Wednesday, March 10, 2021

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर

पद्मभूषण कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर ‍ि९ मार्च १८९९ ला सातारा जिल्हयातील चाफळ येथे त्यांचा जन्म १९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली कवी यशवंत हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक कवींपैकी एक महत्वाचे कवी म्हणून प्रसिध्द. १९२० ते ३० या दशकात रविकिरण मंडळाने कविता महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवल्या १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ‘आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत त्यांनी आईची थोरवी वर्णिली आहे. ‘यशोधन’ हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कविता संग्रह होय ‘यशवंती’, ‘भावमंथन’, ‘बंदिशाळा’, ‘जयमंगला’ आदी त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह ‘जयमंगला’, ‘काव्यकिरीट', ‘बंदीशाळा' आदी खंडकाव्य त्यांनी ‍ लिहिली ‘काव्यकिरीट’ या खंड काव्यात बडोद्याचे अधिपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाचे वर्णन आहे. या काव्याने प्रभावीत होत १९४० मध्ये बडोद्याच्या महाराजांनी कवी यशवंत यांना ‘राजकवी’चा बहुमान दिला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले पानशेत धरण फुटल्याच्या दुर्घटनेवर त्यांनी ‘मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य लिहिले ‘मित्रप्रेम रहस्य’, ‘वीणा झंकार’, ‘कातिणीचे घर’ ही त्यांची पुस्तके गाजली ‘मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह कवी यशवंत यांनी लिहिलेली 'घायाळ' ही कादंबरी लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर होय त्यांनी १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले १९६९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

गणपतराव जोशी

गणपतराव जोशी मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी जिल्हयातील राजापूर येथे जन्म १८८१ मध्ये त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना केली,ही मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था ठरली अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते गणपतराव जोशी यांनी शेक्सपिअर यांच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका वठवून लोकप्रियता मिळविली . झुंझारराव (ऑथेल्लो), चंद्रसेन (हॅम्‍लेट), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्यकडून मिळाले होते ‘राणा भीमदेव’ नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व ‘तुकाराम’ व ‘रामदास’ नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्‌भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. ‘झोपी गेलेला जागा झाला’ (दातेकृत) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती

Tuesday, March 9, 2021

पद्मश्री रणजित देसाई

पद्मश्री रणजित देसाई उत्कृष्ट कादंबरीकार,कथालेखक आणि नाटककार ८ एप्रिल १९२८ रोजी जन्म. कोल्हापुर जिल्हयातील कोवाड हे त्यांचे मूळ गाव माध्यमिक शाळेत असतांनाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली कोल्हापूरच्या महाद्वार मधून त्यांचे लेखन प्रसिध्द होत असे त्यांच्या ‘भैरव’ कथेला कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथा लेखनाला सुरुवात झाली ‘रूपमहाल’, ‘कणव’ , ‘जाणे’ , ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’ इत्यादी त्यांचे कथा संग्रह प्रकाशित झाले ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा एक प्रकारे चित्रकथाच होत्या, इतकी त्यांची जीवंत मांडणी होती सुरुवातीला त्यांनी ‘बारी’ ,‘माझ गांव’ या कांदब-या लिहिल्या १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ या ऐतिहासिक कादंबरीने लोकप्रियतेचे शिखर गाठले १९६४ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीही अतिशय लोकप्रिय झाली कर्णाच्या जीवनारील ‘राधेय’ तसेच ‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिंड’, ‘राजा रवी वर्मा’ या त्यांच्या कादंब-याही खूप गाजल्या त्यांनी लिहिलेल्या ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’, ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली ‘नागिन’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘सवाल माझा ऐका’ आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या १९७३ मध्ये ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला

Wednesday, February 17, 2021

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

नवी दिल्ली, दि. 22 : महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. https://mahasamvad.in/?p=30219

Tuesday, October 20, 2020

Friends Corner गप्पा With ममता

सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार,                  ‘वाळवंटातील फुलं’  या आपल्या  वाट्सअप समुहाच्या Friends Corner या  उपक्रमाची चौथी Special Guest  ममता पिसे - मेहरे  ला काल 18 ऑक्टोबर  2020 ला आपण भेटलो.            ममता, आपल्या उपक्रमाच्या ‘अशी मी-अशी मी’  या पहिल्या  सेगमेंटमच्या सुरुवातीलाच म्हणाली, ‘ मी, साधी राहणी व उच्चविचारसरणी माननारी व अवलंबणारी मुलगी आहे.’ आणि आम्हाला तिच्या सोबत संवाद साधताना या वाक्याचा पदोपदी अनुभवही आला. जिल्हा परिषद शाळेपासून ते एम.ए., बीएड असा तिचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा होता. पुढे विहीगावच्याच उर्दुशाळेत व महात्मा फुले शाळेमध्ये अध्यापन कार्य करताना ‘मॅडम, तुम्ही आमच्या मुलांना खूप चांगलं शिकवता!’ अशी  विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मिळणारी  प्रतिक्रिया सांगतांना ममताचा आत्मविश्वास व तिला मिळालेलं समाधान दिसून आलं.अशातच अकाली पितृछत्र हरपल्याने कोसळलेला दु:खाचा डोंगर व सुरु झालेल्या संघर्षाची नवी सुरुवात सांगतांना ममता भावूक झाली तिच्या डोळयात एकदम पाणी तरळल व आम्ही सर्वच क्षणभरासाठी तिच्या या भावनिक स्थितीशी समरस झालो. ‘लग्न’ या आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर मनाची झालेली घालमेल पुढे त्यातून सापडलेला मार्ग व अपेक्षेपेक्षाही उत्तम जोडीदार मिळाल्याने संसार रथाच्या सुरु असलेल्या आनंदी मार्गक्रमनाबद्दलचे ममताचे हृदगद आम्हाला सुखाहून गेले.           आपल्या उपक्रमातील ‘ऋणानुबंधाच्या जुळून आल्या गाठी’ या दुस-या सेगमेंटच्या अनुषंगाने बोलताना, तुला दोन वर्षांपूर्वी आलेलं स्थळ पुन: चालून आलं व ऋणानुबंधाची गाठ कायमची बांधली गेली या सर्व प्रक्रियेत ‘धाकटा भाऊ राहुल’  याने पाठबळदेत दाखविलेल्या समंजसपणाविषयी ऐकूण आम्हाला फार समाधान वाटलं. प्रत्यक्ष जोडीदार व सासरच्या मंडळींचं प्रेम व वात्सल्यामुळे गुण्यागोविंदाने सुरु असलेला  संसारही आम्हाला भावला. आवडी- निवडी जाणून घेताना नवनवीन पदार्थ बनविण्याची तुझी आवड आणि त्यासाठी तुझ्या वहिणींकडून तुला मिळालेलं ‘मेन्यू मॅडम’ टायटल मस्तच बर का !.  यातचं अमोल ने तुझ्याकडे या सर्व चांगल्या व्यंजनांवर ताव मारण्यासाठी येण्याची इच्छा व्यक्त करताचं तू त्याला स्वागत असल्याचे सांगून ‘येण्याआधी कळव म्हणजे मेन्यू ठरवता येईल व बनवताही येईल छान!’ असं दिलेलं प्रेमळ उत्तर मैत्रितीतील निर्मळता व सहजता अधोरेखित करून गेली. फोटोसोबत संवाद  साधतांना सत्यम पवारच्या घरी तुम्ही सर्व मैत्रिणी भेटल्याची आठवणं त्यात, ज्योत्सनाला तब्बल 18 वर्षांनी भेटल्याची बाब व या भेटीने तुला झालेला आनंद फारच छान विषद केलास. याच सेगमेंटमध्ये काल्पनिक फोटो निर्माण करत शाळेत हुशार असल्याने तुला मिळालेल्या बक्षिसाच्या आठवणीविषयी विचारलं आम्ही. त्यावर तू पंचायत समिती अंजनगाव येथे झालेल्या सत्कार समारंभाचा प्रसंग व या सत्कारासाठी गुरुजण व आई-वडिलांना तू दिलेलं श्रेय तसेच योगिता पटेलही चांगले गुण घेवून उत्तीर्ण झाल्याने तिचाही या समारंभात झालेला गौरव हा किस्सा सांगितला. त्यामुळे आम्हाला तुझ्याकडून योगिताविषयीची ही आणखी चांगली माहिती ऐकायला मिळाली. आणि आपल्यासोबतच इतरांनाही श्रेय देण्याचा तुझा दिलदारपणा खूप आवडला. तुला पंख दिले तर  लगेच आईच्या भेटीला जावून येण्याची तुझी ममत्व भावना आम्हाला आवडली . झटपट संवादात तू ,‘लग्न’ हा तुझ्या आयष्यातील सर्वात आनंदाची घटना असल्याचे सांगितले. राधाबाई सारडा महाविद्यालयात प्रगती व तू उशीरा आल्याचे लक्षात येताच तत्कालीन प्राचार्य डॉ. राध्येशाम सिकची यांनी घरी परत पाठवले ,व घरी लवकर आल्याने तुम्ही आज घरी लवकर कशा परतल्या? अशी केलेली विचारणा अशी एकूणच उडालेली तारांबळ मस्त सांगितलीस. होम इकोनॉमिक्सच्या प्रॅक्टीकलमधील मजेशीर किस्याविषयी विचारले असता, पिझ्झा मेकिंगच्या प्रॅक्टीकलला पिझ्याचा उंडा बदळून तुम्ही मैत्रिणींनी केलेली धमाल तर भारीच होती बुवा. आयुष्यात शिक्षिका होण्याचं स्वप्न अपूर्ण असल्याचं सांगतांनाच शिवणकाम किंवा नक्षीकाम करायला आवडेल ही तुझी भूमिकाही सकारात्मक आहे. आपल्या वाळवंटातील फुलांसोबत संवाद साधून मन हलकं होत आणि ‘माझ्या संदेशांना मित्र-मैत्रिणी चांगला प्रतिसाद देतात’ या तुझ्या बोलक्या भावना आम्हाला सुखाहून गेल्या.                           प्रिय ममता, संवादाची सुरुवात करताना वडिलांच्या नसण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी बोलून दाखवून तू आम्हाला बाप व लेकिच्या नात्याचं महत्व पटवून दिलसं. काहीस भावूक, विनोदी, सकारात्मक व्हाईब्स आम्ही तुझ्यासोबतच्या संवादात अनुभवल्या. बहूमोल वेळ काढून आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्यासाठी आमच्या सर्वांकडून तुझे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.                                                                                                                                                                                (रितेश मोतीरामजी भुयार)                                              ***** 

Monday, October 12, 2020

पैशांचा खिसा

हल्ली दूरचित्रवाहिनीवर एका मालिकेची जाहीरात जोरात सुरु आहे, भरत जाधव आणि रोहिणी हटंगडी या हरहुन्नरी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आहे,‘सुखी मानसाचा सदरा’.मालिकेच्या शिर्षकाहून साधारण तिची मध्यवर्ती कल्पना समजून येते. पण ,मलाही व्यक्त व्हायचं आहे या निमित्ताने !. मी ही माझ्या शालेय जीवनात आजोळी असताना पैशांचा खिसा बघितला व अनुभवला आहे. तो ‘खिसा’ ज्या मानसाचा होता तो माणूस मनाने किती श्रीमंत असावा हा विचारही या निमित्ताने मनाला अलगद स्पर्शून गेला. आमच्या आजोळी धाब्याचं घर असल्याने लोकशाही पध्दतीने माज घरात त्यावेळी खुंटीला एका रांगेत सर्वांचे कपडे लटकायचे. या सर्व कपडयांमध्ये एक पँट म्हणजे या खुंटीवरीलं खास आकर्षण. कारणही खास आहे म्हणा तसे ! आमच्या अविनाश मामांच्या पँटचा हा खिसा म्हणजे माझ्यासह घरातील प्रत्येकासाठी चालती फिरती पैशांची पेटी. मग घरात भाजीपाला, दूध, मजुरांचे देणे, अन्य किरकोळ सामान खरेदी पासून दवाखाना, औषधी आदींसाठी पैश्यांची गरज असल्यास त्या-त्या व्यक्तीने खिश्यात हात टाकायचा व आवश्यक पैसे घ्यायचे आणि पैशांचा विनियोग झाल्यावर वाचलेले पैसे पर खिश्यात पडायचे. ही एवढी लोकशाही पध्दत म्हणजे संयुक्त कुटुंब पध्दतीचे बलस्थान असल्याचा अनुभव मी आजोडी शिकतांना घेतला जो मला खूप समृध्द करून गेला. आता तर कॅशलेस व्यवहारांचा जमाना आहे व भविष्यात यापुढील टप्पाही बघायला मिळेल. अशात या पैशाच्या खिशाची चित्तर कथा कदाचित मी जी इथे खरडतोय त्यातूनच इतरांना समजेल असचं वाटतयं. असो खिश्याकडे येण्याआधी ही पध्दत कशी होती हे तर आता तुम्हाला सांगायलाच हवे न !. तर ऐका, घरात त्यावेळी आजीचा संदुक अर्थात लोखंडी ट्रंक होती ज्यात पैसे असायचे त्यामुळेच त्याला भलं मोठं कुलूप असायचं. आता या मोठया तिजोरीची एक शाखा थोडया फार फरकाने या ट्रंकेंचे लहान व्हर्जन असलेली कापडाची चंचई आमच्या आदरणीय आजींच्या (स्व.पंचफुलाबाई ज्यांना मी आईचं म्हणायचो) कायम कमरेला खोवलेली असायची. या चंचईमध्ये तेव्हा घरातील किरकोळ खर्चासाठी पैसे असतं. चंचईची रचना अशी की ज्यात सुटया पैशांच्या नोटा व शंभर रुपये आदींच्या बंदया नोटा व पैशांची सुटी नाणी असतं व मोठया खजिन्याची म्हणजेच संदुकाची चाबी असायची. सोबतच चंचईमध्ये सोप, सुपारी, लवंग आणि विलायचीही असे. मामांच्या पगाराचे पैसे , शेतीतील पीक विकून आलेली रोकड रक्कम या संदुकामध्ये जमा व्हायची. तर मजुरांना , घरातील सर्व कामांसाठी लागणारे पैसे या संदुकातून व्यय व्हायचे. मला तर आजीच्या चंचईतील ती चाबी काढून संदुकातील आवश्यक पैसे मामांना दयायला भारी आवडत असे. या संदुकातील पैशांचा विनियोग व पैशांची आवक -जावक यावर आजीचं पूर्ण लक्ष असायच व हा सर्व व्यवहार त्यांच्या तोंडीच होता. म्हणजे बँकेतील कॅशीयरला पैशांच्या व्यवहाराची नोंद ठेवायला लागणारी चोपडी व आतातर संगणकात या नोंदी करण्याचा काळ आहे त्यात आजीचा एकहाती व तोंडीव्यवहार कौतुकास्पद होता. घरातील सर्व आर्थिक बाबींवर आजीचं पूर्ण नियंत्रण सर्वांनी एकमताने मान्य करून ही पध्दत अवलंबिली होती. आज हा सर्व पट आठवतांनाही सुखाची अनुभूती होते हेच त्या संदुक व चंचईचं महत्व अधोरेखित करतं. बदल हा सृष्टीचा नियम आहे जो बदलांचा स्वीकार करत पुढे जातो तोच काल सुसंगत ठरतो. आता आजोळीही संदुकाच महत्व कमी होवून माज घरातील खुंटीवरील मामाच्या खिशाने संदुक व चंचईची जबाबदारी अगदी सहजपणे व समन्वय-सामंजश्यातून स्वीकारली होती. घरातील ज्या सदस्याला ज्या कामासाठी पैसे हवे त्याने मामांना कारण सांगायच व त्यांनी लगेच होकारात्मक मान हलवायची व खिशातून पैसे काढायचे एवढी सहज पध्दती होती ती. हा खिसा माझा हक्काचा आहे व त्यातील पैशांचा विनियोग आवश्यक कामांसाठीच व्हावा असा अलिखीत नियमच सर्वजन कटाक्षाने पाळत असत. आता बँकेच्या वेळेप्रमाणे या खिशाची वेळ होती. म्हणजे मामा डयुटीवर गेले तर त्यांच्यासोबतच हा खिसा बाहेर जायचा. पण ज्यांना आवश्यक काम आहे ते आधीच यातून पैसे काढत असतं. मामा जो पँट घालून ऑफिसला जायचे तोच पँट खुंटिला व त्याच पँटच्या खिश्याला पैशांचा खिसा हा बहुमान लाभत असे. शालेय शिक्षणाचं तेव्हाच माझ वय त्यामुळे या पैशाच्या खिशाचं तेवढ महत्व म्हणा अगर त्याची महती मला कळली नाही मात्र, आता म्हणजे जवळपास तब्बल सोळा –सतरा वर्षांनी मला या खिश्याविषयी खूप अप्रुप वाटल व व्यक्तही व्हाव वाटलं. या पैशाच्या खिशाबद्दल म्हणालं तर मला खूप अप्रूप वाटतं. घरात कर्त्या पुरुषाने एवढया सहजपणे आर्थिक व्यवस्था विकसीत करावी हेही नसे थोडके. विश्वास, ममत्व, प्रेम, जबाबदारी आणि आपलेपण असे सर्व गुण मला त्या पैशांच्या खिश्यात दिसतात. आणि ज्या मानसाचा तो खिसा आहे तो किती सुखी व दिलदार असावा हे आज ‘सुखी मानसाचा सदरा’ या कलर्स मराठी दूरचित्रवाहिनीवर येवू घातलेल्या मालीकेच्या शिर्षकाच्या माध्यमातून ठसठसीत प्रतिबिंबीत होतो. कॉम्प्युटरच्या किबोर्डवर बोट चालू लागले व हा लेखनप्रपंच सहज घडला आणि ‘सुखी मानसाच्या पैशाचा खिसाच’ आज माझ्या समोर शब्द रूपात उभा राहिला. तुम्हालाही तो आवडेल व चांगला विचार देवून जाईल या विश्वासाने येथेच थांबतो. रितेश मोतीरामजी भुयार (12 ऑक्टोबर 2020 , नवी दिल्ली) *******