Monday, September 29, 2025
Thursday, September 18, 2025
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘नवीन नागपूर’
स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल; ‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव
आत्मनिर्भर भारताद्वारे समृद्ध गाव
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातच देशवासियांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सर्व क्षेत्रांना आवाहन करत आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. याला प्रतिसाद देत देशात विविध क्षेत्रांमध्ये देशी बनावटीच्या वस्तू व तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. याच दिशेने एक पाऊल पुढे जात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठेवला व त्यास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्याचे ठरले. त्यानुसार व्हाईस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक होवून हा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असलेली भौगोलिक व अनुषांगिक सर्व सज्जता असलेल्या नागपूर ग्रामीण मधील गटग्रामपंचायत सातनवरी या 1800 लोकवस्तीच्या गावाची निवड देशातील हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यासाठी झाली व त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
गेल्या दोन महिन्यापासून स्थानिक प्रशासनाने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि व्हाईस कंपनीने सातनवरी गावात मुक्काम ठोकला व या गावाला स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या दिशेने काम झाले. या प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी व व्हाईस कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेतला.
असे होत आहे सातनवरी स्मार्ट व इंटेलिजंट
सातनवरी गाव इंटरनेट सुविधांनी पूर्णपणे जोडण्यात आले आहे. वायफाय, हॉटस्पॉट आदींचा उपयोगही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रामपंचायत ते गावातील घरे, संस्था आणि गावात वायफाय, फायबर टु द होम (फटीटीएच), सॅटेलाईट सुविधा, 4 जी, 5 जी व अन्य वायरलेस तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्रॉडबॅन्डची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून देण्यात आली आहे. स्मार्ट शेतीला प्राधान्य देवून गावातील शेतांमध्ये सेन्सर बसविण्यात आले आहे. याद्वारे शेतीतील पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, माहिती, पीक पद्धतीचे नियोजन आदी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध झाली आहे. या गावातील शेतकरी ड्रोन व सेन्सर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींच्या योग्य नियोजनाद्वारे पर्यावरणपूरक शेतीसह उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अग्रेसर झाले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारत आहे. हेल्थ कार्ड, टेलिमेडिसिन आदींचा उपयोग होवून गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होत आहे व शहरांकडे होणारी गावकऱ्यांची पायपीट आता थांबत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर या उपक्रमामध्ये सहभागी होवून ग्रामस्थांना आरोग्य सुविधांचा लाभ देत आहेत. गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धीमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होवून वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे. शाळा व अंगणवाडीमध्ये स्मार्ट ईसीसीई व्हिडियो मार्गदर्शन पुस्तक, ए.आय. च्या माध्यमातून रिमोट क्लास रूम तसेच डिजिटल अंगणवाडी केंद्र या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या गावात ई-स्कील सेंटर, मोबाईल हेल्थ कनेक्टिविटी आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. संगणकामुळे ग्रामपंचयातमधील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होत आहेत. तसेच ग्रामस्थांना वायफायच्या माध्यमातून गाव व शहराशी जोडणे सुलभ झाले आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तलावांमधील मत्स्यपालनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यातील घटकांची माहिती डॅशबोर्डवर दिसत आहे. ग्रामपंचायतीने स्मार्ट पथदिवे लावले असून यामुळे विजेची बचत होत आहे. स्मार्ट कॅमेरांचा उपयोग करून गावात ठिकठिकाणी टेहळणी सुरू आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून गावातील पेयजल वितरण व गुणवत्ता नियमन करण्यात येत आहे. स्मार्ट गर्व्हनन्स, स्मार्ट कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट अग्निशमन व्यवस्था उभारण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जगात विविध क्षेत्रात क्रांती घडत आहे. भारतातही तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वदेशी कंपन्यांनी एकत्र येवून समृद्ध गावाचा आदर्श निर्माण करण्याचा ध्यास धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पास पूर्ण सहकार्य देवून देशाला दिशादर्शक ठरेल असे सातनवरी गाव स्मार्ट व इंटेलिजंट करण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाची संपूर्ण मदत दिली. त्यातून उभे राहिलेले हे गाव आता प्रगतीच्या वाटेवर आरूढ झाले असून आधुनिक जगातील एक आदर्श गाव म्हणून सातनवरी नक्कीच आपली ओळख भारतासह जगाला करून देईल याची खात्री पटते.
हातमाग व विणकारांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न
Wednesday, September 17, 2025
‘सिव्हिल लाईन्स’ ते ‘धंतोली’तील सकाळचे नागपूर
रस्त्याने शिस्तीत धावणारी तरुण मंडळी, सिटी बसेसची लगबग, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम,भीक मागण्याच्या तयारीत असलेल्या चिमुरड्या मुली, आपल्या आईच्या डोक्यावर कॅन ने पाणी ओतणारा मुलगा आणि आयसियु मध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकाच्या तब्येतीत सुधार होण्याच्या आशेने हॉस्पीटलच्या व्हरांड्यात झोपलेली मंडळी अस चित्र सकाळी ६.१५ ते ७.०० वाजे दरम्यान नागपूरच्या सिव्हिल लाईन्स ते धंतोली या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भागाचे.
काल रात्री वरुण राजाची जोरदार बॅटिंग झाल्यानंतर वाटल होतं नागपूर सुस्तावल असेल पण, पोटाची खडगी भरण्यासाठी सायकलवर बुड्डी का बाल (हा शब्द आमच्या बालपणातील आता त्याला कँडी म्हणतात सोपेस्टीकेटेड लँग्वेज मध्ये),फुगे व खेळणी बांधून निघालेला व्यक्ती बघून माझ्यातही उत्साह संचारला. मग थोडा विचार केला हा आपल्या समाजाचा एक घटक आहे. या व्यक्ती सारख्या कित्येक व्यक्तींच्या सायकली एव्हाना महाराष्ट्र आणि देशाच्या असंख्य भागात रस्त्यावर धावत असतील असा विचारही मनात आला.
सर्व महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालये, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, आकाशवाणी, विधिमंडळ असणाऱ्या या रस्त्यावर मार्गस्थ झालो तसा एका पाठोपाठ धावणारी 25-35 वयोगटातील तरुण आणि जोडीला साठी ओलांडलेली स्त्री व थोडा वेळाने पुरुषही दिसले. आकाशवाणी चौकात तर एवढ्या सकाळी गळ्यात गळा घालून चालणारी युगल जोडीही दिसली.
येथून पुढे युटर्न घेत महाराजबाग कडे जाताना एका-मागोमाग मोरभवन कडून येणाऱ्या व आपल्या गंतव्य स्थानकाकडे जाणाऱ्या सिटी बसेसचे दर्शन घडले. बसेस मध्ये चालक व वाहक वगळता तुरळक प्रवासी दिसले. मग विचार केला चालक-वाहक मंडळी कर्तव्यावर उपस्थित होण्यासाठी घरून किती वाजता निघत असेल बरे ! हा विचार करता थोडा पुढे चालताच झालो तर सर्वोच्च प्रतिष्ठितांच्या बंगल्यातून भली मोठी चार चाकी निघताना दिसली म्हणून औत्सुक्याने आजूबाजूच्या बंगल्यांना न्याहाळले तेव्हा लक्षात आले ही बंगल्याची मालक मंडळी बहुतेक एडवोकेट,जजेस आणि सीएच आहेत. वाटेत एक भली मोठी निर्माणाधीन इमारत जवळपास 30 माळ्यांची दिसली त्याहून लक्ष ढळत नाही तर नागपूर विद्यापीठाच्या विस्तारित इमारती समोर एक तरुण-तरुणी ‘मेरा नंबर कब आयेगा’ अशा काहीश्या स्थितीत मला लांबूनच दिसली जवळ गेल्यावर कळलं आज स्टाफ सिलेक्शन कमिशनची येथे ऑनलाइन परीक्षा आहे.
महाराजबाग पासून बर्डी कडे वळण घेतले आता मात्र अमरावती रस्त्यावरील सुसाट रहदारी येथे दिसत होती. आता या रस्त्याहून मोरभवन या सिटी बसेस मध्यवर्ती स्थानकाच्या मागच्या बाजूचा रस्ता घेत हे मार्गस्थ झालो. वाटेत लागलेली नालासदृश्य नागनदी आणि त्यात स्नान करणारे वराहराज पाहून गंमत तर वाटली पण नदी खोलीकरण व विस्तारीकरणाची सकारात्मकबाब दिसून आली. म्हणजे कितीही जोराचा पाऊस आला तरी या नदीतून पाण्याचा विसर्ग सहज होऊ शकतो. एवढ्यात मोरभवनच्या टर्मिनल 4 वर गाड्यांची ये-जा करण्याची गती वाढल्याचे चित्रही दिसले. तिथून पुढे जातो तोच चार-पाच लोकांचा घोळका दिसला तरी फारशी बाब काही लक्षात आली नाही. जस-जसं या घोळक्याचा आणि माझं अंतर कमी होत होतं तशीही फारशी काही कल्पना आली नाही. मात्र, जसं या घोळक्याच्या जवळ आलो. तिथं रक्ताने पूर्णपणे माखलेला एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. अगदी आपाद मस्तक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व्यक्ती एवढ्या सकाळी मी पहिल्यांदाच बघितला.
प्रथमदर्शनी तर वाटलं की हा मृतदेह असाव. पण त्या इसमाचा पाय हलत होता हे पाहून चित्र लक्षात आलं की या इसमाला प्रथमोपचार मिळावे म्हणून हा घोळका प्रयत्नरत होता.
झाशी राणी पुतळ्याकडे व तिथून लोकमत चौकाकडे आता माझा मार्च सुरू झाला. यालाच धंतोली भाग म्हटल जात. पहिल्या चौकात दर्शन झाले ते साधारण 8 ते 12 वर्ष वयोगटातील चिमूरड्या मुलींचे. हातात कसल्याशा प्लास्टिकच्या कटोऱ्या आणि त्यांच्यात आपसातच सुरू असलेल नियोजन बहुतेक भिक्षा मागण्याचे. इथून पुढे दुभाजकावर अर्थात फ्लाय ओव्हरच्या खाली बहुतेक संसार थाटलेले दिसतात. यांचीही सकाळ झाली होती. कोणी गप्पा हाणण्यात, तर कोणी काहीतरी हादडण्यात व्यस्त असताना पन्नाशी-साठीतील एक स्त्री आपल्या चेहऱ्याच्या दिशेने केस पूर्णतः वळवत असल्याचे लक्षात आले. तेवढ्यात तिच्या मुलाने पाण्याच्या कॅनमधून जलधारा सोडण्याचे खास कौशल्य व या महिलेने केश सांभार स्वच्छ करण्याचा चालवलेला प्रयत्न पाहूनही मी थक्क झालो.
आता या पायदळ वारीची सांगता होताना चक्षुनी टिपलेली दृश्येही सांगता होतो. आयसियुमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना थांबणेही आवश्यक असल्याने व जागा उपलब्ध नसल्याने हॉस्पिटलच्या रिसेप्शन शेजारीच गाढ झोपलेले नातेवाईक व स्टाफची सारखी ओरड ‘चलो सब जगजाओ फर्श की सफाई करनी हैं’. अशात केविलवाणे नातेवाईक आवर-सावर करण्याची ही वेळ. आता मला सांगितलं होतं की डॉक्टरांची अपॉइंटमेंट सकाळी 7.00 वाजता घेतली जाते तर तो डेस्क पूर्ण रिकामा त्यांनीच दिलेल्या ऑप्शन नुसार मोबाईलवर संपर्क करतो तर मी फोन करतो तेंव्हा आतून एक फोन नेमका खणखनण्याचा आवाज येत होता मग लक्षात आलं येथील वेळेच नियोजन. सरते शेवटी 7.45 वाजता मी नातेवाईकासाठी अपॉइंटमेंट घेतली व इथेच माझ्या या पायदळ वारीचा सुखांत झाला.
पण या सर्व प्रवासात, शहरातील सकाळची लगबग व त्यात समरस होत जाणारी सामाजिक परिस्थिती ठळकपणे दिसून आली. अर्थातच हे शहरातील एका भागाचं प्रातिनिधिक अवलोकन आहे हेही तेवढच खरं.
00000
Tuesday, August 19, 2025
आजपासून सवय बदलणार ….. मनाला हुरहूर
घडयाळीत सायंकाळचे ६.३० वाजले की आपसूक पायांना चाहूल लागायची एका ठिकाणाची. मग, कार्यालयाचा जिना उतरुन नजिकच्या गिरीपेठ किंवा लॉ कॉलेज रोडच्या बस थांब्याकडे (नागपूर) मार्गस्थ होणे, मग दाभा किंवा मारुती सेवा थांब्यापर्यंत मिळणारी सीटीबस किंवा ऑटो घेणे, वेळ झाला तर मारुती सेवा थांब्यापासून घ्यायला जिवाभावाचा व्यक्ती येणे नाही तर पायी चालण्याचा आनंद घेत पुढे जाणे, मग एकदाचा गंतव्यस्थानावर पोहचून 'त्या वास्तूत' प्रवेश केला की खूप बर वाटणे असं सर्व घडत होतं गेल्या पावने तीन वर्षांपासून आज त्याला पूर्ण विराम लागत असल्याने हुरहूरपणाची ही भावना काही तरी हरवल्याचं आतून सांगतीये.
आयुष्याचे विविध टप्पे ओलांडतांना पदोपदी अडचणी मग प्राप्त अनुभवाच्या जोरावर व कमवलेल्या आत्मविश्वासाच्या एकमेव शस्त्राने या लढाया जिकंतही आलो. मग हा प्रवास शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण आणि नोकरी मिळविण्याचा असो त्यात गाव,निमशहर,शहर,महानगर,पर राज्य अशा ठिकाणी वास्तव्य व त्याच्याशी लळाही ओघानेच आला.पण, यावेळी त्या पलीकडे जावून हुरहूर वाटण्याचा अनुभव हा काही वेगळाच आहे. याला कारणीभूत आहेत स्वच्छ व निर्मळ मनाची माणसं व त्यांच्या गोतावळयाची सवय आणि त्यातून आलेला आपलेपणाचा ओलावा, जो अन्य ठिकाणांहून निघतांनापेक्षा यावेळी सरस आहे म्हणूनच प्रभावीही आहे.
घरापासून दीड शेकडा कि.मी. दूर अंतरावर नियमित अंतराने सतत पावने तीन वर्ष जाणे, मग तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे व मग त्या वातावरणाचाच एक भाग होणे म्हणता म्हणता त्यात समरस होवून जाणे हा या सर्वांचाच तर परिपाक नाही ना !. हा गोतावळा मिळण्याचे कारण ठरते नोकरी निमित्ताचे वास्तव्य व आपल्या वाटणाऱ्या उदार मनाच्या माणसांचा मदतीचा हात. आणि सुरु झाला हा प्रवास. या वास्तूत आपली समस्या घेवून आले आणि तीचं समाधान शोधून जीवनात योग्य मार्गाला लागलेले हजारो लोक यात मिळाले. त्यांचे भावविश्व व ‘स्व’ सोबतच्या त्यांच्या लढाईत या वास्तूने दिलेला आधार आजपर्यंत अगदी ठळकपणे जाणवत होता. तसाच तो काही व्यक्ती ही लढाई हारत पुन्हा या वास्तुचा आसरा घेताणाही आढळले.
पण अप्रूप वाटत होतं या वास्तुची शान वाढविणाऱ्या त्या प्रामाणिक हातांचे, त्यांच्या त्यागाचे व इथे बरे होण्याकरिता आलेल्यांना २४x७ तास सांभाळण्याचे.या हातांचे स्वत:चे प्रश्न आहेत पण त्याला मुरड घालत इतरांना सुखावह वाटाव म्हणून सदैव हास्य वदनी ही मंडळी बरच मोठ अनुभवाच गाठोड देवून गेली. यांची खरी कसरत ही आर्थिक परिस्थितीपासून सुरु होवून त्याभोवतीच्या असंख्य बारीक-बारीक कंगोऱ्यांशी जुळलेली आढळतात. पण त्यांच्यासोबतचा सहवास सदैव भारी वाटायचा.मला वेळ होत असल्याचे पाहून काळजीपोटी येणारा फोन दरम्यान तुम्ही केंव्हा येणार पासून सुरु होणारा संवाद माझ्या जेवणाची व्यवस्थाही लावून जायचा. आस्थेने विचारपूस अन् सुख दु:ख वाटणारी मंडळी कधी मधी माझ्या गायनाचीही साथीदार व्हायची तर मारुती सेवा थांब्यापर्यंत नेण्यासाठी आनंदी चेहऱ्याने सारथ्यपण करायची. गेल्या पावने तीन वर्षात यातील कित्तेक गेलेत नव्याने आलेत जुने गेले अन् पुन्हा आले अस हे सत्र सुरुच राहिल. पण दु:खीतांचे अश्रू पुसणारी ही वास्तू त्यांना आश्रय देत राहिल हेही तेवढेच खरे.
हा हा करता हा प्रवास बऱ्याचदा अनपेक्षित घटना घडण्याचे अनुभवही देत गेला. पण, ही घटना आपल्यासोबत घडावी हा योगही जुडवून गेला. जेवणासाठी हाक मारणारा आवाज आता घरातील वासे फिरताच आपसूक फिरला आणि वाटलं आता हीच वेळ आहे थांबण्याची.
जीवन हा एक निरंतर प्रवास आहे.यात अनेक लोक भेटतात बरेच थांबेही येतात. मात्र पावने तीन वर्षांचा हा थांबा काही ओरच होता कायम स्मरणातला व कृतज्ञभावही व्यक्त करणारा. तसेच लळा लागण्याची सवय बदलविण्यास लावणारा आणि संत वचनातून संदेश देणारा की, "पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती,तैसे असावे संसारी , जोवरी प्राचीनाचीदोरी..."
००००००
Thursday, August 7, 2025
कृतकृत्यतेची अनुभूति
आपण करीत असलेल्या कामाची पावती देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळया आखिव रेखिव पद्धती ठरलेल्या आहेत.शासकीय कामांची पावती म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांना गोपनिय अहवालाद्वारे याची प्रचिती येते. बर्गर किंग,सीसीडी आदी फुड आऊटलेट मध्ये एम्पलॉयी ऑफ द डे, विक, मंथ हे संबंधितांचा फोटो चिटकवून दर्शनीभागात लावल्याचेही निदर्शनास येते. मात्र लौकिकापलीकडे जावून तुमच्या कामाची पावती जर प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळाली तर ती कृतकृत्यतेची अनुभूति ठरते. आज हीच अनुभूति घेतली म्हणूनच लेखन प्रपंच.
नियमितपणे काही प्रबोधनात्मक विषय घेवून मांडणी करण्याचा माझा नियमित सिरस्ता आजही तसाच होता. यानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’वर मांडणी केली. समोर बसलेल्यांसोबत जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वत: उपस्थित राहू शकत नाही त्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहचावा म्हणून ध्वनिक्षेपकाचा (माईक) उपयोग करतो तसा तो आजही केला. विषय मांडून झाला आणि आता निघणार तेवढ्यात वयाची पासष्टी ओलांडलेले (जे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पहिल्या माळ्याहून श्रवण करीत होते.) अंगात पांढरा सदरा, पायजामा घातलेले एक निरागस गृहस्थ समोर उभे ठाकले आणि म्हणाले, “सरजी, पसायदानपर आपके विचार सुनकर बहुतही अच्छा लगा ! मै धन्य हो गयाहॅू आपको सूनकर, आपके प्रती आभार !” (त्यांच्या डोळयात आसवही तरळत होते) हे शब्द ऐकताच मी त्यांना चरणस्पर्श केला आणि नुसता अनुभव घेतला तो कृतकृत्यतेचा.
ही अनुभूति ताजी असतानाच कार्यालयाकडे जाण्यासाठी परम मित्राच्या गाडीवर बसलो तेव्हा कोणी समोरून येत असल्याचे बघून त्यांनी जागीच गाडी थांबवली.तेवढ्यात एका मुलीने समोर येत सदाफुलीचं फुलं दिलं ते फुल आनंदाने व आदराने स्वीकारुन मी भरुन पावलो व कृतकृत्यतेचा हा दुसार अनुभव लागोलग घेतला (पोस्ट सोबत इथं तेच फुल दिलं आहे.). मुळात त्या मुलीला मंचावर उभ राहण्यासाठी काही मार्गदर्शन करु शकलो आणि त्याप्रतीचा कृतज्ञभाव म्हणून हे सदाफुलीच फुल मी स्वीकारलं होत जे माझ्या कामाची पावती मी मानतो. खरे तर तुम्ही काम करत जायच असत फळाची अपेक्षा न ठेवता हे तेवढच खरं आहे. पण, कधीमधी असा अनुभवही You are on Correct Track सांगून जातो व नवी ऊर्जा देवून जातो हेही तितकच खरं.
००००००




















