Sunday, July 4, 2010

पाऊस दाटलेला. . . . . . .


आपना सर्वांना नमस्कार।

काय लिहाव हेच सुचेना पहिल्यांदा ब्लॉग लिहितोय. अनायशे दिल्लीत पाऊस पडला.  मागील दोन वर्षात एवढा मोठा पाऊस माझ्या दिल्लीतील वास्तव्यात पहिल्यांदाच बघीतला. पहाटे 4 वाजता  पावसाचे टपोरे थेंब पडत असल्याचा भास  झाला थोडा बिछान्याहून उठलो आणि गॅलरीत येउन उभा राहिलो खरंच बाहेर धो-धो पाऊस सुरु होता. डोळयात झोप पण होती. तसाच परत बिछान्यावर जावून पहुडलो पण, आता झोपच येत नव्हती . मग पावसाच्या  जुन्या आठवाणीत शिरलो.
मी तसा 5 वी पासनं मामांकडे खेडेगावात  शिकायला गेलो. मामंच गाव म्हणजे भारी मजा  निसर्ग संपदा भरभरून आहे इथे  'विहीगाव' या गावाच नाव. शहानुर नावाची नदी ही गावाची अगदी सिमारेषाच.  पावसाचे दिवस म्हणजे  खेड़ेगावात घरोघरी पार्टीचा माहोल गरमा गरम भजी व अन्य तळलेल्या पदार्थांचा बेत तर अगदी कुठे गेलाच नाही। घरी कचोरी करायचा प्लॅन फिक्स झाला. आता कचोरितील मसाल्यासाठी मुगाच्या शेंगा आनायच्या होत्या. माझा लहान मामा शामसुंदर आणि मी असे दोघांनी मिळून शेतात जावून मुगाच्या शेंगा तोडून आनाव्यात असा निर्णय झाला .मग काय , एक भली मोठी पिशवी घेउन निघालोत आम्ही शेताकडे .

गेल्या दोन दिवसांपासून गावात सतत पाऊस पडत होता. वाटेतच मातीचे घर कोसळलेले दिसले मग रस्ता बदलून वेगळा रस्ता पकडला. तसेही गावात मातीची घर मोठया प्रमाणात असल्याने पावसाळयात सततच्या पावसाने मातीच्या भितींत पाणी मुरून घर कोलमडून   त्याची माती इतस्तहा पडून दैनंदीन वापरायचे रस्ते बंद होने नित्याचेच.  शेताकडे जाताना  गावची नदी ओलांडून पुढ जाव लागत. आज कमरे एवढ पाणी होत नदीला  मामांचा हात धरून वाहत्या पाण्याच्या प्रवाह पार केला. अण शेताच्या रस्त्यावर आलो. पावसात शेताची वाट म्हणजे लई बिकट वाट पायातील चपला हातात घेऊन शिस्थीत चालाव लागत नाही तर थोडा चुकलात की पायात काटा गेला समजावा. आम्ही सकाळी ८ वाजता निघालो पाऊस सुरूच होता .  छत्री अण घोंगडी( पावसापासून संरक्षण व्हाव म्हणून अंगावर घेतलेल जाड पोत)  अंगावर घेवून पाऊस झेलत आम्ही शेत जवळ करत होतो. तास भाराच अंतर कापत शेतात पोचलो . वाटेत मामाकडून बरीच माहिती मिळत होती. हे पलिकडले शेत अमक्याचे त्यापलिकडचे टमक्याचे  आणि कधी एकदम सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारून  मला बोर होणार नाही याची पूर्ण काळजी मामा घेत होता .

आता शेत जवळ आल .शेतात शिरताच आम्ही शेंगा तोडायला सुरुवात केली. मामाने मला आधीच सांगीतल होतं कोणत्या शेंगा तोडायच्या नी कोणत्या नाही ते. मामाचा शेंगा तोडायचा वेग भारी होता. मी आपला कासव गतीन शेंगा तोडत होतो. एवढयात मामा केव्हा पुढे निघून गेला हे मला कळलेच नाही. आजूबाजूच्या शेतातही कोणी दिसत नव्हत.  वरून पावसाची रीप रीप सुरुच होती. एव्हढयात शेता शेजारून जाणारा एक म्हातारा(अजाबरावजी अभ्यंकर-सोकारी) माझ्याकडे बघत म्हणतो  'कोण आहे रे तिकडे, चोरी चाल्ली का शेंगाची?' मी म्हटल नाही आजोबा शामसुंदरचा भाचा आहे मी घरच्यासाठी शेंगा घेवून जातो जरा. खात्री पटल्यावर ते आजोबा म्हटले बरे तर. लवकर निघा पोरांनो घराकडे सततच्या पावसान नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे असा इशारा देवून ते आजोबा तर निघून गेले. आता मात्र मी पुरता घाबरलो होतो. मामा जवळ दिसत नाही आजुबाजूच्या शेतात कोणीच नाही निर्जन जंगल वरून पावसाची रिप रिप त्यामुळे अंग भिजून जोरदार कपकपी भरत होती. मामाला जोर -जोरात आवाज देताना भर पावसात माझा गळा कोरडा पडला होता.  मामाचा काही पत्ताच नव्हता.

मी शेंगा तोडायच्या थांबवल्या सतत पडत असलेल्या पावसाने मी खूप भिजलो होतो. त्यात भरीस भर म्हणून जोराचा वारा वाहत होता. त्यामुळे शरीराला कापरे धरले होते मी थर थर कापायला लागलो होतो.  मामा काही जवळपास दिसत नाही हे पाहून मी हंबरडा फोडला जोर जोराने रडायला लागलो प्रचंड भिती वाटत होती. रडून रडून थकलो पोटात आग पडली होती. भर पावसात खूप जोरदार भूख लागली होती. मनात मामाचा खूप राग येत होता म्हणून मनातल्या मनात मामाला शिव्याची लाखोलीही वाहत होतो लिटररी अगदी घाणेरडया शिव्या देत होतो . शेवटी मामा माझ्या पुडयात येवून उभा राहिला अण म्हटला अरे आपल्या चिकणीच्या शेतात( शेताच स्थानिक नाव)  गेलो होतो जरा फेर फटका मारायला. एवढ रडायला काय झाल तुला काय शेतात वाघ बिघ खायला येणार व्हता होय! असे समजवत तो म्हटला चाल आता पुरे होतील एवढया शेंगा चल निघू घराकडे. 

मी सांगितल त्याला की, नदीला पुर येणार असल्याचे सांगितले एका वाटसरुने. पण, मामाने मला धिर देत सांगितले, ‘ अरे राजा घाबरू नकोस, मला पोहता येतं त्यामुळं मी सुरक्षीत नेईन तुला नदीपलीकडे. पण, माझं थरथरनार अंग अन मनातील भिती काही केल्या थांबत नव्हती.  शेतातून घराच्या दिशेने चालता-चालता गाव नजिक आल होत. गावात शिरण्यासाठी आम्हाला आता नदि ओलांडून जाण्याचे दिव्य आता आमच्या समोर उभे ठाकले होते. जसा नदी जवळ आलो तसे नदिच्या पाण्याचा वेग आणि पाण्याची वाढलेली पातळी पाहून मी घाबरून गेलो. एव्हाना नदिच्या पलिकडच्या किनारी गावकरी जमले होते. आता नदिच्या या किना-या उभे असलेल्या आम्हा मामा-भाच्यांकडे सर्वांच्या नजरा टिकून राहिल्या होत्या. आणि आता ही दोघं नदी कशी पार करणार याकडे सर्वच उत्सुकतेने बघत होते.  

          मामा, मला धिर देत होता. मात्र, पोहण्याच्या कौशल्यात शुन्य असणारा मी नदिचं विस्तीर्ण पात्र व  वरून कोसळणा-या पावसाने पुरता गारठून गेलो होतो. आता मामाने युक्तीबाण गारठलेल्या शरीरात पूर्ण बळ भरून  आमच्याकडे असलेली शेंगांची पिशवी पलिकडच्या किना-यावर फेकली आणि ती सुखरूप पोचलीही.  आता मला खांदयावर घेत मामा नदिच्या पात्रात शिरला. पाण्याला जोरदार प्रवाह होता त्यामुळे खांदयावर मला घेवून नदिपात्रात थोडा दूर गेलेला मामा परिस्थितीचा रोख लक्षात घेत मागे वळला. मामाचे बॅक फुटवर येणे मला मात्र पुरते घाबरवून गेले मनात भलते सलते विचार येऊ लागले जसे की आपण पाण्यात वाहून गेलो तर येथेच जलसमाधी  !. (आणि समाधीवर शब्द ओळ – भरपावसात शेंगा आणण्याचे दिव्य करताना शहीद झालेला जवान).  

          मामाने रणनिती आखत पुन्हा नदिपात्रात प्रवेश केला. थोडा दूर जात नाही तोच मामाच्या पायाखालचा नदितील दगड सरकला व मामाचा पाय घसरून मामा व त्यांच्या खांदयावरचा मी असे दोघेही नदिपात्रात पडलो. हे चित्र बघताच नदि काठावर असलेल्या एकाने क्षणाचाही  विलंब न लावता नदित सूर मारून मला बाहेर काढले. मामा पोहत पोहत किना-यावर येताच माझ्या काळजी  पोटी तो  जवळ आला.  त्यानंतर बहुदा घाबरलेली  माझी अवस्था व गारठलेल शरीर यामुळे माझी शुध्द हरवली.
          थोडा वेळाने जेव्हा शुध्दीवर आलो तेव्हा बघतो तर मी घरी आलो होतो आणि माझ्या अंगावर दोन जाड रजई आणि ब्लँकेट असा सर्व थाट होता. माझ्या समोरचे चित्र असे की, मामी कचोरी बनबण्यात मश्गुल तर मामा तिला  पाक कार्यात मदत करीत होता. थोडा वेळाने कचोरी तयार झाली आणि जिच्यासाठी हा सर्व खटोटोप चालला होता ती कचोरी एकादाची माझ्या पोटात गेली आणि  भर पावसात  इतका वेळ माझ्या पोटात पडलेली आग एकदाची शांत झाली.  
                  


 आणि या प्रसंगापासूनच मी भर पावसात शेतात जाण्याचे टाळले ते थेट आतापर्यंत. पण तो पाऊस मला अजही हवा हवासा वाटतो. दुर्देवाने आता तसा पाऊस पण येत नाही आणि विहीगावातील शाहनूर नदी पण कधी दुथडी भरून वाहत नाही. अरेच्या,  हा लेखन प्रपंच सुरु असताना मी विसलोच की घडयाळीत सकाळचे ७ वाजले होते आज ऑफीसला सुटीच होती पण आठवडाभराची माझी रखडलेली कामे तर शिल्लकच होती चला तर आवरतो आता……….
                                I miss that rain












1 comment:

  1. aplyala hawa tasa paus milan he ata durapastach zhal ahe..pan tujhi udaleli dhandal bhari hoti...lahangya wayatil ya asha athawani kayam manat ghar karun rahtat nahi ka...mast!!!!

    ReplyDelete