Saturday, March 13, 2021

व्हॅलेंटाईन विशेष २०२१

१७ व्या लोकसभा निवडणुका एक स्वर्णीम आठवण

दिल्लीतील वास्तव्यात विशेषत: शासकीय नौकरीत वेगवेगळया आघाडयांवर लढावं लागतं याचाच एक स्वर्णीम अनुभव. वर्ष २०१९ मध्ये १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला व या निवडणुका देशभर सुरक्षीत तसेच व्यवस्थीतरित्या पार पाडण्याची भूमिका असलेल्या भारत निवडणूक आयोगाने ऑब्सजर्व्हससाठी आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्याचा हा अनुभव आहे. भारत निवडणूक आयोग देशातील आएएस, आयपीएस, आयआरएस आदी अधिका-यांना वेगवेगळया राज्यांत ऑब्सजर्व्हर म्हणून नेमते. निवडणूक काळात नियत नियमानुसार पैसा व्यय व्हावा, सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी यासह नेमूण दिलेल्या अन्य बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अधिका-यांची नेमणूक करण्यात येते. त्याच राज्यात नेमणूक असलेला अधिकारी त्याच राज्यात ऑब्जर्व्हर नसावा हा दंडक पाळला जातो. या ऑब्जर्व्हस्‍ साठी भारत निवडणूक आयोगाने विज्ञानभवनात दोन टप्प्यात ब्रिफींग मिटींग आयोजित केली होती एक १४ मार्च २०१९ ला तर दुसरी २६ मार्च २०१९ ला. निवडणूक आयोग या आयोजनात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयाची मदतही या घेत असते. त्यानुसार महाराष्ट्र सदन या राज्य शासनाच्या दिल्लीतील महाराष्ट्राच्या दुतावासाकडे ब्रिफींग मिटींग काळात हेल्पडेस्क लावण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र सदनाकडून माझ्या नावावर शिक्कामोर्तब होवून कार्यालय प्रमुखाला याबाबतीत अवगत करून माझी विशेष सेवा घेण्यात आली. असे काम करतो हेल्पडेक्स महाराष्ट्र सदनाचा एक कर्मचारी एक वेळा श्री.जगदीश उपाध्याय तर दुस-यावेळी श्री. राजेश हरणे हे माझ्या दिमतीला होते. महाराष्ट्रात ज्या ऑव्जर्व्हरची नेमणूक केली आहे ते अधिकारी आमच्या हेल्प डेक्सवर येत असत. मग संबंधित लोकसभा मतदार संघ कुठे आहे?, त्याच्या आजुबाजुला कोणते एअरपोर्ट आहे?, आम्हाला घ्यायला गाडी येणार का?, तो भाग कसा आहे?, तेथे पर्यटन स्थळ कोणती आहेत?, खानपान कस आहे? असे आपआपल्या प्रकृतीनुसार सर्व प्रश्न विचारण्यात येत असत. हेल्पडेक्सवरील माझे सहकारी हे मुळात उत्तराखंड व दिल्लीत जन्मलेले असल्याने त्यांचा महाराष्ट्राशी व तेथील भौगोलिक राजकीय परिस्थितीचा तसा फारसा अभ्यास नसल्याने या अधिका-यांना माहिती देवून त्यांचे समाधान करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. आणि ही आगळीवेगळी जबाबदारी सांभाळताना मला खूप मजाही आली व एक सुंदर अनुभवही मिळत होता. आमच्या डेक्सवर आलेल्या अधिका-यांना आम्ही महाराष्ट्राचा नकाशा , जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी , पोलीस अधिक्षक कार्यालय आदींचे संपर्क क्रमांक असणारी माहिती पुस्तिका देत असू. या निमित्ताने देशातील आयएएस आयआरएस आएफएस आदी अधिका-यांचा हा मेळाच जवळून बघता आला. या अधिका-यांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर, आकस, मोठेपणाचा तोरा आदी गुण अवगूण म्हणा हवे तर जवळून बघता आले. आणि हेल्प डेक्सहून वेळ मिळाला तसा या ब्रिफींग मिटींगमध्ये होत असलेल्या मार्गदर्शन सत्राचाही आस्वाद घेता आला. एकंदरीतच हा एक आगळा वेगळा अनुभव समृध्द करणारा ठरला. 0000

Wednesday, March 10, 2021

महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर

महाराष्ट्र भूषण कवी मंगेश पाडगावकर १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्याला जन्म मुंबई येथे उच्च शिक्षण. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा उत्तीर्ण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक, साधना साप्ताहिकात सहसंपादक ,आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून नियुक्ती काही काळ ‘प्रोड्यूसर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली. मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली . मुंबई विद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती . ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘जिप्सी’, ‘छोरी ‘ ,‘उत्सव’ , ‘विदूषक’ व ‘सलाम’ आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद ‘मीरा’ ह्या नावाने प्रसिद्ध इंग्रजीतील लिम्‌रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही लिहिल्या आहेत. ‘भोलानाथ’ आणि ‘बबलगम’ हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह. ‘जिप्सी’, ‘छोरी’ व ‘भोलानाथ’ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके. पाडगावकरांनी लिहिलेले काव्यात्म ललित निबंध ‘निंबोणीच्या झाडामागे’ नावाने प्रसिद्ध अनेक अमेरिकन साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत जे. कृष्णमूर्तींच्या काही भाषणांचा त्यांनी अनुवाद केला . ‘बोरकरांची कविता’ , ‘युगात्मा’ , ‘महात्मा गांधीवरील ललित लेखनाचा संग्रह’, ‘संहिता’ , ‘विंदा करंदीकर ह्यांची निवडक कविता’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले त्यांच्या ‘शर्मिष्ठा’ या नाट्यकाव्यात प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार दिसतो उपहास व उपरोधाचे चित्र असलेला ‘सलाम’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे पाडगांवकर यांच्या साहित्यिक योगदानासाठी २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान २०१३ मध्ये केंद्र शासनाने ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला

वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज

वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार २७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे येथे जन्म नाशिक येथे त्यांचे शिक्षण झाले. १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते त्यांनी पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’ , ‘हिमरेषा’ व ‘वादळवेल’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण ठरले ‘दुसरा पेशवा’ , ‘कौंतेय’ , ‘आमचं नाव बाबुराव’ , ‘ययाति आणि देवयानी’ , ‘वीज म्हणाली धरतीला’ , ‘नटसम्राट’ आदी त्यांची स्वतंत्र नाटक प्रसिध्द आहेत ‘दूरचे दिवे’ , ‘वैजयंती’ , ‘राजमुकुट’ , ‘ऑथेल्लो’ व ‘ बेकेट’ ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके होत ‘वैष्णव’ , ‘जान्हवी’ व ‘कल्पनेच्या तीरावर’ आदी त्यांच्या प्रसिध्द कादंब-या होत ‘फुलवाली’ , ‘सतारीचे बोल आणि इतर कथा’ , ‘काही वृद्ध काही तरुण’ , ‘प्रेम आणि मांजर’ व ‘निवडक बारा कथा’ आदी त्यांच्या कथासंग्रह प्रसिध्द आहेत कालिदासाच्या मेघदूताचे मराठी रूपांतर , ‘समिधा’ हा मुक्तकाव्य संग्रह, ‘आहे आणि नाही’ हा लघुनिबंध संग्रह तसेच काही ‘बालकथा’ व ‘बालगीते’ यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो १९७४ मध्ये त्यांच्या ‘नटसम्राट’ ह्या नाटकला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले भारतीय साहित्यातील योगदानासाठी १९८७ मध्ये त्यांना मानाच्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वि.वा.शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातील योगदानासाठी २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर ‍ि९ मार्च १८९९ ला सातारा जिल्हयातील चाफळ येथे त्यांचा जन्म १९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली कवी यशवंत हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक कवींपैकी एक महत्वाचे कवी म्हणून प्रसिध्द. १९२० ते ३० या दशकात रविकिरण मंडळाने कविता महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवल्या १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ‘आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत त्यांनी आईची थोरवी वर्णिली आहे. ‘यशोधन’ हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कविता संग्रह होय ‘यशवंती’, ‘भावमंथन’, ‘बंदिशाळा’, ‘जयमंगला’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह ‘जयमंगला’, ‘काव्यकिरीट', ‘बंदीशाळा' आदी खंडकाव्य त्यांनी ‍ लिहिली ‘काव्यकिरीट’ या खंड काव्यात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. या काव्याने प्रभावीत होत १९४० मध्ये बडोद्याच्या महाराजांनी कवी यशवंत यांना ‘राजकवी’चा बहुमान दिला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले पानशेत धरण फुटल्याच्या दुर्घटनेवर त्यांनी ‘मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य लिहिले ‘मित्रप्रेम रहस्य’, ‘वीणा झंकार’, ‘कातिणीचे घर’ ही त्यांची पुस्तके गाजली ‘मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह कवी यशवंत यांनी लिहिलेली 'घायाळ' ही कादंबरी लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर होय त्यांनी १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले १९६९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

गणपतराव जोशी

गणपतराव जोशी मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी जिल्हयातील राजापूर येथे जन्म १८८१ मध्ये त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना केली,ही मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था ठरली अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते गणपतराव जोशी यांनी शेक्सपिअर यांच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका वठवून लोकप्रियता मिळविली . झुंझारराव (ऑथेल्लो), चंद्रसेन (हॅम्‍लेट), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्यकडून मिळाले होते ‘राणा भीमदेव’ नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व ‘तुकाराम’ व ‘रामदास’ नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्‌भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. ‘झोपी गेलेला जागा झाला’ (दातेकृत) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती

Tuesday, March 9, 2021

पद्मश्री रणजित देसाई

पद्मश्री रणजित देसाई उत्कृष्ट कादंबरीकार,कथालेखक आणि नाटककार ८ एप्रिल १९२८ रोजी जन्म. कोल्हापुर जिल्हयातील कोवाड हे त्यांचे मूळ गाव माध्यमिक शाळेत असतांनाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली कोल्हापूरच्या महाद्वार मधून त्यांचे लेखन प्रसिध्द होत असे त्यांच्या ‘भैरव’ कथेला कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथा लेखनाला सुरुवात झाली ‘रूपमहाल’, ‘कणव’ , ‘जाणे’ , ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’ इत्यादी त्यांचे कथा संग्रह प्रकाशित झाले ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा एक प्रकारे चित्रकथाच होत्या, इतकी त्यांची जीवंत मांडणी होती सुरुवातीला त्यांनी ‘बारी’ ,‘माझ गांव’ या कांदब-या लिहिल्या १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ या ऐतिहासिक कादंबरीने लोकप्रियतेचे शिखर गाठले १९६४ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीही अतिशय लोकप्रिय झाली कर्णाच्या जीवनारील ‘राधेय’ तसेच ‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिंड’, ‘राजा रवी वर्मा’ या त्यांच्या कादंब-याही खूप गाजल्या त्यांनी लिहिलेल्या ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’, ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली ‘नागिन’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘सवाल माझा ऐका’ आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या १९७३ मध्ये ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला