Sunday, July 17, 2016
Wednesday, July 13, 2016
Monday, July 11, 2016
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
अटकेपार झंडे लावणा-या मराठी सैन्यांनी दिल्ली सर करण्यासाठी
केलेले प्रयत्न आणि त्याची देशाने घेतलेली दखल हे आपणास महाराष्ट्राच्या स्वर्णीम
इतिहासाची ओळख करून देते. तीच प्रचिती आता देशाचा गाडा चालणा-या राजधानी दिल्लीत
येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ठ झालेले मराठी मंत्री आणि संसदेचे
वरीष्ठ सभागृह राज्यसभेत आणि राष्ट्रपतींकडून नामनिर्देशीत खासदारांमधे नव्याने
सामील झालेल्या महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वामुळे हे चित्र आणखी आशादायी व सुखावह असल्याचे दिसते.
नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात
महाराष्ट्रातील पुण्याचे प्रतिनिधीत्व करणारे आणि केंद्रात पर्यावरण व वने मंत्री
म्हणून पदभार सांभाळणारे प्रकाश जावडेकर यांना उत्तम कामगिरीची बक्षीसी म्हणून
मनुष्यबळ विकास मंत्रीपदी बढती देण्यात आली. देशभरातून वेग-वेगळया राज्यांतून
प्रतिनिधीत्व असणा-या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून रिपब्लीकन पक्षाचे(आठवले गट) नेते तथा राज्यसभा खासदार रामदास आठवले
यांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून तर धुळे लोकसभा
मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री
म्हणून जबाबदारी देण्यात आली. यासोबतच केंद्रातील मंत्रिमंडळात मराठी मंत्र्यांची
संख्या वाढली असून सर्व महत्वाचे खाते त्यांच्याकडे आली आहेत.
देशाच्या विकासात पायाभूत सुविधा महत्वाची भूमिका
बजावतात.देशात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, रेल्वे, उर्जा, शिक्षण अशा महत्वाच्या
मंत्रालयांवर मराठी मंत्री उत्तम प्रकारे काम करीत आहेत. देशात राष्ट्रीय महामार्गांचे
जाळे निर्माण करण्याकरिता आणि बंदरे विकास करून समुद्र व नदयांद्वारे होणा-या
व्यापार उदिमास गती देणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी. रेल्वे अर्थसंकल्पात नव्या रेल्वेंगाडयांच्या
घोषणा न करता आहे त्या रेल्वे व्यवस्थेला सुधारण्याचे काम करणारे रेल्वे मंत्री
सुरेश प्रभु. उर्जा क्षेत्रात नव-नवे किर्तीमान स्थापीत करणारे केंद्रीय उर्जा
मंत्री पियुष गोयल यांना उर्जा मंत्रालयासोबतच आता खान मंत्रालयाचा स्वंतत्र
प्रभार सोपविण्यात आला आहे. देशात उत्तम व गुणवत्ता आधारीत शिक्षण देण्यासाठी आपण या मंत्रालयाचा मंत्री
म्हणून काम करू असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा नव्याने पदभार स्वीकारणारे
प्रकाश जावडेकर. केंद्र सरकार मधे श्री.
जावडेकर यांनी माहिती व प्रसारण आणि पर्यावरण व वने मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा
पदभार उत्तमरित्या सांभाळला आहे. अवजड उद्योग विभागाचे मंत्रीपद भूषविणारे केंद्रीय
मंत्री अनंत गिते यांनीही या विभागाला नवी ओळख दिली . राज्याचे माजी मुख्यमंत्री
दिवंगत विलासराव देशमुख आणि राज्यातील
जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या खात्याचा पदभार या आधी सांभाळला आहे.
केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच राज्यमंत्री पदावरही
महाराष्ट्रातील मंत्र्यांची कामगिरी चमकदार राहीली आहे. खते व रसायन राज्यमंत्री
म्हणून चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी राज्याचे भक्कम प्रतिनिधीत्व केले. मंत्रिमंडळ
विस्तारात त्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल सदैव पुढाकार घेणारे लोकनेते रामदास आठवले यांना देशात
सामाजिक न्याय प्रस्तापित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक न्याय व
अधिकारीता मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देऊन महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. व्यवसायाने
कँसर तज्ज्ञ वैद्यक असणारे धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना
संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि या मंत्र्यांनी नुकताच
आपला पदभार स्वीकारला आहे.
केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच आता राज्यसभेवर
महाराष्ट्राच्या कोटयातील नव्या खासदारांची निवड करण्यात आली आहे. यात सामाजिक
विषयावर आणि सुशासनावर पकडअसणारे डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, प्रसिध्द नेत्र तज्ज्ञ
पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचा समावेश आहे.विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल,
पियुष गोयल आणि संजय राऊत यांची राज्यसभेवर फेर निवड करण्यात आली आहे. तसेच, माजी
केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचीही निवड महाराष्ट्रातून राज्यसभेवर झाली आहे.
राष्ट्रपतींना विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची
राज्यसभेवर नामनिर्देशीत सदस्य म्हणून निवड करण्याचा अधिकार आहे. यानुसार त्यांनी
नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्रसिध्द
अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव आणि छत्रपती शाहू
महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांची निवड करण्यात आली आहे. विविध
क्षेत्रात उत्तम कार्य करणा-या १२ व्यक्तींची निवड राष्ट्रपतीं करतात सध्या या
एकूण १२ सदस्यांमधे महाराष्ट्रातून श्रीमती अनु आगा, श्रीमती रेखा गणेशन आणि श्री.
सचिन तेंडुलकर, डॉ. नरेंद्र जाधव आणि छत्रपती संभाजी राजे अशा एकूण ५ मान्यवरांचा
समावेश आहे.
राजधानी दिल्लीतून देशाचा धोरणात्मक व्यवहार चालतो.
यात महाराष्ट्राच्या प्रतिनिधीत्वाचा वाढता सहभाग राज्यासाठी भुषणावह आहे तसेच तो, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या बिरूदाला साजेसा असाच आहे.
०००००
-रितेश मोतीरामजी भुयार
-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
Friday, June 17, 2016
असेही घडते
स्थळ महाराष्ट्र
सदनाचे व्हिआपी डायनींग. वेळ सायंकाळ ७.१५ वाजता ची . प्रसंग होता पत्रकार
परिषदेचा. आम्ही कार्यालयाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते सर्व पत्रकार
आलेत मी दुस-या रांगेत बसलो होतो. कोणी पत्रकार येणार म्हणून मी मुद्दाम मागे बसलो
होतो. एवढयात राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवर आले व त्यांना खूर्ची खाली दिसताच
त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत मानेनंच पुढील खुर्चीवर बसण्यास सांगितले. हा
प्रसंग म्हणजे ध्यानी मनी नसताना एकदम ओढवलेली अतिरीक्त जबाबदारीच होती. पण अनपेक्षित असल्याने असेही घडते हा नवा अनुभव
गाठीशी आला.
दिनांक १५
जून २०१६ रोजी राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री यांचा दिल्ली शासकीय दौरा सकाळी ९.४५ वा. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या भेटी पासून सुरु
झाला. मंत्री महोदयांनी दिवसभर विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि राज्याच्या
विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. या भेटीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने विविध महत्वाचे निर्णय व करारही झाले. या
सर्वांची माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्रिमहोदयां सोबत कदम ताल ; एक अविस्मरणीय अनुभव
(येथे देण्यात आलेले छायाचित्र हे इंग्लडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचे
आहे.)
अहो इथून
गडकरी साहेबांच्या कार्यालयात आपल्याला पायी जाता येईल का? हा
राज्याच्या कॅबीनेट मंत्री महोदयांचा मला सवाल ! तेवढयाच समय
सूचकतेने आणि विचारपूर्वक व तत्काळ मी दिलेल उत्तर, ‘हो सर, नक्की जाता येईल.’ स्थळ,
दिल्लीतील ‘श्रमशक्ती भवन’ अर्थात
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाची इमारत याच इमारतीत कामगार मंत्रालयही आहे. राज्याचे
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे नदीजोड प्रकल्पाच्या विशेष समितीच्या ९ व्या बैठकीत
सहभागी होण्यासाठी आले होते. ही माहिती कळताच मी मंत्रालयात पोहचलो तेच कळल की, साहेब
बैठक आटोपून खाली स्वागतकक्षाकडे येत आहेत. तोच निर्णय घेतला स्वागतकक्षाजवळच
थांबायच. थोडया वेळात मंत्री महोदय आले. त्यांना नमस्कार केला. औपचारीक गप्पांनंतर
त्यांनी विचारल की आपल्याला गडकरी साहेबांकडे पायी जाता येऊ शकते का? मी एैकल त्यांच मंत्रालय इथेच आहे . मी या भागात
पत्रकारिता केली असल्याने मला माहिती होत की, या मंत्रालयाच्या मागील दाराने आरबीआय,पीटीआयच्या
कार्यालयांकडून गडकरी साहेबांच्या ‘परिवहन भवन’ या मंत्रालयात जाता येतं.
मंत्रीमहोदयांनी ड्रायव्हरला सांगितले
‘आप गडकरी साहब के मंत्रालय में जाकर खडी करो गाडी,
हम पैदल ही जाएंगे’ ड्रायव्हर म्हटला’ ‘जी सर’. मंत्री महोदय, महाराष्ट्र सदनाचे
राजशिष्टाचार अधिकारी आणि मी असे आम्ही
तिघेही पायी निघालो. गिरीष महाजन हे शरीरयष्टीने सदृढ आणि तंदूरुस्त असल्याने
त्यांना अस out of box जाऊन वागन आवडत. त्यांच्यासोबत चालणे
म्हणजे मलाही आपला चालण्याचा वेग वाढवावा लागला. बघता बघता आरबीआय, पीटीआय बिल्डींग
क्रॉस करून आम्ही परिवहन भवन अर्थात गडकरी साहेबांच्या कार्यालयाच्या प्रवेश
द्वारावर आलो. तिथेच पोलीसांनी विचारण्याच्या आत मी सांगितले यह हमारे मंत्रीसाहब
है महाराष्ट्र के जो गडकरी साहब से मिलने जा रहे है. आता याच दारातून मोटारीने आत
जाणारे मंत्री व त्यांच्यासोबत सुरक्षेचा ताफा पाहणारे हे पोलीस महोदयही अवाक झाले की, चक्क
महाराष्ट्रा राज्याचे मंत्री महोदय पायी
येऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटायला जातात.
६ मजली मंत्रालयाच्या इमारतीच्या तळ
मजल्यावरही एकदा तपासणी होते तिथेही मी पुढे गेलो आणि सांगितलं, यह हमारे
मंत्रीसाहब हे जो गडकरी साहब से मिलने आए है. तसेच साहेबांना लीफ्टने घेऊन गडकरी
साहेबांच्या ऑफीसकडे गेलो . गडकरी साहेबांना यायला उशिर होता तोच मंत्रीमहोदयांना
गडकरी साहेबांच्या चेंबर मधे बसविण्यात आले. मग मी ही त्यांच्यासोबत गेलो.
मंत्रीमहोदयांशी बोलून बातमी घेतली आणि त्यांची रजा घेऊन मी कार्यालयात परतलो.
रमजान महिना आणि जामा मस्जिदीतील उत्साह
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीना सुरु आहे. देशातील
सर्वात मोठी मस्जीद म्हणून ओळख असणा-या दिल्लीतील ऐतिहासिक ‘जामा मस्जिद’ येथे रमजान निमित्त उत्साहाचे वातावरण
दिसून येत आहे. देश-विदेशातून दिल्ली भेटीसाठी येणा-या विविध धर्मियांची जामा
मस्जिद येथील लगबग राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यास पुरक ठरत आहे. पवीत्र
रमजान निमित्ताने जामा मस्जिद समोरील मिना बाजार ,चांदणी चौक, नयी सडक या
बाजारपेठांसह परिसरातील गल्या तर शेवय्या, खजूर, सुखामेवा या खाद्य पदार्थांसह
टोप्या, अत्तर आदी वस्तूंनी फुलल्या आहेत.
इस्लाम कॅलेंडर नुसार रमजान हा वर्षातील नववा महिना
पवीत्र मानला जातो. या महीन्यात संयम आणि दान वृत्ती वाढविण्यासाठी व धार्मीक
कार्यातून मानवीय भावना वृध्दींगत करण्याचा संदेश देण्यासाठी ‘रोजे’अर्थात उपवास ठेवण्यात येतात. मुस्लीम धर्मामधे
रमजान महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यातील उपवासानंतर चंद्र दर्शन
झाल्यावर ‘ईद उल फित्र’ साजरी होऊन
रमजानचा समारोप होतो. यावर्षी इंग्रजी कॅलेंडरच्या जून महिन्यातच हा रमजान आला
आहे. सध्या देशाच्या विविध भागांसह देशाच्या राजधानीतही उन्हाचा प्रकोप आहे. अशात
दिवसभर आपले नियमीत व्यवहार सांभाळून नमाज अदा करणा-यांची नियमीत लगबग सध्या जामा
मस्जिम मधे बघायला मिळत आहे. सायंकाळची नमाज अदाकरून उपवास सोडणा-यांच्या गर्दीने
मस्जिदीच्या वरांडयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
जामा मस्जिदीचा परिसर हा सर्वधर्म समभावाचा आणि
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आहे. पंतप्रधानांचे देशाला संबोधन ज्या
ऐतिहासीक लाल किल्याहून केले जाते तो लाल किल्ला, चांदणी चौकातील प्रसिध्द जैन
मंदिर आणि शिख धर्मियांच्या त्याग व बलिदानाची ओळख पटवून देणारा शिषगंज गुरुद्वारा
याच परिसरात आहे. त्यामुळे इथे माणसांची दिवसभर वर्दळ असते. याच परिसरात देशातील
सर्वात मोठी जामा मस्जिद आहे आणि प्रसिध्द मिना बाजार आहे.
आग्रा येथील ताज महाल या स्वर्गसुंदर वास्तूनंतर मोगल
बादशाह शहांजहांने दिल्लीतील आपल्या वास्तव्यादरम्यान १६५६ मधे ऐतिहासिक जामा
मस्जिदीची स्थापना केली. ही मस्जिद म्हणजे हिंदू व मुस्लीम वास्तू कलेचा उत्तम नमुना आहे. लाल दगडांनी निर्मीत दोन भल्या उंच मिनार आणि
काळया पांढ-या संगमरवरी दगडांनी निर्मीत तीन मोठाली घुमट आणि चार स्तंभ येथे
येणा-या प्रत्येकाच्या डोळयात भरावे एवढया सुबक आहेत. हात पाय धुण्यासाठी
मस्जिदीच्या १०० मिटर एैसपैस व्हरांडयातील भला मोठा हौद. इथे एकाच वेळी १०० जण हात-पाय
धूवू शकतात. महिला, पुरुष आणि लहान चिमुरडयांपासून ते वयोजेष्ठ इथे शिस्तीत हात
पाय धूवून नमाज अदा करायला मुख्य मस्जिद मधे जातात. मस्जिदीचे प्रार्थना स्थळ
विशालकाय आहे २६० खांब आणि ११ मेहराबांवर
निर्मित प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी एकाच
वेळी हजारो भाविकांना नमाज अदा करण्यासाठी पुरेल एवढी जागा इथे आहे. प्रार्थनास्थळ
आणि व्हरांडा मिळून एकाचवेळी इथे २५ हजार भाविक नमाज अदा करू शकतात या वरून
देशातील सर्वात मोठी मस्जिद असल्याचा प्रत्यय येतो. व्हरांडयातच काही ठिकाणी महिलांना
बसण्याची व कुराण पठण करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.
सायंकाळची नमाज झाल्यानंतर मस्जिदीच्या आजुबाजुचा परिसर
माणसांनी गजबजू लागतो. मिना बाजार, चांदणी चौक आणि नयी सडक भागातील खाद्य
पदार्थांच्या दुकानांवर लोकांच्या रांगाच-रांगा लागतात. फळ फळावळ, खाद्य
पदार्थांच्या थाळींसह सर्वजन मस्जिदीत प्रवेश करतात. मस्जिदीला एकूण तीन दार आहेत
आणि प्रत्येक दारावर प्रेवशाच्यावेळेस सर्वांना सुरक्षा तपासणीतून जावे लागते.
पादत्राणे आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, इथे स्वच्छतेची पूरेपूर काळजी घेण्यात
आली आहे. हात-पाय स्वच्छ धुवून सर्वांची नमाज अदा करण्यासाठी लगबग आणि निर्वाण
शांतता असचं चित्र असतं सायंकाळच्या नमाजच्या वेळी. नमाज आटोपल्यानंतर व्हरांडयात सतरंजी,
चटई टाकण्याची सर्वांची घाई सुरु होते. बघता बघता येथे कुटुंबच्या कुटुंब
एकोप्याने गप्पा गोष्टींमधे आणि सोबत सोबत खाण्याचे व्यंजन काढण्यात व्यस्त असतात.
इथे रोजेदारांना(रोजा ठेवणारे)सामाजिक
संस्थांकडून उपवास सोडण्यासाठी निंबू सरबत, फळ फळावळ आदी अगदी सिस्थित वाटण्यात
येते. अगदी ८ ते १० वर्षांच्या मुला मुलींपासून वयोवृध्द ‘रोजे’ ठेवत असल्याचे चित्र बघायला मिळते.
रमजान निमित्त जामा मस्जिदचा परिसर धार्मिक आणि
राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने ओतप्रोत भरलेला व भारलेला आहे. वैविद्यपूर्ण भारत
देशाचे हे एक अनन्यसाधारण वैशिष्टय अनुभवन्याची परवणीच या निमित्ताने मिळत आहे.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
















