.
        या करारानुसार नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वास्तू शिल्प वारसा क्षेत्राचा विकास, नवीन नवीकरणीय उर्जाक्षेत्र विकास आदी क्षेत्रांमधे फ्रांस तांत्रिक मदत देणार आहे. फ्रांसमधून याकामासाठी येणा-या तंत्रज्ञ तज्ज्ञांचा सर्व खर्च फ्रांसीसी विकास संस्था उचलणार आहे.                               
                       पंतप्रधानांनी मानले आभार 
भारत-फ्रांस व्यापार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आधुनिक शहर निर्माण करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली. तसेच, नागपूरसह देशातील तीन शहरांमधे स्मार्टसिटी निर्माण करण्यासाठी फ्रांसने घेतलेल्या पुढाकाराबाबत आणि आज उभय देशांमधे याबाबत झालेल्या द्वीपक्षीय कराराबाबत फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. या परिषदेत भारत फ्रांसच्या कंपन्यांमधे एकूण १६ करार झाले.
                   मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेसचा शुभारंभ
रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी रेल्वे भवनात व्हिडीयोकॉन्फरसींगच्या माध्यमातून मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेसया साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. विदर्भ वासियांची ब-याच दिवसांपासून मागणी असलेल्या, मुंबईतील लोकमान्य टर्मीनल्स ते तेलंगानातील कोझीकोट रेल्वे स्थानका दरम्यान धावणा-या या रेल्वे गाडीचा शुभारंभ रेल्वे भवनात पार पडला. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के मित्तल आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते. याचवेळी रेल्वे भवनात लावण्यात आलेल्या स्क्रिनवर मुंबईच्या लोकमान्य टर्मीनल्सवर उपस्थित मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार मंगेश कोडाळकर उपस्थित असल्याचे दिसत होते.  
                             अशी धावणार मुंबई-काझीपेट आनंदवन एक्सप्रेस
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही रेल्वे गाडी तेलंगनातील कोझीकोट रेल्वे स्थानकासाठी सुटेल. लोकमान्य टर्मिनल्सहून सुटल्यानंतर ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामनगांव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, बल्लरशा या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
                       महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४  बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आपल्या चार मित्रांना वाचवताना प्राण गमवावे लागलेल्या नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्देला जाहीर झालेला भारत पुरस्कार गौरवचे आई वडील रेखा व कवळू सहस्त्रबुध्दे यांनी स्वीकारला. जळगाव जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला हा पुरस्कार प्रदान करण्यात  आला.
नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणा-या ४ मुलांचा प्राण वाचविला,त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला भारत पुरस्कार जाहीर झाला.  
  जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील मुक्ताई मंदीरात मामा सोबत गेलेल्या निलेश भिलने मंदीराच्या घाटावर एक मुलगा बुडत असल्याचे दिसताच. क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत मुलाचे प्राण वाचविले. कोथळी गावात राहणारा निलेश रेवाराम भिल हा गावातील जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.
वर्धा जिल्हयातील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणा-या  वैभव रामेश्वर घंगारे हा गावातील नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.         
आई वडीलांचे छत्र हरवलेल्या मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणा-या मोहीत दळवीने परिसरातील तलावात स्नान करताना  बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता तलावात डुबत होती तीने आपल्या मैत्रीनीला हात दिला पण तीला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन  मुलीचे प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीत  वाळकेश्वर येथील महानगर पालीकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.                                   
     शिरीष मोहोड आणि शेखर चन्ने यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार 
मतदान व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वीप कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील मानेकशा सेंटरच्या झोरवार सभागृहात आयोजित ६ व्या राष्ट्रीय निवडणूक मतदातादिनाच्या कार्यक्रमात निवडणूक पध्दतीच्या उत्तम अंमलबाजवणीसाठी विविध राज्यांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, निवडणूक आयुक्त द्वय ए.के.जोती आणि ओमप्रकाश रावत मंचावर उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील विविध राज्यात मतदारांना साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्याचा कार्यक्रम’(स्वीप) राबविण्यात येत आहे. श्री. मोहोड आणि श्री. चन्ने  यांनी या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्यात वर्ष २०१५ मधे महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली आहे. त्यांनी स्वीप कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविला आहे.  
                 दिल्लीत गरजला महाराष्ट्र ; महा-जत्रा महोत्सवास देश विदेशातील  
                                  पर्यटकांचा उदंड प्रतिसाद
महाराष्ट्राच्या मराठ मोळया संस्कृतिचे दर्शन घडवित  १७ जानेवारी रोजी दिल्ली हाट येथे महाराष्ट्र शासनाच्या महा-जत्रा या कला-संस्कृति व हस्तकला प्रदर्शनाला थाटात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दिल्ली हाटचा परिसर दणाणून गेला. महाराष्ट्राच्या संस्कृतिची ओळख व्हावी व राज्यातील लघु उद्योजक, हस्तकला कारागीर व कलाकरांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राजधानी दिल्लीत राज्य शासनाच्या वतीने महा-जत्रा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दि. 17 ते 31 जानेवारी 2016 पर्यंत चालणा-या या महाजत्रेत महाराष्ट्रातील लघुउद्योजक, हस्तकाला कारगीर, कलाकार यांनी 120 स्टॉल्स उभारले आहेत. राज्य शासनाचा पर्यटन विभाग, सांस्कृतिक संचालनालय, लघु उद्योग  विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
        पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सचिव श्रीमती वल्सा आर. नायर सिंह यांच्या हस्ते महा-जत्रा या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर यावेळी उपस्थित होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या परिसराची सजावट केली आहे.या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणारी कार्यशाळा प्रथमच पहायला मिळाली. महाराष्ट्राची पांरपारिक ओळख वारली चित्रकला, रांगोळी, आदीवासी मुखवटे तयार करणे, मातीचे किल्ले तयार करणे याबरोबरच नऊवारी साडी नेसणे आदी विषयांवर पर्यटकांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच मराठी भाषेतील गाजलेले चित्रपटही याठिकाणी प्रदर्शीत करण्यात आले. या महाजत्रेत दिवसभर महाराष्ट्राच्या लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरिल महत्वाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घडामोडीतील महाराष्ट्राच्या सहभागाची दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन व राज्य शासनाची प्रकाशने या प्रदर्शनात मांडण्यात आली.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रदर्शन
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महा-जत्रा च्या निमित्ताने राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती या प्रदर्शनास  भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत आकर्षकपणे ही प्रदर्शनी लावण्यात आली. महाजत्रेत मोक्याच्या ठिकाणी आकर्षक पध्दतीने मांडण्यात आलेल्या या प्रदर्शनीस भेट देणा-या प्रत्येकांची पावल येथे स्थिरावत होती. राज्याच्या प्रगतीचा आलेख एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने प्रदर्शनीस भेट देणारा प्रत्येक व्यक्ती भरपूर माहितीचा ठेवा  मिळविल्याच्या भावनेने कृतार्थ होत होता. जवळपास दोन आठवडे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून महा जत्रेस भेट देणारे देश-विदेशातील पर्यटक, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली. लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचा स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात आला होता. या स्टॉलवर पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या राज्यशासनाच्या मुखपत्रांची आकर्षक मांडणी आणि दर्जेदार मजकुराला लोकांची पसंती मिळत होती.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील जलसिंचनाबाबत दिल्लीत महत्वाच्या वाटाघाटी


पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रीय पुढाकाराने राज्यात राबविल्या जात असलेल्या जलशिवार योजनेचे सुपरिणाम दिसत असतानाच राज्यातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाच्या वाटाघाटी केल्या. केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा खोरे पाणी वाटपासह मराठवाडा व विदर्भातील सिंचनाच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार महाराष्ट्राला मिळालेल्या पाण्याचे फेरवाटप करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडतानाच मराठवाडयाला त्याच्या हिश्श्याचे पाणी मिळावे आणि विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.त्यास केंद्राकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद राज्याच्यादृष्टीने महत्वाचा ठरला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळयास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या.यासोबतच राज्यातील प्रशासकीय अधिका-यांचा व राज्यशासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वेबपोर्टलचा राजधानीत झालेल्या राष्ट्रीय  सन्मानाने यात भर पडली.    
राज्याच्या दृष्टीने कृष्णा  खोरे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी जवळपास दोन हजाराहून अधिक किलो मीटरचे अंतर कापून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगनातून वाहत जावून बंगालच्या उपसागरात मिळते. या राज्यांदरम्यान कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून निर्माण झालेल्या  कृष्णा  पाणी वाटप लवादातील राज्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत स्पष्ट केली. कृष्णा खोरे लवादानुसार महाराष्ट्राला मिळालेल्या पाण्याचे फेरवाटप करण्यात येऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा खो-याचा लवाद हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये आहे. आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगना राज्य वेगळे झाल्यामुळे आंध्रप्रदेश ने याचिका दाखल करून नव्याने पाणी वाटपाचा निर्णय दयावा असे म्हटले आहे. कृष्णा पाणी वाटप लवाद पुन्हा सुरू करावा ही आंध्र प्रदेशाची मागणी आहे. कृष्णा खोरे लवादाचा निर्णय झाला त्यावेळी तेलंगाणा हे राज्य अस्तित्वात नव्हते त्यामुळे पाण्याचे फेरवाटप व्हावे अशी मागणी आंध्र प्रदेशने केली आहे. पंरतु लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटयाला आलेल्या पाण्याच्या उपलब्धतेवर राज्याने काही प्रकल्प हाती घेतले आहेत व त्यासंदर्भात नियोजन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या हिश्श्याचे पाणी आंध्र प्रदेशला देणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबैठकीत सांगितले. आंध्रप्रदेशला जे पाणी मिळाले आहे ते पाणी आंध्र आणि तेलगंणा या दोन राज्यांनी वाटून घ्यावे असे स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत मांडले.  
मराठवाडयाला 21 टिएमसी पाणी मिळावे
उजनी धरणाविषयी बैठकीत चर्चा झाली. या धरणातील पाणी भीमा खो-यातून येते. यासंदर्भात दूस-या अंतरीम लवादाने उजनी धरणात पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाडयात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळाने होरपडून निघालेल्या मराठवाडयाची स्थिती बीकट असल्याने मराठवाडयाला त्याच्या हिश्श्याचे 21 टिएमसी पाणी मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत  केली .
                       गोसी खुर्द प्रकल्पास  निधी उपलब्ध व्हावा
विदर्भातील गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प ब-याच वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास  विदर्भातील सिंचन क्षमता वाढेल. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्याकरिता ब-याच अडचणी येत आहेत. सध्या या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेता प्रकल्प पूर्ण करण्याकरिता केंद्राकडून  निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  बैठकीत केली. या सर्व मागण्यांबाबत   उमा भारती यांनी सकारात्मकरित्या मार्ग काढण्याचे आश्वासन  दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, जल व्यवस्थापन विभागाचे सचिव एस.एम. उपासे, लवादासमोर राज्याची बाजू मांडणारे ऍ. दिपक नाडगोरकर यावेळी उपस्थित होते.
             शरद पवार यांचा दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळा
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहीलेले , केंद्रात सलग १० वर्ष कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळणारे व भारतीय राजकारणात ५ दशक यशस्वी कारकीर्द गाजविणारे  राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळा येथील विज्ञानभवनात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळयास उपस्थिती लावून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमीत्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंत प्रधान डॉ. मनमोहन सिंग,कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजावादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनीस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला, श्रीमती प्रतिभा शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते. याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया, विविध केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच देशातील व महाराष्ट्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांची उदबोधक भाषणे झाली. भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात  निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे.’ अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवारांचा गौरव  केला. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले.९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल  त्यांना सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणनेऔचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत ५ दशक वावर असणारे  पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौ-यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपासी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
 उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी, शरद पवार हे एक अष्टपैलू राजकारणी आहेतअशा शब्दात पवरांचा गौरव केला. कृषीमंत्री म्हणून पवारांना राज्यसभेत सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पवारांनी नेहमी संयत भूमिका घेल्याचेही त्यांनी सांगितले.  
 माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह म्हणाले, शरद पवारांनी देशाला सृजनात्मक योगदान दिले.महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पवारांनी महत्वपूर्ण कार्यकेल्याचे त्यांनी सांगितले. ७० च्या दशकात यशवंतराव चव्हाण देशाचे वित्तमंत्री असताना त्यांच्या आर्थिक सल्लागारपदी आपण होतो तेव्हा शरद पवारांशी पहिली भेट झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर ८० च्या दशकात आपण आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त झाल्यापासून ते माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत पवारांचा सहवास लाभल्याचेही त्यांनी सांगितले. तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजारअशा शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळयात विविध पक्षांचे नेते एका मंचावर उपस्थित असल्याचे चित्रच त्यांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी आहे. पवारांशी माझा स्नेह गेल्या दोन दशकांपासून असल्याचे सांगत, देशातील तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढवून त्यांची निर्यात करण्याच्याकामी पवारांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्या म्हणाल्या.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शरद पवार आपल्या मनोगतात म्हणाले, मी वयाच्या अठराव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला.  वयाची पंचाहत्तरी, राजकीय जीवनाचे पच्चावन वर्ष आणि संसदिय जीवनाचे ४९ वर्ष अशा सर्व प्रवासात जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्याप्रसंगी आई-वडीलांची आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात शरद पवार यांच्या कार्याचा वेध घेणारी लघु चित्रफित दाखविण्यात आली. तसेच शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत गौरव ग्रंथ,ऑन माय टर्मआणि लोक माझे सांगातीया पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे  प्रस्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले तर आभार खासदार सुप्रिया सूळे यांनी मानले.
                                राज्यातील प्रशासकीय अधिका-यांची छाप
महाराष्ट्रातील तीन अधिका-यांचा जी फाईल्स पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला.  संस्थेने २०१५ च्या वार्षिक पुरस्कारासाठी देशभरातील १० प्रशासकीय अधिका-यांची निवड केली त्यात महाराष्ट्रातील ३ अधिका-यांचा समावेश असने ही गौरवाची बाबआहे. पुरस्कार वितरणसमारंभात महाराष्ट्राचा गौरव आणखी वाढविणारा क्षण ठरला तो, या संस्थेने राज्याचे सुपूत्र ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा. सरकारचे कायदे, नियम व योजनांची चोख अंमलबजावणी करून कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्यात मोलाची भूमिका वठवत इतरांसाठी पथदर्शी काम करणा-या अधिका-यांचा गौरव जी फाईल्स ही संस्था करते.     
            केंद्रीय खान व स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिध्द वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना  संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे प्रभारी अभियंता अजय सिंघल यांनाअसाधारण योगदान पुरस्कार,जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना उत्कृष्ट योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते.
डॉ. अनिल काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजय सिंघल यांनी  उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पध्दतीचा अवलंबकरून नियम उल्लंघ नकरता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. शेती पिक किटक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून शेती व ई- प्रशासन व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.  मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना गौरविण्यात आले.
                         माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळाला राष्ट्रीय पुरस्कार
काळाचे पाऊले ओळखत महाराष्ट्र शासनाने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. राज्य शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग यात अग्रेसर आहे. विभागाने शारीरिक असक्षम व्यक्तींना हाताळण्यास सोयीचे असे वेब पोर्टल तयार केले असून यास राजधानीत सर्वोत्तम सरकारी संकेतस्थळाचा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.   
 केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शारीरिक असक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून शारीरिक असक्षम राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली  यांच्या हस्ते  विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री  थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय  कृष्णपाल सिंह आणि विजय सांपला उपस्थित होते.
            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी  राज्य शासनाला मिळालेला सर्वोत्तम संकेतस्थळाचा पुरस्कार स्वीकारला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम संकर नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत प्राध्यापक व स्वत: शारीरिक असक्षम असलेले धंनजय भोये यांचा संकेतस्थळ निर्मिती कार्यात सहभाग होता. शारीरिकदृष्टया असक्षम व्यक्तींनाही शासन निर्णय व संकेतस्थळावरील महत्वाची माहिती सुगम रित्या कळावी यासाठी ब्रेल लिपीसह ऑडीओ –व्हीडीओ क्लीप देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग निर्देर्शीत करण्याची व्यवस्थाही या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.  संकेतस्थळ  बहुभाषी सुविधांसहीत स्मार्ट फोन व संगणकावर सहजगत्या वापरता येऊ शकते.याच कार्यक्रमात कर्ण बधिरांच्या स्वयंरोजगार गटात वैयक्तीक पुरस्कार पुण्याच्या नेहा कुलकर्णीला प्रदान करण्यात आला. मंतीमंदाच्या गटात मुंबईच्या समीर दार्जी यांना सन्मानीत करण्यात आले. अपंगाच्या आदर्श व्यक्ती गटाच्या कर्णबधीर या उपगटात  पुण्याच्या  प्रेरणा सहाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.                       
                                     परिचय केंद्राच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद
        येथील प्रगती मैदानावर आयोजित ३५ व्या भारतीय अंतरराष्ट्रीय उद्योग मेळाव्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने महाराष्ट्र दालनात राज्य शासनाच्या गेल्या एक वर्षाच्या काळातील विकास कामांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. आशियाखंडातील महत्वाचा व्यापार मेळावा म्हणून ओळख असणा-या या व्यापार मेळाव्यात व्यापारी, गुंतवणूकदार, ग्राहक मोठया प्रमाणात भेटी देतात. देशातील प्रत्येक राज्यांकडून आपल्या राज्यातील लघू व मध्यम उद्योगांसह राज्यसरकारच्या सहाय्याने होत असलेल्या प्रगतीची झलक येथे मांडण्यात येत असते. महाराष्ट्र दालन या मेळाव्यास भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीच्या आकर्षणाचे केंद्र असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात राज्याने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती महाराष्ट्र दालनास भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत आकर्षकपणे ही प्रदर्शनी लावण्यात आली. महाराष्ट्र दालनाच्या दर्शनी भागात आकर्षक पध्दतीने मांडण्यात आलेल्या प्रदर्शनीस भेट देणा-या प्रत्येकांची पावल स्थिरावत होती. राज्याच्या प्रगतीचा आलेख एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने प्रदर्शनीस भेट देणारा प्रत्येक व्यक्ती भरपूर माहितीचा ठेवा  मिळविल्याच्या भावनेने पुढे जात होता.
             जवळपास दोन आठवडे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून महाराष्ट्र दालनास भेट देणारे देश-विदेशातील व्यापारी, गुंतवणुकदार, ग्राहक व सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाची व योजनांची माहिती पोहचविण्यात आली. प्रदर्शनीस थायलंडच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यासोबतच महाराष्ट्रातील खासदार सर्वश्री विनायक राऊत, आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, रक्षा खडसे यांनी भेट दिली व प्रदर्शनाचे कौतुक केले.      

                                                          ********