Wednesday, October 23, 2024

संसदेत महाराष्ट्र गुणात्मकदृष्टया अव्वल-ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

 



संसदेत महाराष्ट्र गुणात्मकदृष्टया अव्वल
-ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली,१७ : महाराष्ट्राचा भारतीय संसदेतील इतिहास प्रेरणादायी आहे.सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना विधायक काम करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा बाणा संसदेत वेगवेगळया रुपात पहायला मिळतो म्हणूनच संसदेत गुणात्मकदृष्टया महाराष्ट्र अव्वल राहिला आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी आज मांडले.

                संसदेतील महाराष्ट्र या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे  २९वे पुष्पगुंफताना श्री. केसरी बोलत होते.

            देशाचे पहिले विधी मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र कन्या व देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपपंतप्रधान भूषविणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे पहिले अध्यक्षपद भूषविणारे दादासाहेब मावळणकरांपासून पुढे या पदावर सरस कार्य करणारे महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्ष नेते,कर्तबगार केंद्रीय मंत्री व उत्तमोत्तम संसदपटू देणा-या महाराष्ट्राची संसदेतील कामगिरी अभिमानास्पद आहे. विधायक कार्य करण्याचा मराठी बाणा जपत महाराष्ट्रातील नेत्यांनी संसदेत गुणात्मकदृष्टया उत्तम काम करून राज्याला संसदेत अव्वल स्थान मिळवून दिले आहे,असे श्री केसरी म्हणाले. 

            स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्राने संसदीय कार्यप्रणालीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महत्वाचे मंत्री होते. ते राज्यसभेचे सदस्य होते.त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व संसदेत होते. सोबतच काकासाहेब गाडगीळ हेही महाराष्ट्राचे मंत्री देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात होतेदेशावर आलेले संकट दूर करण्यात मराठी माणसं पुढे होती. चीनच्या भारत आक्रमनानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात बोलवून संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीश्री चव्हाण यांनी १९६५ मध्ये पाकिस्तान विरुध्दचे युध्द जिंकून भारतीय सैन्यास आत्मबल दिले. त्यानंतर त्यांनी गृह,अर्थ,परराष्ट्र व्यवहार ही खाती समर्थपणे सांभाळली आणि उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही वठविली असे श्री. केसरी यांनी सांगितले.

       लोकसभेचे पहिले अध्यक्षपद गणेश वासुदेव उर्फ दादासाहेब मावळणकर या मराठी माणसाने भूषविले त्यांनी उत्तम प्रथा पंरपरा संसदेत स्थापित केल्याशिवराज पाटील चाकुरकर लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी संसदेचे कामकाज दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहचविले. दूर चित्रवाणीद्वारे प्रश्नकाळ व महत्वाच्या चर्चा देशभर पोहचविण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी सभागृहाच्या कामाकाजाला वळण लावण्याचेही कार्य केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मध्यप्रदेशच्या असल्या तरी मूळ मराठी असलेल्या सुमित्रा महाजन यांची लोकसभाअध्यक्षपादाची कारकीर्दही उल्लेखनीय राहिल्याचे श्री केसरी म्हणाले.

            महाराष्ट्राच्या कर्तबगार मंत्र्यांचे ,खासदारांचे राष्ट्रीय स्तरावरील योगदान व संसदीय कामगिरी उल्लेखनीय आहेलोकसभेचे नेते म्हणून सुशील कुमार शिंदे यांना मान मिळाला आहे तर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कामगार नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगेसमाजवादी नेते एस.एम.जोशी,नानासाहेब गोरे,बॅ.नाथ पैमधू दंडवते,जॉर्ज फर्नांडीसविठ्ठलराव गाडगीळप्रमोद महाजनराम नाईक तसेच महाराष्ट्रातून निवडूण न आलेले पण अखेर पर्यंत मराठी बाणा जपणारे संसदपटू मधु लिमये,नानाजी देशमुख आदींनी संसदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवून उत्तम कार्य केलेमृणाल गोरे, प्रमिला दंडवते सरोज खापर्डे जयवंतीबेन मेहता या महिला खासदारांनीही संसदेत चमकदार कामगिरी केल्याचे श्री केसरी म्हणाले.  

            शंकराव चव्हाण यांनी गृहमंत्रीपदी केलेली कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहेत्यांच्या काळात पंजाबमध्ये शांततेत निवडणुका पार पडल्यात्याचवेळी जम्मू-काश्मीर व आसाम मध्ये शांतता प्रस्थापीत करण्यातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका वठविलीयशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर आणि सुशिल कुमार शिंदे यांनीही देशाच्या गृहमंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळलीदेशाचे अर्थमंत्री राहिलेले चिंतामणराव देशमुख यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनीही अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. सलग दहा वर्ष कृषीमंत्री म्हणून कार्य करणारे शरद पवार यांची कामगिरीही दमदार राहिली आहे.मधु दंडवते, राम नाईक ,सुरेश प्रभु आणि विद्यमान रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या रेल्वे मंत्रीपदाची वेगळी छाप सोडली आहे. दिलेली जबाबदारी चोख व समर्थपणे पूर्ण करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा स्वभाव आहे म्हणूनच त्यांना केंद्रात विविध महत्वाच्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळाली व त्यांनी ती उत्तमरित्या निभवली, असे श्री. केसरी यांनी सांगितले.

             संसदेत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून जातात लोकशाहीच्या या मंदिरात महाराष्ट्राचा केवळ संख्येनेच नाही तर कर्तृत्चाने व गुणात्मकदृष्टयाही दबदबा आहेमहाराष्ट्राचा हा दबदबा सत्तेत दिसतो तसाच विरोधातही खुलतो म्हणूनच संसदेत महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहेराज्याचे हे स्थान भाविष्यातही कायम राहिल ,असा विश्वास  श्री. केसरी यांनी यावेळी व्यक्त केला.

   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     

     http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.विक्र.११०/दिनांक १७.०४.२०२  

दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका- ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक

 






दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक

नवी दिल्ली,१६ महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाज ही शंभर वर्ष जुनी संस्था,मराठी शाळा, मराठी मंडळे आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मराठी माणसांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैचारीक वारसा जपत दिल्लीतील महाराष्ट्राची पताका उंचाविली असल्याचे, मत ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक  विजय नाईक यांनी आज व्यक्त केले  

 

        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‍‍दिल्लीतील महाराष्ट्र  या विषयावर २८वे पुष्पगुंफताना श्री. नाईक बोलत होते.

 

             महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, बाडा हिंदुराव रुग्णालय,तालकटोरा उद्यान,नोएडा गोल्फ कोर्स येथील स्तंभ आदी वास्तू तसेच शिवाजी स्टेडियम, खाशाबा जाधव स्टेडियम, शिवाजी ब्रिज, तिलक ब्रिज, बाजीराव पेशवे रोड, न्या.सुनंदा भंडारे रोड अशा महाराष्ट्राच्या ठसठसीत खुणा आज देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये बघायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचे पद भुषवून प्रदीर्घ काळ दिल्लीत वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्राला आकार दिला तर दिल्लीत मराठी माणसांसाठी सदैव मदतीस तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ हे मराठी जणांचे आधारवडच ठरले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील मराठी संस्था. मंडळे व वेगवगेळया क्षेत्रात कार्यरत मराठी माणसांनी महाराष्ट्राची वेगळी छाप दिल्लीत सोडली असून राज्याची पताका अभिमानाने उंचाविली असल्याचे श्री नाईक म्हणाले.   

            जन्मभूमी अहमदनगर असलेले व गेल्या ५२ वर्षांपासून दिल्लीवासी  झालेले आणि सक्रीय पत्रिकारीतेत ४५ वर्ष कार्यरत श्री नाईक यांनी यावेळी दिल्लीतील महाराष्ट्राच्या वेगवेगळया पाऊल खुणांबाबत माहिती दिली. २०व्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीत मराठी माणसांची पहिली वसाहत नया बाजार भागात झालीमराठी लोकांनी एकत्र येत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या २ कि.मीअंतरावरील पहाडगंज भागात १९१९ मध्ये महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून मराठी सण,उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. पुढे दिल्लीत मराठी माणसाला हक्काची व अल्पदरात राहण्याची व्यवस्थाही संस्थेने बृह्नमहाराष्ट्र भवनच्या रुपाने केली, नुतन मराठी शाळाही पहाडगंज भागातच उभारली. पुढे खारी बावली, चांदणी चौक भागात मराठी लोकांचा विस्तार झाला आजही या भागात मराठा सेनानी गंगाधर यांनी बांधलेले शिवपार्वती मंदीर असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

मराठी महिलांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यकलापासाठी १९५३ मध्ये लोधी कॉलनी परिसरात वनिता समाजाची स्थापना झालीदिल्ली  राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात अंदाजे ३ लाख मराठी लोकसंख्या असून वेगवेगळया भागात जवळपास ४५ मराठी मित्रमंडळ कार्यरत आहेतनुतन मराठी शाळा, चौगुले पब्लिक स्कुल या मराठी शाळा दिल्लीत कार्यरत आहेतदिल्लीत कार्यरत मराठी अधिका-यांनी स्थापन केलेली पुढचे पाऊल संस्था व दिल्लीत दिवाळी पहाटचा अनोखा उपक्रम राबविणा-या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या अलीकडच्या संस्थांही दिल्लीत महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे श्री नाईक म्हणाले.

                     दिल्लीत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता‍ ‍दिल्लीतील महाराष्ट्राच्या महत्वाच्या तीन पाऊल खुणा सापडतात, असे श्री नाईक म्हणाले. १७३७-३८ मध्ये बाजीराव पेशवे यांनी मोघल सुलतान सादत खान याला पराभूत केले तेव्हा पेशव्यांच्या सैन्यांच्या येथील मुक्कामात त्यांना थाळी व कटोरीतून जेवन दिले जात असे म्हणून येथील उद्यानाला तालकटोरा उद्यान’ असे नाव पडले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील महाराजा दौलतराव यांचे जावई मराठा उमराव राजा हिंदुराव यांनी १८५७ च्या उठावानंतर जुन्या दिल्लीत मुक्काम ठोकला. १९५८ मध्ये त्यांच्या महालाचे रुपांतर बाडा हिंदुराव रुग्णालयात करण्यात आले. 

नोएडा येथील गोल्फ कोर्समध्ये १९१६ साली उभारण्यात आलेला स्तंभ आजही मराठा सैन्याच्या शौर्याची गाथा सांगत आहे. ४० फुट उंचिच्या या स्तंभावर २१८ वर्षांआधी मराठा सैन्यांनी या परिसरात गाजविलेल्या  शौर्याचा उल्लेख आढळतो   

                           दिल्लीतील  महाराष्ट्राची जडणघडण

            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले विधी मंत्री  झाले व त्यांच्या रुपाने दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री झाले. पुढे १९८४ पर्यंत केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत असताना त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात दिल्लीतील महाराष्ट्राची जडणघडण झाल्याचे श्री नाईक म्हणाले.महाराष्ट्राचे उत्तुंग नेते म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होतीच याबरोबरच साहित्याचे उपासक, कलाकारांना वाव देणारे त्यांचे व्यक्तीमत्व होतेदिल्लीत भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलाचे अध्यक्षपद श्री चव्हाण यांनी भूषविले होतेयानंतर दिल्लीत अनेक मराठी नाटके ,गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. दिल्लीत महाराष्ट्र घडविणा-या मान्यवरांमध्ये मराठी माणसांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळमहाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे मानद अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे,मुरलीधर भंडारे,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात भर घालणारे महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले रा.मोहेजीबपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव व राजदूत द्वय सुधीर देवरे आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे आदी मंडळींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

 यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रानेही दिल्लीतील महाराष्ट्राला बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगून परिचय केंद्राच्या आजवरच्या प्रमुखांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. उदरनिर्वाहासाठी दिल्लीच्या रस्त्यावर चहाची टपरी चालविणारे लक्ष्मण राव यांनी लिखणाचा व्यासंग जपला व आज ते ख्यातीप्राप्त लेखक झाले ॲमेझॉन, किंडल, फ्लीपकार्टवर त्यांची पुस्तके विकली जातात. जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अरबी समुद्रातील छत्रपती शिवराय, अयोध्येतील राममंदिरात रामाचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम करीत असलेले जय काकतीकर यांच्यासह राजकारण,प्रशासन,पत्रकारिता आदी क्षेत्रात दिल्लीतील मराठी माणसांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचाविली आहे.

     मराठी संस्था,मंडळे, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी महाराष्ट्राचा समृध्द वारसा जपत राज्याची पताका दिल्लीत उंचाविली असल्याचे श्री नाईक यांनी यावेळी सांगितले.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:

         http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.विक्र.१०८/दिनांक १६.०४.२०२      

 

 

 

प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहे- डॉ. ज्ञानेश्वर मुळे



 प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहे- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 

नवी दिल्लीदि. २५ : देशात प्रशासकीय सेवांमध्ये मराठी अधिका-यांचा टक्का वाढत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा वारसा पुढे घेवून जात हे अधिकारी महाराष्ट्राची ध्वजा अभिमानाने उंचावत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज केले.

 

           महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना  प्रशासकीय सेवेतील मराठी माणूस या विषयावर डॉ. मुळे बोलत होते.  

 

            गेल्या काही दशकांमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून गुवाहाटीपर्यंत मराठी अधिकारी संपूर्ण  देशभर कार्यरत आहेत. राजधानी दिल्लीतही विविध मंत्रालयात महत्वाच्या पदांवर मराठी अधिकारी महत्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. केंद्र शासनानाच्या विविध आयोगांवर व संस्थांमध्येही  महत्वाची पदे भूषवित आहेत. हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचे राजदूत असून त्या-त्या राज्यात तसेच राजधानी दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा प्रभाव पाडत आहेत, हे आश्वासक चित्र असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

 

            देशाच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत हे सर्व अधिकारी महाराष्ट्राचा सामाजिक,ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा पुढे घेवून जाण्याचे  कार्य जोमाने करीत आहेत. केंद्र सरकारमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे कार्यरत मराठी अधिका-यांसह येथील एकूण ५३ मंत्रालयांच्या विविध विभागात आपल्या ज्ञानाची व कौशल्याची छाप या अधिका-यांनी सोडली आहे. दिल्लीमध्ये अशा २०० हून अधिक अधिका-यांनी एकत्र येत पुढचे पाऊल ही संस्था स्थापन केली आहे. हे अधिकारी खासदार मित्र ही संकल्पना दिल्लीत राबवित आहेत. बहुतांश अधिकारी आपल्या जबाबदा-या सांभाळून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या तयारीसाठी येणा-या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विविध मंचांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.

 

            ‍िडॉ. मुळे यांनी यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तामीळनाडू,मध्यप्रदेश,ओडिशा,छत्तीसगड या राज्यांसह केंद्रशासीत  प्रदेशात  प्रशासकीय सेवेत मराठी अधिकारी करीत असलेले उल्लेखनीय कार्य व त्याला स्थानिक जनतेकडून मिळत असलेली कौतुकाची थाप यावरही प्रकाश टाकला. तामीळनाडूचे राज्यपाल आणि त्यांच्या ताफ्यातील सर्व महत्वाच्या पदांवर कार्यरत अधिका-यांच्या कार्याने अन्य राज्यांसमोर आदर्शवत चित्र उभे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या अन्य भागांप्रमाणेच इशान्येकडील राज्यातही प्रशासकीय सेवांमध्ये मराठी अधिकारी प्रभावीपणे कार्य करीत आहेत.आपल्या सेवेच्या माध्यमातून हे अधिकारी कर्मभूमी आणि जन्मभूमी यांना सांधणारा दुवा म्हणूनही कार्य करीत आहेत. नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगली अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाला खंबीर नेतृत्व देत सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे अधिकारी व त्यांचा त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडून झालेला सन्मान व कौतुकाचे अनेक उदाहरण असल्याचे डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले.

 

       दिल्लीसह अन्य राज्यातील प्रशासकीय सेवेत कार्यरत मराठी अधिका-यांनी त्या-त्या राज्यांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून जन्मभूमीशी नाळ कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. राज्या बाहेर प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील या सर्व अधिका-यांनी आपआपल्या जन्मभूमीत आणखी नवनवे प्रकल्प राबवावे अशी अपेक्षाही डॉ. मुळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील वेगवेगळया भागात स्थापन केलेल्या नागरी परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधून या अधिका-यांनी  रिसोर्सपर्सन म्हणून मदत करण्याची आवश्यकता असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. नुकतेच महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार  समिती नेमली असून या समितीद्वारे पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे यातही या अधिका-यांनी आपले योगदान दयावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

          राज्याबाहेर कार्यरत हे सर्व मराठी अधिकारी एकत्र आले तर महाराष्ट्र सर्वांगिण उन्नतीचे केंद्र बनेल. तसेच अन्य राज्यांना निश्चितच आपले अनुकरण करावे वाटेल. या संपूर्ण प्रवासात मराठी अधिका-यांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            

                        

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.६३ /दिनांक  २५.०३.२०२१

बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

 







बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

 

नवी दिल्लीदि. २४ : महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत राज्याच्या साहित्य, संस्कृती  व्यवहाराला पुढे आणण्याचे कार्य करणा-या बृह्नमहाराष्ट्राच्या चळवळीने राज्याची सशक्त प्रतिमा निर्माण करण्याचे  मोलाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे यांनी आज केले.  

     महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र या विषयावर श्री ढगे बोलत होते.

 

             बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत साहित्य, सांस्कृतिक  व्यवहाराला पुढे आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे म्हणूनच  देश व परदेशात ही  महाराष्ट्राची शक्तीस्थळे  ठरली असल्याचे श्री ढगे म्हणाले. अन्य राज्यात मराठी माणसांची  विविध क्षेत्रातील घौड-दौड महाराष्ट्राला पुरक आहे.अखिल भारतीय साहित्य महामंडळ,विश्व साहित्य संमेलन यामाध्यमातूनही बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या कार्याला जोडण्याचे व महाराष्ट्र संस्कृतीचे विश्वव्यापी काम झाल्याचे त्यांनी सांगीलते. तसेच या कार्यास  महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो याची अपेक्षा व प्रतिक्षाही बृह्ममहाराष्ट्रातील जनतेला असते असे ते म्हणाले. देशाच्या विविध प्रांतात व परदेशात आपले स्वत:चे स्थान निर्माण करत असताना आपल्या संस्कृतीला सतत जपणा-या बृहन्महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्रातील जनतेकडूनही काही सहकार्य मिळण्याची वा त्‍यांच्या सादाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

            मराठी संस्कृती व मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन करण्यासाठी मराठी नियत कालीके, मराठी शाळा-विद्यालये, ग्रंथालये, संशोधनकार्य आदींच्या माध्यमातून बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या उपक्रमांवरही श्री ढगे यांनी प्रकाश टाकला. विचार आणि स्नेहाचे आदान-प्रदान अधिक वृध्दींगत होण्यासाठी बृह्ममहाराष्ट्र आणि महाराष्ट्र यामध्ये दुवा सांधणारी  एक चळवळ राज्यात निर्माण होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बृह्ममहाराष्ट्रात साहित्य निर्मिती प्रमाणेच अनुवादाचेही काम होत असे. मात्र, मराठी भाषेत होणारी साहित्य निर्मिती ही देशातील अन्य भाषांमध्ये हव्या त्या प्रमाणात जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्या-राज्यांतील अशा सांस्कृतिक व्यवहारांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा श्री ढगे यांनी व्यक्त केली.

 

                       महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले बृह्नमहाराष्ट्राला जोडणारे दुवे        

‍ि गोवा आणि दिल्ली  येथील  महाराष्ट्र परिच केंद्र आपल्या राज्याचा त्या-त्या राज्यांतील लोकांना परिचय करून देण्याबरोबरच दोन राज्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध व संवाद सेतु सांधण्याचे कार्य करीत आहेत. या परिचय केंद्रानी बृह्नमहाराष्ट्राला जोडणा-या दुव्यांप्रमाणे कामगिरी निभवली आहे. हे कार्य प्रत्येक राज्यात वाढत गेले तर महाराष्ट्राचा प्रभाव वाढण्यासाठी पूरक भूमिका साध्य केली जाईल. महाराष्ट्र मंडळ व परिचय केंद्र ही  चाकोरीत काम करणारी  नसून महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडणारी शक्तीस्थळ आहेत. त्यामुळे  यांची व्यापकता वाढवणे गरजेचे ठरेल यांना सोबत घेवून भविष्यात काम करावे लागेल ,असे श्री ढगे म्हणाले.

महाराष्ट्राने इतिहासात गौरवास्पद कामगिरी केली आहे व वर्तमानात उल्लेखनी कामगिरी करीत आहे आणि भविष्यातही या राज्याला वैचारीक नैतृत्व करण्याची संधी लाभणार आहे. या वैचारीक वारशाचा व औद्योगितकतेचा वसा पुढे नेत असताना एक प्रगल्भ विकास पूरक व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राने बृह्ममहाराष्ट्रातील ही  आपली जनसंपर्काची  साधने अधिक सशक्त करण्याची गरज आहे. भविष्यात ही साधने सशक्त झाल्यास महाराष्ट्र हे केवळ राज्याच नाही तर महाराष्ट्र हा एक विचार असेल, एक चळवळ असेल महाराष्ट्र ही देशाला जोडणारी व्यापक अर्थाने सशक्त भूमिका असेल असा विश्वास श्री. ढगे यांनी व्यक्त केला.

                        

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.६० /दिनांक  २३.०३.२०२१

मराठी पत्रकारितेला दिल्लीत मोलाचे स्थान - ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

 





मराठी पत्रकारितेला दिल्लीत मोलाचे स्थान - ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

नवी दिल्ली,३० : देशाची राजधानी असलेली दिल्ली हा पत्रकारिता क्षेत्रासाठी समुद्र आहे. यात मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व असून मराठी पत्रकारांनी उत्तम कार्यातून दिल्लीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर यांनी आज व्यक्त केले.  

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे बारावे पुष्प गुंफताना दिल्लीतील मराठी पत्रकारिता या विषयावर श्री बागाईतकर बोलत होते.

            दिल्लीतील मराठी पत्रकारिता, तिचे स्वरूप व या पत्रकारितेचा होत गेलेला विकास हा पट श्री बागाईतकर यांनी विविध घटनांचा उल्लेख करत व दाखले देत उलगडला. दिल्लीतील  महाराष्ट्र परिचय केंद्राची येथील मराठी पत्रकारितेच्या विकासातील महत्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

            सुरुवातीच्या काळात मराठी वृत्तपत्रांची दिल्लीत प्रतिनिधी नेमण्याबाबत असलेली उदासिनता आणि याचकाळात लेखक तथा पत्रकार जयंतराव टिळक यांनी दैनिक केसरीचे विशेष प्रतिनिधी म्हणून चमकदार कार्य करून मराठी वृत्तपत्रांची दूर केलेली उदासिनता यावर श्री बागाईतकर यांनी भाष्य केले. जयंतराव टिळकांनी मराठी  वाचकांना दिल्लीतील घडामोडी पुरविल्या. त्यांच्या अशी ही दिल्ली या साप्ताहिक सदरातून मराठी वाचकांना नियमीत माहिती मिळत असे .पुढे या सदारावर पुस्तक स्वरूपात दोन खंड प्रकाशित झाले ते वाचनीय आहेत, असे श्री. बागाईतकर म्हणाले. त्यानंतर दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ कुलकर्णी आले त्यांचीही वार्तापत्र खूप गाजली.

                                           बापुसाहेब लेले ; मराठी पत्रकारांसाठी आधारवड

        महाराष्ट्रातून दिल्ली या परमुलुखात आल्यावर येथील भाषा, संस्कृती, वातावरण या विपरीत परिस्थितीत काम करताना सुरुवातीला पत्रकारांना अडचणी येतात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब लेले हे दिल्लीत येणा-या मराठी पत्रकारांसाठी आधारवडच होते. दिल्लीतील पत्रकारितेत आपली वेगळी छाप सोडणारे श्री. लेले यांचा उत्साह विलक्षण दांडगा होता तसेच ते मृदू स्‍वभावाचे होते.महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या नवीन पत्रकारांना त्यांचा आधार वाटत असे. ते या पत्रकारांची आस्थेने चौकशी करत व त्यांना आवश्यक मदत करीत. मो .ग. तपस्वी हे मराठी पत्रकार मात्र, शिस्तीचे भोक्ते होते. दिल्लीत आलेल्या नवीन मराठी पत्रकारांच्या लिखाणातील त्रृटी दाखवून ते आस्थेने  समजावून सांगत व  मार्गदर्शन करत. हा काळ संपल्यानंतर वि.ना.देवधर हे महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी  म्हणून दिल्लीत आले त्यांच्याकात दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडल्या.

            गंगाधर इंदूरकर यांनी दिल्लीत हिंदी वृत्तपत्रामध्ये आपली वगेळी ओळख निर्माण केली होती.  यानंतर ब-याच मराठी पत्रकारांनी  दिल्लीतील अमराठी माध्यमांमध्ये उत्तम कार्य केल्याचे सांगून सुभाष किरपेकर, मधु साठे, सुनिल गाताळे ,व्यंकटेश केसरी  यांच्या कार्याचा उल्लेख श्री बागाईतकर यांनी यावेळी केला.

                                          मराठी वृत्तपत्रांना पटले दिल्लीचे महत्व

            पत्रकाराच्या अंगभूत वैशिष्टयांसह त्यांच्याकडून मराठीतून विश्लेषण, भाष्य हे वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना आपला दिल्लीत प्रतिनिधी असावा अशी निकड वाटू लागली. मराठी लेखणीतून दिल्लीतील घडामोडी येणे गरजेचे वाटू लागले व पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिल्लीत आपले प्रतिनिधी पाठवायला सुरुवात केली. गोविंदराव तळवलकर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असताना त्यांनी अशोक जैन यांना महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून पाठविले तर माधवराव गडकरी दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक असताना त्यांनी विजय नाईक यांना दिल्लीत पाठविले. लोकसत्ताने श्री पेंडसे यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले असा संदर्भही श्री बागाईतकर यांनी  दिला.

            दिल्लीतील आर्थिक, राजकीय, सामाजिक आदी घडमोडींमध्ये महाराष्ट्राचे स्थान राष्ट्रीय वृत्तपत्रातून आवश्यक तेवढे प्रदर्शित होत नाही. हे स्थान विस्ताराने व तपशीलाने व ठळकपणे देण्याचे काम मराठी पत्रकारांनी केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या मागे असलेले दिल्लीतील धागे-दोरे तसेच आतली माहिती देण्याचे काम या पत्रकारांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

            पत्रकारितेचा विकास व विस्तार होत गेला त्यानुसार मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांनी दिल्लीत प्रतिनिधींची संख्या वाढवली. आधी वृत्तपत्रीय पत्रकारितेचा काळ होता आता इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे युग आले आहे, आता त्यांनीही आपले प्रतिनिधी नेमले आहे. दिल्लीत वृत्तपत्र  व वृत्त वाहिन्यांचे ब्युरो कार्यालय स्थापन झाले व त्यात प्रतिनिधींची संख्याही वाढली. आणि हळू हळू दिल्लीतील मराठी पत्रकारिता बहरत गेली ही स्वागतार्ह बाब असल्याचे  मत श्री बागाईतकर यांनी मांडले.

                           प्रेस क्लब ऑफ इंडियांच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान

       प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील महत्वाच्या संस्थेच्या स्थापनेतही मराठी पत्रकाराचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत दि.रा.मकनेकर हे प्रेसक्लबचे संस्थापक सरचिटणीस हाते. पुढे या संस्थेत दिल्लीतील मराठी पत्रकारांनी विविध भूमिका सक्षमपणे वठविल्या.  दिल्लीतील मराठी पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व आहे. हा वारसा यापुढे आणखी विकसीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे आवाहन श्री बागाईतक यांनी केले .       

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००

रितेश भुयार /वृत्त.विक्र.७१ /दिनांक ३०.०३.२०२ 

 

Thursday, October 10, 2024

असमर्थतेची कुजबुज


                                          

         स्थळ,नागपुरातील दाभा परिसरातील सुरेश लाँड्री.  दुकानाच्या काऊंटरवर उभा झालो आणि आत डोकावतो तर इस्त्रीच्या कपडयांचा भला मोठा ढीग दिसून आला. अशात मी इस्त्रीसाठी कपडयांची पिशवी सोपवताच या लाँड्रीचे मालक सांगते झाले, साहेब कपडे नाही मिळणार तुम्हाला उद्या इस्त्रीचे !, दोन तीन दिवस लागतील. हवं तर दुसऱ्या लाँड्रीत टाका कपडे. आता नियमीत ग्राहक असल्याने मी त्यांना विनवनीच्या स्वरात निदान उद्या एक तर ड्रेस इस्त्री करून द्या, अशी विनंती केली तेव्हा हो नाही करत ते राजी झाले. मग स्वत:हूनच आपली असर्मथता सांगते झाले, बघा साहेब दुकानात कपडयांचा ढीग लागला आहे आणि माझ्याकडील कारागीर कामावर येतनाहीये.थोडया विस्मयाने व आपसूकच  मी विचारलं, का नाही येत कारागीर? त्यावर ते  प्रश्नार्थक स्वरूपात उत्तर देताना म्हणाले, ‘साहेब, आता या लोकांना घरबसल्या अन्न धान्य, यांच्या बायकांना पैसे यांच्या मुलांना स्टायफेंड मिळते मग नियमित कष्टाच्या कामाला कसे बरे येणार हे कारागीर!’.

 

        मग त्यांनी एक एक कॅलक्युलेशन सांगायला सुरुवात केली. बघा एका कपडयाच्या इस्त्रीपोटी ( एक शर्ट किंवा पँट इस्त्री करण्यासाठी) ८ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कारागिराला जातात. उर्वरित ४ रुपयांमध्ये दुकानच भाड आणि वीज बिल असा प्रत्येकी १ रुपया आणि एका कपडयामागे माझी मिळकत होते फक्त दोन रुपये. लाँड्री मालकाचं आर्थिक गणित समजून घेताना हे लक्षात आल की, हा प्रकार जणू  'मेहनत करे मुर्गी ओर अंडा खाये फकीर' या उक्तीला चपखल बसणारा आहे. म्हणूनच काकांना ग्राहक परत गेला तरी काही फरक पडत नसावा, असं मला वाटलं. त्यात भरीस भर म्हणजे काका सेवानिवृत्त कर्मचारी आहेत व त्यांना २० हजारांचे मासिक निवृत्तीवेतनही मिळते. मात्र, आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करणारे काका घरी बसून राहतील ते काका कसले !.या बद्दल लाँड्री मालकाचे कौतुकचं. प्रश्न आणि विषयाची मेख इथेच तर दिसून येते की, कारागिरासाठी नोकरी ही ऐच्छिक झाली आहे आणि हिच बाब मालकाची चिंता वाढवणारी ठरली आहे. हे चित्र शेतीतही दिसून येते. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे, शेतावर राखनदार मिळत नसल्याचे चित्र आहे. याही पुढेजात आस्थापणांवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे पदोपदी दिसून येते.

      किस्सा क्र. २ : स्थानिक सार्वजनिक वाहनाने कार्यालय गाठायचा माझा सिरस्ता आजही तसाच होता (त्याच्या मागचं लॉजिक असं की सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय घडत आहे. पर्यायाने समाजात काय घडतं हे कळतं.).

सिटीबसच्या चालक व वाहकांचा संप सुरु असल्याने ऑटो घेतला. बसताच कानावर ऑटोचालक व प्रवासी महिलेचा संवाद ऐकू आला. आमच्याकडे तर कामगार किट वाटत आहे एक आमदार अन ते घ्यायला तर लोकांची भली मोठी रांग आहे. लोक रांगेतील आपला नंबर जावू नये म्हणून रात्रभर मुक्काम करतात. त्यात भर घालत ऑटोचालक म्हणाला, ताई आमच्या भागातही काही चित्र वेगळ नाही अन् या कामगार सुरक्षा व संसार किटसाठी कागदपत्र लागतात म्हणून झेरॉक्सचे दुकान लावलेत तिथे लोकांनी आणि चक्क एका पानाच्या झेरॉक्ससाठी २० रूपये आकारतायेत. एवढच काय लोकांनी अल्पोपहाराची दुकानही थाटली आहेत  या रांगांच्या आजुबाजुला. एवढयात ऑटोचालकाला घरून फोन आला तो त्याने ऑटोतील प्रवाशांच्या जीवावर उदार होवून रिसिव्ह केला अन् फोन झाल्यानंतर त्या महिला प्रवाशा सांगता झाला आमच्या हिचा फोन होता की, किटसाठी नंबर लागला अन आपल्याला बी किट मिळून रायली.

       दोन वेगवेळे प्रसंग आहेत मात्र,यात माणसांना काही गोष्टी/वस्तू/ निधी मिळत असल्याचे आणि यामुळे याच समाजातील अन्य व्यक्ती असमर्थ झाल्याचे चित्र आहे. राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर समाजात घडत असणाऱ्या या बदलाचे निरीक्षण येथे चिंतन करायला लावणारे आहे (पण तेही ऐच्छिक आहे म्हणजे ज्यांना करायचे असेल त्यांना अन्यथा दररोज दिवस उगवतो व मावळतोच आहे).                                          

                                   ०००००