Thursday, May 14, 2026

आणि प्रवास थांबला.... आमचा बाप : दातृत्व व अनुभवाचा धनी















 



कृपया लिंक ओपन करा👇

  https://youtu.be/7VbkSAqL52Y?si=HZitQoPAxkHpck0D

     कुटुंबापेक्षा समाजातील गोर-गरिब व गरजूंना आपला वेळ देणारे व त्यांच्या दुःखात सदैव मदतीला खंबीरपणे उभे राहणारे आमचे बाबा.समाज,व्यवसाय आणि माणसं वाचत आयुष्य जगणारे बाबा म्हणजे चालता बोलता माहिती कोष व अनुभवाच मोठ गाठोड. त्यांनी आपल्या कार्यातून व जगण्यातून आम्हाला दिलेली संस्काराची शिदोरी आमची पॉवर बँक आहे. त्यांच्या सहवासाला आम्ही आज कायमचे मुकलो आहोत. आमचे प्रिय बाबा मोतीरामजी गुलाबराव भुयार (वय ७०) यांची गेल्या १० वर्षांपासून पॅरालिसीस आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर आज १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता संपली.     

          लहानपणी ज्यांच्या प्रेमाला पारखे झाल्याची खंत  आता आम्हाला उरली नव्हती. आणि त्यांच्या दराऱ्यासहीत हा माणूस सर्वांनी मनोभावे स्वीकारला हेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचं गमक होत. गेल्या १० वर्षांपासून पॅरालिसीस आजाराने ग्रस्त असतानाही त्यांचा वट काही कमी नव्हता. ६० वर्ष जो माणूस सामाजिक व वैयक्तीक आयुष्य आपल्या पद्धतीने जगतो त्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध एका आजाराच्या विळख्यात जातो हे त्यांच्यासह आम्हा सर्वांना क्लेशदायक होत. पत्नीला समर्थ जोडीदार, मुलांना मार्गदर्शक व नेतृत्व देणारे वडील,सुनांना सासरे आणि नातवंडांना एक स्वस्थ व आनंदी आजोबा म्हणून बाबा तुम्ही हवे होतात. 

           आजही आठवते मी पुण्याला पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात मला टूव्हिलरची गरज असताना तुम्ही नवीन गाडी घेऊन दिली व स्वत: 'अचलपूर ते पुणे' असं अंतर गाडी चालवत आलात व मला गाडी सुपूर्द केली. पुणे सोडून ध्येय प्राप्तीसाठी दिल्लीकडे कुच करताना मला आवश्यक असलेली आर्थिक मदत करून मुलाच्या ध्येयाची पायाभरणी करणारे वडील म्हणून मला तुम्ही सदैव प्रियच राहिलात. दिल्लीहून गावी आलो तेंव्हा परतताना टू व्हिलरने मला ट्रॅव्हल्सवर किंवा कधी मधी बैतुलच्या जवळपर्यंत पोहचवून देणारा प्रेमळ बाप माझ्या वाटयाला आला. तसाच माझ्या लग्नावेळी मुली बघण्यापासून देखना व आटोपशीर विवाह सोहळा संपन्न करण्याचं कर्तव्य तुम्ही खूपच उत्तम पद्धतीने पार पाडल विशेष म्हणजे तोच आमच्या कुटुंबातील मुलांच्या फळीतील पहिला विवाह सोहळा ठरला. 

                 आमच्याकडील राजदूत गाडीवर (टू व्हिलर) वडिलांनी आम्हा भावंडांना सैर घडविल्याची आठवणही आम्ही जपली आहे. चांगल्या हॉटेलमध्ये आम्हाला घेवून जात वेगवेगळया मेन्यूंचा परिचय करून दिला तसाच आमच्या काळात अचलपूरच्या देवडीभागात मोठया दिमाखात व हाऊस फुल्ल शो चालणारी श्री टॉकीज व या टॉकीजमध्ये कितीतरी चित्रपटांच्या बारी आम्हाला बाबांकडून थेट थिएटरमध्ये बसून मिळत असल्याच्या आठवणी हा मोठा ठेवाच आहे.आजारपणाच्या तिव्रतेकडे दुर्लक्ष केल्याने पॅरालिसीसने तुम्हाला ग्रासले आणि मग वाघासारखा राबता  व स्वत:चा वेगळा दरारा असणारे तुमचे व्यक्तीमत्व वॉकर आणि बिछान्याचे सोबती झाले. मात्र, पॅरालिसीसलाही हरविण्याची तुमची जिद्द आणि जगण्याची विल पावर आम्ही या काळात अनुभवली.

      नागपूर येथील पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या उपचारासहीत तीगावच तेल, तेल्हाऱ्याचे इंजेक्शन आणि विविध काढे, वनौषधी, आयुर्वेदीक औषधी, मालिश, फिजिओथेरपी असे सर्व प्रयोग तुम्हाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी थोरला मुलगा मनिष (मनिष दादा) यांच्या नेतृत्वात झाले. इनफॅक्ट आमच्या वहिनी निकीता आणि आई अशा तिघांनी बाबांची खूप सेवा केली. या सेवेत खंड पडू नये म्हणून दादाचे कुठेच फटकणे होत नव्हते तर आई व वहिनी यांना कुणाकडे जाण्याची किंवा माहेरी चार दिवस थांबण्याची सोयच उरली नव्हती. या तिघांनी बाबांची खूप सेवा केली ती अनमोल आहे.

         वडीलांच्या आजारपणात दोन मोठया दुखापती झाल्यात. एकदा तोलजाऊन घरा बाहेर पडले तेव्हा २२ टाके आणि नंतर एकदा घरातच तोलजावून पडल्याने ९ टाके पडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करावे लागले. यावेळी थोरला भाऊ मनिष दादा, आमचे मोठे वडिल प्रभाकरराव भुयार, भावंड आशिषदादा, स्वप्निल आणि अंकुश यांनी आपल्या डयुटया ठरवून हॉस्पिटलमध्ये बाबांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ सेवा दिली. यानंतर कॅथेड्रर निघाल्याने बाबांवर पुन्हा शस्त्रक्रिया झाली. आधीच आजाराने खंगलेले शरीर आणि त्यात लागोपाठ शस्त्रक्रिया अशाने शरीर अशक्त होत गेले आणि शेवटचे तीन वर्ष तर हालचालच बंद  झाली व सर्वकाही बिछानाच त्यांच कार्यक्षेत्र ठरल. अशात नौकरीमध्ये पदोन्न्ती मिळाल्याने गावाकडे आल्याच्या आनंदाने पत्नी सोनाली व मुलगा स्वरित यांच्यासोबत बाबांच्या भेटीला येण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद काही औरच होता. माझ्यासोबत या दोघांनाही बाबांच्या भेटीतून ऊर्जा मिळत असल्याचा मला मनोमन आनंद होत. या भेटीत बाबांकडील अनुभव व ज्ञानाच्या मोठया पुतडीतून आम्हाला आपसुकच सैल हाताने प्रेम माया व ज्ञान मिळाले. प्रत्येक भेटीत दाडी करण्याचा नित्यक्रम त्यांच्या शेवटच्या दाढी व आंघोळी पर्यंत पाडता आला याचे खूप समाधानही आहेच.

                      कृतकृत्यता

शिक्षण व मग नोकरीसाठीचा माझा संघर्ष सुरू असतानाच प्रयत्नांना यश येऊन २०१३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात शासकीय नोकरीत आलो. अशात दिल्लीला कार्यरत असताना आई-बाबांना बोलावलं. माझ्या ऑफिसमध्ये दोघेही आले आणि माझ्या केबिनमध्ये आई- वडिलांना माझ्या संघर्षाअंती यशाचे प्रतीक असलेल्या खुर्चीत बसवले. तो क्षण म्हणजे 'कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो....'  (संत तुकाराम महाराज यांचा अभंग) असाच ठरला. त्यावेळी आई-बाबा दोघेही माझ्याकडे साधारण महिनाभर थांबले .यावेळी राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,पंजाब या राज्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. हा सर्व टूर मी प्लॅन करू शकलो सर्व प्रवास एसी ट्रेन व तत्सम वाहनाने व्हावा याची पूर्ण काळजी घेतली. ऑफिस सांभाळून इतर वेळी माझा प्रिय मित्र नीलकंठ महल्ले याच्या सोबतीने हा टूर पूर्ण केला. शासकीय नोकरीत आल्यानंतर आई-बाबांसोबत घालवलेला हा सर्वोत्तम वेळ ठरला. 'या टूरची सांगता ही आई-बाबांना विमानाने दिल्ली ते नागपूर प्रवास घडवून केली', याचेही मला खूप समाधान आहे.

              दिल्लीतून पदोन्नतीने महाराष्ट्रात आलो तेव्हा माझ्या अमरावतीच्या राहत्या फ्लॅटमध्ये बाबांना घेऊन आलो साधारण तीन आठवडे ते आमच्या सोबत होते. सुट्टी काढून पूर्ण वेळ आई बाबांसोबत सहपरिवार राहण्याचा उत्तम योग आला. ( या फ्लॅटमध्ये रहायला येण्याआधी झालेल्या वास्तू पूजेत बाबा आवर्जून आले त्यावेळी त्यांना नुकताच पॅरालीसीस आजार जडला होता.) यात त्यांचा वाढदिवसही साजरा केला आमच्या काकू प्रतिभा भुयार ,भाऊ अनुप्रीत आणि बाबांचे लाडके भाचे प्रवीण सिनकर यांना खास आमंत्रित केले होते. 

       आम्हा दोघा भावांपैकी माझे लग्न आधी झाले आणि या लग्नाचे संपूर्ण नियोजन आणि लग्न समारंभ बाबांनी थाटात पार पाडला. थोरला भाऊ मनीष दादाचा साखरपुडा बाबांच्या कुशल नेतृत्वात पार पडला आणि त्यानंतर दोन दिवसातच बाबांना पॅरालिसिसने ग्रासले. दादाच्या लग्नाचे सर्व नियोजन आई व दादाने कुशलतेने करून देखणा विवाह सोहळा पार पाडला. येथूनच बाबांच्या प्रकृती अस्वास्थामुळे घराची संपूर्ण धुरा आई आणि दादांच्या खांद्यावर आली. या दोघांच्या दिमतीला आता आमच्या वाहिनी निकिता मनिष भुयारही होत्या. वहिनींनी लग्न झाल्यापासून आमच्या वडिलांची अंतिम क्षणापर्यंत सुश्रुषा केली व संपूर्ण काळजी घेतली, ही अत्यंत समाधानाची व कौतुकाची बाब आहे.(पॅरालिसिस सोबत बाबांनी ९ वर्ष १० महिने झुंज दिली.).

              आमच्या घरात 'स्वरित' (माझा मुलगा) च्या रूपाने बाबांना पहिल्या नातवाचे मुख बघायला मिळाले तेंव्हा बाबा  या आजाराने ग्रस्तच होते त्याच वर्षी माझा पुतण्या 'कैवल्य' याचा ही जन्म झाला. म्हणजे एकाच वर्षी (वर्ष २०१७(एप्रिल - ऑगस्ट) बाबांना आपल्या दोन्ही नातवांचे मुख बघून त्यांना आशीर्वाद देण्याचा सुयोग लाभला. मुलांचे लग्न, सुन्मुख आणि नातवंडांना आशीर्वाद देण्याचं भाग्य त्यांना लाभलं मात्र, नातवंडांना खेळवण्याचं व सुनांना आपले धडधाकट सासरे व त्यासोबत मायेची पाखर मिळण्याची खंत तेवढी राहिली. अशात बाबांची प्रकृती ठीक असती तर आमच्या कुटुंबाला खूप मोठा आधार मिळाला असता. दादाला शेतीत व घरात चांगली मदत झाली असती व पर्यायाने आमच्या लौकिक प्रगतीलाही गती मिळाली असती हे तितकेच खरे.

           जस तुम्ही आम्हाला पोरक करून गेलात तस तुम्हा एकूण ५ भावंडांमध्ये दोन थोरल्या बहिणी नंतर (आमच्या आत्या स्व. शांताबाई अंबाडकर (अचलपूर) आणि स्व. ताईबाई मेहरे (करजगाव) ) शेंडेफळ अर्थात भावंडांमध्ये सर्वात लहान असून हे जग सोडून जाण्यात तुम्ही तिसराच क्रमांक लावला. भावंडांमध्ये चौथा क्रमांक असणारे आमचे मोठे वडील श्री. प्रभाकरराव भुयार (७६) आणि आमची आत्या शकुंतलाबाई सिनकर (७३) यांनाही तुम्ही एकट टाकून गेलात. तीनही आत्या व मोठे वडील यांचं  तुमच्यावर विशेष प्रेम व जिव्हाळा होता ते त्यांच्या वागण्यातून आम्हाला आपसुकच कळायचं. याआजारपणात तुम्हाला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनाही हळहळ वाटत असे.

                  मरावे परी किर्ती रूपे उरावे

          वडिलांच्या आजारपणात ते बहुतेक वेळ टिव्ही बघायचे. त्यात सकाळच्यावेळी आवर्जून मराठी वाहिन्यांवरील किर्तन ते बघत असत. कधी नव्हे तो त्यांच्या आयुष्यात सतत किर्तन ऐकण्याचा योग आला. यातील बोधपर गोष्टी, तत्वज्ञान व प्रबोधन त्यांनी आत्मसात केले तसे त्यातील ज्ञानातून त्यांनी मरणोत्तर करावयाचे संकल्पही करून ठेवले. पहिला संकल्प होता मृत्यूनंतर आपल्या डोळयातून एखाद्याला ही सुंदर सृष्टीदिसावी म्हणून केलेला नेत्रदानाचा संकल्प तर दुसरा संकल्प होता की, मृत्यू नंतर आपल्या शरीराची राख व अस्थी अन्य कोण्या तिर्थस्थळी विसर्जित न करता आपल्या शेतात पुराव्यात आणि त्यावर झाड लावावी या माध्यमातून मी माझ्याच शेतात कायम विसावेल. शेवटच्या काळात ते या संकल्पांची आम्हाला सारखी आठवण करून देत असत. त्यांच्या संकल्पानुसार त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांचे नेत्रदान केले.त्यासाठी आमचे मामेभाऊ श्री. संदीप गणगणे यांनी सर्व समन्वय सांभाळून डॉ.गोतमारे यांच्याकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यापासून ते हरिना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मंडळी अमरावती येथीलच शासकीय  जिल्हा रुग्णालयाच्या टिमशी संपर्क साधून आमच्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान पार पाडले. हरिना फाऊंडेशनचे पंकज गुप्ता यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते व मरणोत्तर नेत्रदानाचे हे पुण्यकर्म जनतेपर्यंत पोचावे यासाठी त्यांनी श्रध्दांजली सभाही घेतली.

  अंत्य विधीच्या दुसऱ्या दिवशी वडिलांच्या संकल्पानुसार आम्ही त्यांची रक्षा आणि अस्थि सोबत घेवून आमच्या शेतात गेलो व विहिरी शेजारीच ही रक्षा व अस्थि पुरून त्यावर दशेहरी आंबा,बारमाही आंबा ,चिकु आणि जांभुळ ही चार झाड लावली. आम्ही सर्व भुयार कुटुंबातील भावंड आणि आमची मुल यांनी हा सर्व प्रसंग अनुभवला . ‘बाबा’, आता आमच्या शेतात या झाडांच्या माध्यमातून कायमच आमच्या सोबत असणार असून ते मुक मार्गदर्शन करणार आहेत .आम्हीही त्यांच्या शेजारी बसून मनोमन गुज गोष्टी करू आणि त्याची व्यवस्था बाबांनी संकल्पाद्वारे करून ठेवली होती यातून त्यांची सकारात्मक व दूरदृष्टी दिसून येते.

           बाबांच्या निधनापासून दशक्रियेच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही घरात खूप खेळीमेळीच व धार्मिक वातावरण ठेवल. दुसऱ्याच दिवसापासून (१६ एप्रिल २०२६) ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ पारायण सुरु केले. एकही दिवस खंड पडू न देता (२३ एप्रिल २०२६ रोजी सकाळ पर्यंत) ज्ञानेश्वरीचे संपूर्ण १८ अध्याय एकूण ९हजार ३७ ओव्या आणि श्रीमद्भ्गतवगीतेचे ९०७ श्लोकांचे पठण केले, माझ्यासोबत आमच्या काकु प्रतिभा नामदेवराव भुयार, मामी भारती अविनाश पोटदुखे आणि माझी पत्नी सोनाली व मुलगा स्वरित यांनी मिळून हे पारायण यशस्वीपणे पूर्ण केले. श्रोत्यांमध्ये आमची आत्या शकुंतलाबाई सिनकर, माझी आई ,मोठी आई  सुलोचनाबाई व सरलाबाई , काकु सुनिता भुयार,मनकरनाबाई काळे यांचा समावेश असे. नियमित 'सांप्रदायीक हरिपाठ' आणि गुरुदेव सेवा मंडळाची 'सामुदायिक प्रार्थना'ही आम्ही सर्वमिळून केली.  

या कालावधीत भजनी मंडळींची दोन भजनाचे कार्यक्रम आणि आमच्या नातेवाईक मंडळींच्या भजनाचा एक कार्यक्रमही आम्ही आयोजित केला.दशक्रियेच्या आदल्या दिवशी वडिलांना समर्पित प्रवचनसेवाही मी देवू शकलो.  या सर्व कालावधीत आमचं दु:ख कमी व्हाव म्हणून आमची नातलग मंडळी दररोज आमच्याकडे भोजणासाठी येत तसेच आप्त स्वकीय व मित्रमंडळींच्या सांत्वन पर भेटीही सुरुच होत्या. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून जुळलेला आमचा  अमरावती येथील ॲम्बिशीयस ग्रुप, माझ्या अपार्टमेंटच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी व अपार्टमेंटचे सदस्य आप्त स्वकीय यांनी दिलेल्या सदिच्छाभेट तसेच मेसेजेस व फोनद्वारे आलेले सांत्वनपर संदेश  या दु:खद समयी दिलासा देवून गेले.  

     'बाबा’, तुम्ही सामाजिक जाणीवेतून जीवन जगलात. गोरगरीब आणि वंचितांना मदत करण्याची तुमची वृत्ती बेमिसालच ठरली, ज्यांना ज्यांना तुम्ही मदत केली त्यांनी आमच्या जवळ या संदर्भातील किस्से सांगून आणि काही किस्से तुम्ही स्वत: सांगितल्याने तुमच्यातील जिंदादील माणूस कळला व तस बनन्याची प्रेरणाही मिळाली. कित्तेकांचे दवाखाने त्यांची सुश्रुशा त्यांना आर्थिक मदत केली. शिक्षण, जमीन व्यवहारासाठी लागणारी शासकीय प्रमाणपत्रे व दाखले गरीब व गरजुंना मिळवून  देण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असायचा, परिसरातील कित्तेक गरिबांचे अंत्यविधी तुम्ही स्वत:च्या पैशांतून केले त्यांना दशक्रीयेसाठी भटजी मिळत  नव्हता तेव्हा स्वत: हे विधी पार पाडल. दुर्बल घटकाची सेवा करण्याच्या भावनेतूनच एकदा तुम्ही अचलपूर नगरपरिषदेची नगरसेवक पदासाठी निवडणूकही लढवली. पण इथे मात्र अपयश आले. आम्हीही तुम्हाला मिळालेल्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हांवर आधारीत घोषवाक्याद्वारे प्रचार केल्याचे आजही स्मरते. 

     पंचक्रोशीतील संत्रा  व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत तुमचा चांगला संवाद होता. त्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी कित्तेकदा देशाच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यात तुम्ही शेतमाल घेवून गेलात व त्याची विक्रीकरून तुम्ही शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून दिला. स्वत:ही दोन ट्रक खरेदीकरून संत्रा व कांद्या विक्रीचा व्यापार नफा व तोटयाचे गणित सांभाळून केला. शेतात संत्रा व अमराई ( ५० च्यावर ‍विविध वाणांची आंब्याची झाडे) व पारंपरीक खरीप व  रब्बीची पिकेही घेऊन नफ्या तोटयाची गणित सांभाळली.

      आई-वडिल आणि आम्ही तिघ भावंड असं आमच छोट कुटुंब होत.वयाच्या १५ व्या वर्षी आमची थोरली बहिण शुभांगीताई पोलिओ आजाराशी झुंज देवून आम्हाला सोडून गेली आणि दोन्ही मुलांची आपापल्या क्षेत्रातील प्रगती, सुना व नातवंड डोळेभरून बघून आता वयाच्या सत्तरीत तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्हा दोघांची आठवण सतत येत राहील मात्र उणिव कायम भासत राहिल. तुमच्याकडून मिळलेल्या चांगल्या संस्कारातून आम्ही मार्गक्रमण करीत राहू व आमच्या नावासोबत जन्माने जोडलगेलल तुमच नाव सदैव सार्थक करीत राहू हाच विश्वास व्यक्त करून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

                       ०००००० 


Saturday, April 4, 2026

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’








विशेष लेख :-


       लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'साधना सप्ताह' अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

          आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात होत असलेला वापर पाहता राज्य शासनाचाही तंत्रज्ञानाधारित कार्यक्रमात पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या गतिमान प्रशासनाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात 100 दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम आणि 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या पाठोपाठ आता केंद्रशासनाचा 'साधना सप्ताह' राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच विभागीय आयुक्त कार्यालये आणि विभागांतर्गत येणारे जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद आदींमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताह अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा यासह प्रशासनातील विविध विभागामध्ये सक्षमपणे कार्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'TECH-वारी 2.0' या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

      'कर्मयोगी भारत' हा केंद्र शासनाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म व अभिनव राष्ट्रीय उपक्रम आहे. तंत्रज्ञान‑आधारित शिक्षणाद्वारे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता,कौशल्य आणि शासनक्षमता वाढविण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने 'साधना सप्ताह' अंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्म वरील तंत्रज्ञानाधारित 50 प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तयार केली आहे. या सप्ताह अंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यादीतील एकूण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी किमान चार तासांचे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये 'लोकप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता', 'आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूळ बाबी : शिकणे, उपयोग आणि नैतिकता', 'प्रशासनासाठी जबाबदार एआयचा उपयोग', 'सर्वांसाठी युवा ए आय' असे एकूण 44 मिनिटे ते 46 तास काल मर्यादेचे एकूण  50 प्रशिक्षण कार्यक्रम कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महासंचालकांच्या पुढाकाराने माहिती व जनसंपर्क विभागातही ‘साधना सप्ताह'

        केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रशासकीय क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेला ‘साधना सप्ताह’ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या विभागात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये, मुंबई येथील या विभागाचे मुख्यालय तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि पणजी येथील कार्यालयांमधील  1002 अधिकारी-कर्मचारी 'साधना सप्ताह' अंतर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. महासंचालक ब्रिजेस सिंह यांनी या संदर्भात बैठक घेऊन विभागाला सूचना दिल्या आहेत.

माहिती संचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही साधना सप्ताहाचा उत्साह

         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही 'साधना सप्ताह' अंतर्गत विभागातील एकूण 174 अधिकारी- कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यापूर्वी विभागातील शिपाई, वाहन चालक या वर्ग 'ड' पासून वरिष्ठ वर्ग 'अ' पर्यंतच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भारत पोर्टलवरील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये विशेषतः अमरावती विभागातील अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी  390 तास काल मर्यादेचे 294 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नागपूर विभागातून गडचिरोली चे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी 60 तास काल मर्यादेचे एकूण 63 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. साधना सप्ताहातही नागपूर अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी हिरीरीने भाग घेऊन विहित काल मर्यादेचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले आहे.

      बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या नव्या आव्हानात्मक विषयांचा परिचय होऊन प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे व गतिमानतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्या यासाठी केंद्र शासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यभर राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय भाग घेऊन जनता व शासनाप्रती आपली प्रतिबद्धता दृढ करण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे. 


रितेश मोतीरामजी भुयार, 
माहिती अधिकारी, 
 माहिती व जनसंपर्क नागपूर. 
     
              O00000



 

Wednesday, February 11, 2026

…ती ‘आई’ होती म्हणुनी…



    गोठयात उभी एक गाय जिने दोन दिवसांपासून चारा खानं सोडला आणि दुसरीकडे तिच्या कालवडीच्या डोळयातून ओघवत असलेले अश्रू पाहतांनाचा क्षण बरच काही सूचवून आणि शिकवून गेला. मुक्या प्राण्यांना भावना असतात आणि जे हात त्यांची नेहमी काळजी घ्यायचे चारा व पाणी दयायचे ते आता दिसेनासे झाल्याने त्यांची ही अवस्था झाली होती. ती व्यक्ती म्हणजे आमची सर्वांची लाडकी ‘बुट्टी’ अर्थात जयश्री भुयार-नवले. तिचे अकाली निघून जाणे (गुरुवार,५ फेब्रुवारी २०२६- वय ४२ वर्ष ७ महिने) हे तिच्या तीन मुली आणि पतीला (आमचे जावई) जसे पोरके करणारे होते तसेच ते आम्हा भुयार परिवारालाही मुलगी सोडून गेल्याचे अपरमित दु:ख देणारे ठरले.

         मुळात तिच्या जाण्याने एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुलींना आई, पतीला पत्नी , सासुला सून पोरकी झाली आहे तसे ती बहिणी, आई, काकु,भाऊ असा मोठा आप्त परिवार पोरका करून गेली आहे. गावात सर्वांना मदत करणारी , बोलकी आणि धाडसी महिला म्हणून ओळख असणाऱ्या जयश्रीने स्वकृत्वाने आपली ओळख निर्माण केली. रुढ अर्थाने नोकरी, राजकारण,शिक्षण आदी क्षेत्रातील वावरानेच माणसाची ओळख निर्माण होते हे आपण पाहतो. मात्र, कतृत्व आणि मितभाषी स्वभाव या गुणांआधारेही तुम्ही स्वत:ची छाप पाळता व सर्वप्रिय होता हे जयश्रीच्या अकाली जाण्याने समाजातील विविध लोकांच्या प्रतिक्रियांमधून अधोरेखित झाले.

         तिच्या जाण्याने घरातील गुरं, शेजारची गोंडस लहानगी चिऊ, ज्योत मंदिराचा भव्य सप्ताह आणि तिच्या पोटची लेकरं हे कायमचे पोरके झाले होते. चिऊचा वावर सतत जयश्रीच्या घरात व्हायचा व आपल्या तीन मुलींचा उत्तम सांभाळ करणारी ही माऊली आता चिऊचीही काळजी घेऊ लागली. तिला खेळवू लागली. त्यांना एकमेकींचा लळाच लागला होता. ज्या गिरणीच्या भरवश्यावर जयश्रीने संसाराचा रथ लिलया पेलला आणि स्वप्नातील घर प्रत्यक्षात उभारल त्या गिरणीतच चिऊ कितीदा दळणाचे पीठ खात असे व जयश्रीही त्याची परवानगी देवून चिऊच्या चेहऱ्यावर पिठाची रांगोळी काढत असे. जेमतेम दीड दोन वर्षांची चिऊ जिला हे आनंदाचे क्षण हवे हवेसे वाटत होते त्याला आता कायमचा थांबा बसला. कालांतराने ती मोठी होईल तेव्हा तिला या आनंदाच्या क्षणाबद्दल कोणी सांगेलही. पण, आताच्या घडीला ती संभ्रमात पडली असेल. तिचे बालसुलभ मन आता त्या क्षणांचा आनंद घ्यायला मुसमुसले असेल. तसेच गोठयातील त्या माय-लेकरांचेही झाले असेल.त्यांचा सांभाळ करणारे हात आज त्यांच्या आजुबाजुला दिसत नसल्याने त्यांची तगमग सुरु आहे. त्यांच्या सभोवताली आधी असलेलं आनंदी वातावरण आता दु:खात परावर्तीत झाल्याचे त्या मुक्या जिवांना प्रकर्षाने जाणवत असल्यानेच एकीने चारा खानं सोडून तर दुसरीने आसवांना वाट मोकळी करुन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

       ‘ज्योत मंदिर’ हे पणज गाव आणि पंचक्रोशितील ( जि.अकोला,ता.अकोट) प्रसिद्ध धार्मिक स्थळ ठरत आहे.या ठिकाणी तुपाचा सतत तेवत राहणारा दिवा येथे येणाऱ्या भाविकांना सतत तेवत राहण्याची ऊर्जा देवून जातो. घराच्या भिंतीलाच लागूण असणाऱ्या या ज्योत मंदिराशी जयश्रीचं भावनिक व धार्मिक नात जुळलं होतं. जेव्हा केंव्हा तिच्याशी बोलण व्हायचं तेंव्हा तिच्या बोलण्यात या मंदिराचा आवर्जुन उल्लेख येत असे आणि त्यासोबतच या मंदिरात दर्शनासाठी ये असे निमंत्रण वजा आवाहनही असे. याच मंदिराचा उत्सव येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार होता, विशेष म्हणजे याच उत्सवादरम्यान जयश्रीचा जाहीर सत्कारही होणार होता. तो आता कधिही होणार नाही हे कटुसत्य सर्वांनाच पचवता येत नाहीये. या मंदिरासाठी काही जागा जयश्रीच्याच पुढाकार व आग्रहाने देण्यात आली म्हणूनच दात्यांच्या यादित तिचे नाव कोरले गेले आहे.आणि आता या उत्सवासाठी जवळपास 35 गव्हाच्या पोत्यांच्या दळणापैकी तिने जाण्याच्या दिवसापर्यंत जवळपास 25 पोते गव्हाचे दळण दळले होते व उर्वरीत दळणही ती नि:शुल्क दळणार होती. जागा दान देणे व नि:शुल्क दळण दळून या उत्सवाला हातभार लावण्यामुळे तिचा सत्कार होणार होता. मात्र,या उत्सवाच्या चार दिवस आधी तिच्या दुर्देवी निधनामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करून जयश्रीप्रती कृतज्ञभाव दर्शविला. उत्सवासाठी तयार करण्यात आलेले मिष्ठान्न (बुंदी) नजिकच्या मंदिरांमध्ये गजानन महाराज प्रगटदिन कार्यक्रमासाठी व शेगाव येथील गजाजन महाराज मंदिरात कणकेची पोती पाठविण्यात आली.

       घरावर कोसळल संकट 

        आई गेल्याने तिची तीन पिल्लं आता कायमची पोरकी झाली आहेत. मोठी मुलगी  श्रुतिका (छकुली) धाय मोकलून रडत होती व आई वर गुदरलेला हा प्रसंग सांगत असतानाच जयश्रीचा समजुतदारपणा व धाडसी स्वभाव तिच्या व्यक्तीमत्वात दिसून आला. तिने सांगितले की, गिरणीच्याच भरवशावर आईने हे घर उभं केल आणि त्यापूर्वी आमच्या जावई बाप्पुंनीही याचा तोंडभरून उल्लेख केला होता. गेल्या आठवडाभरापर्यंत तिने या घराचे उर्वरित बांधकाम,छपाई,रंगरंगोटी करून घेतली.या घरात गेल्या वर्षी आम्ही आईसोबत दसरा,दिवाळी असे सर्व सण साजरे केले. प्रत्येक दिवाळीला एक ड्रेस आमच्या वाटयाला येत असे यावेळी हात सैल करून आईने आम्हा तिघिंना प्रत्येकी दोन ड्रेस घेतले. बाबांचा वाढदिवस दणक्यात केला, रोडग्यांचं (कणकेच्या गोळयापासून बनविण्यात येणारा पोळी वर्गीय पदार्थ) जेवण दिलं. रात्रीचे जेवण आटोपल्यावर माझ्या दोन्ही धाकटया बहिणींसोबत ती एकाच मोबाईलवर रिल पाहत असे. एवढयात ती स्वत:वर आणि आमच्यावरही खूप खर्च करायला लागली होती. दु:खद बाब म्हणजे माझी दुसऱ्या क्रमांकाची बहिण गौरीचा वाढदिवस आई गेली त्याच दिवशी होता. त्या उद्विगनेतून तिने तर देव्हाऱ्यातील देव फेकून देत राग व दु:ख व्यक्त केले होते. सर्वात धाकटी रेणुकाही आई गेल्याच्या धक्क्यातून सावरली नाही अजून. मी आयबीपीएस अर्थांत बॅंकींगची परिक्षा दिली प्रिलिमरी एक्झाम पास केली आता मेन्स आहे. पण, नाही देणार मी एक्झाम माझ मनच उडून गेलं आता काही करण्याबाबत. यावर आम्ही सांगितलं की, 'आता तुला थोरली बहिण म्हणून आईच्या जागी त्यांना धिर दयायचा आहे व त्यांचा सांभाळ करायचा आहे.' आणि तुला आयबीपिएस मेन्स दिलीच पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आम्ही तिला आश्वस्त केले.

      आता पोरकी झालेली ही तीनं पील्लं आपलं आयुष्य केवळ आईने दिलेल्या संस्काराच्या पुंजीतून जगणार आहेत.पतीवर मात्र आता घर चालविण्याची व आईची पाखर या पिल्लांवर घालण्यी दुहेरी जबाबदारी पडली आहे. 

           पती हाच परमेश्वर ; कृतीशील परिचय 

जयश्रीच्या मुली सांगतात की, 'आमची आई फारशी देवपूजेत रमायची नाही. मात्र, दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आमच्या वडिलांचे दर्शन घेऊनच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे'. तिची ही कृतीतर अल्प शिक्षण झालं असलं तरी तिची विचारसरणी ही काळाच्या पुढे जाणारी होती हे दर्शविते. यातून मुलींनाही आपसूक बाळकडू मिळाले व खरा देव माणसात आहे ही संतांची शिकवण तिने कृतीतून मुलींना दिली हे ठळकपणे दिसून येते. ती शरीर यष्टीने जाड होती, पण याच तिला अजिबात वाईट वाटायचं नाही. आम्ही गंमतीने तिला याबाबत खोड काढायचो तेव्हा ती त्याच आत्मविश्वाने सांगायची , आमच्या यांना मी आहे तशीच आवडते मग मला इतरांच काही देणं घेण नाही.' या दोन्ही कृतीतून पती-पत्नी मधील संमजसपणा ,प्रेम व नात्याची घट्ट वीण ठळकपणे दिसते.

     सासु बाईंनाही प्रेमळ व होतकरु सुनेच्या नसन्याची सल त्यांच्या यजमानांच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. पण या सर्वांना या अपरमीत दु:खातून सावरुन सक्षमपणे उभे रहावे लागणार आहे व जयश्रीच्या आठवणी व तिच्या चांगुलपणाची चळवळ पुढे घेऊन जावी लागेल.  

              ही वाट दूर जाते

         आम्ही सर्व भावंड अचलपुरातील (जि. अमरावती) विलायतपुरा भागातील दानाखोरीत लहानाची मोठी झालो. बालपणात भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. माझे मोठेबाबा दिवंगत अर्जुनराव भुयार आणि मोठी आई श्रीमती सरला भुयार यांच्या पोटी पाच मुलींनी जन्म घेतला. श्री. अर्जुनरावांनी स्वत:ची चहाची टपरी उघडून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून इमाने इतबारे काम करून संसाराचा गाडा ओढला. 

     घरी अठरा विश्वे दारिद्र्य आणि त्यात पाच लेकींचा सांभाळ त्यांचे शिक्षण अशी जबाबदारी आली. मी तेंव्हा मामांकडे शिकायला होतो. मग उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अचलपूरला माझ्या गावी यायचो तेंव्हा आम्ही सर्व भावंड सोबत खेळायचो. विशेष करून मी या बहिणींच्या गोतावळ्यात असायचो. मला आठवते तेंव्हा पत्त्यांचा खेळ खेळायचो आम्ही (बिटफुल बहुदा) तेंव्हा जयश्रीचा खेळात जास्त उत्साह असे. घरा शेजारीच आमची वाडी (छोटे शेत) होती तिथेही आम्ही सर्व भावंड खेळायला जायचो. पुढे शिक्षणासाठी माझा प्रवास एका गावातून दुसऱ्या असं सुरू होत. तस तसा मी अचलपूर पासून लांब जात होतो. अशात इकडे या पाच बहिणी थोड बहुत जुजबी शिक्षण घेऊन लग्न या आयुष्यातील महत्वाच्या जबाबदारीला सामोऱ्या गेल्या. गरीब परिस्थिती असताना चांगली स्थळ आली व एका मागून एक लग्नाची जबाबदारी पार पडत गेली .पाच बहिणी पैकी जयश्रीच लग्न क्रमाने तिसरं.

      आता मी मामाकडे शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील भास्कर महाराज संस्थान, द्वारकेश्वर येथे वारकरी शिक्षण व सर्वांगीण विकास शिबिरात जायचो. अशातच जयश्रीच्या आग्रहाखातर तिचं नुकतंच लग्न झालं असताना शिबिरातून गावी परतताना तिच्या पणज या गावी गेल्याचं मला आठवतं. तिचे सुविध्य पती (आमचे जावई) सासू-सासरे, दीर अशा सर्वांशी गप्पा झाल्या. लग्नानंतर आपल्या घरी भाऊ आल्याचा आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होत. उन्हाळा असल्याने माझ्यासाठी आंब्याच्या रसाचा खास पाहुणचार केला होता ते स्मरते (तेंव्हा कदाचित इयत्ता १२ वीत असेन, मी.).

        पुढे शिक्षणासाठी अमरावती, पुणे अन् नोकरीसाठी दिल्ली असा प्रवास करत मी अचलपूरपासून अधिक लांब जात गेलो. शासकीय नोकरीत आलो. लग्न झालं. आमच्या घरात मुलांमध्ये माझच पहिलं लग्न. त्यामुळे आमच्या बहिणींना लग्न एन्जॉय करायची नामी संधी. यात जयश्रीने सर्वात जास्त मज्जा केल्याचे मी बघितले. मांडवात नवरदेव जाण्यापूर्वी व गावात मिरवणुकी दरम्यान जयश्रीने माझा हात धरून अक्षरशः कमाल डान्स केल्याचे मला आठवते. लग्नाच्या त्या दोन-तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये तिने धमाल डान्स केल्याचे व पुढेही माझ्या नंतर झालेल्या माझ्या भावांच्या लग्नामध्येही तिचा उत्साह आणि ठसकेबाज डान्स सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी होती. तिचं वागणं- बोलणं खूपच मोकळ धाकळ आणि स्पष्ट होतं. 

     परत विधिवत चतुर्भुज झाल्यानंतर (लग्न झाल्यावर) मी दिल्लीत गेलो. मग अधे-मधे दिवाळीत वगैरे भाऊबीजेला जयश्रीची भेट व्हायची. आता दिल्लीहून परतलो नागपुरात नोकरीत व्यग्र झालो. अशात भेट झाली तेव्हा जयश्री म्हणायची, 'आता आपल्या भागात आला बरं झालं !आता तरी ये आमच्याकडे मुक्कामी.' दिल्लीहून नागपूरला येऊन मला तीन वर्ष झाली. मात्र, तिच्याकडे जायचा योग आला नाही. आणि आता तिच्याकडे जावं लागलं तेव्हा तिच हे जग सोडून गेली होती. हे तिचं जायचं वय नव्हतं.अजून आयुष्याचा बराच चित्रपट बाकी होता त्या आधीच तीने इंटरवल साधला आणि आम्हा सर्वांना पोरक व निशब्द करून गेली, एवढ्यात तुला श्रद्धांजली वाहण्याचं धाडसच नाही होत.

    तुझ्या जाण्याने तुझी तीन पिल्लं आणि तुझ्या घरातील गाय वासरु यांना थेट झळ पोहोचली. तुझ्याशी या सर्वांचा असलेला भावनिक व मायेचा संबंध याची मोजदात नाही.

  आई सोडून गेल्याने तिच्या लेकरांची होणारी हिच तगमग मांडण्यासाठी कवी ग्रेस यांच्या कवितेचा आधार घेऊन येथे थांबतो.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो

त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता.....


                                             ००००००

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार ; 352 तालुक्यात सकारात्मक बदल !



 






 कोणत्याही राज्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी भुजलाचा स्तर चांगला असणे गरजेचे असते. भूजलस्तर सुधार म्हणजे दुष्काळापासून मुक्तता हा मंत्र ठरला आहे. राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा हाच ध्यास व मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उराशी बाळगून वर्ष 2015 च्या सुरुवातीलाच ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून भूजलस्तर वाढून राज्यात दुष्काळी भागाची स्थिती सुधारली. या कार्यक्रमाला जोड म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वात राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’,‘अटल भूजल योजना’ आणि ‘जलजीवन मिशन’ ची अंमलबजावणीही प्रभावीपणे होत आहे. परिणामी केंद्रशासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिते प्रमाणे विहित कार्यपद्धतीत अंतर्गत भूजल दुष्काळ निर्देशांकानुसार वर्ष 2025 अखेर राज्यातील 353 तालुक्यांपैकी 352 तालुक्यात दुष्काळ नसल्याचे व भूजल तूट वर्गवारी सामान्य असल्याची आणि मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर 1.52 मिटरने वाढल्याची सुवार्ता पुढे आली आहे. 

      राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत शेतीच आहे तर 82 टक्के भूभाग हा पावसावर अवलंबून आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही गावांमध्ये अनिश्चित व अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानावर आणि शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत असल्याचे चित्र होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळीत होणारी तूट भरून काढण्यासाठी व या सर्व परिस्थितीत कृतीशील कार्याद्वारे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 26 जानेवारी 2015 रोजी राज्यात ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात झाली. 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उदिष्टातून लोकसहभागाद्वारे सूक्ष्म सिंचन आणि पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात झाली. स्थानिक जलप्रवाहांना मोठया जलप्रवाहांशी आणि नैसर्गिक प्रवाह उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या तयार करून जलप्रवाहांशी जोडण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाची आवक होऊन हे पाणी संवर्धनासाठी सूक्ष्म जलसाठयांमध्ये वाहून नेण्यात येऊ लागले. उपलब्ध जलप्रवाहांचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि गावांमध्ये नवीन जलप्रवाह निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

        नद्यांच्या तळांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यावर भर देण्यात आला. पाण्याची झिरपण रोखण्यासाठी तलाव, तळी, शेततळे आणि कालव्यांमधून गाळ काढण्यात आला. चेकडॅम, कालवे, लहान तलाव आणि सार्वजनिक व खाजगी विहीरी बांधण्यात आल्या. पावसाच्या पाण्याची साठवण करण्यात आली. विशेष करून दुष्काळी भागात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. शेतीसाठी कार्यक्षमतेने पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आणि मोठया प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले. परिणामी 2019 पर्यंत राज्यात अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन 19 हजार 655 गावे कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त झाले. याकाळातच 22 हजार 539 गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या 6 लाख 32 हजार 896 कामांद्वारे 27 लाख 8 हजार 279 टीएमसी जलसाठा क्षमता निर्माण होऊन 39 लाख 4 हजार 394 हेक्टर सिंचन क्षमतेचा भूभाग निर्माण झाला. याद्वारे 29 हजार 544 गावांना पाणी पुरवठा करण्याचे लक्ष पूर्ण झाले. लक्षणीय यशानंतर पुन्हा 3 जानेवारी 2023 पासून राज्यात ‘जलशिवार योजना’ (2.0) सुरु करण्यात आली.

    प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने वर्ष 2015-16 पासून 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना' सुरू केली. राज्याच्या 34 जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्याच्या 60:40 हिश्श्याच्या अर्थसाहाय्याद्वारे ही योजना सुरु आहे. 

         माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जन्मदिनी 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजना’ सुरु केली. जागतिक बँकेच्या सहकार्यातून केंद्र शासनाने या योजनेसाठी 6000 कोटी रुपयांस मंजुरी दिली होती. लोकसहभागातून या योजनेत अंतर्भूत सर्व 78 जिल्ह्यांमधील 8350 ग्राामपंचायतींचा भूजल आराखडाही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

        ‘जल जीवन मिशन’ या केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या योजनेमुळेही ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला सुरक्षित, शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी नळजोडणीद्वारे नियमितपणे उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे.15 ऑगस्ट 2019 रोजी सुरु झालेल्या या योजनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन’ सुरु करण्यात आले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच अन्य विभागांच्या समन्वयाने व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या मान्यतेने जल जीवन मिशन चे जिल्हास्तरीय आराखडे तयार करण्यात येतात.

 या सर्व प्रयत्नांतून राज्यातील दुष्काळी परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल दुष्काळ निर्देशांकात ते प्रकर्शाने दिसते. त्याविषयी जाणून घेवूया.

अशी होते भूजल पातळी जाहीर

   राज्याच्या महसूल व वनविभागाचा ७ ऑक्टोबर २०१७ चा शासन निर्णय आणि केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ च्या अनुषंगाने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने वनस्पती निर्देशांक, मृद आर्दता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेण्यात येतात.

      यातील जलविषयक निर्देशांक हा राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत व पुणे स्थित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) द्वारे तयार करण्यात येतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक गरजांसाठी भूजलाचे सर्वेक्षण, संशोधन, नियोजन आणि विकास करणारी ही यंत्रणा तालुका निहाय भूजल दुष्काळ निर्देशांक तयार करून या निर्देशांकाचे मूल्य व त्यानुसार भूजल तुटीची वर्गवारी दर तीन महिन्याने जाहीर करते.

     राज्यात एकुण 3920 निरिक्षण विहिरी स्थिर भूजल पातळीच्या मोजपासाठी स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ऑक्टोबर 2025 मध्ये 3665 निरीक्षण विहिरींची माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार वर्ष 2025 चा भूजल पातळी निर्देशांक काढण्यात आला आहे. यात राज्यातील 33 जिल्ह्यांतील 352 तालुक्यांमध्ये भूजल पातळी 0.15.च्या आत असून भूजल तुटीची वर्गवारी सामान्य असून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात हा निर्देशांक 0.16 ते 0.30 दरम्यान असल्याने भूजल तुटीची वर्गवारी सौम्य वर्गात समाविष्ट आहे. 0.60 पर्यंत एकूण पाच स्तरांमध्ये भूजल पातळी निर्देशांकानुसार सामान्य, सौम्य, मध्यम, गंभीर आणि अती गंभीर अशी भूजल तुटीची वर्गवारी काढण्यात येते.

भूजल स्तरात 1.52 मिटरने वाढ

मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर 1.52 मिटरने वाढला असून राज्याच्या दृष्टीने ही महत्वाची उपलब्धी आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील कोणताच तालुका मध्यम, गंभीर आणि अती गंभीर भूजल तुटीच्या वर्गात नसल्याने हे सकारात्मक चित्र आहे.

     भूजल पातळी निर्देशांकानुसार भुजलाच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडल्याचे दिसून येते. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमधील सर्वच तालुके सामान्य भूजल तुटीच्या श्रेणीत आहेत. त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्येही भूजल तूट स्थिर असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमधील तालुक्यांचा यात समावेश आहे.



              भुगर्भातील जल हे शाश्वत आहे. शेती, पिण्यासाठी, पर्यावरण आणि उद्योगासाठी आपणास ते वर्तमानकाळात टिकवून भविष्यासाठीही राखून ठेवायचे आहे. त्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने सुरु झालेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आणि राज्यातील दुष्काळ कायमचा नष्ट करण्यासाठी‘नदी जोड प्रकल्प’ राबविण्याच्या कामालाही गती प्राप्त झाली आहे. त्याचा परिणाम होऊन झालेले बदल भूजल पातळी निर्देशांकातील आकडयांद्वारे अधिक स्पष्ट झाले आहेत. या योजनांसह केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने राज्य मार्गक्रमण करीत आहे.


रितेश मो.भुयार,
माहिती अधिकारी, 
 माहिती व जनसंपर्क नागपूर.

               ०००००

Friday, January 16, 2026

‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण
























 विशेष लेख :


       ‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी स्वाभीमान आणि देश रक्षणासाठी दिलेले बलिदान अनन्य साधारण आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही देशासाठी शहादत दिली. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे स्मरण करणारा आणि गुरुंनी देशासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकणारा हा लेख…


            कश्मीरचा सुभेदार हा शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांच्या मदतीसाठी गेला. ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) कश्मीरींच्या रक्षणासाठी गुरु तेगबहादुर साहिब यांनी थेट तत्कालीन सत्तेला आवाहन दिले व दिल्लीकडे कुच केली. आग्रा येथेच तेगबहादुरांना अटक करण्यात आली.दिल्लीला आणून त्यांना धर्मांतराची बळजबरी करण्यात आली. गुरु तेगबहादुरांनी त्यास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान इतिहासात अमर झाले व भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी बलिदान देऊन मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.

             श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या देश व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाल गुरु तेग बहादुरांच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी तत्कालीन सत्तेला आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी सत्ताधाऱ्यांच्या आज्ञेनुसार गुरु तेगबहादुरांचे शिर अमानुषपणे धडापासून वेगळे करण्यात आले आणि ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार पाडेल त्याला व त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा करण्यात येईल,’ असा फतवा काढला. 


      अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी धडपडू लागले. सत्तेची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे ‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांच्या सुपूर्द केले. इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज गुरुद्वारा’उभा आहे.


त्याग व शौर्याचे प्रतीक ‘सीसगंज’ आणि ‘रकाबगंज’ गुरुद्वारा


               सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा भारतीयांचे मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे, तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित आहे.


                शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्युनंतर बकाला येथे जाऊन विरक्त वृत्तीने राहू लागले.


         शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह यांचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह म्हणून ते उदयास आले.


तेगबहादुर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचे बलिदान


             देशहितासाठी प्राणांचे बलिदान देणारे गुरु तेग बहादुर यांनी मोठा आदर्श घालून दिला. त्यांचीच शिकवण पुढे घेऊन जात त्यांच्या कुटुंबीयांनीही बलिदान दिले. आनंदपूरच्या लढायांनंतर सरदार वजीर खानाने गुरू गोविंदसिंग यांच्यावर हल्ला केला.यात मोठे दोन साहिबजादे अजीतसिंग आणि जुझारसिंग यांनी सरदाराच्या सैन्यासमोर शौर्याने लढत वीरगती प्राप्त केली. छोटे साहिबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांना त्यांच्या आजी माता गुजरीजींसोबत सरहिंदच्या थडग्यात कैद करण्यात आले. वजीर खानाने त्यांना थंडीच्या रात्री उघड्यावर ठेवले आणि नंतर जिवंतपणे भिंतीत बंद करून मारले. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने २१ ते २७ डिसेंबर हा 'बलिदान सप्ताह' आणि २६ डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' म्हणून घोषित केला व देशभर तो साजरा केला जात आहे. शिखांचे दहावे व शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांनी १४ युद्धे लढली. १७०८ मध्ये नांदेड येथे देश रक्षणासाठी लढताना ते शहीद झाले.


            गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या सद्विचारांचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.


       ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. विदर्भ आणि छत्तीसगढ मधील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मीकी आणि सिंधी समाजबांधवानी एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा केला.     


 श्री हुजूर साहिब नांदेड


                 शीखांचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.


  नांदेडमध्ये देहरुपी गुरु जाऊन गुरुग्रंथ साहिबची स्थापना झाली. नांदेड येथील बंदासिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रेरणेने पंजाबात जाऊन परकियांशी लढा दिला व प्रशासक बनले. त्यांनी सरहिंद जिंकून शेतकऱ्यांना जमीन मालकीचा अधिकार दिला आणि स्वराज्याची पायाभरणी केली.


गुरू गोविंद सिंग यांनी १७०६ मध्ये ‘जफरनामा’ हे पत्र लिहून सत्ता प्रमुखाला नैतिकतेचे आव्हान दिले. हे पत्र फारसी भाषेत असून, त्यात सत्ताधिशांच्या विश्वासघातकी वर्तनाचा, जुलूमांचा आणि शीखांवर केलेल्या अत्याचारांचा समाचार घेतला. पत्र वाचून बादशाहने गुरूजींना सन्मानाने आणण्याचा आदेश दिला, पण गुरूजींनी ते नाकारले. हे पत्र शीख इतिहासातील विजयाचे प्रतीक मानले जाते.


            मराठवाडयातील नरसी नामदेव हे थोर वारकरी संत, संत नामदेवांचे जन्म गावही याच भागात आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या विस्ताराकरिता देशभ्रमण केले. पंजाबात गेले असता त्यांच्या उद्बोधनाने सर्व समाज भारावला त्यांच्या ६१ अभंगांचा शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.


            श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा देशरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मिकी उदासीन आणि गुरुनानक नामदेव संगत, तखत नांदेड गुरुसाहेब यांचा समावेश असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना आणि मराठवाडयातील शीख व अन्य समाज बांधव मोठया संख्येने यात सहभागी होणार आहेत. गुरु तेगबहादुरांच्या कार्याची महती पोचविण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, गीते, डाक्युमेंटरी प्रदर्शीत करण्यात येत आहेत. या सर्व आयोजनातून ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे महान विचार आणि अजोड कर्तृत्वाचा परिचय जनतेला होणार आहे.

                                                                                                                                                                                                           

                 रितेश मो.भुयार,                                                                                                 

               माहिती अधिकारी,                                                                                                

   माहिती व जनसंपर्क, नागपूर.


                                              ००००००