Tuesday, September 29, 2020
Friends Corner गप्पा With ज्योत्सना
सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार,
‘वाळवंटातील फुलं’ या आपल्या वाट्सअप समुहाच्या Friends Corner या उपक्रमाची दुसरी Special Guest ज्योत्सना पोटदुखे-टेंबले ला काल 27 सप्टेंबर 2020 ला आपण भेटलो.
ज्योत्सना ,विहीगावात लहानाची मोठी झाली आणि लहान वयातच आलेल्या कौंटुबिंक जबाबद-यांनी अनुभव संपन्न झालेली व सुखाचा संसार करणारी गुणी मुलगी. शालेय जीवनात क्रीडा, नृत्य, विज्ञान प्रदर्शनी आदी उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणा-या ज्योत्सनाला या सर्व गुणांचा उच्च शिक्षण घेताना फायदा होईल व त्यातून आपले व्यक्तीमत्वही फुलेल ही माफक अपेक्षा असेलच. पण, शेवटी परिस्थिती आपल्या समोर काय मांडून ठेवते हे काही आपल्याला माहित नसते ! त्याला ज्योत्सनाही अपवाद नव्हती मुळी. बोहल्यावर चढण्याची फारशी जाणीव नसण्याच्या काळात वैवाहिक जीवनाचा आरंभ झाला व परिस्थितीनेच आता तिच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका घेतली होती व तिनेही या गुरुकडून धडे गिरवत आपली सिध्दता केली. पतिच्या नोकरीमुळे ब-याचदा संसारच बि-हाड एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरीत कराव लागलं पण अशातही पतीच्या सर्व निर्णयांमध्ये त्याला खंबीरपणे साथ देत तिने संसार फुलवला. या संसाररूपी वेलीवर दोन गुणी फुलं (मुलं) उमलली .थोरला मुलगा ‘यश’ ने तर ‘माँ से बेटा सवाई’ ही नवी म्हण सार्थकी लावत ज्या विहीगावच्या महात्मा फुले विद्यालयात ती शिकली त्याच विद्यालयात 12 वीत टॉपर येण्याचा मान मिळवला. आता तर आई बाबांसोबत घर चालविण्याच्या जबाबदारीतही त्याने खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली आहे.
आपल्या उपक्रमातील ‘ऋणानुबंधाच्या जुळून आल्या गाठी’ या दुस-या सेगमेंटमध्ये ,तू ***** जात असताना यजमान अमोलरावांसोबत झालेली आँख मिचोली तर सर्वांना असही होऊ शकते! असा सुखद धक्का देणारी ठरली. संसाराचा गाडा हाकताना स्वयंपाक जमत नव्हता तेव्हा पतीने समजून घेत दिलेली साथ. मध्यप्रदेशातील पूर्णपणे हिंदी भाषिक प्रदेशात संसार थाटताना भाषेशी जुळून घेताना घडलेल्या गमतीजमती, उभयतांमध्ये खटके उडाल्यास दहा मिनीटांपेक्षा एकमेकांचा दुरावा सहन न करू शकणारे दांपत्य समजून घेताना त्यांच्या संसारातील बाँडींग बघून आम्हाला आनंद झाला.आवडी- निवडी जाणून घेताना तुझी लिखानीची आवड व अमोल ठाकरे ने त्याबाबत फर्मायीश करता लगेच तू सादर केलेली उत्तम रचनाही आम्हाला खूप आवडली. फोटोसोबत संवाद साधतांना ढोल वाजवत असणा-या तुझ्या वडिलांच्या फोटोबाबत तू केलेली मांडणी आवडली . ‘ढोलाचे भजन’ या लोकवाद्य व कला प्रकाराचा माहेरातून मिळालेला वारसा व ढोलावर उभेराहून तू एके काळी केलेल्या नृत्याची आवठवणही आम्हाला तुझ्या कलाअंगांची ओळख पटवून गेली. तुला पंख दिले तर आपल्या समाजातील गोर गरीब व गरजुंच्या जवळ उडून जाऊन त्यांची मदत करण्याची तुझी कल्पकताही आम्हाला आवडली.
झटपट संवादात तुला छिंदवाडयातील ठळक आठवणीबद्दल विचारले असता यजमानांनी तुला त्यांच्या कंपनीत घेवून जात सर्वांसोबत तुझा परिचय करून देण्याचा प्रसंग हटके वाटला.आयुष्यात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न अपूर्ण असल्याचं सांगतांनाच संसार रथाचे एक चाक म्हणून तू सक्षमपणे निभावत असलेली भूमिकाही कौतुकास्पद आहे. बाकी संसाराच्या नित्याच्या कार्यकलापामुळे मनावर थोडी मळभ येते तेव्हा आपल्या वाळवंटातील फुलांसोबत संवाद साधून एक नवी ऊर्जा मिळत असल्याच्या तुझ्या भावना आम्हाला हा वाटस्अप गृप स्थापन करण्याचा व फ्रेंन्ड्स कॉर्नर हा उपक्रम सुरु करण्याचा हेतू सफल होत असल्याचा आनंद देवून गेला.
प्रिय ज्योत्सना, संवादाची सुरुवात करताना दिवंगत आईचे स्मरण करत त्यांनी तुझ्या व्यक्तिमत्वाला पाडलेल्या पैलूबद्दलचे तुझे विधान आम्हाला त्यांची आठवण करून गेली व तुझ्या मनाची घालमेलही अधोरेखीत करून गेली. आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यासाठी आमच्या सर्वांकडून तुझे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
(रितेश मोतीरामजी भुयार)
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment